मूर्ख कावळा आणि त्याला ‘मामा’ बनविणारी कोकिळा

Submitted by Dr Raju Kasambe on 18 March, 2020 - 11:16

मूर्ख कावळा आणि त्याला ‘मामा’ बनविणारी कोकिळा

कावळ्याचा परिचय कुण्या भारतीयाला करून द्यायची आवश्यकता नाही. आपल्या बालपणी ‘एक होता काऊ, एक होती चिऊ’ असं आपल्याला शिकविलं जातं. कावळ्याचा धूर्तपणा आणि चिमणीची निरागसता आपल्या मनावर ठसवली जाते. पंचतंत्रातल्या गोष्टी आणि लोककथांचा आपल्या मनावर ठसा उमटतो. मग आपल्याला जग तसंच वाटतं.

खरे तर, कावळा तहानलेला असताना माठात खडे टाकून पाण्याची पातळी वर आणायचा प्रयत्न करील काय? त्याला एवढी बुद्धी आहे का? महिनो गणती पक्षी दररोज त्याच घरी त्यात आरशातल्या वा खिडकीच्या काचेतील स्वतःच्या प्रतिबिंबाला टोचण्या का मारतात? खरे तर, माकडापर्यंतच्या उत्क्रांती पावलेल्या कुठल्याही प्राण्याला आरशाचा अर्थच समजत नाही. तो फक्त चिंपांजी आणि त्यापेक्षा जास्त बुद्धिमान असलेल्या प्राण्यांनाच समजतो.

भारतात सर्वत्र आढळणारा कावळा वाळवंटापासून बर्फाळ प्रदेशापर्यंत स्वतःला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारा पक्षी आहे. त्याला खायला काहीही चालते अगदी खरकट्या पासून तर मेलेल्या प्राण्याच्या मांसापर्यंत. तसेच पक्ष्यांची छोटी पिल्लं पळविण्यात ही तो तरबेज आहे. अगदी हॉटेल मालकाची नजर चुकवून भजी, इतर खाद्य पदार्थ सुद्धा तो पळवितो. गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे मृत जनावरांची कलेवरं संपवायची जबाबदारी काही अंशी घारींसोबतच कावळ्यांवर येऊन पडली आहे.

दुसऱ्या पक्ष्यांची पिल्ले पळविणारा कावळा स्वतःच्या घरट्याचे, पिल्लांचे संरक्षण मात्र खूप आक्रमक पद्धतीने करतो. घरटे बांधणीसाठी चिवट काड्या काटक्या सोबतच बारीक तारांचा उपयोग सुद्धा तो करतो. त्यामुळे त्याचे घरटे खूपच मजबूत असते. एप्रिल ते जून मध्ये कावळ्याची वीण होते. घरटी असलेल्या झाडावर चुकुनही चढणाऱ्या माणसाला ते टोचण्या मारून हैराण करून सोडतात. पण धूर्त कावळ्याची वीण होते त्या वेळेसच त्याला मूर्ख बनविण्यासाठी दुसरा पक्षी तयार असतो. तो म्हणजे कोकीळ!

कोकीळ नर चमकदार काळा रंगाचा असून त्याचे डोळे गूंजी सारखे लाल असतात. मादी मात्र तपकिरी रंगाची असून त्यावर पांढरे ठिपके आणि पट्टे असतात. आपल्याकडे कोकिळा सुंदर गाते गैरसमज आहे. खरेतर ‘कुहुss कुहुss’ गातो तो नर कोकीळ, मादी नव्हे!

मादी केवळ ठीक ‘पीक ‘पीक क्यू’ असा कर्कश आणि तुटक आवाज काढू शकते. सांगायचे असे की कोकिळेची विण सुद्धा एप्रिल ते जून ह्या काळातच असते. पण, कोकीळ कधीच स्वतःचे घरटे बांधीत नाही. तर कोकिळा स्वतःची अंडी कावळ्याला मूर्ख बनवून त्याच्या घरट्यात घालते आणि कावळ्याची स्वतःची अंडी घरट्याच्या बाहेर फेकून देते.

