छंदिष्ट मी

Submitted by nimita on 21 April, 2020 - 21:17

यावेळी आमच्या साहित्य कट्ट्याच्या मुख्याध्यापकांनी खूपच अवघड विषय दिलाय लिहायला .... प्रत्येकाला आपल्या छंदांबद्दल लिहायचं आहे !! विषय कळल्यापासून डोक्यात नुसता धुमाकूळ चाललाय विचारांचा ! काय लिहू ; कुठून सुरू करू ? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे लिहिण्यासारखं काही आहे का?

नाही, म्हणजे तसे माझे छंद बरेच आहेत...पण त्यांना 'छंद' म्हणावं का 'फावल्या वेळातले उद्योग' हे अजून ठरत नाहीये. म्हणून मग 'छंद' या शब्दाची व्याख्या समजून घ्यायचं ठरवलं आणि त्या दृष्टीनी शोध सुरू केला.(माझा लेख इतक्या उशिरा share करण्यामागचं हे मुख्य कारण आहे.)

त्या शोध मोहिमेतून जे काही थोडंफार कळलं ते म्हणजे - जी कृती केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि आपला वेळ सत्कारणी लागतो ती कृती 'छंद' या सदरात मोडते! हे कळल्यानंतर तर माझ्या मनातला गोंधळ कमी होण्याऐवजी अजूनच वाढला. कारण आपल्या रोजच्या जीवनात आपण अशा कितीतरी गोष्टी करतो ज्यांनी आपल्याला आनंद मिळतो आणि बऱ्याच वेळा आपला वेळही सत्कारणी लागतो.... पण म्हणून त्यांना छंद म्हणणं योग्य ठरेल का ?

असो, आता पुन्हा मुख्य मुद्द्याकडे वळते... 'छंद' हा शब्द ऐकल्यावर माझं मन भूतकाळात जातं.... आमच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की आमची आई वेगवेगळ्या 'छंद वर्गांत' आमची नावं नोंदवायची .. दिवसभराच्या आमच्या कटकटीतून तिची काही काळ तरी सुटका व्हावी या हेतूनी ही असेल कदाचित ! पण त्यामुळे मी माझ्या शालेय जीवनात बरंच काही शिकले. तेव्हा पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात हे असे सुट्टीतले छंद वर्ग चालायचे. त्या सुट्ट्यांमधे मी कापडी खेळणी तयार करणे (आत्ताची stuffed toys), मेणाची फळं बनवणे, भरतकाम एवढंच नाही तर अगदी भेटकार्ड (आत्ताची ग्रीटिंग कार्ड्स) कशी बनवायची हे सुद्धा शिकले. या कलाकुसरी बरोबरच टिळक टॅंक मधे रिसबुड सरांकडून पोहायला शिकणे, आपटे प्रशालेत सकाळी सकाळी judo च्या क्लासला जाणे, योग विद्या धाम मधे जाऊन योगाभ्यास शिकणे हे देखील त्या छंद वर्गांत समाविष्ट होतं. तेव्हा हे सगळं शिकताना खूप मजा यायची, पण यातलं काहीच मी पुढे छंद म्हणून जोपासलं नाही. हं, त्यातला योगाभ्यास मात्र अजूनही अगदी मनोभावे करते. पण तो तर व्यायामाचा एक प्रकार आहे- छंद नव्हे!

पण माझ्या सध्याच्या काही छंदांची बीजं मात्र माझ्या लहानपणीच माझ्या मनात रुजली होती हे नक्की!

माझ्या काही मित्र मैत्रिणींच्या मते मला 'घर आवरण्याचा' छंद आहे. गंमत म्हणजे त्यांना जो छंद वाटतो ती माझ्यासाठी एक मूलभूत गरज आहे! पण माझ्या या मताचं खंडन करत माझी एक अगदी जवळची मैत्रिण म्हणते," घर आवरणं ही गरज असते, पण तुझ्यासारखं - 'आवरलेलं घर पुन्हा पुन्हा आवरणं' हा तर छंद च असतो." अशीच एक विवादास्पद कृती म्हणजे 'पॅकिंग करणं'.....काही जणांना वाटतं मला 'सामान पॅक करायचा' छंद आहे - यात एखादी छोटी हँडबॅग पॅक करण्यापासून ते मोठ्या मोठ्या ट्रंक्समधे पूर्ण घरातलं सामान पॅक करण्यापर्यंत सगळ्याचा समावेश आहे. असे लोक जेव्हा भेटतात तेव्हा हमखास विचारतात -"आर्मी सोडल्यापासून तुझा तो 'पॅकिंग' चा छंद पूर्ण होत नसेल ना?" अशावेळी त्यांचं म्हणणं मी हसण्यावारी नेते ; पण खरं सांगू का...जेव्हा मी एखाद्याला वेड्यावाकड्या पद्धतीनी सुटकेस पॅक करताना बघते ना तेव्हा खरंच माझे हात शिवशिवतात....अहो, मधेमधे किती जागा रिकामी सोडतात हे लोक ! अशा वेळी अगदी मनापासून वाटतं-' मी याच्या दुप्पट सामान adjust केलं असतं तेवढ्याच जागेत!' पण 'उगीच भोचकपणा कशाला करायचा' - या उदात्त हेतूनी गप्प बसते.

