मन वढाय वढाय (भाग २७)

Submitted by nimita on 20 March, 2020 - 21:44

रात्रीची जेवणं झाल्यावर रजत, स्नेहा आणि वंदना गच्चीत बसून गप्पा मारत होते. हळूहळू रजतचा ट्रेनिंग करता जायचा दिवस जवळ येत होता. आणि त्यादृष्टीनी त्याची तयारी कुठपर्यंत आलीय याबद्दल तो अगदी उत्साहानी सांगत होता.त्यांचं बोलणं चालू असतानाच रजतचे बाबा पण वर आले.

"बरीच रंगलेली दिसतीये मित्रांची मैफिल ?" वंदनानी हसत हसत विचारलं. रजतच्या शेजारी बसत त्याचे बाबा म्हणाले," हो, पुढच्या आठवड्यात सगळ्यांचा पिकनिकला जायचा प्रोग्रॅम ठरतोय.... आणि तोही सहकुटुंब सहपरिवार! तुम्हांला सगळ्यांना जमेल ना?स्नेहा, तुझे आई बाबा पण येतील बहुतेक."

"मला तर डोकं वर करायला पण फुरसत नाहीये हो.... माझं अवघडच आहे. पण तुम्ही सगळे जण जा!" थोडासा खट्टू होत रजत म्हणाला.

त्यावर वंदना म्हणाली," आता सध्या तरी मी कुठेही नाही जाणार या दोघांना सोडून. जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत त्यांचा सहवास एन्जॉय करू या. एकदा का हे बडोद्याला गेले की मग आपल्याकडे खूप वेळ असेल ; तेव्हा करू हे सगळं !"

वंदनाचं बोलणं ऐकून रजतनी चमकून तिच्याकडे बघितलं आणि विचारलं," हे काय ! म्हणजे तुम्ही नाही येणार आमच्या बरोबर ? पण हे कधी ठरलं? "

त्याची ही प्रतिक्रिया अपेक्षितच होती त्याच्या बाबांना. ते हसत हसत म्हणाले,"तुझी प्रश्नावली संपली की सांग, मग एकदमच सांगतो सगळं,"

रजतच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघत वंदना म्हणाली," अरे, आज सांगणारच होतो आम्ही तुम्हांला."

"पण हा निर्णय का घेतला तुम्ही ? I am sure, तुम्ही नीट विचार करूनच ठरवलं असणार; पण तरी- तुम्ही या वयात इथे एकटे राहणार म्हणजे..." रजतच्या आवाजात त्याला आपल्या आईवडिलांविषयी वाटणारी काळजी अगदी स्पष्ट दिसत होती.पण त्याच्या बाबांकडे त्याच्या सगळ्या काळज्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयारच होती. काही क्षण थांबून त्यांनी बोलायला सुरुवात केली -" खरं सांगू का...तुझं हे प्रमोशन आणि त्यामुळे तुझ्या होणाऱ्या बदलीची बातमी कळली म्हणून.....नाहीतर आम्ही दोघांनी ठरवलंच होतं या बाबतीत तुमच्याशी बोलायचं म्हणून...म्हणजे बघ ना- आता तुमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं... इतके दिवस आपण सगळे एकत्र राहिलो... पण आता तुम्ही दोघांनी तुमचं वेगळं घरकुल उभारावं असं आम्हाला वाटतंय .आणि फक्त आम्हांलाच नाही बरं का ! याबाबतीत आम्ही जेव्हा स्नेहाच्या आईबाबांशी , आजीशी बोललो - आमची भूमिका स्पष्ट केली तेव्हा त्यांना सुद्धा पटला आमचा विचार." आपलं म्हणणं दोघांना पटतंय की नाही याचा अंदाज घेत ते पुढे म्हणाले, "आम्ही चौघांनी मिळून ठरवलं होतं की पुढच्या महिन्यात स्नेहाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं....पण तुझ्या या बदलीच्या न्युज मुळे आमची प्लॅंनिंग गडबडली.."

"कोणतं सरप्राईज?" स्नेहानी कुतूहलानी विचारलं.त्यावर वंदना म्हणाली," अगं, बऱ्याच वर्षांपूर्वी- म्हणजे तुम्ही दोघं खूप लहान होतात ना तेव्हा- तुझ्या आई बाबांनी आणि आम्ही इथे पैठण रोडवर दोन प्लॉट्स घेतले होते- शेजारी शेजारी - तुमच्या दोघांसाठी. पण तेव्हा हे माहीत नव्हतं ना की शेवटी ते दोन्ही प्लॉट्स एकच होतील म्हणून!" आपल्या मुलांच्या गंभीर चेहेऱ्यांवर हसू यावं म्हणून वंदनानी कोपरखळी मारली. आणि काही अंशी ती यशस्वीही झाली.