पण आपल्याला वाटते तितके हे सोपे नसते. कारण कोकीळ काही गडबड करेल असा संशय कावळ्याला असतोच. कावळीणीने अंडी घातल्यानंतर नर कोकीळ आपल्या एकसारख्या ‘कुहुss कुहुss’ कुंजनाने त्या अंडी उबविणार्‍या कावळीणीला आणि घरट्याचे संरक्षण करणाऱ्या कावळ्याला त्रासवून सोडतो. नर कावळा नर कोकिळेचा पाठलाग करून त्याला दूरपर्यंत हुसकावून परत येतो. पण नर कोकीळ पुन्हा पुन्हा ‘कुहुss कुहुss’ चा राग आळवत राहतो. सुरुवातीला मंजूळ वाटणाऱ्या ह्या ‘कुहुss कुहुss’ची पट्टी चढत जाऊन शेवटी कर्कश होत जाते. पुन्हा-पुन्हा कोकिळेचे घरट्याजवळ धडक मारणे त्या कावळ्याच्या जोडप्याला असह्य होते. त्यामुळे चिडून जाऊन कावळा-नर-मादी दोघेही मिळून नर कोकिळेचा पाठलाग करतात. ह्याच संधीची वाट बघत मादी कोकिळा जवळपास पानोर्‍यात दडून बसलेली असते. तिची अंडी घालायची वेळही येऊन ठेपलेली असते. ती लगेच कावळ्याच्या घरट्यात स्वतःचे अंडे घालून कावळ्याचे अंडे चोचीत धरून फेकून देते. तिकडे नर कोकीळ कावळ्यांना दूरपर्यंत घेऊन जातो. कावळे परत येईपर्यंत मादी कोकिळा आपला कार्यभाग साधून उडून गेलेली असते.

बरेचदा ती गडबडीत कावळ्याचे अंडे फेकायचे सोडून देते. कावळ्याची आणि कोकिळेची अंडी रंग आणि आकाराला हुबेहूब एकसारखीच दिसतात. निसर्ग कोकिळेचीच साथ देतो. परत आलेल्या कावळ्यांना घरट्याकडे बघून काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो. पण नेमके काय झाले असावे ते त्यांना कळत नाही. समजा घरट्यात एखादे अंडे जास्त असले तरीही कावळ्यांना मोजता थोडीच येते? (समजा एक अंडे जास्त असल्याचे त्यांना कळाले असते तरीही आपले ते कोणते आणि परके ते कुठले हे ओळखणे निश्चितच अशक्य ठरले असते). कधीकधी काही कावळ्याच्या घरट्यात पाच ते दहा अंडी सुद्धा आढळून आली आहेत. त्यात कोकिळेचे योगदान किती ते शोधणे मजेशीर असेल!

मूर्ख (की मामा?) बनलेले कावळे घरट्यातील सर्वच अंडी उबवतात. सर्व पिल्लांना स्वतःची समजून प्रेमाने भरवितातही. हळूहळू पिल्लं बाळसं धरतात. त्यांना पंख फुटायला लागतात. ते आवाज करायला लागतात. अनेकदा तर कोकिळेची पिल्लं कावळ्याच्या पिल्लांना घरट्यातून खाली ढकलून देतात.

तिकडे आपल्या घरट्यात मोठी होत असलेली पिल्लं आपल्यासारखी दिसतही नाहीत आणि आवाजही विचित्र करतात हे बघून कावळ्यांचे जोडपे साशंक होते. आपल्या सोबत धोका झाला आहे त्यांना हळूहळू उमजते.

आता ह्या पिल्लांना असं जिवंत सोडायचं नाही असं त्यांना वाटत असेल. पण तोपर्यंत कोकिळेची पिल्लं आपल्या बीनभाड्याच्या सावत्र आई वडिलांचे घरटे सोडून उडून गेलेली असतात. अर्थात कधी कधी अशी पिल्लं कावळ्याकडून मारली सुद्धा जातात.

अशाप्रकारे आळशी कोकीळेचा वंश अजूनही टिकून आहे आणि मूर्ख कावळे कोकिळेच्या पिलांना वाढवतच आहेत. आम्ही बालपणी ऐकलेल्या गोष्टीतील ‘चतुर कावळ्याला’ मामा बनविणारा पक्षी सुद्धा आहे तर!!

कावळे कोकिळेच्या पिल्लांना भरविताना : विडिओ
https://www.youtube.com/watch?v=GtCQAOStdFM
https://www.youtube.com/watch?v=J4WV7s16pSY

एक छायाचित्र: https://www.facebook.com/wildlifephotographyindia/photos/a.9203393947024...

डॉ. राजू कसंबे, मुंबई
(पूर्व प्रकाशित: दैनिक मातृभूमी 18 जुलै 2002)
.

