बाई

Submitted by _तृप्ती_ on 14 April, 2020 - 02:44

आंनदी कॉलेजमधून नुकतीच घरी आली होती. थोडा वेळ इकडे तिकडे करून आता पुस्तक वाचायला बसणार, एवढ्यात आईने आठवण करून दिली. "आनंदी, जरा वेळात माझा स्वयंपाक होईल. कालच्यासारखा आजपण बाईंकडे डबा घेऊन जा. बऱ्या आहेत का ग? मला कालपण भेटायला जायला जमलंच नाही. त्यांचं जेवण होईपर्यंत तिथेच थांब." बाई, यांचं खरं नाव सुनंदा. गावात काही लोकं सोडली तर सगळे त्यांना बाई या नावानेच ओळखत. कित्येक वर्ष एकट्याच आहेत. गेल्या ३-४ दिवसापासून तापाने आजारी, झोपूनच होत्या.आनंदीच्या आईनेच औषध आणून दिलं. बाईंच्या अंगात ताकदच नव्हती. गेले काही दिवस, आनंदीची आई रोज जेवणही पाठवते आहे. बाईचं घर, आनंदीच्या घराच्या जवळच, गल्लीतलं शेवटचं. आता शिल्लक राहिलेल्या काही वाड्यापैकी एक, शिंदेच्या वाड्ड्यात, ओसरीच्या बाजूची, अडगळीची वाटावी अशी खोली म्हणजे बाईंचं घर. आनंदी लहान असताना खेळायला वाड्यात जायची. पण आता एवढ्यात काही जाणं झालं नव्हतं. मागचे काही दिवस बाईना जेवण देण्यासाठी आली तेवढीच. आजही आनंदी जेवणाचा डबा घेऊन आली. वाडयात एका बाजूला बाई, दुसऱ्या बाजूला बराचसा मोडका भाग आणि त्यात राहणारे तात्या शिंदे. एकंदरीत सगळंच मोडकळीस आलेलं. अंगणातल्या हौदाचा नळ थेंब थेंब गळत होता. तिथल्या शांततेचा तेवढाच टीचभर आवाज. सात वाजून गेले होते. बाईनी सकाळच जेवण तरी नीट केलं होतं की नाही काय माहित असा विचार करत आनंदी थोडी घाईनेच बाईंच्या खोलीपाशी आली. दार नेहमीप्रमाणे नुसतंच लोटलेलं होतं. अंगणातला पालापाचोळा दारापाशी जमा झाला होता. आनंदीने दार हलकेच ढकललं. बाईना हाक मारली. संध्याकाळच्या वेळेला बाई दिवा लावायच्या. पण मागच्या ३-४ दिवसात इथे नुसताच अंधार. आनंदीच्या हाकेला उत्तर आलंच नाही. ह्या एका खोलीचे छोटा कट्टा बांधून दोन भाग केले होते. एकात बाईंचं स्वयंपाकघर आणि दुसरी बाहेरची खोली. स्वयंपाकघरच्या मागच्या बाजूला वाड्याचा पडका भाग, पूर्वी इथे छोटा चौक होता. मागच्या मोकळ्या भागामुळे, स्वयंपाकघरच्या खिडकीतून थोडा उजेड आत डोकावत होता.आनंदीने दिवा लावला. बाई तिथेच अंथरुणावर झोपल्या होत्या. आनंदी जरी लहान असल्यापासून बाईना पाहत आली असली तरी तिची बाईंशी फार ओळख नाही. डबा ठेवून निघून जावं असा विचार करत असतानाच बाईना आवाजाने जाग आली. "कोण आहे?", "मी आनंदी. आईने जेवणाचा डबा पाठवला आहे." बाई उठून बसल्या. मनातल्या मनात त्यांना आपल्या "कोण आहे?" या प्रश्नातला फोलपणा जाणवून हसू आलं. इथे कोणीही येत नाही. या आजारपणामुळे गेले ४ दिवस आनंदी डबा घेऊन येते आहे. आनंदीला तिथे आलं की विचित्र अवघडलेपण यायचं. असं वाटायचं की कधी एकदा बाहेर पडून मोकळा श्वास घेतो. तिथल्या भिंतीचे उडलेले पोखडे, काळवंडलेले छप्पर, आणि बाईंचे थकलेले डोळे यातलं नक्की जास्त उदास काय आहे हे ठरवता येऊ नये इतकं ते सुनसान होतं. ते सगळं एकत्रित कोणालाही नकोसं वाटेल असंच. पण तरीही आनंदी रोज डबा घेऊन येत होती. तिला आता माहिती होतं. बाई उठतील, कसंबसं स्वयंपाकघरातल्या मागच्या दाराने बाहेर जाऊन हात,पाय धुतील. एक ताट घेतील, त्यात वाढून घेतील. त्यातले दोन घास बाजूला काढतील, ते मागच्या कावळ्यांना, मांजरींना, आनंदी ठेवून येईल. बाई हात जोडून थोडा वेळ बसतील आणि मग जेवायचा प्रयत्न करतील.बाई जेव्हा हात जोडून शांत बसत, तेव्हा काही क्षणांसाठी सगळ्या वातावरणाचं मळभ दूर होत असे.
