क्वारंटाईनचे दिवस !

Submitted by Charudutt Ramti... on 28 March, 2020 - 07:09

‘कऱ्हेचे पाणी’, ‘माईन काम्फ’, ‘माझी जन्मठेप’ वगैरे प्रमाणे कधी काळी जर आत्मचरित्र लिहायला घेतलं तर त्या आत्मचरित्राचं नाव मी 'क्वारंटाईनचे दिवस' असं ठेवीन. असे (क्वारंटाईनचे) दिवस कधी काळी माझ्या नशिबी येतील असं मला यत्किंचितही वाटलं नव्हतं. मी काही फार सोशल बिशल कॅटेगरी मध्ये मोडणारा व्यक्ती नाही, तसा मी एकांत-प्रियच (कळपात न राहणारा) प्राणी आहे. तरी पण २१ दिवस ( आणि कदाचित गरज पडल्यास जास्तच) बाहेर पडायचं नाही हे जरा निश्चितच दुरापास्त आहे.

सॉफ्टवेअर बिफ्टवेर वगैरे मध्ये असतं तसं आमच्या धंद्यापाण्यात 'वर्क फ्रॉम होम' वगैरे चा दुरान्वयेही काही संबध नसतो ( ‘नसतो’ म्हणजे ‘नव्हता’, पण आता सुरु झाला, हा भाग वेगळा). म्हणजे जर उद्या सादिक किंवा उस्मान नावाच्या गॅरेज वाल्याला "उस्मान भाई, आज दुकान का शट्टर डाऊन्नीच रक्खना. तुमना जरा वर्क फ्रॉम होमिच्च करो" असं जर का सांगितलं तर ते कसं विनोदी वाटेल? किंवा आपल्या इथे पुण्यात मुळामुठेच्या काठी ओंकारेश्वरावर किंवा तिकडे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा-कोयना वा कृष्णा-पंचगंगा अश्या खळखळत्या संगमावर अथवा केवळ शांत नदिकाठी वसलेल्या औदुंबर किंवा तत्सम तीर्थ क्षेत्री, अनामिकेत दर्भाची अंगठी घालून श्राद्धाचे पिंड घालणाऱ्या गुरुजींना “वर्क फ्रॉम होम” जितकं कठीण आहे, तितकंच आम्हा पामर मेकॅनिकल इंजिनियर्स ना. पण आता हळू हळू ते ही शिकावं लागतंय, थँक्स टू "झी जिनपिंग!" फ्रॉम चायना.

नवीन लग्न होऊन सासरी आलेली, (माहेरी फक्त वरण भाताचा कुकर लावायला शिकलेली) सुनबाई कशी हळू-हळू, एक-एक करत सणावाराचा पुरणावरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक करायला शिकते, तसाच काहीसा हा माझा सध्याचा वर्क फॉर्म होम 'शिकण्याचा' अनुभव आहे. इंग्रजांच्या आणि अमेरिकन लोकांच्या भाषेत बोलायचं तर – “टेकिंग बेबी स्टेप्स” !

यू.के. किंवा जर्मनी मधील क्लाएन्ट बरोबरच्या कॉल मध्ये आपली बोलायची टर्न आल्यावर ऐन वेळेस नेट डाउन होणे अश्या अडचणीं पासून ते गोगलगाई पेक्षा ही अति स्लो स्पीड असलेल्या शेअर ड्राइव्ह वरची तेरा एमबी ची फाईल डाउनलोड करण्या पर्यंत! नशिबी गुदरलेले सगळे बाका प्रसंग आणि अस्मादिकांच्या करियरच्या अडथळ्याच्या शर्यतीत समोर आलेले सर्व बिकट प्रश्न सोडवणे आणि ते करत असताना ह्या क:पदार्थ जीवाची यत्किंचितही चिडचिड आणि अजिबात घालमेल न होऊ देता, वर्क फ्रॉम होम चा एक एक दिवस काढणं म्हणजे, आनंद, समाधान आणि धीरगंभीरता ह्या स्वभाव वैशिष्ट्यांचा त्रिवेणी संगम असलेल्या आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले वैश्विक गुरु श्री श्री रविशंकर ह्यांचा किंवा अंगभर काळी वस्त्रं परिधानून खांद्यावर जरतारिचं मोरपंखी नक्षीदार उपरणं घेऊन रुबाबदार दिसणाऱ्या सदगुरुंचा तीन दिवसांचा सत्संग बेंगळुरू किंवा कोईम्बतूरच्या त्यांच्या आश्रमात न जाताच घरबसल्या अटेंड करून मिळवलेल्या पुण्या सारखं आहे.

