जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे

Submitted by अतुल ठाकुर on 1 April, 2020 - 02:36

images_2.jpg

हिन्दी चित्रपटांच्या बाबतीत आपल्याला मनात काही जोड्यांची जुळलेली केमिस्ट्री असते. उदाहरणार्थ शर्मिला टागोर म्हटलं की आपल्याला तिच्या बरोबर राजेश खन्ना किंवा धर्मेंद्र आठवतो. आणि फिरोज खान म्हटलं की जरा आधुनिक दिसणार्‍या नायिका आठवतात. म्हणजे मुमताज, रेखा वगैरे. पण पटकन आपल्या डोळ्यासमोर शर्मिला टागोर आणि फिरोज खान येणार नाहीत. त्याचप्रमाणे मुकेशने आनंदी मूड मध्येही सुरेख गाणी दिली असले तरी मुकेश म्हटले की पटकन दर्दभरी गाणीच आठवतात. जुन्या हिन्दी चित्रपटाच्या चाहत्यांनी बहुधा हे पटावे. पण होते काय की अगदी विसंवादी वाटणारी मंडळी एकत्र येतात आणि त्यातून अतिशय सुरेख अशी कलाकृती तयार होते. काँट्रास्ट मध्येही स्वतःचे आपले असे एक सौंदर्य असतेच. १९७० साली आलेल्या "सफर" चित्रपटातील "जो तुमको हो पसंद" गाण्याच्या बाबतीत असेच काहीसे घडल्यासारखे वाटते.

बाकी पुढे जाण्याआधी एक गोष्ट सांगाविशी वाटते. या चित्रपटातील गाणी म्हटली की लोकांना आधी आठवतं "जिंदगी का सफर है ये कैसा सफर". त्यानंतर आठवतं " जीवनसे भरी तेरी आंखे". दोन्ही किशोरची. पण कधी कधी एखाद्या फलंदाजाला एकच चेंडू खेळायला मिळावा आणि त्याने तो मैदानाबाहेरच टोलवावा असे मुकेशने अनेक गाण्यांच्या बाबतीत केले आहे. ते याही गाण्यात झाले आहे. शिवाय मुकेश जेव्हा आनंदी असतो तेव्हा त्याच्या आवाजात अवखळ प्रेमिक कधीही नसतो. असतो तो समंजस नायक. आपल्या स्त्रीला समजून उमजून घेणारा, तिच्याशी हळुवारपणे वागणारा आणि तिला फुलासारखं जपणारा. मुकेशच्या आवाजातच हा समंजसपणा आहे असे मला वाटते. गाणे पाहिले असता अगदी हेच जाणवते.

शर्मिला टॅगोर आणि फिरोज खान एकत्र पाहिल्यावर असं वाटतं दोन देशांमधली दोन अगदीच भिन्न जमातीची माणसे एकत्र आली आहेत. पण तरीही हे दोघे जोडपे म्हणून आकर्षक वाटतात. कारण कल्याणजी आनंदजी यांनी दिलेली गोड चाल, त्यातील इंदिवर यांचे सोपे पण नायकाच्या भावना थेट सांगणारे शब्द आणि मुकेशचा आवाज. आणि याला जोड लाभली आहे ती फिरोजखानच्या अभिनयाची. आपल्याला हवे ते मिळाल्याने आनंदून गेलेला आणि नायिकेच्या प्रेमात पार चिंब झालेला फिरोज खान संपूर्ण गाणे आपल्याला दिसतो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या घाटातून येणारी पांढरी शुभ्र गाडी आणि त्यात हे देखणे जोडपे. गाण्याच्या सुरुवातीपासूनच शर्मिलाच्या चेहर्‍यावर ते लाघवी स्मित आहे. ही स्वामिनी आपल्या प्रेमात पडलेल्या नायकाचे ते आर्जव जणू एंजॉय करते आहे.

गाडीत बसलेल्या शर्मिलाची देहबोली नीट पाहिली तर कळते की ती अगदी रिलॅक्स आहे. नायकावर संपूर्ण विश्वास टाकलेली नायिका. कारण तो आपल्या प्रेमस्वरुपाची पुजाच करण्यात गुंगलेला आहे. म्हणूनच त्याचे शब्द आहेत " देते ना आप साथ तो मर जाते हम कभी के, पुरे हुवे है आप से अरमान जिंदगी के, हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे". ती कार आणि त्यातून फिरोज खानचं बाहेर येणं, नायिकेसाठी दार उघडणं हे सारं खानदानीपण फिरोज खानच दाखवू जाणे. काही माणसांनाच श्रीमंती आणि त्याबरोबर अदबशीरपणा आपल्या वागण्यात एकत्र दाखवता येतो. हा खान त्यापैकी एक. तिचे किंचित लक्ष दुसरीकडे वळले आहे पाहून तो तिला चटकन फुलासारखे उचलून घेतो. आणि बंगल्यात नेतो....ते दृश्य अतिशय मोहक. आणि गाण्यात दोघांचे एकमेकांशी हळुवारपणे वागणेही तितकेच मोहक.

बाकी प्रेमाची भाषा वेगळी असते असे म्हणतात. असेल ती असो. पण येथे मात्र "तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे" म्हणणारा नायक समोर असल्यावर प्रेम म्हणजे काय ते वेगळ्याने समजवण्याची गरज उरलेली नाही हेच दिसून येते.

अतुल ठाकुर

https://www.youtube.com/watch?v=Cg8753MS35o

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीसारखे गोड लिहिलेय.

हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे, त्यामुळे हल्लीच परत एकदा बघितलाय. त्यामुळे वाचायला अजून मजा आली.

फिरोज खानाला गांवढळ अडाण्याचा रोल कधी मिळाला नसावाच. एक सपेरा... मध्येही 1 सपेरा असला तरी दुसरा रुबाबदार आहेच. फिरोज अशा खानदानी श्रीमंत , आब राखून असलेला तरी इतरांशी त्याची घमेंड न मिरवणाऱ्या रोल्समध्ये कायम मस्त फिट व्हायचा. या चित्रपटातही तसाच रोल आहे, फक्त स्वभाव संशयी असल्यामुळे थोडी निगेटिव्ह छटा.

हे गाणे खूप आवडते आहे पण समहाऊ, हे असे म्हणणारे पुरुष नंतर किती बदलतात याचे प्रत्यंतर या चित्रपटातही येत असल्यामुळे हे गाणे ऐकताना मन प्रसन्न तर होते पण वस्तुस्थिती जाणवून तोंडात थोडी कडवट चवही येते.

साधना प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार. तुमच्या प्रतिसादात काहीतरी नवं असतं. तुम्हीही खुप लक्षपूर्वक गाणं पाहता हे लक्षात आलंय माझ्या. थँक्यु सो मच Happy

मन्या प्रतिसादाबद्दल आभार Happy यापुढे लिंक देत जाईन.