आमची बजेट टूर

Submitted by पराग र. लोणकर on 1 April, 2020 - 09:31

२०११च्या मध्यात सिमला मनाली चंदिगड अशी टूर करण्याचा योग आला. आमची ही ग्रुप टूर पहिलीच! आत्तापर्यंतची भटकंती फक्त वैयक्तिक बुकिंग करूनच केली होती.

जायचे ठिकाण ठरल्यानंतर कोणत्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे हे ठरवण्यासाठी कमीत कमी चार पाच संस्थांमध्ये चौकशी केली. काहींचे दर खूपच महाग, तर काही ठिकाणी टूरची माहितीच इतकी उदासपणे देण्यात आली की आपली टूर हे किती उत्साहाने conduct करणार असा प्रश्न पडला.

या सर्वांमध्ये छाप पडली ती एका टूर कंपनीची. आमच्या प्रत्येक चौकशी भेटीमध्ये अतिशय आदरपूर्वक आणि उत्साही संवाद; याने अतिशय आत्मीयता वाटली. त्यात भर म्हणजे अतिशय वाजवी दर.

त्यामुळे त्याच कंपनीची निवड केली. हे दर अतिशय वाजवी, खरं तर फारच कमी असल्यामुळे टूरमधील विविध गोष्टींचा दर्जा कसा असेल याबाबत शंका होती. दुर्दैवाने ही शंका खरी ठरली.

हजरत निजामुद्दीन स्टेशनवर पोचल्यावर प्रथम उभे रहावे लागले ते आमच्या बसेसची वाट बघत. बसेस आल्याच नाही आणि आम्हाला लहान-लहान गाड्यांमधून चंदीगडला नेण्यात आले. वाटेत आमच्या गाड्यांपैकी एकीला (ती इनोव्हा असावी) एक मोठा अपघात होता होता वाचला. गाडीचे एक चाक गाडी वेगामध्ये असताना निखळून दूर जाऊन पडले. अशावेळी ती गाडी जर उलटली असती तर काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही.

चंदीगडला पोहोचल्यावरही बसची व्यवस्था नव्हतीच. काही वेळानंतर बसेस आल्या. आल्या खऱ्या; पण बसच्या चालकांची बस चालवण्याची तयारीच नव्हती. मग भरपूर वेळ गेल्यावर कोणीतरी आलं. त्या चालकांच्या हातात पैसे ठेवले गेले आणि ते चालक गाडी चालवण्यास बसले. टूरसाठी जेवढ्या मंडळींनी नोंदणी केली होती एवढ्या लोकांना बसण्याएवढी जागाही बसमध्ये नव्हती. कशीतरी adjustment करून काही मंडळींना बसावे लागले.

सिमल्याला पोचल्यावर आले तेथील हॉटेल. हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर तेथील दृश्य पाहिल्यावर हसावे की रडावे तेच समजेना. खोलीमध्ये सर्वत्र जमीन सोडली तर आरसेच आरसे. कपडे बदलणेही अशक्य व्हावे अशी परिस्थिती. बेड हिंदी चित्रपटांमध्ये नको त्या जागेवर दाखवतात तसा! आमच्या खोलीतील टीव्ही तर पुढचा भाग व मागचा भाग यामध्ये जवळजवळ एक इंच gap असलेला. टीव्हीची पुढची जवळजवळ निम्मी बटने गायब. रिमोट नाही. प्रथमतः हे टीव्हीचे नुसते खोके आणून ठेवले आहे असे टीव्ही लागत नाही हे पाहून आम्हाला वाटले. मात्र हॉटेलच्या माणसाने तो अद्भुत टीव्ही लावून दिला. प्रत्यक्षात तो टीव्ही चालू झाल्यावर त्यावरील मुंग्यांमधून चित्र शोधत बसण्यापेक्षा टीव्ही बंद होता तेच बरे होते असे आम्हाला वाटले.

बाथरूम मध्ये पाण्याचा गिझर. गिझरचा खालील भाग संपूर्णपणे खाली लोंबकळत असलेला. कोणत्याही क्षणी त्यातील वायरिंगवर पाणी पडून दुर्घटना घडावी अशा परिस्थितीतील.

या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट नव्हते. त्यामुळे रात्रीचे जेवण घेण्यास आम्हाला एका प्रचंड चढणीवर असलेल्या एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले गेले. या हॉटेलकडे जाणारा रस्ता, जिना हा रात्रीची वेळ असल्याने प्रचंड अंधारलेला. प्रचंड अरुंद. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यापासून शेवटच्या पायरीवर पाय ठेवेपर्यंत उलटी होईल एवढा मलमुत्राचा भयंकर वास. अंधारात आपण कशावर पाय ठेवतो आहोत याचाही अंदाज घेणे अशक्य. शिवाय आधारासाठी आजूबाजूला हात ठेवणे शक्यच नाही. अशा या प्रचंड किळसवाण्या अंधाऱ्या मार्गावरून आपल्या ग्राहकांना नेण्याची कल्पना अजबच होती.