आयटी क्षेत्रा मध्ये जुनाट झालेल्या पण नॉनआयटी मध्ये ह्या करोना व्हायरस मुळे प्रचलित होत चाललेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ ह्या ‘नॉव्हेल’ अश्या संकल्पनेशी माझा झगडा सुरु होतो, तो घरी मनाजोग्या कधीच न मिळणाऱ्या सुमार अश्या आंतरजालीय संदेश वहन क्षमते पासून. थोडक्यात ' पुअर क्वालिटी ऑफ सिग्नल' किंवा ब्रॉडबँड विषयीच्या अनादी कालापासून आमच्या इंटरनेट सेवा देणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर कडे पेंडिंग असलेल्या असंख्य अश्या तोंडी व अगणित अश्या लेखी तक्रारीं मुळे. अलीकडे मी घरातून जे कॉन्फरन्स कॉल अटेंड करत आहे, त्या कॉल्स ची व्हॉइस क्वालिटी पाहता, एकोणीसशे एकोणसत्तर साली निल आर्मस्ट्राँग ने चक्क चंद्रावरून, अमेरिकेतील नासाच्या ह्युस्टन मधील कंट्रोल रूम ला जो कॉल केला होता आणि त्या कॉल वरून 'ए स्मॉल स्टेप फॉर या मॅन बट ए जाऐंट लीप फॉर मॅन काईन्ड' असा संदेश नासाच्या खगोलशात्रज्ञांना बोलून पाठवला होता, त्या कॉल च्या व्हाईस क्वालिटी पेक्षाही कितीतरी निकृष्ट आहे, हे मी इथे मुद्दाम हून नमूद करू इच्छितो.

आमचा क्लायंट यू. एस. चा आहे. त्यामुळं टेलीकॉन्फरन्स ची वेळ म्हणजे दिवेलागणीची किंवा तिन्ही सांजेची. आणि आधीच्या आठवड्यात कॉल मध्ये ठरल्या प्रमाणे आणि मिटिंग नंतर सर्क्युलेट केल्या गेलेल्या मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये नमूद केल्याप्रमाणं जर आपल्या वाट्याला आलेली कामं पूर्ण झाली नसली तर ह्याच तिन्ही सांजेच्या वेळेला कुणी जर 'कातर-वेळ' असं म्हंटल तर ते फारसं वावगं ठरणार नाही. आता मन कातर होते ती वेळ म्हणजे कातरवेळ की कात्रीत सापडल्या सारखी अवस्था होते ती खरी कातर वेळ, हे ज्याचं त्यानं ठरवावं. आता इथे बऱ्याच लोकांना वाटू शकतं, मेकॅनिकल इंडस्ट्री मधला जॉब आणि यु.एस. किंवा युरोप चा क्लाएन्ट कसा काय बुवा? बऱ्याच लोकांना अजूनही वाटतं की मेकॅनिकल इंजिनियर चा जॉब म्हणजे ‘बर्निंग ट्रेन’ वगैरे सारख्या हिंदी सिनेमात धर्मेंद्र जसा फावड्या नं कोळसा टाकतो बॉयलर मध्ये किंवा शोले च्या फाईट सिन मध्ये जेम्स वॉट ने शोधून काढलेल्या वाफेच्या इंजिनावरची शिट्टी वाजवण्या सारखी काळपट कामं हे मेकॅनिकल इंजिनियरिंग चे लोक रोज कारखान्यात जाऊन करतात. पण जसा आपल्या देशातून देवीचा विषाणू कायमचा नष्ट झालाय तसाच मेकॅनिकल इंजिनियर चा कोळश्याच्या इंजिनातला जॉब सुद्धा आता नष्ट झालाय हे सुद्धा इथे नम्र पणे नमूद करू इच्छितो. तर मूळ मुद्दा असा की भारतातील ही ‘संध्याछाया भिवविती ह्रिदया’ ची वेळ म्हणजेच आमच्या क्लाएन्ट ची 'तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज' ची म्हणजे सूर्योदयाची वेळ त्यामुळे तो गोरा(पान) जॉर्ज, लुईस किंवा थॉमस सकाळी सकाळी बारा सूर्य नमस्कार घालून कॉल ला येतो.

