शिक्रा

Submitted by अरिष्टनेमि on 2 April, 2020 - 22:32


मला तो पहिल्यांदा दिसला ध्यानी-मनी नसताना अचानकच एका सकाळी. वेडा गबाळा, घाबरट. नुकताच घराबाहेर पडला असावा. रुप देखणं होतं, पण घराण्याची राजेशाही ऐट, ती मस्ती, तो रुबाब अजून त्याच्या वागण्यात उतरला नव्हता. रीती-भाती अजून समजत नव्हत्या. सरळ सरळ एका कावळ्याशेजारी टी.व्ही.च्या अँटीन्यावर बसायचं म्हणजे काय? हे जरा जास्तच होतं. हे असं कधी पहायची सवय नाही म्हणून मी निरखून बघितलं “हं, शिक्राच आहे. नक्की.” पोटावर फिकट तपकिरी, लालसर ठिपकेवजा आडव्या रेघा, पाठीचा फिका निळसर-काळसर होऊ लागलेला पण अजून तपकिरी रंग, आखूड टोकदार चोच, पिवळसर-लालसर डोळे. बावरल्यासारखा अंग चोरुन बसला होता. शाळेतून पळून आलेल्या पोराला जसं पुढं काय करायचं हा प्रश्न लवकर सुटत नाही अन् त्या नादात पोरगं शाळेमागच्या झाडाखाली उगीचच दप्तर काखोटीला मारुन रिकामंच बसतं. तसा हा रिकामाच बसलेला. पुढं काय करायचं याचं चक्र त्याच्या डोक्यात फिरत असावं. त्यातून शेजार अट्टल कावळ्याचा!
कावळ्यानंही गि-हाईक हेरलं. अन् कावळासुद्धा कसा? तर कावळ्यासारखा जातिवंत कावळा; पुढ्यातला चान्स सोडतोय होय? त्या कावळ्याला त्याची चेष्टा करायची लहर आली असावी. त्यानंपण क्षणभर मिशी खाजवून पोज घेतली. शेजा-याला दोन-पाच सेकंद वाकड्या डोळ्यानं बघितलं आणि एकदम त्याच्यावर चोच उगारली. शिक्रा बिचारा अवसान सोडून धडपडला अन् थेट पाठीला पंख लागेस्तोवर झपाटून पळाला. इकडं कडूलिंबाच्या झाडावर बुलबुल आणि खारोट्यांनी कल्लोळ माजवला. शिक्रा तिथून निघाला तो थेट नजरेच्या टप्प्याबाहेर निघून गेला. कावळ्यानं त्याला धूम जाताना बघितलं. आता ४ फुटाचा अँटीना आख्खा त्याचा एकट्याचाच. बसल्या जागेवर डावा पाय इंचभर सरकावून त्यानं ऐटीत मान फिरवून बघितलं. येस्स! ब-याच पब्लिकनं त्याची डेअरींग बघितली होती. कावळा खूश. ‘बोले तो, भाईसे पंगा नही लेनेका.’ तो पुन्हा पिसं चोचीनं घासून चमकावण्यात मग्न झाला. कडूलिंब शांत झाला. वहिवाटीच्या अंगठ्याएवढ्या फांदीवर एक खारोटी शेपूट फुगवून चुकचुकत राहिली. एक लाल-पिवळं जेझेबल फुलपाखरु गुलमोहोरावरुन फिरत आलं. त्याला तो कावळा, तो शिक्रा अन् उगा डोक्याला ताप देणा-या त्या खारोटीशी काही देणं घेणं नव्हतं. कडूलिंबावर भिरभिरलं अन् पलिकडच्या काशिदावर उतरलं.
शिक्रयाचं हे अजाण लेकरु कुठून तिथं आलं हे कळायला काही मार्ग नव्हता. पण तो उडून गेला आणि मी ही गोष्ट विसरुनही गेलो. दोन दिवसांनी पुन्हा मला इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर तो दिसला. पुन्हा तसाच, निरुद्देश. बराच वेळ काहीही न करता नुसताच इकडं तिकडं बघत बसला आणि थोड्या वेळानं उडून गेला. त्यानं हवेत झेप घेतल्याबरोबर इकडं पुन्हा कडूलिंबाच्या झाडात खारोट्यांच्या ललका-या घुमल्या. मग मी त्याला रोज शोधायचा प्रयत्न करत होतो पण ब-याच दिवसात तो दिसलाच नाही. देवाघरचं पोर, त्याचा काय तपास लागावा!