संभाषणाचा हा धागा पकडत बाबा म्हणाले, "आम्ही ठरवलं होतं की ते दोन्ही प्लॉट्स स्नेहाला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून द्यायचे; म्हणजे तिथे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घर बांधून राहता येईल."

आपल्या बाबांचं हे बोलणं ऐकून रजत पुरता गोंधळला होता. त्यानी स्नेहाकडे बघितलं तर तिच्या चेहेऱ्यावर सुद्धा त्याला तेच दिसलं.. ती सुद्धा विचारात पडली होती.
त्या दोघांना असं एकदम गप्प बसलेलं बघून वंदना म्हणाली,"अरे, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं किंवा गोंधळून जाण्यासारखं काहीच नाहीये. आम्ही काही वेगळं नाही करणार...आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे ही.. पूर्वी नाही का लोक वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे ! तसंच काहीसं आहे हे. तुम्ही दोघांनी पण तुमच्या संसाराची स्वप्नं बघितली असतील.. तुमचंही एक स्वप्नातलं घरकुल असेल- राजाराणीचा संसार असेल.... मग आत्ता ऐन उमेदीच्या काळात ही स्वप्नं पूर्ण झाली तर उत्तमच नाही का ?

पुढच्या पिढीच्या आयुष्यात उगीच लुडबुड करून आपलं वर्चस्व दाखवत बसण्यापेक्षा त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीनी जगू द्यावं आणि आपणही आपल्या मनाप्रमाणे मुक्त जगावं! आता आमच्याही सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यायत, गृहस्थाश्रमातली सगळी कर्तव्यं आम्ही अगदी चोखपणे पार पाडली आहेत.पण ते सगळं करत असताना इतर बरंच काही करायचं राहून गेलं होतं; आता त्या सगळ्या इच्छा, सगळी स्वप्नं पूर्ण करायचा विचार आहे."

आपल्या आईचं हे स्पष्टीकरण रजतला काही फारसं पटलं नाही. तो काहीशा नाराजीच्या स्वरात म्हणाला,"पण आम्ही कुठे म्हणतोय की तुम्ही आमच्या संसारात लुडबुड करताय म्हणून ? तुम्ही स्वतःच ठरवून घेताय सगळं. आणि आपण सगळे एकत्र राहून सुद्धा एन्जॉय करतोच आहोत ना आत्ता ? कोणीच कोणाच्या आयुष्यात उगीच ढवळाढवळ करत नाहीये पण तरीही जेव्हा मदतीची गरज लागते तेव्हा आपण असतो एकमेकांसाठी ! किती मोठा आधार वाटतो अशा वेळी..."

"तुझं सगळं म्हणणं मान्य आहे आम्हांला. तुमच्यासारखंच आम्हांला पण तुमच्या बरोबर राहायला आवडतं. तुमचा आधार वाटतो. पण तरीही आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी तुमचा वेगळा संसार थाटावा...." वंदनाच्या स्वरातून तिचा निर्धार जाणवत होता -"आणि आम्ही जे काही करतोय ते आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी आहे. कायम जवळ राहिलं म्हणजेच नाती मजबूत होतात असं अजिबात नाहीये...उलट - त्यामुळे 'अतिपरिचयात अवज्ञा' होण्याचीच शक्यता जास्त असते. खूप उदाहरणं बघितली आहेत आम्ही अशी. त्यापेक्षा थोडं लांब राहून नात्यातला गोडवा टिकवणं कधीही चांगलं!"

वंदनाच्या बोलण्याला दुजोरा देत रजतचे बाबा म्हणाले,"याबाबतीत मात्र माझा तुझ्या आईला अगदी बिनविरोध सपोर्ट आहे बरं का!"

'त्यांनी दोघांनी ऑलरेडी निर्णय घेतला आहे' हे आता रजत आणि स्नेहाच्या लक्षात आलं होतं. स्नेहा काही बोलणार इतक्यात रजत तिला म्हणाला," आपण दोघांनी काय ठरवलं होतं - सगळे मोठे जो काही निर्णय घेतील त्याचा मान राखायचा ! हो ना ? त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे; now the ball is in our court.. let's respect their decision."

रजतचं हे बोलणं ऐकून त्याच्या आई बाबांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांना वाटत होतं त्यापेक्षा जास्त समजूतदार निघाली होती त्यांची मुलं. मनाविरुद्ध का होईना पण दोघंही तयार झाले होते.

"चला, ठरलं तर मग. आता उद्यापासून तुमची दोघांची बडोद्याला जायची तयारी सुरू ! मी नीलाला फोन करून ही खुशखबर सांगते. वाटच बघत असेल ती माझ्या फोनची," गच्चीतून खाली जाता जाता वंदना म्हणाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users