ता.क.:
कोकिळेची परभुत विण (Brood Parasitism) यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी उत्क्रांत पावल्या आहेत. त्यापैकी काही म्हणजे:
१. नर कोकीळ रंग – आकाराला कावळ्यासारखा दिसतो. त्यामुळे संधीप्रकाशात त्याच्याकडे दुर्लक्ष होते.
२. मादी कोकीळ चुट्ट्या बुट्ट्यांची असल्यामुळे संधीप्रकाशात सहजी दिसून पडत नाही.
३. कोकिळेच्या अंड्यांचा ऊबवणीचा कालावधी कावळ्यांच्या उबवणीच्या कालावधी पेक्षा कमी असतो. जेणेकरून कोकिळेची पिल्लं आधी जन्माला येतात. ह्या पिल्लांना जन्मताच घरट्यातील इतर पिल्लांना किंवा अंड्यांना घरट्याबाहेर ढकलून द्यायची उपजत प्रवृत्ती असते.
४. कोकिळेची पिल्लं आधी जन्माला आल्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसात भरपूर खाऊन बऱ्यापैकी सुदृढ बनतात व त्यांच्या जगण्याची संभावना वाढते.

Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती. आपली पिल्ले वेगळी दिसताहेत हे पक्ष्यांना बहुतेक कळत नसावेत. मागे एक फिल्म पहिली होती त्यात स्वतःच्या आकाराच्या तिप्पट असलेल्या पक्ष्याला स्वतःचेच पिल्लू समजून दुसऱ्या जोडीने वाढवले. आपले पिल्लू इतके मोठे किंवा इतके खादाड कसे हा प्रश्न त्यांना पडला नाही.

https://youtu.be/SO1WccH2_YM

मस्त लेख सर.
आणि खरेतर ‘कुहुss कुहुss’ गातो तो नर कोकीळ, मादी नव्हे!>>हे खरंच माहीत नव्हते. आजपर्यन्त काळी ती गाणारी कोकिळ मादी समजायचो Proud
----------

अवांतर -
कोकिळ पक्षी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या टाइप मेंटेलिटी आहे आणि मुळात कोकिळ नर गातो हे समजल्यावर गानकोकिळा उपाधी थोड़ी विसंगत वाटू लागलीय

इंटरेस्टिंग.
हे सर्व इतकी वर्षे चालूनही कावळा कावळीत दोघे एकावेळी घरटे सोडून न जाण्याचा इंटेलिजन्स का आला नाहीये?

इंटेलिजन्स हा प्रॉब्लेम कळाला किंवा मान्य केला की त्याची पुढची पायरी नं? ही अडचण खरेतर दिमाग के बजाय दिलसे सोचा अशाने असावी का?

कावळ्याचे सोडा ... पुढच्या पिढीच्या कोकिळांना कोण नॉलेज ट्रान्सफर करतो कि कावळ्याच्या घरट्यात अंडी घालायची म्हणून.

साधना तुम्ही दिलेली क्लिप पहिली... ती देखील कोकिळा आहे...
कोकीळ कोणाच्याही घरट्यात अंडी घालतात म्हणजे. क्लिप पाहून वाईट वाटले...

पुढच्या पिढीच्या कोकिळांना कोण नॉलेज ट्रान्सफर करतो कि कावळ्याच्या घरट्यात अंडी घालायची म्हणून.>> डीएनए. Happy

मस्त लेख!

साधना, क्लिप पाहिली.त्या छोट्या पक्षांचे वाईट वाटले.नवल वाटले की डोळे न उघडलेले कोकिळेचे पिल्लू,दुसरी अण्डी घरट्याबाहेर फेकतेय.

छान लेख! ही सगळी माहिती कळण्यासाठी पक्षी, प्राणी अभ्यासकांनी केलेली मेहनत लक्षात येते. संशोधक दिवसरात्र निरिक्षणे करुन आश्चर्यकारक माहिती आपल्या पर्यंत पोहोचवतात.

हे माहीत आहे. पण तुम्ही कावळा प्रजातीला मूर्ख म्हणलात ते काही पटले नाही. साधे असणे विश्वासाने स्वतःचे घरटे बनवणे व कोणी उचकवले तर त्यामागे जाणे हे साहजिक व स्वाभाविक आहे. कावळा प्रजाति खूप स्मार्ट आहे ह्याचा मला अनुभव आहे. हे पर्सेंटेज खूप कमी असणार कारण दोन्ही पक्षी एंडेंजर्ड नाहीत.

निसर्गाला व नैसर्गिक बिहेविअर् ला ह्युमन ट्रेट्स चिकटवू नका गोइन्ग फॉरवर्ड.