आपण कमी पैसे दिले आहेत तर सेवाही दर्जेदार मिळणार नाही अशी मनाची समजूत आम्हीच काय जवळ जवळ त्या टूरमधील सर्वच ग्राहकांनी करून घेतली होती. त्यामुळे दुर्लक्ष करायचे, आपले बीपी वाढवून घ्यायचे नाही असे मी ठरवले होते.

एका ठिकाणी मात्र आपल्यावर अन्याय झाल्याची, आपली फसवणूक झाल्याची भावना अतिशय तीव्रतेने उफाळून आली. ती म्हणजे बर्फावर खेळण्यासाठी जातात त्याठिकाणी जाण्यापूर्वी कपड्यांचा सेट घ्यावा लागतो. ज्या दुकानात आम्हाला थांबवण्यात आले त्यात संपूर्ण सेट अडीचशे रुपयात उपलब्ध होता. काही चिकित्सक प्रवाशांनी एवढा महाग नसतो अशी चर्चा केल्यावर त्या दुकानातील व्यक्तीने यापेक्षा स्वस्त कोठेही मिळणार नाही असे सांगितले. टूर कंपनीच्या प्रतिनिधीनेही `येथेच घ्या` असे आम्हास सांगितले. प्रत्यक्षात काही अंतर पुढे गेल्यावर एका दुकानात कपड्यांचा संपूर्ण सेट पन्नास रुपयात अशा प्रकारचा बोर्ड लावलेला आम्ही सर्वांनी पाहिला. म्हणजे आम्हा तिघांचे दीडशे रुपये होत असताना आम्हाला साडेसातशे रुपये भरायला लावले गेले. अगदी प्रत्यक्ष बर्फ असलेल्या ठिकाणी असे कपडे वीस-तीस रुपयात मिळत होते असे काही प्रवाशांनी मागाहून मला सांगितले.

टूर कंपनीचा टूर मॅनेजर हा अगदीच अप्रशिक्षित होता. त्याचे आपल्याच बसेसच्या ड्रायव्हरवर अजिबात नियंत्रण नव्हते. त्या मॅनेजरनेच बसचा ड्रायव्हर त्याचा मोबाईल बंद ठेवत असल्याने संपर्क करता येत नाही अशी तक्रार आमच्यासमोर कित्येकदा व्यक्त केली. प्रत्यक्षात आमच्या चालकाला वारंवार फोन येत होते. तो ते उचलून बोलतही होता. मग टूर मॅनेजरचाच त्याच्याशी संपर्क का होत नव्हता हे अनाकलनीय होते.

एकदा सकाळी लवकर आटपून बाहेर पडायचे असताना पहाटे उठल्यावर सर्वत्र अंधार होता. लाईट गेले होते. हॉटेलच्या रिसेप्शनपाशी गेल्यावर तेथे सर्वजण झोपलेले. दिवाबत्तीची सोय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याची क्षमता टूर मॅनेजरमध्ये नव्हती.

पुण्यामध्ये नोंदणी करत असताना जी जी ठिकाणे दाखवू असे सांगितले गेले त्यातल्या अनेक ठिकाणी टूर मॅनेजरने केवळ हाताने ते दूरचे स्थळ दाखवले व त्या ठिकाणी जायचे असल्यास तुमचे तुम्ही चालत जा, अशाप्रकारे सूचना दिल्या. एका अभयारण्यात न्यावयाचे आश्वासन दिलेले असताना त्याच्या जवळ गेल्यावर टूर मॅनेजरने `या अभयारण्यात विशेष काही नाही. दिसली तर माकडेच दिसतील. तुम्हाला जायचे असेल तर समोरच्या मालवाहतूक करणाऱ्या जीपमधून जा व येताना तुमचे तुम्ही हॉटेलवर या,` अशा प्रकारे वक्तव्य केले.

एकूणच सर्व गैरसोयींबद्दल जेव्हा जेव्हा प्रवाशांनी तक्रारीचा सूर व्यक्त केला तेव्हा गोडीत बोलण्याऐवजी टूर मॅनेजरचा अॅप्रोच `attack is the best kind of defense` असलेला मला दिसला. हॉटेलमध्ये वास्तव्यास गेल्यानंतर तेथे खोल्यांचे बुकिंगही व्यवस्थित न झाल्याचा अनुभव अनेक प्रवाशांना आला. पॅकेज ब्रेकफास्ट व डिनर असे असताना सर्वच दिवस ब्रेकफास्टमध्ये केवळ ब्रेड-बटर-जाम असेच देण्यात आले. त्यातही काही व्यक्तींना तेही मिळाले नाही असे दिसले.