असाच अजून एक भोचकपणा मी नेहेमी करते... पण मनातल्या मनात ! इतरांना माझ्या या भोचक छंदाबद्दल माहीत नाहीये... पण आज मी तो गौप्यस्फोट करणार आहे. मला लहानपणापासूनच गृहसजावटीची (interior decoration) ची खूप आवड आहे. मी कॉलेजमधे असताना Interior decoration चा एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स पण केला होता. आणि लग्नानंतर दर एक दोन वर्षांनंतर घरं बदलायला लागत असल्यामुळे मी माझी ही हौस अगदी पुरेपूर भागवून घेतली. आता तुम्ही म्हणाल की यात कसला भोचकपणा ? पण माझी ही हौस किंवा छंद म्हणा- ही फक्त माझ्या घरापुरतीच मर्यादित नसते. मी जेव्हा एखादयाच्या घरी जाते ना तेव्हा मनातल्या मनात त्यांच्या घरातल्या सामानाची पुनर्रचना करून मोकळी होते. त्यांच्या घरातलं फर्निचर माझ्या हिशोबानी अरेंज करते... भिंतीवर जर फ्रेम्स किंवा तत्सम काही वॉल पीसेस असतील तर त्यांनाही थोडं नीट सजवते ; गरज भासली तर त्यांच्या जागाही बदलते... आणि जर भिंती अगदीच रिकाम्या असतील तर मग काय ...माझ्या कल्पनाशक्तीला अगदी बहर येतो. अशा वेळी माझ्या मनात त्यांच्या घराचं जे चित्र तयार होतं ना ते एखाद्या international home decor magazine साठी सर्वतोपरी योग्य असतं. पण नाईलाजानी मला माझा हा छंद आणि त्यातून मला मिळणारा आनंद हा माझ्यापुरताच ठेवावा लागतो.

हे असे छंदिष्ट विचार करत असताना अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली - ती म्हणजे वेळोवेळी बदलत्या परिस्थिती प्रमाणे माझे छंद सुद्धा बदलत गेले. म्हणजे मी जेव्हा शाळा कॉलेजमधे होते तेव्हा मी सरोद शिकत होते....अगदी मनापासून आवडायचं मला सरोद वाजवायला ...अगदी छंद म्हणता येईल इतकं ! घरी सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी रियाज करायची. पण मग लग्नानंतर सरळ अरुणाचल सारख्या दुर्गम भागात गेले- साहजिकच तिथे माझं सरोद घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तेव्हा जो खंड पडला त्यानंतर परत कधीच सरोद हातात नाही घेतलं.

असाच अजून एक छंद मधेच सुटून गेला... ट्रेकिंग चा! अकरावी बारावीत असताना आमच्या कॉलेजमधे आमचा एक खूप मोठा ट्रेकिंग ग्रुप होता. त्या काळात खूप गड किल्ले पालथे घातले. अगदी महिन्यातून एखादा तरी ट्रेक व्हायचाच. पण लग्नानंतर परत कधी पुण्यात वास्तव्य झालंच नाही आणि त्यामुळे तो छंदही मधेच सुटला.