एका सकाळीच खिडकीसमोरच्या त्या कडूलिंबाच्या झाडावर शिक्र्याचा दमदार आवाज गर्जला. मी ताडकन् उठून खिडकीतून बाहेर पाहिलं. तोच होता. तो आला होता आणि आता नुसता आला नव्हता तर मी आलो आहे असं गर्जून सांगतही होता. या महिना-पंधरा दिवसात त्याच्यात फरक पडला होता. त्याच्या वागण्या-बोलण्यात घराण्याचा डौल दिसत होता. तो अनभिषीक्त राजपुत्र होता. त्या दिवशी मी त्याला किती वेळ पहात बसलो होतो याचं मला भान राहिलं नव्हतं. शेवटी मला ऑफिसला उशीर होईल म्हणून मी अंघोळ-पांघोळ आटोपायला गेलो. घरातून निघायच्या आधी मी जाता-जाता एक नजर फिरवली, तो तिथंच ठिय्या देऊन बसला होता.
हे असं त्याचं ऐन सकाळी गर्जून तमाम पक्षी प्रजेला जरब घालणं आता सवयीचं होऊ लागलं होतं. आठवड्यातून २-४ वेळा तो असायचाच. साधारण त्याच किंवा आसपासच्या फांदीवर बसून, झाडात उतरणा-या, झाडातून उठणा-या पक्ष्यांवर नजर ठेवून असायचा. उगीचच कलकल करणा-या एखाद्या खारोटीवर हलकिशी झडप घालून तिला केकाटत टणाटण पळताना बघत बसायचा. एक मिश्किल हसू त्याच्या चोचीच्या कोप-यात मग दिसायचं. तो सकाळी एक पाय पोटाशी घेऊन कोवळं ऊन खात असताना कधी कधी एखादा टग्या कावळा उगीचच त्याच्याजवळ जाऊन दादागिरी करायला बघायचा. पण कोवळी मिसरुड असली तरी त्याचं रक्त शिक्र्याचंच. आता अशा कावळ्यांना तो भीक घालत नव्हता. आता ते झाड त्याचं साम्राज्य होतं. तिथं राजा तो एकच. कावळाही आता सत्ता सोडून दिल्यासारखा गुपचूप जागा बदलून बसत होता.
त्याला मी किती तरी दिवस तिथं नित्य नेमानं पहात होतो. आता त्याचा रंग जरासा बदलू लागला होता. डोळ्याची पिवळसर छटा जाऊन ते लाल दिसू लागले होते. पण अजून त्यात शिक्र्याचं रक्त पुरेपूर उतरलेलं दिसत नव्हतं. एवढ्या दिवसात त्यानं कधीही शिकार केलेली मला दिसली नव्हती. पण तो चांगलं-चुंगलं मिळवत होता हे नक्की. कदाचित त्या झाडात फिरणा-या मुबलक खारोट्या त्याला पुरेशा होत असतील. शिवाय मध्येच दोन-चार दिवस तो कुठेतरी गायब व्हायचा तेंव्हा रुचीपालट म्हणून वेगळी मेजवानी झोडूनही येत असेल. बोलून चालून ते राजघराणं, त्याचं काय सांगावं!
असाच एक दिवस तो गायब झाला. नेहमीसारखा येईल दोन-चार दिवसांनी म्हणून मी फार लक्ष दिलं नाही. आता तो ऐन तारुण्यात होता, मस्तवाल होता. त्याची काळजी करायचं कारणच नव्हतं. पण दोन-चार दिवस म्हणता म्हणता महिने गेले अन् तो परत आलाच नाही. रोजच मी त्याला शोधायचो. कुठं दिसेना, कुठं आवाज येईना. उरात कालवाकालव होऊ लागली. त्याच्या दर्शनानं माझा दिवस सुरु व्हायचा. त्याचं असणं माझ्या आयुष्याचा एक भाग बनलं होतं. पण आता रोज वाट पाहून पाहून आशा मावळली होती. आता त्याचं नसणं सवयीचं होऊ लागलं होतं. त्याला शोधायचा माझाही नाद आताशा राहिला नव्हता. उगीचच कधी कधी त्याची आठवण यायची मात्र. नको म्हटलं तरी मला ते आठवायचं की एकदा नाशिक पुणे हमरस्त्यावर अवसरी घाट वनोद्यानाजवळ वेगातल्या गाडीला धडकून घाटात रस्त्यावर पडलेला राजबिंडा शिक्रा मी पाहिला होता. मी गाडी थांबवून तो उचलला. त्याला ठोकून जाणा-याला कळालंही नसेल आपण काय केलंय. हाडा-मांसाची माणसासारखी माणसं चिरडून गाड्यावर गाड्या जात राहतात. प्रेत खरवडून पोत्यात भरावं लागतं. अजून कावळ्या-चिमण्यांचा विचार