आपल्या चुका.. आपले गुरु.

Submitted by साद on 27 November, 2019 - 02:39

साधारणपणे आपण वयाच्या पाचव्या वर्षापासून ‘शिकू’ लागतो. मग प्राथमिक, माध्यमिक शाळा, पुढे कॉलेज, विद्यापीठ अशा पातळ्यांवर शिक्षण घेतो. त्यानंतर नोकरी अथवा व्यवसायात पडतो. आता अनुभवावर आधारित शिक्षण चालू होते. समाजात अनेक कारणांनी वावरतानाही आपण अप्रत्यक्षपणे शिकत जातो. वेगवेगळ्या प्रसंगात आपल्या हातून चुका होतात. त्यातूनही आपल्याला शिकायला मिळते; कधीकधी तर अगदी ‘धडा’ मिळतो. अनेक टक्केटोणपे खात आपण मोठे होतो आणि अनुभवांतून सतत शिकत राहतो. आपल्या या सर्व प्रकारच्या शिक्षणादरम्यान आपले वेगवेगळे ‘गुरु’ असतात. गुरु ही व्यक्ती दरवेळेस आपल्यापेक्षा वयाने मोठी असतेच असे नाही. आपल्याला विशेष समजत नसलेल्या कुठल्याही बाबतीत ज्याला आपल्याहून अधिक समजते, तो आपला गुरु ठरतो. गुरूने शिकविलेली एखादी गोष्ट आत्मसात करणे हे मात्र आपल्यावरच अवलंबून असते. आपण ती किती गांभीर्याने घेतो, किती मन लावून शिकतो यावर ते ठरते. अशी एखादी गोष्ट शिकल्यावर भविष्यात ती गुरुविना करता आली तर खर्या अर्थाने आपण शिकलो असे म्हणता येते. पण हे वाटते तितके सोपे नसते. ती गोष्ट करताना सुरवातीस आपल्या हातून चुका होतात. मग त्या आपल्याला उमगतात आणि पुढे सरावाने आपण त्यात प्रवीण होतो.

एकदा सहज विचार करत बसलो होतो. आतापर्यंत आयुष्यात भेटलेल्या अनेक गुरुंबद्दल विचार केला आणि एकदम मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मलाच मी एक प्रश्न विचारला, “ आपल्या सर्व गुरूंमध्ये सर्वश्रेष्ठ कोण?” मग मीच याचे उत्तर मला दिले: ‘आपल्या हातून घडलेल्या चुका हेच आपले सर्वश्रेष्ठ गुरु होत !’
आपल्या चुकांतून आपण कसे पक्के शिकलो, अशा अनेकांच्या अनुभवाचे इथे संकलन करावे अशी या धाग्याची कल्पना आहे. यात आपल्या बालपणापासून ते आजपर्यंतचे अनुभव लिहावेत. कधीकधी तर एखादी गोष्ट आपल्याला कोणीही ‘शिकवली’ नसते; निव्वळ आपल्याच चुकीतून आपण ती ‘शिकतो’. कुठल्याही गुरुविना अशा चुकांमुळे आपण काय शिकलो, असे अनुभव प्राधान्याने लिहावेत.

नमुन्यादाखल माझ्यापासून सुरवात करतो.

शालेय वयातले हे दोन अनुभव. तेव्हा गावाच्या मध्यवस्तीत राहत असल्याने मोठ्या मंडईतून भाजी आणणे हा घरचा नित्य कार्यक्रम असे. अधूनमधून मी वडिलांबरोबर त्यासाठी जाई. एकदा वडील गावाला गेले असल्याने आईने मला एकट्याला भाजीसाठी पिटाळले. जरा मोठी यादी दिली होती. मी रमतगमत गेलो. मंडईत शिरल्यावर ज्या क्रमाने भाजीवाले बसले होते त्या क्रमाने माझ्या यादीनुसार भाज्या घेत गेलो. सर्वात शेवटाला बटाटे पिशवीत भरले. मग ती भरलेली पिशवी सावरत चालत घरी आलो. आता पिशवी उपडी केली आणि घोटाळा लक्षात येताच कपाळावर हात मारला ! पिशवीत सर्वात तळाशी मी टोमाटो घेतले होते आणि सर्वात वर जड बटाटे ! टोमाटोचा झालेला लगदा मी अजून विसरलेलो नाही ! भाज्यांचा भरण्याचा योग्य क्रम कसा पाहिजे हे शिकवायला आता आयुष्यभर कोणाचीही गरज नव्हती !

एकदा संध्याकाळच्या वेळेस मित्राबरोबर असाच बेकरीसमोरून चाललो होतो. बरोबर पिशवी नव्हती. पण एकदम आठवले की घरून ब्रेड आणायला सांगितलाय. मग तो घेतला आणि हातातच ठेवून गप्पा मारत निघालो. जरा वेळाने मागून एकदम धक्का बसला आणि हातातला ब्रेड हिसकावला गेला. पाहतो तर काय? एका कुत्र्‍याने त्यावर झडप घातली होती ! काही खाद्ये नेहमी पिशवीतूनच आणावीत, हे शिकायला याहून उत्तम प्रसंग कोणता होता ?
.........