रोहतांग पास या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने एका ठिकाणी दोन्ही बसेस उभ्या केल्या गेल्या. खूपच वेळ तिथे थांबल्यामुळे बरेच जण बसमधून उतरले. अचानक पुढील रस्ता मोकळा झाल्यावर दोन्ही बसेस प्रचंड वेगाने तो पूर्ण डोंगर चढत्या झाल्या. माझ्यासारख्या अनेकांच्या बायका, लहान मुलं बसमध्ये होती. त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना तो कठीण डोंगर चढून डोंगराच्या टोकावर पोहोचावे लागले. यात कुणास अपघात होण्याची नक्कीच शक्यता होती. सुदैवानं तसं काही घडलं नाही.

एकूणच अगदी वाईट अर्थानं आमची ही टूर अविस्मरणीय ठरली आणि हा सारा अनुभव घेतल्यानंतर कानाला खडा लावला आणि त्या टूर कंपनीकडून पुन्हा कधीही प्रवासाला गेलो नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन करून सावध केलेत हे उत्तम. पुढचे जाणारेही कुठे रेट्स कमी दिसले की शंका घेतील. अजून कोणत्याही आयोजित पर्यटनाचा अनुभव मी घेतला नाही. आपण आपले गेल्यास वीस टक्के फसवलो गेलो (८०० चे रुम भाडे १००० दिले) तरीही एकूण खर्च हा आयोजितांपेक्षा तीस टक्केच असतो. शिवाय बाकीच्या ठिकाणी तरी फसत नाही.

पण टूर कंपनी कुठली ते सांगितलंच नाही.
जेष्ठ नागरिक सोबत नसतील तर स्वतः आयोजित करून जाणे हे सगळ्यात उत्तम. आंतरजालाच्या युगात आता तर ते खूपच सोपे झाले आहे.

सर्वात बेस्ट टूर कंपनी आपण स्वतः असतो. थोडा वेळ घालवून नीट प्लॅनिंग करायला जमलं तर कुठलीही टूर सुखावह होईल. फक्त 3 ते 4 महिने आधी प्लॅनिंग सुरू करावे , त्यापेक्षा आधी जमले तर अतिउत्तम.

टूर कंपनीचे नावाचा मुद्दाम उल्लेख केलेला नाही. अनुभव सर्वांना सांगावा आणि असा अनुभव दुसऱ्या कुणाला येऊ नये, यासाठी विचार व्हावा हाच लेखनाचा उद्देश!

आपले आपण बुकिंग करून जाण्यापेक्षा टूर बरोबर गेलो तर अनेक खर्च शेअर होऊन तुलनेने कमी खर्चाचे पडते असे मला वाटत होते. हा माझा समज चुकीचा असावा.

नवीन Submitted by पराग र. लोणकर on 1 April, 2020 - 20:38>>

असेच आहे, जवळजवळ 40 ते 2० टक्के पैशाची बचत आणि टूरवर पूर्ण कंट्रोल ! कुठेही चला चला लवकर पुढच्या ठिकाणाला जायचंय म्हणून घाई नाही आणि दुसऱ्यांनी निवडलेली ठिकाणे बघण्याची जबरदस्ती नाही.

त्याशिवाय टूर वाल्यांची ठिकाणांची लिस्ट कधी कधी एखादा मूर्ख बनवतो. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळी निवांत जाऊन बसायला हवं त्या ठिकाणी टूर वाले नेमक सकाळी किंवा भर दुपारी घेऊन जातात.

ग्रुप टुअर म्हणजे फसगत असते. स्वत: एखादा गट घेऊन टुर आयोजकांकडे जाता तेव्हाही आणि आपणच आपल्या मित्र - नातेवाईकांना घेऊन जाणे हे सुद्धा. पहिल्या उदाहरणात आयोजकांना आपणच रेडी ग्रुप आणून देतो. दुसऱ्या उदाहरणात येणाऱ्यांच्या वयाचा ताळमेळ राहात नाही. लहान मुले तरुण आणि वयस्क यांची आवड आणि चटपटीतपणा यांत खूप फरक पडतो. प्रत्येक जण त्याची आवडती ठिकाणे ऐनवेळी घुसवू पाहतो. शेवटी कुणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागते.
टुअरवाल्यांचे नाव सांगण्याची गरज नाही. त्यातून धागा भरकटण्याची शक्यता अधिक.

मला स्वतःला फिरण्याची खुप हौस आहे. आजपर्यंत कधीही प्रवासी कंपन्या मार्फत प्रवास केला नाही. थोडासा वेळ आणि जबाबदारी घेतली तर खुप कमी खर्चात छान आपण ट्रीप करु शकतो याचा अनुभव घेतलेला आहे.