व्हायला भारतात पाच-सात पिढ्या जातील. माझा जीव कासावीस झाला. कुठंही वरुन इजा दिसत नव्हती. हातानं चाचपून बघितलं, हाडं शाबूत होती. त्याचं शरीर साधारण गरम होतं पण हालचाल नव्हती, हृदयाची धडधड जाणवत नव्हती. हवेतल्या हवेत रानपाखरु गारद करुन घेऊन जाणारी ती मस्तवाल मान आता कायमची खांद्यावर लवंडली होती. डोळे अर्धवट मिटलेले होते पण अजून डोळ्याचं तेज विझलं नव्हतं. मला हे सगळं आठवलं आणि उगीचच भीती वाटली. ‘त्याचं’ काय झालं असेल कोण जाणे. नकळतच देवाला साकडं घातलं, “देवा, लेकरु अजाण आहे, सांभाळ.”
आयुष्याच्या रहाटगाडग्यात मी अडकलो होतो. त्याची आठवणसुद्धा आता येईना. अचानकच परवा सकाळी दोन घारी जरा कमी उंचीवरुन घिरट्या घालत होत्या. माझ्या डोक्यात किडा वळवळला म्हणून मी बघत होतो. घिरट्या घालत वर-वर जाणं ठीक आहे, पण सतत कमी उंचीवर घिरट्या घालतात म्हणजे काहीतरी ‘मॅटर’ आहे बॉस. एकाएकी खालच्या सिल्व्हर ओकच्या झाडातून तो बाणासारखा सणसणत वर निघाला आणि झाडावर फिरणा-या घारीवर हल्ला केला. ती घार त्याच्या दुप्पट होती. तिनंही हवेतच पलटी मारून त्याला चोच मारायचा प्रयत्न केला. त्यानं चपळाईनं दिशा बदलली. घार पुढे गेली आणि शिक्र्यानं पुन्हा तिच्यावर सूर मारला. असं करुन शेवटी दोन्ही घारींना त्यानं हाकलून दिलं आणि तो पुन्हा त्या सिल्हर ओकमध्ये गायब झाला. माझा ऊर अभिमानानं भरुन आला. “एवढंसं लेकरु पाहिलं होतं, घाबरत अंग चोरुन बसणारं. आता स्वत:चं राज्य लढवतो आहे. भले शाब्बास, लगे रहो.” तो एवढे दिवस कुठं गायब होता? त्यानं जोडीदारीण शोधली असेल का? तो जर याच परिसरात आहे तर त्याच्या जुन्या कडूलिंबाच्या झाडावर का येत नाही. अनेक प्रश्न डोक्यात येऊन गेले. काही असो, आज दिवस साधला होता एवढं खरं.
संध्याकाळी चार-साडेचारला मी गच्चीच्या दाराजवळ खुर्ची टाकून माडगूळकर वाचत बसलो होतो. अर्धा पाऊण तास गेला असेल आणि एकदम गच्चीच्या छतावर काहीतरी सरसरल्यासारखं झालं. कबुतर धिंगाणा घालत असेल असं मनाशी म्हणून मी वर नजर टाकली. काही नव्हतं, सगळं शांत. मी पुन्हा मान खाली पुस्तकात घालणार इतक्यात समोर दोन निखा-यासारखे लालबुंद डोळे माझ्याकडे बघताना मला जाणवलं. मला क्षणभर खरं वाटेना, समोर ‘तोच’ बसला होता. इतके दिवस त्याला मी लांबूनच बघितलं होतं. आता तो स्वत:च माझ्याजवळ येऊन बसला होता. कधी आला होता मला समजलंही नाही. मी त्याच्याकडं पहात होतो आणि तो एकदम सावधान झाला, आरामासाठी पोटाशी धरलेला उजवा पाय सरळ करुन तो ताठ बसला. तो उडून जायला नको म्हणून मी माझ्या डोळ्यांवर हात ठेवला आणि निश्चल होऊन बोटांच्या बारीक फटीतून त्याला कौतुकानं निरखू लागलो.