या सुटलेल्या छंदांसाठी जरी तेव्हाची परिस्थिती जबाबदार असली तरी त्याच बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मला इतर अनेक छंद जोपासायला मिळाले हेही तितकंच खरं आहे. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं ते ज्या सैनिकी वातावरणात मी राहिले तिथल्या life style ला ! बऱ्याच वेळा अतिशय दुर्गम जागी राहायला लागल्यामुळे मी कितीतरी बाबतीत स्वयंसिद्धा झाले आहे .... अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या cuisines पासून ते प्रसंगानुरूप भेटवस्तू बनवण्यापर्यंत सगळं काही घरी स्वतःच बनवायला शिकले आहे.... आणि तेही घरात असलेल्या मोजक्याच resources मधून ! त्यामुळे चायनीज कूकिंग साठी लागणारं चिली ऑइल असो, रशियन सलाड करता लागणारे Mayonnaise असो किंवा मुलींसाठी बर्थडे केक्स असो.... सगळं घरीच करायला शिकले.... पण इतकं असूनही मला अजूनही स्वैपाक करायचा छंद काही लागला नाहीये ! पण आता वाटतंय, जर लागला असता असा छंद तर बरं झालं असतं.. सध्याच्या या lockdown च्या काळात मी पण फेसबुक वर रोज एखादं नवीन cooking challenge टाकलं असतं !!!

पण त्यातल्या त्यात समाधान म्हणजे आर्मी मुळे मला हस्तकलेचा छंद मात्र लागला. बऱ्याच ठिकाणी आमच्या कॉलनी पासून मुख्य शहर आणि तिथलं मार्केट खूप लांब असायचं ; त्यामुळे जेव्हा अचानक एखाद्या वाढदिवसाचं किंवा anniversary चं बोलावणं यायचं तेव्हा त्या उत्सवमूर्ती साठी प्रसंगानुरूप एखादी छानशी भेटवस्तू करून देण्यावाचून गत्यंतर नसायचं. स्वतःच्या हातांनी अशा भेटवस्तू करून लोकांना द्यायला खूप आवडतं मला! इतकंच नव्हे तर मुलींच्या बर्थडे पार्टी ची invitation कार्ड्स, त्यांच्या मित्र मैत्रिणींसाठी रिटर्न गिफ्ट्स हे सगळं सुद्धा मी बऱ्याच वेळा स्वतःच बनवलं आहे. माझ्या लग्नानंतर आम्ही जेव्हा आगरतला मधे होतो तेव्हा राखी पौर्णिमेच्या निमित्तानी माझ्या तमाम भावांना राख्या पाठवायच्या होत्या; पण त्यावेळी तिथल्या त्या छोट्याशा मार्केट मधे मला आवडेल अशी एकही राखी नाही मिळाली. म्हणून मग मी स्वतः सगळ्या राख्या बनवल्या. तेव्हापासून आजपर्यंत - गेली २६-२७ वर्षं मी स्वतः बनवलेल्या राख्याच पाठवते सगळ्या भावांना !

आर्मी मधल्या इतर जबाबदाऱ्या पाळत असताना अजून बरेच छंद वाढीला लागले... आता प्रत्येकाबद्दल वेगळं न सांगता त्यांना 'art and craft' या एकाच छत्रीखाली गोळा करते. हे सगळे छंद मला अजूनही साथ देतायत. पण याशिवायही अजून एका छंदाचा श्रीगणेश आर्मीमुळेच झाला...लिखाणाच्या छंदाचा! पण तेव्हा हा छंद need based होता....अगदी गरजेपुरता ! म्हणजे युनिटच्या फॅमिली वेल्फेअर च्या कार्यक्रमासाठी एखादी नवीन एकांकिका हवी असेल; किंवा लेडीज क्लब साठी एखादी 'हटके' थीम आणि त्यानुसार स्क्रिप्ट हवं असेल तर मग लगेच अस्मादिक आपली लेखणी बाहेर काढायचे.

पण नुसतं लिहून भागायचं नाही... कधी कधी लेखणी बाजूला ठेवून हातात माईक पण घ्यावा लागायचा. जशी गरज असेल त्याप्रमाणे कधी लेडीज क्लब किंवा Raising Day साठी सूत्र संचालन तर कधी एखाद्या स्किट मधे छोटीशी भूमिका ! तेव्हापासून अभिनयाची आवड निर्माण झाली... पण माझी ही आवड बघणाऱ्यांना कितपत आवडेल हे अजून कळायचं आहे.

असाच अजून एक छंद म्हणजे - भांडी घासणे! त्याचं श्रेय पण आर्मीलाच जातं... एखाद्या ठिकाणी नळाला पाणी नाही म्हणून तर कधी कामवाली बाई नाही म्हणून...कारण काहीही असो; पण मला भांडी घासायचा छंद - नव्हे - नादच लागला होता. स्वतःच्या हातांनी स्वच्छ घासलेली, चमकणारी भांडी बघितली की जगण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं मला ! पण माझ्या नवऱ्याला माझं हे सुख बघवलं नाही बहुतेक.....आर्मी सोडून एक वर्षही नसेल झालं...त्यानी घरात एक डिशवॉशर आणून ठेवला. एका क्षणात माझ्या आयुष्यातले ते 'खुशियों के पल' गायब झाले.... पण त्याहीपेक्षा दुःखद गोष्ट म्हणजे ... तो डिशवॉशर माझ्या पेक्षा जास्त कार्यकुशल निघाला. पण अजूनही अधूनमधून मी एखाद्या भांड्यावर माझा हात साफ करून घेते !