ह्या रचने मागे निसर्गाचा काय उद्देश असावा कळत नाही? एकिकडे सुगरण सारखा पक्षि प्रचंड मेहेनत घेउन सुबक असं घरटं करणारा पक्षि बनवलाय तर दुसरीकडे कोकिळे सारखा आळशी?

बोधकथा, दंतकथा, पंचतंत्र यामध्ये कुठेतरी कावळा व कोकिळा यांच्यातील या विषयावर कथा/ गोष्ट नक्कीच असणार.

अग्निपंख
निसर्ग नेहमी समतोल राखणारा असतो त्यामुळे इकडे सर्व काही उपाय विचारपूर्वक असतात हे नक्कीच. कावळ्याची प्रजाती अनिर्बन्ध वाढू नए याकरिता कोकिळ रुपात चेकमेट साधुन निसर्गाने हां बायोलॉजिकल कण्ट्रोल घडवलेला आहे. कावळे अतिप्रमाणात वाढले तर ती राष्ट्रीय आपत्ती कशी घडते हे डॉक्टरांनी मागे एका उदाहरणात नमूद केलेले आहेच.

अंडी फेकून द्यायची अक्कल त्यांच्या dna मध्येच लिहिलेली आहे.
पक्षी/प्राणी/जलचर हे स्वयंप्रेरणेने कठीण कठीण गोष्टी लीलया करतात, जसे जन्मतःच आजूबाजूची अंडी बाहेर फेकणे, अतिशय कठीण रचनेचे मजबूत घरटे बांधणे, जिथे जन्म झाला त्या जागी हजारो मैल जमीन, हवा अथवा पाण्यातून प्रवास करून पोहोचणे. माणसाच्या dna मध्ये असे कुठले ज्ञान आहे का? स्वयंप्रेरणेने तो काही करतो की सगळेच त्याला निरीक्षणातून शिकावे लागते असे प्रश्न कधीकधी पडतात.

कावळा मूर्ख नसून खूप हुशार आहे या अमाच्या मताशी सहमत. त्याच्यासमोर त्याला न मिळेलश्या जागी अन्न ठेवले तर तो अनंत युक्ती करून ते अन्न मिळवतो हे खूपदा पाहिलंय. त्याला स्मरणशक्तीही असावी बहुतेक. त्याचे घरटे मोडणाऱ्या किंवा इतर त्रास देणाऱ्या माणसांना तो दीर्घकाळ विसरत नाही. माझा मामा लहानपणी खूप वांड होता. पक्षांची घरटी तोडणे, त्यांना मारणे वगैरे गोष्टी तो सहज करायचा. त्याने एकदा कावळ्याचे घरटे तोडायची चूक केली. कावळ्यांनी त्याला जवळपास 6 महिने त्या विशिष्ट भागात येऊ दिले नाही, इतरांना त्रास देत नसत, हा तिथे गेला की कल्ला करून याला पळवून लावायचे.

आमच्या पारसिक टेकडीवर कावळे व कोकीळ ढिगांनी आहेत. एप्रिल मे महिन्यात कर्कश आवाजात किंचाळणारी कोकीळ व मागे लागलेला कावळा हे दृश्य नेहमीच एकतर दिसते किंवा ऐकू येते. कावळे घरटी सांभाळतात.
वाशी ब्रिज सोडून गाडी मानखुर्दच्या दिशेने धावायला लागली की रस्त्याच्या दोन्ही बाजूला तरुण, जास्ती फांद्या नसलेले वृक्ष दिसतात. प्रत्येकावर 1 घरटे व बाहेर कावळा घरटे राखत बसलेला हे दृश्य मी कायम पाहते.

आम्ही नेहमी जोक करतो की कावळ्यांनी security अशी टाईट ठेवली तर काही दिवसात मिसेस कोकिळा मिस्टर कोकीळाला हौसिंग सोसायटी बांधायला भाग पाडणार Happy Happy

छान लेख!
>>कावळा मूर्ख नसून खूप हुशार आहे या अमाच्या मताशी सहमत. >>+१
मी होस्टेलला होते तिथे बाल्कनीला लागून आंब्याचे मोठे झाड होते. त्यावर या कोकिळा आणि कावळे कचकच करत. कावळ्याचे एक जोडपे घर बांधणार तर त्रास द्यायला ८-१० कोकिळा येत असत. कावळा एकाच्या मागे धावला की दोन कोकिळ लगेच घरट्यावर झेपावायचे. ते बघून कावळ्याची फार दया यायची.

