वचने आणि बोध

Submitted by साद on 9 March, 2020 - 07:49

मी थोडेफार वाचन करतो. ते करताना काही नामांकित, वलयांकित किंवा विचारवंत इत्यादींची वचने वाचनात येतात. मग मी ती माझ्या डायरीत लिहून ठेवतो. वाचनातून मला जडलेला हा छंदच आहे म्हणाना. एकदा निवांत बसलो असता मी माझी जुनी डायरी चाळली. तेव्हा असे लक्षात आले की माझ्या संग्रहातील काही वाक्ये खूप मार्मिक आहेत. मला ती पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात. ती खूप विचार करायला लावतात. या मंथनातून मला एक आगळाच आनंद मिळतो. या लेखात अशी काही निवडक वाक्ये घेतो आणि त्यावर काही भाष्य करतो.

१. ‘जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती? तर इतरांनी काय करावे, हे आपण ठरवणे’.

हे वाक्य मूळ कोणाचे आहे याबद्दल काही कल्पना नाही. पण अगदी मार्मिक आहे. नीट विचार केला तर आपल्या सर्वांनाच ते कमीअधिक प्रमाणात लागू आहे. कुठल्याही मोठ्या सामाजिक घटना बघा. त्यावर चर्चा आणि काथ्याकुट करताना आपण अगदी तावातावाने बोलतो. अशी घटना आपल्या गल्लीतील असो की आंतरराष्ट्रीय पातळीवरील, त्यावरील आपले मत हे नेहमीच बरोबर आणि अंतिम असते ! त्या घटनेचा वा विषयाचा पुरेसा अभ्यास न करता संबंधितांना अनाहूत सल्ला द्यायला खूप जण उत्सुक असतात. अशा असंख्य स्वघोषित तज्ञांची सध्या कमी नाही. एखाद्या खेळाडूने कसे खेळायला पाहिजे होते, इथपासून ते एखाद्या राष्ट्रप्रमुखाने कुठला निर्णय घ्यावा, इथपर्यंत आपण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना सल्ले देत असतो. असे करताना एक मूलभूत बाब विसरली जाते. कुठलेही काम यशस्वीपणे करणे हे आव्हान असते. पण याउलट त्यावर टीका करणे हे कायम सोपे असते. रस्ता माहित आहे पण त्यावर गाडी काही चालवता येत नाही अशी ही स्थिती असते. एखाद्या कामात आपण काही योगदान न देता, “त्यांनी असेच करायला पाहिजे” हे सांगणे अगदी सोपे असते. म्हणूनच हा सोपा मार्ग बरेच लोक निवडतात.

२. ‘नातेवाईक हे आपल्याला जन्मतःच मिळतात पण आपण आपले मित्र आपल्या आवडीनुसार निवडू शकतो’. – ऑस्कर वाईल्ड

हे मूळ इंग्लीश वाक्य खूप सुंदर आहे. माझ्या या भाषांतरात थोडी अर्थहानी होऊ शकते. म्हणून मूळ वाक्यही लिहितो.
‘God gives us relatives. Thank God, we can choose our friends’.

काय वाटतंय? पटायला हरकत नसावी. रक्ताचे नाते हे आपल्याला जन्मतःच मिळते आणि जसे आपले वय वाढत जाते तसे ते अधिकाधिक गुंतागुंतीचे होते. असे नाते जितके जवळचे, तशी ही गुंतागुंत जास्त होते. ताणले की तुटते याची जाणीव आपल्याला असते. म्हणून जेव्हा ताणण्याचे प्रसंग येतात तेव्हा ते तुटू न देण्याची कसरत करावी लागते. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाचे नातेवाईकांचे अनुभव भलेबुरे असू शकतात. पण मध्यमवयीन लोकांचे साधारण निरीक्षण करून पाहा. तुलनेसाठी दोन प्रसंग देतो. एकात आपल्याला नात्यातील कार्यक्रमाचे आमंत्रण आलेले आहे, तर दुसर्‍यात मित्राच्या कार्यक्रमाचे.

