फळांच्या गोष्टी

Submitted by अरिष्टनेमि on 26 March, 2020 - 10:23


गोष्ट सुरु होते कोल्हापूरकडं; पण लाल मातीतल्या पहिलवानकीची नाही, म्हशीच्या धारोष्ण कसदार दुधाची नाही. गोष्ट जांभळा-करवंदांची, आंब्या-फणसाची.

कोल्हापूरला शिकायला माझ्याबरोबर गोव्याचा ‘साईश’ होता. परिक्षा संपून सुट्ट्या लागल्या. पोरं रात्रीतून पसार. होस्टेलला कडक शांतता. भयाणच वाटायचं. साईशचं आणि माझं ठरलं होतं की सुट्ट्या लागल्यावर गोव्याला सायकलवर जायचं. आम्ही दुस-या दिवशी सायकलींवर टांग मारली न् सुटलो. गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, चंदगडमार्गे तिल्लारी घाटातून डिचोलीत उतरायचं असा कार्यक्रम केला होता तयार.

एक सॅक पाठीला अडकवलेली. सायकलींवर आणि स्वत:च्या पायांवर दांडगा विश्वास. अख्खं जग आपण या सायकलवर फिरु शकतो अशी एक आतली शक्ती. सकाळी सायकलवर बसलो अन् ही शक्ती छाती फुटून बाहेर निघेल असा उत्साह. जसा जसा घाटाच्या रस्त्याला लागलो तशी शक्ती बिक्ती मागं कोल्हापूरातच राहिल्याचं कळालं; पॅडल मारुन नुसती छातीच फुटायची खरी राहिली.

चारेक वाजता पावसानं गाठलंच. ७ जूनचाच दिवस तो, पाऊस काय आल्याशिवाय राहतोय? आलाच. ऐन रस्त्यात गाठलं. साईश कालपासून म्हणतच होता. खरंच झालं. पण इलाज नाही. ‘आधीच हौस, त्यात पाऊस.’ मग एका घराच्या वळचणीला चोरासारखे उभे राहिलो, राहिलो, राहिलो. घराच्या लक्ष्मीला दया येऊन घरात बसवून चहा पाजला. पाऊस उघडला न् आम्ही परत ओल्याशार रस्त्यावर सुर्रर्र करुन सायकली हाणल्या. अंगावरचे कपडे जरासे वाळले म्हणेस्तोवर वाटमारी करणा-या डाकूसारखं पावसानं ऐन घाटात गाठून आडवं उभं धोपटून टाकलं. आडोसाच नाही; करता काय? गायरानात चरायला सोडलेल्या बैलासारखे मुकाट उभे राहीलो.

खाली डांबराच्या कभिन्न रस्त्याला वाहणारं गढूळ पाणी निळसर झालेलं. हा म्हणजे चमत्कारच. पुढं चढाला रस्त्यावर जांभळं पडून नुसता राडा. वर बघितलं, नुसते घोसचे घोस. पण दगड मारायला वर पाहिलं की डोळ्यात पाऊस सणाणा घुसे. मग डोळ्याला हात लावून आधी घोस पाहून घ्यायचा आणि मग द्यायचा दणका, कुठं का लागेना. तोवर दगड शोधता शोधता एका झाडाला टेकवून ठेवलेला लांबच्या लांब बांबू दिसला. मग काय विचारता! चांगली पाटीभर जांभळं पाडली. मध्यम आकाराची, लहानशीच म्हणानात! वरुन पाऊस बदादा झोडतोय, आम्ही जांभळं गोळा करुन खातोय. ताजी रसरशीत जांभळं, आम्ही जीभेचे चाकर. रिकाम्या पोटी ढीगभर जांभळं रिचवली. साईशला म्हटलं, “खा रे भरपूर, अजून पाडतो.” पुन्हा घोस शोधून शोधून बांबूने झोडपे देणं चालू. ‘दुस-याची कढी, धावू धावू वाढी.’ पाऊस उघडेस्तोवर जांभळं हादडली. बॅट-या चार्ज. पुढच्या प्रवासाला सुरु.