आता माझा एक संगणकाशी संबंधित हापिसातील अनुभव.
( हा अनुभव इथे सुसंगत असल्याने माझ्याच अन्य एका धाग्यावरून इथे कॉपीपेस्ट करतोय. तरी क्षमस्व.)

मला तिथे कार्यशाळा घेताना पॉवर पॉइंट ने सादरीकरण असते. ते करताना प्रोजेक्टर चालू असतो. आता २-३ स्लाइड्स दाखविल्यावर मध्ये काही स्पष्टीकरण द्यायचे असते. तेव्हा सर्वांनी प्रोजेक्शनकडे न बघता माझ्याकडे बघावे ही अपेक्षा असते. आता जोपर्यंत प्रोजेक्टर चालू आहे तोपर्यंत लोकांचे पडद्याकडे लक्ष राहतेच. ते पूर्णपणे वक्त्याशी एकरूप होऊ शकत नाहीत. बरं, मध्येच प्रोजेक्टर बंद करता येत नाही कारण पुन्हा चालू करून स्लाईड दिसायला ५-१० मिनिटे जातात. तो वेळ वाया घालवणे परवडत नाही. समजा आपण तिथे रिकामी स्लाईड ठेवली तरी चालू प्रोजेक्टरच्या प्रकाशझोताकडे लोकांचे लक्ष जातेच.

तेव्हा मी यावर तोडगा काय असा विचार करू लागलो. सहज एक शक्कल सुचली. जेव्हा मी समजावून सांगणार असेन तेव्हा मी प्रोजेक्टरच्या तोंडावर एक जाड वही लावून ठेवली. पुन्हा स्लाईड दाखवताना ती वही काढून घ्यायची. मग अशा प्रकारे २ व्याख्याने छान जमली. मी स्वतःवर खूश झालो.

पण….
पुढे काही वेगळेच घडायचे होते !
एका सादरीकरणा दरम्यान मी तशी वही लावली आणि त्यानंतर सुमारे १५ मिनिटे स्पष्टीकरण द्यावे लागले. आता मी पुन्हा प्रोजेक्टर कडे वळलो आणि पाहतो तर काय ? ती वही उष्णतेने तापून चक्क वाफा आल्या होत्या. मग लगेच प्रोजेक्टर बंद केला. त्याच्या तोंडाशीही काळा डाग पडला होता.
यामुळे चांगलीच निराशा झाली पण पर्यायी मार्ग तर शोधायचा होताच. मग मित्रांशी बोललो. एकाने लगेच युक्ती सांगितली. जेव्हा श्रोत्यांचे लक्ष स्लाइड्कडून वक्त्याकडे वळवायचे आहे तेव्हा संगणकाच्या की बोर्ड वरील B अक्षर फक्त दाबायचे ! B चा अर्थ Blank. त्याने प्रोजेक्टर चालू राहतो पण पडद्यावर काहीच दिसत नाही.
आता पुन्हा आपल्याला स्लाईड कडे वळायचे असेल तेव्हा B चेच बटन पुन्हा दाबायचे - प्रोजेक्शन चालू !

…. हे समजल्यानंतरचा आनंद अवर्णनीय होता ! तसेच ही गोष्ट शिकण्यासाठी माझी चूक हा पाया ठरला, याचा आनंद काही औरच होता.
...........
आपलेही या प्रकारचे (चुका हेच गुरु) अनुभव लिहावे असे आवाहन करतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा.
काही आठवले की लिहितो .

मस्त नॉस्टॅल्जिक धागा.
अकरावीत असताना मोटरसायकल शिकताना घेतलेला धड़ा आयुष्यभर लक्षात ठेवलाय. फर्स्ट गिअरला फूल क्लच झपकन सोडला जाऊन पुढील चाक फुटभर हवेत गेल्यावर उडालेली भँबेरी पुढे कायम क्लच गिअरचे एकत्रित कॉम्बिनेशन डोक्यात फिट करून गेली.

क्लच गिअरचे एकत्रित कॉम्बिनेशन डोक्यात फिट करून गेली. >>>

मी तर बजाज स्कूटर शिकताना पायातील ब्रेक ऐवजी हाताने क्लच दाबला होता ...आणि जोरात आदळलो होतो.
तोपर्यंत सायकलची सवय ना !

सध्या गरज पडल्याने ‘झूम’ शिकायची वेळ आली. सुरवातीला चाचपडायला झाले. एक लेक्चर रेकॉर्ड करून पाठवायचे होते. छानपैकी घेतले. शेवटी ते फाईलमध्ये काही रुपांतरीत होईना. मग पुन्हा प्रयत्न करीत राहिलो तरी नाहीच.
मग शांतपणे लक्ष घातले आणि लक्षात आले की मी रेकॉर्डचे बटनच दाबायला विसरलो होतो !!