मन वढाय वढाय (भाग २६)

Submitted by nimita on 17 March, 2020 - 23:19

"काय गं स्नेहा? कुठे हरवलीयेस?" वंदनामावशीच्या या प्रश्नानी स्नेहा विचारांच्या तंद्रीतून जागी झाली. वरवर हसत म्हणाली," काही नाही गं.. असंच ...," 'माझ्या मनातले विचार वाचले तर नसतील ना मावशीनी माझ्या चेहेऱ्यावर? रजत नेहेमी म्हणतो की माझा चेहेरा खूप पारदर्शक आहे,' स्नेहाच्या मनात आलं. चहाचा कप साईड टेबल वर ठेवायच्या निमित्तानी तिनी आपला चेहेरा दुसरीकडे वळवत वंदनाला विचारलं,"काय म्हणत होतीस तू?"

"मी तुला एवढंच सांगत होते की रजतची काळजी घेत असताना स्वतःकडे दुर्लक्ष नको होऊ देऊ. आत्ता इथे आम्ही सगळे आहोत गं ; पण तिकडे बडोद्याला तुम्ही दोघंच असणार ना... म्हणून तुला सांगून ठेवतीये."

वंदनानी केलेला हा गौप्यस्फोट ऐकून स्नेहा म्हणाली," म्हणजे ? तुम्ही नाही येणार आमच्या बरोबर बडोद्याला? पण हे कधी ठरलं आणि आम्हांला ...."

आपल्या हाताच्या इशाऱ्यानी तिला गप्प करत वंदना म्हणाली, "अगं, आज रजत घरी आल्यावर तुम्हाला सांगणारच होतो आम्ही...."

तिच्या या वक्तव्यावर स्नेहानी काहीतरी बोलायला सुरुवात केली; पण वंदनानी आपलं वाक्य पूर्ण करत म्हटलं," पण आत्ता ते सगळं महत्वाचं नाहीये. मला तुझ्याशी दुसऱ्याच विषयावर बोलायचं आहे; आणि माझ्या दृष्टीनी ते जास्त महत्वाचं आहे. तुला तर माहितीच आहे की रजतप्रमाणेच माझीही अगदी मनापासून इच्छा होती की तुझं आणि रजतचं लग्न व्हावं. त्यामागचं मुख्य कारण काय होतं माहितीये ?" वंदनानी उत्तराच्या अपेक्षेनी स्नेहाकडे बघितलं. "कारण मी लहान असल्यापासून तू मला ओळखतेस!" स्नेहा सहज बोलून गेली. त्यावर नकारार्थी मान हलवत वंदना म्हणाली," नाही,माझी तशी इच्छा होती कारण मी नीलाला ओळखते...अगदी आम्ही दोघी लहान असल्यापासून ! आणि तू तिच्या देखरेखीखाली, तिच्या संस्कारात वाढली आहेस ; म्हणूनच मला तुझ्या बद्दल खात्री होती. Luckily, रजतच्या मनात पण तूच होतीस !