आनंदीला बाईबद्दल फार कुतुहूल होतं. लहान असल्यापासून काही ना काही कानावर पडत आलं होतं. बाई बोलायला लागल्या की कधी कधी असं काही बोलून जात की त्यांचं बोलणं ऐकत राहावं. कधी बाईंचं जेवण होईपर्यंत आनंदी तिथेच पुस्तक वाचत बसे. बाईंच्या घरात सामान असं काही नव्हतंच. बाईंचं अंथरुण-पांघरूण, एका बाजूला भिंतीच्या कप्प्यांचे कपाट, बरंचसं रिकाम, कुठे बाईंच्या चार-दोन साड्या, १-२ पिशव्या, कट्ट्याच्या खालच्या बाजूला एक पेटी-निळया रंगाची. आता बराचसा रंग उडाला होता पण त्याचं नक्षीकाम अजूनही शाबूत होतं. त्यावरून नक्षीकाम केलेला पण आता रंग पार विटून गेलेला एक टॅबलक्लाथ. बहुधा बाईनी तरुणपणी कधीतरी हौसेनी केलेला असावा. स्वयंपाकघरातसुद्धा जेमतेम १-२ पातेली, काही रिकामे डबे, एखादं ताट, वाटी, भांड. एका बाजूला गॅसची एक छोटी शेगडी. खिडकीच्या खाली एका मोडक्या पाटावर एक गणपतीची मूर्ती, कधी तरी लावलेली उदबत्ती आणि वाहून सुकून गेलेली फुलं. आनंदीला ती पेटी आवडायची. या सगळ्या खोलीत ती पेटी फार विसंगत वाटत होती. आनंदीला वाटे, तो टॅबलेक्लाथ काढून, त्या पेटीला नव्याने रंग दिला तर किती सुंदर दिसेल.
आजही बाई कश्याबश्या उठल्या. नेहमीप्रमाणे ताट वाढून घेतलं. आज मात्र त्यांनी अजून एक ताट घेतलं आणि त्यातही वाढलं. मग उठल्या आणि स्वयंपाकघरातल्या डब्यांमध्ये उघडून काही शोधू लागल्या. बहुधा डबे रिकामेच होते. आधीच आजाराने थकलेल्या बाई, अजूनच थकल्या. आनंदीने विचारलं, "बाई, काही हवं आहे का? मी काही मदत करू का?", " नाही गं पोरी, रिकाम्या डब्यात तू तरी कसं काही शोधणार." मग स्वतःशीच बोलावं असं, "निदान, आजच्या दिवशी गुळाचा खडा ठेवायचा होता ह्यांच्या ताटात, तेही जमायचं नाही आता" मग आनंदीला म्हणाल्या, " हे एक ताट बाहेर ठेव ग मांजरीसाठी." आनंदीला विचारायचं होतं दुसऱ्या ताटाच काय करणार. पण ती पानावर वाढलेले दोन घास कावळ्या, मांजरीसाठी ठेवून आली. बाई दोन्ही ताट घेऊन बाहेरच्या खोलीत आल्या. "आनंदी, आज हे दोन घास जेवशील का ग इथे?" आनंदी गांगरून गेली. तिला हे असं काही अपेक्षित नव्हतं. "बाई, हे सगळं तुमच्यासाठीच आणलं आहे. मी घरी जाऊन जेवेन. ", "आनंदी, रोज येतेस बाळा इथे माझ्यासाठी डबा घेऊन. खरं म्हणजे खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. तुझी आई, आजी, फार सांभाळलं मला त्यांनी. अजून खरं तर काय मागणार मी? पण गेले कित्येक वर्ष, आजच्या दिवशी, दुसऱ्या कुणाला जेवायला घातल्याशिवाय जेवले नाहीये ग मी. आज कुठे बाहेर जाऊन कुणाला देणं जमलं नाही आणि आता कुठे जाणार मी. इथेही कोणी येणार नाही. बाळा, प्रसाद म्हणून दोन घास खाशील का? “आनंदी मुकाटयाने ताटासमोर बसली. बाईनी स्वतःच ताट झाकून ठेवलं. "आनंदी, तुझं होऊ देत सावकाश." आनंदीने जेवायला सुरवात केली. बाकी संवाद काहीच नाही. नाहीतरी बाईंच्या मनात चाललेली घालमेल, शब्दामधून पोचणं अवघडच होतं. बाईना दरवर्षी या एका दिवशी मागचं सगळं एखाद्या स्वप्नांसारखं आठवून जात असे. मागे पुसून टाकलेलं सगळं पुन्हा दाटून येत