अशीच जांभळाची गंमत मागच्या पावसाळ्यात मुदुमलाईच्या जंगलात. वाघिणीच्या पंजाचा माग काढत काढत गुगला-नार्दूच्या रस्त्याला नाल्यातून, झाडा-झुडूपातून मी अन् बोम्मन जंगलात सकाळभर- दुपारभर फिरलो. सूर्य डोक्यावरुन कलून गेला. १५ किलोमीटरच्या वर पायपीट झाली होती. मी बोम्मनला विचारलं, ‘काही खायला मिळेल का?’ थोडं पुढं चालून त्यानं ढीगभर जांभळं काढली झाडाची. खाली बसून हिरव्याशार गवतात ती ताज्या जांभळाची उतरंड लावली. आपल्याकडं १००-१२० रुपये किलोनं जांभळं घेतली तरी तितक्याच महागाच्या दमदार अळ्या त्यात निघतात. पण हे जंगलात वाढलेलं झाड. एवढ्या ढीगात एक म्हणता एक जांभूळ किडकं सापडू नये हा चमत्कारच. म्हटलं, या झाडाचा हा जीन काढून आपल्याकडच्या जांभळात घालावा. माझ्या चेह-यावर बोम्मननं काही तरी वाचलं. जांभळ्या दातातून हसत म्हणाला, “नावलफलम् सापटीया?” मी पण म्हटलं, खरंच की जांभळांचंच जेवण झालं. मस्त चवदार. “आमा, नल्ल इरकं.” तर असो. सध्या या गोवा सहलीचीच गंमत सांगतो.

दुस-या दिवशी ऐन भुकेचा कहर. तडाख्यात सापडलं करवंदाचं रान. रान म्हणजे रानच ते. नजर फिरेल तिथं करवंदाच्या जाळ्या. करवंदसुद्धा कसं? हे भलं लिंबासारखं करवंद. एका वेळी तोंडात एकच जाईल. आम्ही गिरणी चालू केली. तोडली करवंदं की कोंबली तोंडात. ‘हाण सावळ्या फुकटचा माल.’ आयुष्यात मी परत असं करवंद पाहिलं नाही. खाल्ली, खाल्ली, किती खाल्ली? पोटाला तडस लागेस्तोवर. मग पाय उचलून सायकलवर बसू गेलं तर पोट टम्म. पाय उचलेना. साईशला म्हटलं, “मित्रा! इतकं छान हिरवं लुसलुशीत गवत खाली पसरलंय. याचा आनंद घेणार कधी?” सायकलच्या हॅण्डलला लावलेली वॉटरबॅग काढून डोक्याखाली घेतली. तासभर आडवा झालो. करवंदाच्या जाळ्यांकडं बघत विचार करु लागलो की ‘देवानं करवंदं एवढी मोठी दिलीत पण माणसाचं पोट का लहान दिलं असावं? किलोभर करवंदातच भरुन जातं?’

गोव्यात पोहोचता पोहोचता एक गोड वास खूपच आला. साईशला विचारलं तर म्हणाला, “फणस रें तों.” मग म्हटलं, ‘चला घ्या. रस्त्यात आहे, शिवाय फुकट आहे. कशाला सोडा?’ साईश म्हणाला, “तू घरी चल. फणस खाऊन खाऊन कंटाळशील इतके फणस देईन तुला खायला रोज.” मी म्हटलं, “ते ठीक रे, पण हा का सोडायचा?” नाही का? इनफिनिटी प्लस वन म्हणजे इनफिनिटीपेक्षा मोठाच की नाही? पण हे काय त्याला झेपेना. मी पण म्हटलं, “सोड रे तू. जा, मी आलोच.” सायकल स्टॅण्डवर लावली. नाक वर करुन हुंगत हुंगत चाललो. एक्काच मिन्टात झाडाचा तपास लावला. टाणकन् उडी मारुन खालची फांदी धरली अन् वर चढलो. पिकलेल्या फणसापाशी पोहोचलो. त्यावरुन हात फिरवला. अहाहा! ऑलिम्पिकमध्ये जिंकल्यावर पदक घेणा-या विजेत्याला असेच शहारे येत असतील का? साईश कंटाळून खरंच पुढं जाईल म्हणून मी घाईघाईनं पिळून तोडण्यासाठी फणस घट्ट पकडला आणि ..... फच्कन आवाज होऊन माझा हात त्या सडक्या फणसात रुतला. मी डब्बल स्पीडनं खाली उतरुन हाताचा परत वास घेतला. ‘झक मारली न् मुंबै पाहिली.’ डबक्यातल्या चिखला-पाण्यात घोळसून घोळसून हाताचा रस पुसला. रस्त्यावर आलो. साईश सायकलचा लगाम धरुन उभाच होता. म्हणाला, “काय रे?” म्हटलं, “काय नाय. खूप मोठ्ठा फणस होता. सायकलच्या कॅरीयरला मावला नसता म्हणून नाही घेतला. जाऊ दे, तुझ्या घरी खाऊ ना! चल.” साईशच्या मागोमाग सायकल काढली. "च्या मारी या फणसाच्या मी!”