बजेट टूर करण्याआधी आपण एकदा साधारण किती खर्च होतो याचा अंदाज घ्यावा व त्यानुसार बजेटवाले जे देताहेत त्याचे ऑडिट करावे. म्हणजे फसगत होणार नाही. अगदीच पाडून भाव देत असतील तर तिकडे सेवा तशीच मिळणार ही खूणगाठ बांधावी Happy Happy

आता हॉटेल्स दरासकट व आतल्या फर्निचरसकट आपण नेटवर पाहू शकतो, ट्रेन/विमान तिकिटांचे दर कळू शकतात. दिवसाला आपल्याला खाणे किती लागते व साधारण किती डिशेस मध्ये आपले भागू शकते याचा अंदाज असतो. यावरून आपले बजेट आपण काढू शकतो. ते मिळालेल्या दराशी मॅच करायचे.

आपण टुअर आपल्यासाठी काढतो पण ते वर्णन ऐकून पुढच्या ट्रिपमध्ये बरोबर येऊ इच्छिणाऱ्यांना नाही सांगणे हा मोठा प्रसंग उभा राहतो. ( राहिला आहे.)
सर्व शहरांत 'गो-स्टे' ( तिथे गेल्यावर तेव्हा रुम असली तर मिळते, नेट बुकिंग घेत नाहीत.) प्रकारची बरी हॉटेल्स असतात रेल्वे स्टेशन / बस स्ट्ँडच्या आसपास. त्याचा उपयोग होतो. अशा ठिकाणी काही जत्रा /उत्सव नसेल तर काही अडचण येत नाही. पैसे भरून बुकिंग न केल्याने न गेल्यास पैसे रिफंड, बुडणे हा धोका नसतो.

Srd, एकटा माणूस बुकिंग न करता आरामात फिरू शकतो, पण सोबत कुटुंब, मुले वगैरे असतील तर हा धोका पत्करता येत नाही.

Booking.com वर तुम्ही आधी बुक करून check in च्या आधी 5 दिवस cancel करू शकता. अर्थात त्यांचे दर हॉटेलच्या मुळ दराच्या ५० ते १०० टक्क्यांनी जास्त असतात असे माझे निरीक्षण आहे

Booking.com वर तुम्ही आधी बुक करून check in च्या आधी 5 दिवस cancel करू शकता. >> हो आम्हि बरेचदा असेच करतो . नंतर एखादे हॉतेल आवडले , स्वस्त वाटले तर हे कॅन्सल करून ते बूक करायचे .
कधि कधि स्ट्राईकिन्ग डील्स पण मिळतात त्यात बरेचदा रीफन्ड मिळत नाही , पण हॉटेल नक्की असेल तर करून टाकतो बूकिन्ग .
आमची मलेशिया- होन्गकॉन्गची पूर्ण १० दिवसाची ट्रीप आम्ही अशीच बूक केली होती .
एक मकाउ च हॉटेल सोडलं तर बाकीची हॉटेल्स आणि लोकेशन्स खूप छान होती.

@ साधना , तिघे असल्यास काही अडचण येत नाही. हा माझा वीस वर्षांचा अनुभव आहे. कारण तीन बेडची एक रुम शोधणे कठीण नसते. स्थानिक सिटी बसनेच जातो. सहज जमते आणि फसवले जात नाही.
कुटुंब म्हणाल तर -
१) वयस्क आई वडिल असतील तर हा अनुभव नाही परंतू इथे काम वाढते - त्यांची आवड आणि लहान मुलांची आवड बदलते,
२) एकाच हॉटेलात दोन बऱ्या खोल्या मिळणे,
३) दोन ओटो कराव्या लागल्यास थोडी धाकधूक वाढते. प्रत्येक रिक्षात एक सक्षम व्यक्ती लागते. गंडवतात/ पुढे मागे होतात/ एम्पोरिअम विजिट गळ्यात मारतात.
४) कार हायर केली की त्याची कमिशनची रेस्टारंटस, दुकाने ,नको असलेली ठिकाणे वाढवून खर्च वाढवतात.

भावा बहिणींचे कुटुंब वाढवल्यास प्रश्न खूपच वाढतात. समवयस्क आणि अतिउत्साही. सतत चर्चा, पर्याय, बाहेर फिरण्यात वेळ वाया घालवणे, कुणाचा इगो कुठे मोडेल सांगता येत नाही.

अशा वेळी प्रत्येक व्यक्तीला एक दिवसाचे नियोजन करू द्यावे... धमाल येते Lol

शेवटी मुख्य planner कडेच सगळे जबाबदारी सोपवून मोकळे होतात आणि ऐन टुरच्या वेळी जास्त कावकाव होत नाही.