आपल्या संस्कृतीत 'लग्न' हा सोळा संस्कारातला सगळ्यात महत्वाचा संस्कार मानला जातो- असं माझी आई म्हणायची नेहेमी. आणि इतक्या वर्षांत आता मलाही तसंच वाटायला लागलंय.कारण लग्न जरी दोन व्यक्तींचं असलं तरी त्यामुळे अजूनही कितीतरी जण वेगवेगळ्या नात्यांत बांधले जातात- कायमचे! दोन परिवारांचं स्वास्थ्य अवलंबून असतं दोन माणसांच्या नात्यावर! बहुतेक म्हणूनच त्याला 'लग्नसंस्था' असं म्हणत असावेत. 'लग्न हा एक जुगार आहे'- असं म्हणतात ना; ते अगदी योग्यच आहे. आणि या जुगारात नवरा आणि बायको या दोघांच्याही भूमिका तितक्याच महत्वाच्या असल्या तरी बायकोची भूमिका जास्त अवघड असते. आणि त्याचं कारण म्हणजे ती स्वतःच्या आईवडिलांचं घर सोडून एका नवीन घरात, नव्या लोकांबरोबर आयुष्यभरासाठी राहायला तयार होते. आणि बऱ्याच वेळा तिच्यासाठी ती blind date असते. तुझ्यासाठी नसेल कदाचित - कारण आमचं घर, आमचा परिवार तुझ्यासाठी अनोळखी नव्हता.पण तरीही तुलासुद्धा काही बाबतीत ऍडजस्ट करावं लागलं असणार !" वंदनाच्या या वाक्यावर स्नेहानी नकळत होकारार्थी मान हलवली. तिला मावशीचं म्हणणं पटत होतं; पण या सगळ्यातून तिला नक्की कोणता मुद्दा सांगायचाय हेच लक्षात येत नव्हतं स्नेहाच्या. पण आता एक गोष्ट तिला कळली होती. 'या सगळ्या मोठ्या माणसांकडे अनुभवांची इतकी मोठी शिदोरी असते.त्यामुळेच त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून बरंच काही शिकायला मिळतं....कधीकधी अगदी साध्या सोप्या कृतीतून किंवा वाक्यांमधून खूप काही सांगून जातात!'

"आणि आज मावशी जरा इमोशनल झालेली दिसतीये. रजतच्या बदलीमुळे असली कदाचित!" असा विचार करून स्नेहा वंदनाचं सगळं बोलणं ऐकत राहिली.

वंदना आपल्याच नादात बोलत होती," तुमच्या लग्नाआधी मी जेव्हा माझ्या इतर बहिणींना, मैत्रिणींना त्यांच्या सुनांबद्दल बोलताना ऐकायचे - त्यांचं वागणं बघायचे तेव्हा मला बऱ्याच गोष्टी खटकायच्या. वाटायचं- सगळ्या अपेक्षा सुनेकडूनच का ? तिनी कसं वागावं, कसं राहावं, स्वैपाक कसा करावा, कोणते कपडे घालावे..... किती अपेक्षा त्या एकट्या मुलीकडून.. पण तिच्या सुद्धा काही अपेक्षा असतीलच ना स्वतःच्या सासूकडून ! कदाचित ती आपल्या सासूमधे स्वतःच्या आईला शोधत असेल ! "

स्नेहाच्या चेहेऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून वंदना म्हणाली,"मला कळतंय की मी आत्ता जे काही बोलतीये ते खूपच विस्कळीत आहे... कदाचित मला नक्की जे बोलायचं आहे ते मी नीट योग्य शब्दांत मांडू शकत नसेन ; पण तुला कळतंय ना मला नेमकं काय म्हणायचंय ते ?"

अचानक काहीतरी लक्षात आल्यासारखं वंदनानी स्नेहाकडे पाहिलं. तिचे हात हातात घेत विचारलं," तुझ्या पण अपेक्षा असतील ना माझ्याकडून ? त्या पूर्ण होतायत का गं? मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतीये - तुला या घरात कुठलाही त्रास होऊ नये म्हणून. तसं वचन दिलंय मी तुझ्या आईला! पण कुठे काही उणीव तर राहात नाहीये ना ? तू खुश आहेस ना या घरात?

बोलता बोलता वंदनाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. आजचं तिचं हे रूप स्नेहानी आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं. तिची वंदना मावशी पण बरीचशी तिच्या आईसारखीच होती. कायम हसतमुख, विनोदी स्वभावाची पण गरज पडेल तेव्हा तितकीच स्ट्रिक्ट! गेल्या वर्षभरात कायम तिच्या सहवासात राहिल्या मुळे स्नेहा तिला अजून चांगल्या रितीनी ओळखायला लागली होती. पण आजचं तिचं हे हळवं, भावुक बोलणं स्नेहा पहिल्यांदाच अनुभवत होती. तिला अचानक मावशीच्या जागी तिची आई दिसायला लागली- मुलीसमोर स्वतःचं मन मोकळं करणारी !