कोकीळ हा अत्यंत भित्रा पक्षी असून जंगल व मोठमोठय़ा झाडांच्या शेंडय़ावर राहणे पसंत करतो. या पक्षाची बीज प्रसारक म्हणून गणना करण्यात आली आहे. दिसायला कावळय़ासारखा नर पक्षी असतो. याची ओळख पटण्यासाठी याचे डोळे लालसर तपकिरी रंगाचे असतात. यामुळे हा कोकीळ पक्षी ओळखून येतो. यातील मादी ही काळय़ा रंगाचीच व त्यावर पांढरे ठिपके असतात. यामुळे नर व मादी लगेचच समजून येते.

कोकीळ या पक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये या पक्ष्यांचा कंठ फु टलेला नसतो. हा पक्षी त्यावेळी केवळ अन्न भक्षण करणे व नियमित जीवन जगणे असा वावरत असतो. या कालावधीत त्याचा आवाजसुद्धा कोणाच्या कर्णोपकर्णी येत नाही. हा पक्षी त्यावेळी अत्यंत शांत म्हणून जगतो. मात्र उन्हाळय़ाची चाहूल लागताच दैवी शक्तीनुसार या पक्षाला कंठ फुटतो. याच कालावधीत नर व मादी यांचा गोंगाट सुरू होतो.

उन्हाळय़ाचा प्रारंभ हा मादीच्या विणीचा तसेच नर, मादी मीलनाचा असतो असे मानले जाते. याचवेळी नर, मादी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठय़ांनी ओरडत असतात. हे ओरडणे अगदी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत अव्याहतपणे सुरू असते. त्यांच्या या ओरडण्याचा आवाज म्हणजे कुहू कु हू कुहू अशा स्वरूपात येत असतो. हा आवाज पहाटेच्या वेळी साऱ्यांनाच मोहून टाकतो. मंजूळ असे स्वर कानी पडल्यामुळे मानवाची सकाळ प्रफुल्लीत व आनंददायी होते.

मात्र हा आवाज दिवसभर सुरू राहिल्यास त्याचा गोंगाट वाटू लागतो. अक्षरश: या आवाजाचा दिवसभर कंटाळा येतो. एवढा गोंगाट या पक्षांकडून केला जातो. प्रथमत: हा पक्षी मंजूळ स्वरात खालच्या आवाजाने व हळूहळू वरच्या स्वरात ओरडू लागतो ही या पक्षाची खासियत मानली जाते. या पक्षाचा सततचा गोंगाट यामुळे मानवाचे डोके दुखण्याचा प्रकार घडतो. म्हणून या पक्षाला ‘ब्रेन फीव्हर’ (तापदायक पक्षी) म्हणून आज त्याची नवीन ओळख पडली आहे. या कोकिळा पक्षीच्या अंगी आवाजाचा चांगला गुण जसा आहे तसाच त्यांच्या अंगी दुर्गुणही लपलेले आहेत.

पक्षांमधील सर्वच पक्षी पावसाळय़ापूर्वी किंवा विणीच्या कालावधीपूर्वी आपले सुंदर घर साकारत असतात. मात्र कोकीळ हा पक्षी स्वत:चे घरटे कधीच बांधत नाही. सदैव वावर हा झाडाझुडुपातूनच असतो. आणखीन एक कोकीळ मादी पक्षाचा आळशी पणा अंडी घालण्याच्या कालावधीत कोकिळा तिच्या अंडय़ाचा रंग असलेल्या इतर पक्षांच्या घरटय़ातील अंडी काही ठिकाणी घालण्याचे काम करते. अत्यंत आळशी पक्षी म्हणून ओळख असलेला हा पक्षी पिल्लांना वाढविण्याची जबाबदारी सोईस्कररीत्या इतर पक्षांवर टाकते.

कोकिळेच्या अंडय़ांचा मिळता जुळता रंग हा कावळय़ांच्या अंडय़ांप्रमाणेच असल्यामुळे कोकिळा आपली अंडी स-हास कावळय़ाच्या घरटय़ात टाकत असते. जर या घरटय़ात कावळय़ाची पूर्वीची अंडी असतील तर त्यातील काही अंडी चोचीच्या सहाय्याने फोडून वा टाकून देण्याचे दृष्ट कृत्यही मादी करत असते. ही अंडी फिकट हिरवट रंगाची व तांबूस तपकिरी ठिपक्यांची असतात. हाच रंग कावळय़ाच्याही अंडय़ांचा असतो. यामुळे कावळय़ांनाही कोकिळेच्या अंडय़ांचा संशय येत नाही.