असे. बाईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांनी हळूच पदराने पुसण्याचा प्रयत्न केला. आनंदीने न राहवून विचारलं, “बाई, आज काय आहे? आणि तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्ही जेवून झोपता का? बरं वाटेल. मी वाढते तुम्हाला. तुम्ही बसा माझ्याबरोबर." तिने त्यांच्या ताटावरचं झाकण काढलं आणि त्यांच्यासमोर ठेवलं. एका भांड्यात पाणी घेतलं, बाईना दिलं. आज बाईंच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात. कित्येक दिवसात इतक्या प्रेमाने कोणी बोललंच नव्हतं. इतकं भरून येतं होतं त्यांना सकाळपासून. आणि आता दिवसाच्या उतरणीला दाटलेले वाहून जात होतं. बाईनी स्वतःला सावरलं. "आज माझ्या यजमानांचा श्राद्धाचा दिवस आहे. या गावात आलो, तेव्हा दोघं होतो. खूप काही ठरवून आलो ग. पण जेमतेम ७-८ महिन्यात सगळं संपलं. तू जेव आनंदी. दरवर्षी जसं जमेल तसं, माझ्याकडे जे असेल त्यातलं थोडं कुणालातरी खायला घातलं की तेवढंच समाधान. आज खरंतर मी काहीतरी करून वाढायला हवं. पण तेही नाही जमलं. घरात साधा गुळाचा खडापण नाहीये. नाहीतर माझ्याकडे तुला द्यायला आहेच काय? “बाई थोड्या शांत झाल्यासारख्या वाटल्या. दोघी जेवायला लागल्या. जे होतं ते जेवून हातावर पाणी घेऊन दोघी उठल्या.
बाईंना आजकाल पटकन उठबस करायला जमत नसे. गुडघे भरून येत. आताही उठताना कसाबसा तोल सांभाळत त्या उठल्या. आनंदीने डबा आवरून ठेवला. तिला वाटलं बाई आता नेहमीप्रमाणे अंथरुणावर निजायला जातील. पण बाई येऊन, निळ्या पेटीसमोर बसल्या. त्यांनी तो टॅबलक्लाथ बाजूला केला. आणि पेटी उघडली. आनंदी पहातच राहिली. आज बाईंच्या अंगात एवढी ताकत कुठून आली? "बाई, तुम्ही आता झोपायला हवं. आराम करा. काही हवं आहे का पेटीमधलं? मी देते काढून. बाईंच्या चेहऱयावर फार करुण हसू उमटलं. "नाही ग. हे मलाच करायला हवं. निदान आजच्या एका दिवशी तरी या पेटीतल्या वस्तुंना हवा द्यायला हवी. तू जा अगं. तुला उशीर होईल. “आनंदीचा पाय अडखळला. नाही म्हटलं तरी आजच्या त्या एकत्र जेवणाने असेल, तिला बाईना आज असं एकटं सोडायला नको वाटतं होतं. एरवी ती आईने सांगितलं म्हणून येई आणि जेवण झालं की निघत असे. जेवण होईपर्यंतसुद्धा तिचं बऱ्याचदा लक्ष पुस्तकात असे नाहीतर फोनमध्ये. घरी पुस्तकं वाचताना कुणीतरी मध्ये येई. इथे कोणीही व्यत्यय आणण्याचा प्रश्नच नव्हता. हाच तिचा इथे येण्याचा थोडाफार हेतू. बाईंशी संवांद साधण्याचं तसं काही कारणच नव्हतं. होतं ते थोडंफार कुतूहल. अगदी बाईंच्या नावापासून. सगळं गावं ह्यांना बाई म्हणत असे. त्या पूर्वी गावातल्या शाळेत शिकवत असतं. पण आनंदीला कधी बाईना शाळेत शिकवताना पाहिल्याचं आठवत नाही. इतक्या एकट्या वाड्यात बाई कश्या राहतात? आणि यांना कोणी कसं नाही? कधी कोणी येत नाही की जात नाही. आई नेहमी म्हणते, "नशिबाचे भोग. दुसरं काय." बाई दिसायला नाकीडोळी नीटस, सुंदर म्हणाव्या अश्याच. पण त्यांना कधीच मनापासून हसताना पाहिलं नाही. वयाने साठी ओलांडली असावी पण त्याहूनही जास्त थकल्यासारख्या वाटतात. आनंदीला हे आणि असे अनेक प्रश्न होते.