माझा अजून एक आवडता छंद म्हणजे...घासाघीस करणं.. म्हणजेच bargaining ! तसं पाहता प्रत्येक bargaining session मधे mostly मीच जिंकते; पण मला अक्षरशः 'dismiss' करणारा एक माणूस आम्हांला भेटला होता. आम्ही जेव्हा पिसा चा 'कलता मनोरा' पाहायला गेलो होतो तेव्हा तिथे एक माणूस छत्र्या विकत होता. त्यानी एका छत्रीची जी किंमत सांगितली त्यात मी त्याच्याकडे दोन छत्र्या मागितल्या. त्यावेळी त्यानी माझ्याकडे टाकलेला कटाक्ष अजूनही लक्षात आहे माझ्या. पण एवढं करून तो थांबला नाही... माझ्या नवऱ्याकडे बघत म्हणाला," You have a mad wife." त्याच्या या वाक्यावर मला जेवढं हसू आलं नसेल तेवढं हसू माझ्या नवऱ्याची प्रतिक्रिया बघून आलं...सद्गदित स्वरात तो म्हणाला होता," साता समुद्रा पलीकडे का होईना ; पण या जगात माझं दुःख समजून घेणारी एक तरी व्यक्ती आहे." हे बोलत असताना त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसल्याचाही भास झाला मला ! असो, याबद्दल जास्त न बोललेलंच बरं !!!

मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे छंदाच्या व्याख्येत अगदी तंतोतंत बसणारं एक काम आहे...एका NGO च्या वतीनी काही खास मुलांना आनंद देण्याचं ; त्यांच्या चेहेऱ्यांवर स्वप्नपूर्तीचं हसू आणण्याचं काम ! गेली दहा बारा वर्षं मी हे काम करतीये.... एका मोठ्या समाजकार्यात माझा खारीचा वाटा उचलतीये. खरंच- या कामात मला आनंद तर मिळतोच ...आनंद म्हणण्यापेक्षा खूप समाधान मिळतं आणि त्याचबरोबर माझा वेळही सत्कारणी लागतो....पण तरीही हे काम म्हणजे माझा छंद नाहीये.... ते माझ्या मनाचं टॉनिक आहे !

यापुढील आयुष्यात माझे बाकीचे छंद टिकून राहतील का नाही - माहीत नाही ! कदाचित त्या यादीत अजून नवे छंद जोडले जातील ! देवच जाणे...पण त्या देवाकडे माझं हात जोडून फक्त एकच मागणं आहे... माझ्या ज्या छंदामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या चेहेऱ्यांवर हसू उमलेल तो छंद मात्र आयुष्यभर टिकू दे !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण रिसबुड सर व त्यांच्या मुलग्या कडून शिकले स्वीमिन्ग. टिळक टॅक वरच. झिंदाबाद.

आर्मीतल्या बायकां ना निदान ८० - ९० च्या दशकात जेव्हा जाल, फेसबुक व्हॉट्सॅप नव्हते तेव्हा तरी, गॉसिप करायची भयंकर हौस असे असे निरीक्षण आहे. छोटे स्टेशन फारसे काही घडत नाही मग कोणी काय केले जेवायला काय मेन्यु कुठे काय झाले असे विषय भयंकर उत्साहाने चर्चिले जात. मला हे ऐकायला फार मजा वाटायची . संदर्भ कळायचे नाहीत पण एक गृप म्हणून राहाय्चे तर काय पथ्ये पाळावी लागतात ते लक्षात यायचे. आपले युनिट दुसरे युनिट ह्या मधील स्पर्धा, पोस्टिंगच्या बातम्या ग्रेपव्हाइन वर प्रसारित होत. गृहिणी व बॅटमन कुक मध्ये पण अनेक गप्पा चालत.

आम्ही सिवीलिअन व व्यक्ति स्वा तंत्र्याचे खंदे पुरसकर्ते असल्याने एका वेगळ्या जगाचे आतले दर्शन व्हायचे.