अंड उबवून कावळय़ावर जबाबदारी टाकणारा हा पक्षी आपली हुशारी वापरून कावळय़ांच्या घरटय़ाच्या ठिकाणी घिरटय़ा मारत राहते. त्यावेळी मात्र मादी कोकिळा कुहुकुहु असा आवाज न करता लहान कीक कीक आवाजाने वावर करत असते. कोकिळेचे अंड कावळय़ाकडून उबवून चोचीने त्याचे पिलू बाहेर काढतो.

याच वेळी कावळय़ाचे अंड फुटले नसेल तर कोकिळा कावळय़ाचे लक्ष नसताना द्वाडपणा करून कावळय़ाचे अंड भिरकावून देते. कारण कावळय़ाचे पिल्लू व कोकिळेचे पिलू एकत्र दिसल्यास कावळा आपले पिल्लू ओळखून कोकिळेचे पिल्लू दुस-याचे असल्याचे समजून चोचीने ठार मारतो. म्हणून कोकिळा कावळय़ाच्या अंडय़ाचा नाश करते. अशा स्थितीमुळे कावळय़ाकडून कोकिळेचे पिल्लू अन्न खावून मोठे होत असते. म्हणून याला परभृत असे म्हणतात.

या पक्षाचे आवडते खाणे, केळी, वड, पिंपळ, दालचिन, सुरवंट यांसह रसाळ फळे खाण्याची आवड असून हे त्यांचे प्रमुख अन्नच आहे. मध व फुलपाखरू, छोटे कीटकही फस्त करत असतो. फळांची बी त्यांच्या विष्ठेतून पडून नवीन रोप धारणा होत असते. यामुळे पक्षाला बीजप्रसारकही म्हटले जाते. या पक्षाला कोयल किंवा पपीहा या नावाने ही ओळखले जाते. कोकिळा या पक्षाच्या जगात १२७ प्रजाती आहेत. यातील ५० जाती इतर पक्षांकरवी अंडी उबवतात. उरलेली ७७ जाती या स्वत: चे अंडे स्वत:च उबवतात. कोकणात दिसून येणारी जात ही अंड न उबवणारी आहे.

फेब्रुवारी ते मार्च हा आकर्षणाचा मीलनाचा कालावधी असून मार्च ते ऑगस्ट हा कोकिळेच्या विणीचा कालावधी म्हणून ओळखला जातो. या पक्षाची लांबी १७ इंच व शेपटी लांब असते. या पक्षाच्या पिल्ल्यांची वाढ इतर पक्षांपेक्षा झपाटय़ाने होत असते.

म्हणून या पक्षाला ‘ब्रेन फीव्हर’ (तापदायक पक्षी) म्हणून आज त्याची नवीन ओळख पडली आहे.
>>>>>

हा पक्षी वेगळा. हा पावश्या. हाही ककू फॅमिलीतीलच. हाही खूप जोरात ओरडतो पण कोकिळापेक्षा याचे ओरडणे वेगळे आहे.

ककू फॅमिलीतील सगळेच मेम्बर घरटे बांधण्याबाबत उदासीन आहेत.

मिस्टर कोकीळ मला तरी अजून कर्कश वाटलेला नाही. अमच्याकडे दिवसभर गोंधळ सुरू असतो. मिसेस कोकिळा मात्र प्रचंड कर्कश व केकाटी असते. आज सकाळीच एका फांदीवर दोन कोकीळ व एक कोकिळा दिसली. कोकिळा दोघांपैकी कावळ्याला पळवून लावण्यात कोण जास्त हुशार आहे हे कर्कश आवाजात विचारत होती व तिच्या समोर बसून दोघे आळीपाळीने आपली बाजू मांडत होते.

मिस्टर कोकिळांच्या तुलनेत मिस कोकिळा कमी आहेत असे माझे गेल्या काही वर्षातले निरीक्षण आहे. हंगामाच्या शेवटी काही मिस्टर बिनकोकिळेचे राहतात असा अंदाज आहे.