बाईनी थरथरत्या हाताने पेटीतून काही वह्या काढल्या. आणि पुन्हा पाण्याच्या धारा वहायला लागल्या. आनंदीला आता राहवेना. “बाई, इतका त्रास होतो आहे तर कशाला त्या जुन्यापान्या वस्तू काढत बसला आहात. आधीच तुम्हाला बरं नाही. आराम करा. द्या इकडे. मी बंद करते ती पेटी. काय आहे त्यात एवढं?" बाईंचं आनंदीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्या एकएका पानावरुन हात फिरवत होत्या आणि कुठंतरी हरवल्या होत्या. काहीतरी वाचीत होत्या. मधेच डोळे मिटून घेत होत्या. वह्या अगदीच जीर्ण झाल्या होत्या. पेटीत असूनही थोडीफार धूळ बसलीच होती. पानं सुद्धा आता निसटायला लागली होती. आनंदीने एक वही काढून पहिलं पान उलगडलं. त्यावर एक कविता होती. काही ठिकाणी अक्षरांची शाई उडाली होती पण अक्षर फार वळणदार होतं. आनंदीने वाचायला सुरुवात केली.
कशास फिरसी रानोमाळ, वणवण करिता काय दिसे
लागते तुजला काय असे, प्रेमाने जग तुजला पुसे
दूरदूरच्या घरट्यामध्ये झाली आता सांज पहा
दिवसाच्या या काठावर मी शोधतो आहे माझे मला
आनंदी वाचत राहिली आणि खाली लिहिलेल्या नावाशी थबकली. ते नाव होत, सदा. "बाई, हे कोणी लिहिलं आहे?" बाईं अजूनही हरवलेल्याच होत्या. "माझे यजमान. सदानंद वीरकर." इतकंच म्हणून त्या पुन्हा वहीची पानं उलटायला लागल्या.
काय माहित कोण माझे
वाढवते झाड एकले
कोण माझ्या मनावरती
हळूच हलके फुंकरे
वाऱ्याशी मी बोलतो
अन माती माझी माय
उघड्या आभाळाखालीच
थबकती माझे पाय
आनंदी वाचत होती. बाई कित्येक वर्षे मागे पुन्हा त्यांच्या पुण्याच्या प्रशस्त वाड्यातल्या दारात पोचल्या होत्या. सुनंदा, सगळ्या वाड्याची लाडकी नंदा. बळवंतरावांची मोठी कन्या. सुनंदा लाडाकोडात वाढलेली. स्वतःच्या हुशारीवर, शिकून काहीतरी मोठं करण्याची रंगीबेरंगी स्वप्ने पाहणारी. देखणी, काहीशी अबोल. बाईना आता अजूनही वाड्याचा कोपरा कोपरा आठवतो आहे. त्यांनी हात फिरवलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या, सजीव निर्जीव वस्तू, प्राणी सगळं सगळं. आणि माणसं, ती तर त्यांची जवळची होती. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्यांना खूप जपणारी. आता मागे बघितल्यावर त्यांनाही समजत नाही, कुठलं बळं त्यांच्या अंगात आलं आणि एका क्षणात त्या पाठ फिरवून, सगळं सोडून निघून आल्या. आता मात्र डोळ्याच्या कडा पाणावत होत्या.
पोर वयात आली, बापाला समजले नाही
पोरीचे वेगळे जग, आईला कळले नाही
पोरीचे गुंतले मन, वाड्याला कळले नाही
पोरही तशीच गेली, फिरून मागे पाहिले नाही
आनंदीने चमकून पहिले. खाली नाव होते, नंदा. म्हणजे सुनंदा. "बाई, तुम्ही?" बाई खिन्न हसल्या. एक उसासा टाकून म्हणाल्या, "सदा आयुष्यात आला आणि माझं जगच बदललं. त्याआधी माझी बाहेरच्या जगाशी अशी ओळखच नव्हती, इतकं जपलं होतं. पण सदानंदला ना आगा ना पिछा. माझ्या सोवळं ओवळं असलेल्या घरात, एका अनाथ, घरदारचा पत्ता नसलेल्या जागाच नव्हती. मग आम्ही लग्न केलं, घर सोडलं आणि इथे दूर या कोकणातल्या गावात आलो." आनंदी वहीची पानं उलटत होती आणि बाई आयुष्याची.