मग फणस कसा खायचा हे शिकलो खुर्सापारला पांड्याच्या घरी. सकाळी न्याहारीच्या वेळेला पांड्याच्या मळ्यातला गडी नारळावर चढला, मस्त दोन-तीन शहाळी उतरवली. परसात फणस पिकून सुगंध सुटला होता. हाताला तेल लावून त्यानं सरासर फणस चिरुन गरे काढले. दोन दणक्यात शहाळे फोडून मऊशार थंड खोब-याच्या वड्या काढल्या. मग एकेक फणसाचा गरा लुसलुशीत खोब-यात घालून खाल्ला. भारी म्हणजे भारीच, आता काय सांगावं! शिवाय संध्याकाळी ४ वाजता चहाच्या मोठ्या मगाबरोबर पांड्याची आई एक ताट भरुन तळलेले फणस गरे ठेवायची. याची मजा पानभर वर्णन करुनसुद्धा सांगता येणार नाही.

अशी मजा आंब्यात नाही. हां, पण आंब्याची लक्षात राहील अशी मजा म्हणाल तर माझ्या लहानपणी. आजोबा आंब्याच्या मोठ्या पाट्याच्या पाट्या विकत घ्यायचे. ‘खा रे पोराहो!’ शिवाय अजून एक खोलवर जपलेली आठवण म्हणजे कै-यांची.

दुपारी शाळा सुटल्यावर सातवीच्या स्कॉलरशिपच्या परिक्षेसाठी शाळेत जादा तास असायचे. मग दुपारी शाळेमागच्या देवळात मी, आशक्या, धन्या, वश्या असे ४-६ निवडक जिवलग जमा व्हायचो. अशोकच्या दप्तरात खोल ठेवलेल्या खोब-या आंब्याच्या शेलक्या कै-या असायच्या. किती झाडाच्या किती कै-या खाल्ल्या असतील पण या कै-या काही औरच होत्या. त्या चवीशी तुलना नाही. मी घरुन कागदाच्या पुडीत बांधून तिखट-मीठ न्यायचो. देवळात मंडळी जमून मांड्या घालून स्थिरावली की वाटेकरी मोजायचे. कंपासधल्या ब्लेडनं कैरीचे मोजून तुकडे करायचे. खिशातली तिखटा-मीठाची पुडी उघडून ठेवायची. ज्यानं जसं सोसेल तसं फोडीवर टाकून घ्यावं. कै-या संपल्या की उठून तोंडं शर्टच्या बाहीला पुसत पुसत शाळेत जायचं. चवीला चटावलेल्या जीभेला मग अभ्यासातली नीरस प्रश्नोत्तरं जीवावर यायची. ‘जाऊ दे खड्ड्यात ही स्कॉलरशिप, काय अडलंय?’

दुस-या दिवशी दुपारनंतर पुन्हा शाळेकडं पाय वळायचे नाहीत. नाईलाजानं फरफटत शाळेत निघायचं. रस्त्यात खिशातली पुडी चाचपायची, आज आशक्या आलाच नाही तर आपला शाळेत उगीच जादाचा हेलपाटा, बिनकामाचा; अशी भीती वाटायची. वर्गात जाता जाता आशक्या आला असल्याची खात्री करुन आपल्या जागेवर बसायचं. समोर सर प्रश्न विचारत असायचे, “महाराष्ट्राच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या किती?” मी आणि शेजारचा वशा वर्गात नजर फिरवून आज कैरी पार्टीचे किती वाटेकरी आलेत या संख्येचा शोध घेत असायचो. वशा हळूच तोंडावर हात ठेवून सांगायचा, “आज धन्या आला नाही. शेतात पाणी भरुन उशीरा येईल.” तो नंतर उशीरा आला तर बरं, मग आपल्याला कैरी जास्त मिळेल. असं आम्हाला दोघांनाही वाटायचं. पण धन्या भामटा, लवकर आला तरी वर्गात न येता आधीच देवळामागच्या वडाखाली जाऊन बसायचा. आम्ही दुपारी कै-या खायला शाळेमागे आलो की आम्हाला धन्या समोर यायचा. धन्यानं कधीच कैरी पार्टी चुकवली नाही आणि मला न् वशाला शाळा संपेस्तोवर विधानपरिषद कळाली नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लिहिलंय, चित्रदर्शी. मागे एकदा राधानगरीला गेलो असताना तेथे अगदी तडस लागेपर्यंत जांभळे खाल्ली त्याची आठवण झाली.
जांभळं, करवंद, कैऱ्या .....सगळा रानमेवा अवीट गोडीचा.

सध्या घरात अडकून पडलोय असे, गावी जाण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही आहोत आणि तुम्ही हे असले तोंपासू लेख लिहून जखमेवर मीठ चोळा.

Mast!!

मस्त लिहिलंय..
एक काळ आणि एक लहानपण डोळ्यासमोर उभं केलंत..
ते ही मनातलं काहीतरी अलगद उलगडता, उलगडता..

मस्तच लिहिलंय
पण पेरू आणि जाम कसे सुटले तुमच्या तावडीतून Wink