कावळा : काक-कुलातील (कोर्व्हिडी कुलातील) हा पक्षी सर्वांना माहीत आहे. रान सोडून मनुष्याच्या सहवासाला येऊन राहिलेले जे प्राणी आहेत, त्यांपैकीच कावळा हा एक आहे. मनुष्याचा तो कायमचा सोबती झालेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाबरोबरच त्याचे सगळे व्यवहार चालू असतात.
कावळ्याच्या बऱ्याच जाती असून त्या जगाच्या वेगवेगळ्या भागांत आढळतात. फक्त दक्षिण अमेरिकेत कावळा आढळत नाही. भारतात नेहमी दिसणाऱ्या कावळ्यांत दोन जाती आढळतात, एक गाव कावळा आणि दुसरा ⇨ डोमकावळा. गावकावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्प्लेंडेन्स व डोमकावळ्याचे कोर्व्हस मॅक्रोऱ्हिकस असे आहे.
गावकावळा पारव्यापेक्षा थोडा मोठा असून त्याची लांबी सु.४६ सेंमी. असते. शरीराचा रंग सामान्यतः काळा असून त्यात जांभळ्या, निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या छटा असतात. मानेच्या भोवती करड्या किंवा भस्मी रंगाचा रुंद पट्‌टा असतो मानेचा काटा, पाठीचा पुढचा भाग आणि छाती यांचादेखील रंग करडा असतो. चोच मजबूत असून भक्ष्य फाडण्याकरिता उपयोगी पडते. चोच आणि पाय काळ्या रंगाचे असतात. डोळे गडद तपकिरी रंगाचे असतात. दृष्टी तीक्ष्ण असते. आवाज मोठा आणि कर्कश असतो. आकार आणि रंग यांच्यामुळे तो सहज ओळखता येतो.
भारताच्या मैदानी प्रदेशात गावकावळा सगळीकडे आढळतोच, पण १,२२० मी. उंचीवर असलेल्या सर्व भागांतदेखील तो दिसून येतो. सर्वत्र आढळणारा आणि ठळकपणे नजरेत भरणारा हा पक्षी आहे, या बाबतीत त्याच्याशी स्पर्धा करणारा आणखी एकच पक्षी असून तो म्हणजे मैना कंवा साळुंकी होय. १,२२० मी. पेक्षा जास्त उंच (१,८३०–२,१३५ मी.) असणाऱ्या प्रदेशात देखील गावकावळा आढळून येतो, परंतु त्याचे तेथील अस्तित्व डळमळीत असते. इतक्या उंचीवरचे कमी तापमान त्याला सोसत नसावे हे त्याचे कारण असू शकेल किंवा या जागी आढळणाऱ्या डोमकावळ्यांपुढे त्याचे काही चालत नसल्यामुळे त्याला तेथे राहणे अशक्य होत असावे.
कावळा संघचारी (गटागटाने राहणारा) पक्षी आहे. थवे करून राहण्याची त्यांची ही सवय प्रामुख्याने रात्रीची विश्रांती घेण्याच्या वेळी दिसून यते. एखाद्या ठिकाणी दाटीने असलेल्या मोठ्या झाडांवर संध्याकाळी शेकडो कावळे जमतात. तिन्हीसांजा होण्याच्या आधीच त्यांचे थवेच्या थवे या झाडांकडे जात असलेले दिसतात. झाडांवर बसल्यावर ओरडून ते विलक्षण गोंगाट करतात पण जसजशी रात्र होत जाते तसतसे त्यांचे ओरडणे कमीकमी होत जाऊन अखेर बंद पडते, ते झोपी जातात. पहाट होते न होते तोच त्यांचे ओरडणे पुन्हा सुरू होते व त्यांचे थवे झाडांवरून बाहेर पडून अन्न शोधण्याच्या मार्गाला लागतात.
माणसाच्या सहवासामुळे तो चांगलाच धीट झालेला असून खोड्या आणि चोरी करण्यात प्रवीण बनलेला आहे. तो उद्धट तर आहेच पण त्याच्या इतका खट्याळ आणि दुष्ट पक्षी दुसरा एखादा असेल असे वाटत नाही.