पहिल्यात औपचारिकता कसोशीने पाळावी लागते. एखादा वटहुकूम काढल्याप्रमाणे तिथे उपस्थिती अनिवार्य असते. पुढे तो कार्यक्रम कसाही झाला तरी, “वा! काय छान सुंदर झाला”, अशीच प्रतिक्रिया आपण द्यायची असते. तिथे गप्पा मारताना आपण शब्द अगदी मोजूनमापून आणि राखून वापरायचे असतात. आपला थोडा जरी संयम सुटला, तर मग परिणामांची धास्ती असते.
याउलट दुसऱ्या कार्यक्रमाची परिस्थिती पाहा. त्याचे आमंत्रण अगदी मोबाईलच्या संदेशाने दिले तरी चालते. आपल्याला काही अपरिहार्य कारणाने जायला जमणार नसेल, तर त्याचाही तिकडून स्वीकार सहज केला जातो. अगदी स्व‍च्छंदी मनाने आपण त्या कार्यक्रमास जातो, तिथे बागडतो आणि त्याच मूडमध्ये घरी परततो.

हा असा फरक का असतो? माझ्या मते नातेवाइकांच्या बाबतीत ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असा काहीसा प्रकार असावा. नात्यातील गुंता विरुद्ध मैत्रीतील तटस्थता असा हा तिढा वाटतो.
एक विनंती. मी हे जे लिहिले आहे ते सरसकटीकरण समजू नये. प्रत्येक विधानाला अपवाद असतात तसे इथेही आहेत. वरील मूळ वाक्याच्या संदर्भात आपण मनन करावे इतकेच म्हणतो.

३. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते माझ्या विझिटिंग कार्डच्या मागच्या बाजूवर लिहीता आले पाहिजे – डेविड बेलास्को

एखादी कल्पना थोडक्यात आणि प्रभावीपणे मांडता आली पाहिजे हा या वाक्याचा मथितार्थ. बऱ्याच लोकांना अतिसविस्तर बोलण्याची सवय असते. बोलताना मुद्द्यावर लवकर न येता फाफटपसाराच अधिक असतो. समोरच्याला गरज नसलेले बारीकसारीक फुटकळ तपशील ते उगाच पुरवत राहतात. त्यात कित्येकदा मूळ मुद्दाच हरवून जातो. असे लोक जेव्हा बोलायला सुरवात करतात तेव्हा त्यांच्या श्रोत्याच्या मनात “लागले आता हे भाषण द्यायला”, अशी नाराजीची प्रतिक्रिया उमटते. पुढे त्यांची बडबड सुरु झाली की मग “नक्की काय म्हणायचे आहे याला”, ही पुढची प्रतिक्रिया मनात उमटते.
याच वाक्याला समांतर जाणारे अजून एक वाक्य वाचले होते.
‘ज्यांना काही सांगायचं असतं ते सांगू शकत नाहीत आणि ज्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नसतं ते मात्र अखंड बडबड करीत असतात’.

४. सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक आहे- स्वामी विवेकानंद

हे वाक्यच इतके सुंदर आहे की त्यावर अधिक काय बोलणार? चेहऱ्याची रंगरंगोटी करून सौंदर्याचा आभास निर्माण करता येतो खरा. पण मनाचे सौंदर्य ही वेगळीच बाब असल्याचे विवेकानंद यातून सुचवीत आहेत. मनाने सुंदर राहिल्यास चेहऱ्यावर एक नैसर्गिक हास्य आपसूकच येते. या संदर्भात अन्य कुणीतरी म्हटले आहे, की चेहऱ्यावरचे नैसर्गिक हास्य हेच सर्वोत्तम सौंदर्यप्रसाधन आहे. एखाद्याच्या निव्वळ दिसण्यावरून त्याच्या अंतरंगाचा अंदाज करता येणार नाही. सुंदर ‘असण्याचा’ प्रयत्न करणे हे वाटते तितके सोपे नाही.

५. गप्पांचे तीन स्तर आहेत – लोक, घटना आणि विचार. – जावेद अख्तर

छान वाक्य आहे. ते आपल्यासमोर वास्तव उभे करते आणि विचार करायलाही लावते. आता बहुसंख्य गप्पांच्या अड्ड्यांवर( पाहिला स्तर) नजर टाकून पाहू. त्यामध्ये (स्वतः सोडून) अन्य लोक हा विषय प्राधान्याने असतो. त्यातही अनुपस्थित लोक हे प्राधान्याने गप्पांचा विषय असतात. आता अशा लोकांबद्दल चांगले बोलणे हे थोड्याफार प्रमाणात असते, नाही असे नाही. पण जरा रंगलेल्या गप्पांकडे नजर टाकून पाहू. तिथे कुजबूज आणि कुचाळक्याना अगदी उत आलेला असतो. या गप्पा जशा ‘चढू’ लागतात तसे अन्य लोकांची टिंगलटवाळी वा निन्दानालस्ती यथेच्छ चालू असते.
वरीलपेक्षा अधिक विचारी लोक गप्पांच्या दुसऱ्या स्तरावरचे असतात. ते एखाद्या घटनेसंदर्भातील लोकांचा उल्लेख ओझरता करतील. पण त्या घटनेतून काय ध्वनित होतंय यावर ते अधिक बोलतात. जर ती घटना वाईट असेल तर भविष्यात ती टाळण्यासाठी काय करता येईल, हे देखील त्यांच्या बोलण्यात असते.