मी कॉल मध्ये "हाय बॉब! होप यु ऑल आर सेफ अँड हेल्दी" असं काहीतरी बाष्फळ ग्रीटिंग्ज वापरून केलेला ओपनिंग टॉक मनातल्या मनात तयार करत, नाटकाची नांदी सुरु करावी त्या पद्धतीने कॉल ची नांदी सुरु करण्याची तयारी करत होतो.

पण एवढ्यातच आमच्या सोसायटीतले दोघे तिघे सिनियर सिटीझन्स 'ह्या देशातील लॉकडाऊन' शी आपला काही संबंधच नाही अश्या अविर्भावात, दिवसभर घरात बसून असल्यानं सुनेनं सांगितलेली कामं करून थकलेल्या अवस्थेत पाय (आणि मन) मोकळे करायला आणि गप्पा मारत बसायला म्हणून खाली उतरले. मी कॉल घ्यायला बसतो त्या रूम च्या आमच्या खिडकीच्या खालून पंधरा वीस फुट अंतरावर असणाऱ्या सेकंड फ्लोअर वर असलेल्या पार्किंग च्या लगत पोडियम वर, नगरसेवकाच्या सौजन्याने सोसायटीला फुकट मिळालेल्या बाकावर बसण्यासाठी लोखंडी बेंच च्या जवळ हे सिनियर सिटीझन च त्रिकुट आलं. आणि मग दोन पाच मिनिटांतच त्यांची चर्चा रंगली. "मोदींनी लॉक डाउन अजून कसं कडक करायला पाहिजे आणि त्याशिवाय करोना पूर्ण कंट्रोल मध्ये कसा येणार नाही” तसेच “'सध्याच्या चीन ने बाजारात आणलेल्या आणि जगभर प्रवास करणाऱ्या करोना विषाणू मुळं जग कसं आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभं आहे?” ह्या विषयावर बाकावर ‘बसून’ ह्या तिघा सिनियर सिटिझन्सनी एकमेकांच्या मध्ये जाणीव पूर्वक अर्धा पाऊण मीटर एवढं सोशल डिस्टंसिन्ग पाळत जोर जोरात परिसंवाद वजा चर्चासत्र सुरु केलं. तिघांपैकी एक आमच्याच बिल्डिंग मधले ‘बरवे’ आजोबा. तोंडावरचा मास्क सारखा रुमाल दर दिड मिनिटांनी गळ्याकडे नेत मान उंच करून ते फ्रेश हवा घेत होते. ‘बरवे’ आजोबांनी परिसंवादाच्या सूत्र संचलनाची जवाबदारी स्वीकारल्या मुळे परिसंवादातील अमूल्य विचार माझ्यासकट कॉल वर आलेल्या इतर आंग्लदेशवासियांना ऐकू येण्यास सुरु झाले. परिसंवादात जमलेल्या तिघांपैकी एका आजोबांना दोन्ही कानांनी अजिबात ऐकू नाही, इतर वेळेस ते कानाला मशीन लावतात…