गावकावळा सर्वभक्षक आहे. मनुष्य जे जे खातो ते सगळे हा खातोच पण मनुष्य जे खाणार नाही असे अनेक पदार्थदेखील याला चालतात. डोळा चुकवून तो हळूच घरात शिरतो व एखाद्या खाण्याचा पदार्थ चटकन उचलून पसार होतो, पण तो सदैव जागरूक असतो. संकटाचा यत्किंचित जरी संशय आला तरी तो उडून जातो. त्याला हाकलण्याचा आपण किती जरी प्रयत्न केला, तरी हुलकावण्या दाखवीत तो लांब जाऊन बसतो व आपली पाठ फिरल्याबरोबर घरात शिरण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. तो कमालीचा लोचट आहे. खाण्यासारखी एखादी वस्तू कोठे दिसते आहे की काय याची तो सारखी टेहळणी करीत असतो व संधी मिळताच ती वस्तू पळवितो किंवा ती मिळविण्याकरिता नाना प्रकारच्या युक्त्या योजतो. लहान पक्ष्यांच्या घरटयांवर पाळत ठेवून त्यांची अंडी अथवा पिल्ले खाणे हा तर त्याचा नेहमीचाच उद्योग असतो. शेतात पिके तयार झाली म्हणजे कावळ्यांचे थवेच्या थवे कणसांवर हल्ला चढवून त्यांतले दाणे खातात व बरीच नासधूस करतात.
कावळे माणसालाच उपद्रव देतात असे नव्हे घुबड किंवा घार या पक्ष्यांवर हल्ला करून त्यांच्याशी झोंबाझोंबी करायला ते मागेपुढे पहात नाहीत. कधीकधी काही उद्योग नसला म्हणजे तो इतर प्राण्यांना विनाकारण त्रास देतो. कुत्री आणि मांजरे यांना देखील त्रास द्यायला तो सोडीत नाही. सरडे आणि बेडूक यांना चोचेने टोचून त्यांचे हाल करून तो ठार मारतो व नंतर ते मेलेले प्राणी खाणे तर दूरच राहीले पण त्यांच्याकडे ढुंकून देखील पहात नाही. केवळ करमणुकीखातर तो या गोष्टी करीत असावा असे वाटते.
गावकावळ्याचा एक दोन बाबतींत माणसाला थोडासा उपयोग होतो. शहरातून, गावातून किंवा खेड्यातून निरनिराळ्या कारणांमुळे घाण साठते ती घाण (निदान बरीचशी) खाऊन नाहीशी करण्याचे काम हा पक्षी करतो. रस्त्यावर पडलेल्या इतर घाणीबरोबरच शेंबूड, थुंकी किंवा कफाचे बेडके तो खाऊन फस्त करतो. वैदू लोक कावळे मारून खातात.
निर्लज्ज, उद्धट, दुष्ट पण बुद्धिवान असलेल्या या पक्ष्यावर मात करणारा एक पक्षी आहेच व तो कोकीळ होय. कावळ्याला फसवून कोकीळ आपली अंडी त्याच्या घरट्यात घालतो एवढेच नव्हे तर त्या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या पिल्लांचे संगोपनदेखील करायला लावतो.
गावकावळ्याचा विणीचा हंगाम महाराष्ट्रात एप्रिल ते जून असतो. इतर राज्यांत तो थोडा मागेपुढे होतो. कावळा आपले घरटे झाडावर उंच ठिकाणी फांद्यांच्या दुबेळक्यात बांधतो. नर आणि मादी दोघेही ते बांधण्याचे काम करतात. घरटे काटक्याकुटक्यांचेच केलेले असल्यामुळे अगदीच ओबडधोबड दिसते. घरट्याच्या मध्यभागी वाटीसारखा खोलगट भाग असून त्याला लोकरीचे धागे, चिंध्या, काथ्या वगैरेंचे अस्तर असते. या खोलगट भागात मादी ४-५ अंडी घालते. त्यांचा रंग फिक्कट हिरवा निळा असून त्यावर तपकिरी रंगाचे लहान मोठे ठिपके किंवा रेषा असतात. अंडी उबविण्याचे व पिल्लांना भरविण्याचे काम नर व मादी आळीपाळीने करतात. आपल्या पिल्लांबरोबरच कोकिळाच्या पिल्लांना देखील खाऊ घालून कावळा त्यांना वाढवीत असतो.
कावळ्याविषयी भारतीय समाजात काही चमत्कारिक समजुती रूढ आहेत. मृताचा आत्मा कावळ्याच्या शरीरात वास करतो अशी हिंदूंची समजूत आहे; म्हणून मृताच्या क्रियेच्या दहाव्या दिवशी पिंडदानाच्या वेळी भाताच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श केला म्हणजे तो मृतात्म्याला पोहोचतो असे समजतात. कावळ्याचे मैथुन पाहिले तर सहा महिन्यांत मृत्यू येतो अशीही एक समजूत आहे. कावळा हजार वर्षे जगतो, त्याला एकाच डोळ्याने दिसते वगैरे चुकीच्या समजुतीदेखील प्रचलित आहेत.
कर्वे, ज.नी.


कावळा फार आवड्तो. एक्स्प्रेसिव्ह असतो. हुषार असतो.
वरच्या फोटोत काय बाई (नसलेला) तुरा वगैरे फुलवुन स्वारी ... एकदम ऐटीत

Pages