रेषारेषांत रंग नवे, भरले आभाळात
केशरी, सोनेरी पान जसे आले भरात
कुठे माडाच्या कुठे हिरव्या रानात
गाज सागराची उठते माझ्या उरात
वहीतल्या पानापानावर कुठले कुठले ठसे उमटले होते, कोवळे स्पर्श, कुणाचे मन उतरले होते. पुढे कितीतरी ओव्या, गाणी आणि काही काही ओळी कोरल्या होत्या. कुठलीही वही, कुठूनही वाचली तरी तितकीच उत्कट, भावपूर्ण आणि फार काही सांगून जाणारी. आनंदी जी थांबली ती ह्या सगळ्या वह्यांमध्ये अडकून पडली. आणि या ओळींशी येऊन थबकली
मावळता दिस
संपेना आस
सख्या, तुझी वाट
पाहू किती!
यापुढे काहीच नव्हतं. बाईना तो दिवस कितीही पुसून टाकावासा वाटला तरी तो भूतकाळ होता आणि तो तसाच असणार होता. कोकणातल्या गावात सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच, एक दिवस ज्या किनारी सुखी आयुष्याची स्वप्ने पाहिली, त्याच सागराने सदानंदलाही कायमचं बोलवून घेतलं. बाई विखरून गेल्या. सावरायचं तरी काय आणि किती. परत कुठे जाण्याचा मार्गच नव्हता. सदानंद गेल्यावर कित्येक महिने त्यांनी काय केलं हे त्यांनाही नीटसं आठवत नाही. गावातल्या लोकांनी धीर दिला.आधार दिला. पण मधल्या काळात बाईंची शाळेची नोकरी गेली. लोंकाच्या उपकारावर किती दिवस चालणार. बाईनी कधी काही शिकवण्या घेतल्या. पण आधीसारखा उत्साह त्या परत कधीही आणू शकल्या नाहीत.एरवी कविता शिकवताना भान हरपणाऱ्या बाई, स्वतःची कविताच हरवून बसल्या होत्या. मग जसं जमेल तसं जगत राहिल्या. या एका दिवशी, दरवर्षी हा पसारा मांडून बसत, काही क्षण पुन्हा जिवंत असल्याचं लक्षण. पुन्हा सगळं पेटीत बंद आणि आयुष्य मागच्या पानावरुन पुढच्या पानावर.
आनंदीला गहिवरून आलं. "बाई, हे सगळं लिखाण खूप बोलकं आहे. तुम्ही आता का नाही लिहीत?", "तेव्हा का लिहीत होते हे तरी कुठे माहिती आहे?" त्यांच्या चेहऱयावर आता ना कुठलं दुःख होतं, ना कसला आनंद. "हे इतकं सुंदर, लोकांना वाचायला मिळालं तर आवडेल त्यांना." बाईनी शांतपणे वह्या आवरायला सुरुवात केली. आता डोळ्यातले अश्रू थांबले होते. घालमेलही कमी झाली होती. आता पुन्हा या सगळ्याची भेट पुढच्या वर्षी. आज मात्र या विचारावर त्या अडखळल्या. "आनंदी, आज तुझ्याशी हे सगळं कसं बोलले माहित नाही. असतील कुठलेतरी ऋणानुबंध. मी आज तुला जेवणात काहीच करून वाढू शकले नाही. एक मात्र देऊ शकते. ह्या वह्या आता माझ्याच्याने सांभाळणे होणार नाही. पुढचं वर्ष कोणी पाहिलंय. आता ह्या एका दिवसाशिवाय, त्याला रद्दीचीही किंमत नाही. तुला जेव्हा हव्या तेव्हा घेऊन जा." आनंदीला काय बोलावं कळेना. बाई शांतपणे जाऊन अंथरुणावर निजल्या होत्या. आनंदीला आता लक्षात येत होतं, ती निळी पेटी या खोलीत इतकी विसंगत का वाटत होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हृदयस्पर्शी एकदम !
खुप ठिकाणी शब्द एकदम काळीज चिरत मनाचा ठाव घेतायेत.

@प्राचीन, अज्ञानी, मनस्विता, कथा कोणाला आवडली की परत नवीन लिहायला मजा येते. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.

@देवकी , आसा, rohan _gawande, मनापासून आभार.
@देवकी, तुमचं बरोबर आहे. कदाचित उत्तरार्ध अजून रंगवता आला असता. असंच सुचवत रहा, पुढच्या लिखाणात सुधारणा करता येईल.