सकाळी आकाशात लढाई जिंकलेला दमदार पठ्ठ्या याक्षणी माझ्या जवळ ८-१० फुटावर बसला होता. तो माझ्या एवढ्या जवळ येऊन का बसला असेल? एवढ्या गर्दीघाण दुनियेत त्याला मीच एकटा रानात उगवलेला का वाटलो असेन? त्याच्या चोचीवर लालसर मांसाचा तुकडा चिकटला होता. म्हणजे बहुतेक नुकतीच कुठंतरी शिकार फस्त करुन आराम करत होता. त्यानं दहा-पाच सेकंद माझ्याकडं भयानक भेदक नजरेनं पाहिलं. मग तो मान फिरवून इकडं तिकडं पहायला लागला. मी हळूच खुर्चीतून उठू लागलो. त्यानं ही हालचाल टिपली आणि पुन्हा माझ्याकडं एकटक पाहू लागला. मी स्तब्ध झालो. पुन्हा त्यानं नजर दुसरीकडं फिरवली. पुन्हा मी हळूच थोडा उठलो. असं करत करत मी भिंतीच्या आड गेलो, कपाट उघडून कॅमेरा काढला आणि लपून त्याच्यावर रोखला. तो माझ्याकडंच पहात होता. मात्र पोटाशी धरलेला पाय त्यानं आता पोटाशीच ठेवला, सरळ केला नाही. अर्थ सरळ होता, तो बुजला नव्हता. त्याचा माझ्यावर विश्वास बसला असेल का? मग मी व्यवस्थित पोझिशन घेऊन खुर्चीच्या आधारानं कॅमेरा ठेवला. मी मोकळ्या-ढाकळ्या हालचाली करत होतो. लपण घ्यायची गरज नव्हती. माझ्या हालचालींबाबत त्याला कुतूहल होतं. तो स्पष्ट माझ्या हालचाली पहात होता. मी त्याचे भरपूर फोटो घेतले. त्याला आता माझी भिती वाटत आहे असं वाटत नव्हतं. मी त्याच्या इतक्या जवळ होतो पण तो माझ्याकडं लक्ष देत नव्हता.
फोटो काढून झाले होते. मी कॅमेरा बाजूला ठेवून उतरत्या संधिप्रकाशात त्याला न्याहाळत होतो. सहा वाजून गेले होते, पुरेसा अंधार झाला होता. तासभर त्याचा आराम झाला होता. माझ्याकडं पाहण्यात त्याला आता बिलकूल म्हणजे बिलकूलच रस नव्हता. कोणत्याही हालचालीला, आवाजाला तो बुजत नव्हता. त्याचं कुतूहल विरलं होतं. त्यालाही वाटत असेल, ‘काय ही माणसं? कसली माणसं? एवढाली घरं कशाला काय बांधतात? झाडावर बसायचं तर खुर्चीत काय बसतात? झाडं, आकाश बघायचं सोडून पुस्तकं काय वाचतात? कपडे काय घालतात? हुड्, यांना उडता तरी येतं का?’ एकदम त्यानं पंख पसरुन एक भारदस्त झेप घेतली, शेजारी सातविणीच्या झाडावर बुलबुल आणि खारोट्यांच्या गप्पिष्ट बैठका उधळून ललका-या झडल्या आणि अंधुक संधिप्रकाशात तो पुन्हा नजरेआड झाला.
हा तासभराचा वेळ चुटकीसरशी गेला. यानंतर आठदहा दिवस गेले. एका रविवारी भर उन्हाची त्याची शीळ घुमायला लागली. तो मला बोलावत होता. मी खिडकीशी येऊन झाडात त्याला शोधलं पण तो दिसत नव्हता. अचानक पानांच्या गर्दीमागून तपकीरी तांबूस पंख पसरुन एक पाखरु निघालं. हा शिक्राच होता पण ‘तो’ नाही ‘ती’ होती. तिच्यामागोमाग ‘तो’ हवेवर स्वार झाला. म्हणजे त्याला जोडीदारीण मिळाली होती म्हणून स्वारी जुन्या झाडाकडे वरचेवर येत नव्हती. दोघंही हवेत मस्ती करत क्षितिजावर दिसेनासे झाले. आता पुन्हा भेट कधी होईल हे तोच ठरवणार होता.
लेकरु आता जाणतं, सामर्थ्यवान झालं होतं. Shikra Pic.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खरंच... फारच सुंदर लिहिलंय.... चित्रदर्शी, भावदर्शी...

शिक्रा.... निसर्गाची एक बेजोड कलाकृृृृृृती...

अप्रतिम लिखाण..
भयंकर आवडलं.. काही काही वाक्यं तर अफाट सुंदर..

निव्वळ लाजवाब _/\_

फोटो देण्यात फार कंजूस आहात पण... थोड़े अजुन येऊ दया प्लीज !

प्रतिसादांसाठी धन्यवाद.
फोटो अजून हवे होते म्हणताय. खरं आहे. पण त्याच शिक्र्याचे अजून फोटो देण्याऐवजी काही निरनिराळे फोटो दिले तर मनोरंजक वाटेल असं वाटतंय म्हणून तसा एक वेगळाच धागा मी इथं लिहिला आहे. https://www.maayboli.com/node/74006

छान

पक्षी , प्राणी , झाडे असली की छान वाटते