पण आज त्यांनी "अहोss बरवेss तु-म्ही ज-रा मो-ठ्या-नं बो-लाsss – माsssझं का-ना-ला ला-वा-य-चं मशीन बिघडलं आssssहे! आणि संचाsssर बं-दी-मु-ळे मलाsss बाहेर पडून ते दु-रु-स्त क-र-ता आsssले-लं नाssहीsss, तेंव्हा तुम्ही दोघेही प्लिssज ज-रा मो-ठ्या-नं बोलाsss" असं वर खणखणीत आवाजात पोलिसांनी संचारबंदी पाळा अन्यथा कडक कारवाई करू अशी ताकीद देत गस्त घालताना तो मेगाफोन वापरावा त्या प्रकारे, कमी ऐकू येणाऱ्या आजोबांनी बरवे आणि दुसऱ्या अजोबांना बजावलं.

त्यामुळे बरवे आजोबा आणि दुसरे ( ते देशमुख आजोबा असावेत) साधारण साठ ते सत्तर पेक्षा कितीतरी जास्त डेसिबल फ्रीक्वेन्सीने ओरडून ओरडून आपापली मतं मत ठाम पणे मांडत होते परिसंवादात. आणि बरव्यांच्या आणि देशमुखांच्या प्रत्येकी दर तीन वाक्यांमागे मशीन दुरुस्त करायला न मिळाल्यानं ऐकू कमी (खरंतर नाहीच) येणारे आजोबा बोळक्या तोंडात सुपारी चघळत चघळत…

"बर्रोब्बsssर आहे , बर्रोब्बरsss आहे , अगदी बsssर्रोब्बर आहे बरवे आणि देशमुख तुमचं…" असं ते आजोबा म्हणत होते.

जरा वेळानं ओळख पटली , ते कानाला ऐकू कमी येणारे आजोबा म्हणजे गडकरी आजोबा होते. मी खिडकीतून टेन्शन मध्ये खाली पाहत होतो, एक तर कॉल सुरु होण्यास फक्त एक मिनिट बाकी होता आणि ह्या तिघांची ही मोठमोठ्या आवाजातील बडबड सुरु झाली होती आणि दुसरं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे “बर्रोब्बरsss आहे , बर्रोब्बरsss आहे” असं ओरडून सांगण्याच्या नादात मधून मधून धाप लागून गडकरी आजोबा खोकल्याची उबळ टाकत होते. कॉल च्या टेन्शन पेक्षा ही गडकरी आजोबांचा खोकला कोरडा आहे की ओला? ह्याकडे माझं लक्ष लागून राहिलं., कारण कोरडा खोकला म्हणजे परत करोनाची लक्षणं. आणि काही कारण नसताना गडकरी आजोबांच्या नादानं हे बाकीचे दोघेही इतिहास जमा व्हायचे आणि आमची सोसायटी रात्री दहाच्या बातम्यात टीव्ही वर दिसायची. ह्या चिन्यामुळे सगळ्यांच्या मनात संशय कल्लोळ नुसता. अकरा वर्षांपूर्वी फ्लॅट बुक करताना, बिल्डिंगची लिफ्ट बंद पडली तर उगाच त्रास नको म्हणून फार वरच्या मजल्यावर फ्लॅट न घेता पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या मजल्यापर्यंत फ्लॅट घेण्याची उडी मारताना ह्या "बरवे" आजोबांचा पुढे जाऊन असाही त्रास होईल असे मला यत्किंचितही वाटले नव्हते. पण बॉब ला ह्या आमच्या सोसायटीच्या सिनियर सिटिझन्स नि चालवलेल्या रियालिटी शो वजा परिसंवादामूळ मी कॉल मध्ये बोललेलं काहीच ऐकू येत नव्हतं आणि ह्या रूम मधली ही खिडकी सोडली तर इतर ठिकाणी चांगला सिग्नल मिळत नसल्यामुळे मला शेवटी नाईलाजानंपण ह्या परिसंवादामुळे मला कॉल चक्क रिशेड्युल करावा लागला.