अचानक इतकं प्रेम दाटून आलं तिच्या मनात ! वंदनाचे डोळे पुसत ती म्हणाली,"उगीच नको नको ते विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतेस तू ! मी खूप खुश आहे इथे...खरंच ! आणि त्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे सांगू? "

"रजतचं आणि तुझं नातं...." वंदना उद्गारली. त्यावर नकारार्थी मान हलवत स्नेहा म्हणाली," ते तर आहेच गं! पण त्याहीपेक्षा महत्वाचं कारण आहात तुम्ही दोघं- तू आणि काका ! 'तुम्ही माझे सासू सासरे आणि मी तुमची सून'.... आपल्यातलं हे नातं तुम्ही दोघांनी खूप समजूतदारपणे हाताळलंत ! उगीच माझे आई वडील बनायचा प्रयत्न नाही केला तुम्ही.....आणि माझ्याकडून पण तुमची 'मुलगी' होण्याची अपेक्षा केली नाहीत.

मी माझ्या एक दोन मैत्रिणींच्या बाबतीत हेच नोटीस केलं होतं.नात्यांमधली ही confusions... आणि त्यामुळे होणारी अपेक्षांची गल्लत! त्यावेळी मला वाटायचं की कुठेतरी काहीतरी चुकतंय...दोन्ही बाजूंची माणसं एक नातं यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असूनही त्यात प्रॉब्लेम्स च जास्त होतायत.... पण तेव्हा त्यामागचं खरं कारण मला समजत नव्हतं. आता जेव्हा मी स्वतः ते नातं अनुभवते आहे तेव्हा येतंय लक्षात. मला काय वाटतं माहितीये ?- प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या आईवडिलांचं एक स्थान असतं- आणि बऱ्याच वेळा ते अढळ असतं. पण नव्या सुनेला तिच्या नव्या घरात परकेपणा जाणवू नये म्हणून तिच्या सासरची मंडळी - खास करून सासू सासरे- तिला तिच्या आईवडिलांचं प्रेम द्यायचा प्रयत्न करतात... त्यामागची त्यांची भावना जरी योग्य असली तरी हळूहळू नात्यांत गुंतागुंत सुरू होते.

पण तू आणि काकांनी कधीही माझ्या आईवडिलांची जागा घ्यायचा प्रयत्न नाही केला. 'त्या घरापेक्षा या घरात मी किती सुखी आहे' हे मला आणि माझ्या घरच्यांना पटवून द्यायचा प्रयत्न नाही केलात तुम्ही. मी जर कधी बोलताना 'आमच्या घरी' असा उल्लेख केला तरी तुम्ही कोणीच - 'आता ते घर तुझ्या आई बाबांचं आणि हे घर तुझं!' - असा उपदेश नाही केला.आणि त्यामुळेच माझ्यावर कोणतंही प्रेशर नव्हतं. मला स्वतःला सिद्ध करायची गरज नाही भासली. I could just be myself !! आणि म्हणूनच मी इथे खूप खूप खुश आहे.... खुश म्हणण्यापेक्षा समाधानी आहे. मी जशी आहे तसं तुम्ही मला स्वीकार केलंयत या भावनेमुळे एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो मला आजकाल !!"

स्नेहाच्या शेवटच्या वाक्यात वंदनाला थोडा विषाद जाणवला, तिच्या चेहेऱ्यावर काही क्षणांसाठी विषण्णता दिसली; पण आपल्या सुनेचे इतके स्पष्ट विचार ऐकून ती इतकी भारावली होती की त्या सगळ्याकडे तिनी दुर्लक्ष केलं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे मोठे भाग येऊ दे.
मला स्वत:ला रियुनिअनला काय झालं त्याची उत्सुकता आहे आणि रजत स्नेहाच नाते कसे सुधारते त्याबद्दल.