पण सांगण्याचा मुद्दा असा की हे 'क्वारंटाईनचे दिवस' म्हणजे गेल्या बेचाळीस वर्षात कधी पदरी न आलेल्या अनुभवांचा एक गंमतशीर आणि नाट्यपूर्ण असा टवटवीत पुष्पगुच्छ आहे. सध्या पुण्यात अगदी नागपुरी अगदी उन्हाळा सुरु असून सुद्धा तो जाणवू ‘न’ देण्याचं अनोखं गुपित ह्या होम क्वारंटाईनच्या गुलदस्त्या मध्ये दडलेलं आहे. म्हणजे, सकाळी उठावं कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायचं. लिंबू पाणी प्यायल्यावर कोरोना व्हायरस शरीरातून नाहीसा होतो ही अफवा आहे हे माहिती असून सुद्धा मी हे असं कोमट लिंबू पाणी पितो. एकतर सगळ्या अफवांच्यावरती विश्वास ठेवणं जसं योग्य नाही तसंच सर्वच अफवांवर 'अ'विश्वास ठेवणं सुद्धा बरं नव्हे हे माझं वैयक्तिक मत आहे. काही अफवा ह्या अफवा आहेत हे कबूल असून सुद्धा त्या प्रमाणे वागणं काही दृष्ट्या हिताचं ठरतं. व्हायरस नाहीसा होईल न होईल किमान वजन तरी आटोक्यात राहील, होम क्वारंटाईनं मुळे वाढणारं ह्या कोमट लिंबू पाण्यामुळं. मग असं लिंबू पाणी प्राशन करून झालं की मस्त पैकी अगदी गार पाण्यानं नाही पण सोलर च्या किमान कोमट पाण्यानं स्वच्छ फ्रेश अंघोळ करावी. बाहेर कुठं जायचं नसलं तरी बाहेर जायचे स्वच्छ धुवून इस्त्री केलेलं कपडे घालावेत.आणि थोडं काही बसल्या बसल्या गेल्या आठवड्यातलं लॉकडाऊन च्या आधी सुरु केलेलं पण अर्धवट राहिलेलं काम संपवता येतंय का ते पाहावं असं म्हणत लॅपटॉप उघडावा…

… तेव्हड्यातच, न्हाऊन डोक्याला चॉकलेटी रेघा रेघांच्या साधारण एक इंच बाय एक इंच अश्या चौकडीचा पांढरा शुभ्र अर्धा मुर्धा ओला पंच्या केसांवर वेणीसारखा गुंडाळून साऊथ इंडियन सिनेमातल्या देखण्या हिरॉईन ने पडद्यावर करावी तशी आमच्या सौ. नं, मी लॅपटॉप उघडून बसलो होतो, त्या रूममध्ये दिमाखदार (खरं तर एकदम टाळीबाज) एंट्री केली आणि मग... आणि मग…

लसणाचे दोन मोठ्ठाले गड्डे असलेली ताटली पुढे करत 'बसल्या बसल्या सोलून द्या' असं एकदम अचानक हिनं, काहीही कारण नसताना फणकाऱ्यानं म्हणावं म्हणावं! एखाद्याच्या आयुष्यात ह्या पेक्षा दुसरा मोठा भ्रमनिरास होऊच शकत नाही.

कणकेच्या हाताने लॅपटॉप समोर ताटली आपटत स्वयंपाकाच्या ओट्या कडे परत जाताना हिनं…
“आणि बरंका हो सॅनिटायझर लावा लसणाला हात लावण्यापूर्वी, तुम्हाला सुद्धा नीट माहिती नसेल कुठल्या कुठल्या घाणेरड्या एमआयडीस्यांमधुन फिरून आलाय तुमच्या बरोबर हा तुमचा लॅपटॉप?” असा टोमणा मारणं, ह्याला कार्ल्याच्या भाजीला एरंडेल तेलाची फोडणी असं म्हणतात.

दोन मोठं-मोठाल्या लसणाच्या गड्ड्यां कडे एक टक पाहत, नाईलाजानं एका हातानं एक्सेल शीट मधील अगम्य फॉर्म्युले एडिट करणं, आणि दुसऱ्या हाताने बारीक बारीक 'लस'णाच्या पाकळया सोलता सोलता,एक्सेल शीट क्लोज करून शेजारी स्क्रीन वर टाइम्स ऑफ इंडीया ची किंवा WHO ची वेबसाईट उघडून “लवकरच ह्या करोनाची 'लस' बाजारात येतीय का?” आणि ह्या ‘लस’णाच्या पाकळ्या सोलण्यापासून सुटका होतीये का ? ते मोठ्या आतुरतेनं आणि खरंतर त्या ही पेक्षा कितीतरी जास्त पोटतिडीकेनं पाहिलं.

तेव्हड्यात स्वयंपाक घरातून आवाज आला…

"अजून जनावरांवरच प्रयोग सुरु आहेत, माणसांवर सुरु व्हायचेय, तोपर्यंत तुमचे लसूण सोलून झाले असतील तर उठून पटापट अंथरूणं घड्या करुन ठेवा, 'चिंम्मी' उठली बघा! तोपर्यंत मी भांडी घासते आणि तुम्ही केर काढा.” अश्या एका मागे एक तीनचार ऑर्डर्स आल्या, गव्हर्नमेंट ने कलम १४४ लावताना पटापट जी.आर. काढावेत तश्या.

ह्या सगळ्या कामाच्या प्रेशर मध्ये नक्की कोणती एक्सेल फाईल आपण ऑफिस च्या सर्व्हर मधून डाऊन लोड करायला घेतली होती हे संपूर्ण पणे विस्मृतीत जाऊन ह्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्या चाकरमान्याचा दोन मिनिटांसाठी पूर्णपणे “गजनी” झाला होता.

“अहो उद्धव ठाकरेंनी आत्त्ताच एबीपी माझा वर सांगितलंय 'जीवनावश्यक वस्तूंची दुकानं चोवीस तास उघडी ठेवणार, आता तुमचं ऑफिस चं काम बाजूला ठेवा आणि ही यादी केलीय ते सर्व सामान घेऊन या लगेचच पटकन दुकान ‘बंद’ होण्यापूर्वी आणि मास्क घाला बाहेर जाताना, नाहीतर टीव्ही वर दिसाल वेंधळ्यासारखे”.

बापरे, हिच्या तोंडात मला धमकावण्यासाठी किरकोळ नगरसेवक, किंवा शिवसेना शाखा प्रमुख वगैरे कोणी नाहीच, एकदम डायरेक्ट मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच! “अगं चाललोय...घरातली ढेकणं मारायला बोफोर्स च्या तोफा कश्याला मागवतेस? निघालोय!” - असं म्हणत मी सेट वरून गायब.

हे आणि असे असंख्य नाविन्यपूर्ण आणि मुख्य म्हणजे अभूतपूर्व अनुभव सध्या ह्या क्वारंटाईनच्या दिवसांमध्ये अनुभवत आहे. आत्मचरित्राचं नाव तर आधीच मी जाहीर केलेलं आहेच. आता फक्त देशातील हे लॉक डाउन जरा उठू दे मग नव्या पेठेत जाऊन एक चांगला प्रकाशक गाठून ह्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहोळा ठरवून च टाकतो. प्रकाशन सोहोळ्याला ‘बरवे’ काका आहेतच अध्यक्ष म्हणून.

चारुदत्त रामतीर्थकर
२८ मार्च २०२०, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
ते आत्मचरित्राचे नाव रजिस्टर करून ठेवा. नंतर कटकट नको.
रच्याकने तिकडे उत्तर महाराष्ट्रात त्या नारायण नागबळी च्या ऑनलाईन पुजा लवकरच सुरू होणार आहेत. Rofl

तोंडावरचा मास्क सारखा रुमाल दर डिड मिनिटांनी गळ्याकडे नेत मान उंच करून ते फ्रेश हवा घेत होते >>>> Lol डोळ्यासमोर आलं अगदी

आम्हा टेक सेन्टर मध्ये काम करणाऱ्या म्यॅकॅनिकल विंजिनियर लोकांची व्यथा समोर आणाल्याबद्दल धन्यवाद