तिसरा स्तर हा बहुधा जनसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असावा. त्यामध्ये समाजहिताचा एखादा नवा विचार चर्चेत असतो. अशा गप्पा या व्यक्तीनिरपेक्ष असतात. एकंदरीत विचार करता अशा गप्पा कानावर पडणे हे तसे दुर्लभ.

तुमचीही अशी आवडती वाक्ये असतील तर या धाग्यावर लिहा. पण फक्त वाक्य लिहून थांबू नका. तुम्हाला त्यावर काय वाटते तेही जरूर लिहा. ही चर्चा उपयुक्त वाटेल ही आशा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

If we do not discipline ourselves the world will do it for us. - William Feather

हे वाक्य वाचल्यावाचल्याच, फार आवडले होते. बाकी आपला त्रास समोरच्याला होउ देउ नये, अति तेथे माती, जनी निंद्य ते सर्व सोडोनू द्यावे, वगैरे वरील वाक्याचेच उपसिध्दांत.

२. ‘नातेवाईक हे आपल्याला जन्मतःच मिळतात पण आपण आपले मित्र आपल्या आवडीनुसार निवडू शकतो’. – ऑस्कर वाईल्ड
>> मित्रांशी वागताना आपण मैत्री तुटू नये ही काळजी असेल तर जसं वागतो तसं नातेवाईकांशी वागलं की तेच मित्र होतील असे वाटते.

चांगला धागा आहे.
माझे आवडते वाक्य :

‘आपण एकट्याने करून फार काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करत नाही, तो ती सर्वात मोठी चूक करतो’.
- एडमंड बर्क

समाजातील काही अनिष्ट गोष्टींमध्ये बदल व्हायची गरज असते. पण त्यासाठी सुरवात कुणी करायची हा प्रश्न असतो. काही मोजक्या लोकांना ती करायची इच्छा असते. ते सुरवात करतात देखील. पण त्यांचे इतरांकडून अनुकरण होताना दिसत नाही. तेव्हा त्यांच्या मनात असा विचार येतो की मी एकट्याने किंवा अत्यल्प लोकांनी असे करून त्या मोठ्या प्रश्नाबाबत असा काय फरक पडतो? तेव्हा अशी निराशा झटकून टाकायला वरील वाक्य कामी येते.

आपल्याकडे एकंदरित काहीही नवीन करायचे असले तर ते करायला सुरुवातही करायच्या अगोदर, हे केल्याने काय होणार ? असं करायला इतर कोणी तयार होतील का? आपण करू तर जग काय म्हणेल? अमूक एक केले तर तमूक होईल का? अशा शंका कुशंका काढणारी माणसे खूप असतात. अनेकदा आपल्याही मनात संभ्रम असतो.
ह्या संदर्भात गांधीजींचे एक वाक्य मला आवडते. ते म्हणत 'करके देखो' अर्थात 'करून पहा'.
निदान काय / कसे करू नये हे तरी कळेलच.

>>>>तुम्हाला काय म्हणायचे आहे ते माझ्या विझिटिंग कार्डच्या मागच्या बाजूवर लिहीता आले पाहिजे – डेविड बेलास्को>>>> डेव्हिड बेलॅस्को यांना ट्वीटरचा शोध आवडला असता Happy

काल मी मला सर्वात आवडलेले वाक्य वाचले. आत्तापर्यंतचे अतिशय आणि सर्वात आवडते वाक्य.
.
Patience with others is love, patience with self is hope, patience with God is Faith.
.
Patience with others is love ............ इतरांच्या बाबतीत कसे पटकन जजमेंट पास करतो. जराही धीर नसतो. तेच स्वतःला आपण लाखो संधी देतो आणि तरीही आपलं नार्सिसिझम कमी होत नाही. हेच समोरच्याकरता का नाही करता येत याचे उत्तर कदाचित उत्क्रांतीमध्ये असेलही. कोणी शास्त्रज्ञ म्हणतीलही की आपल्या अस्तित्वाच्या लढाईकरता ते आवश्यक आहे. परंतु तरीही मी म्हणेन की संतांनी ही जी दुसर्‍यावर प्रेम करा ही शिकवण दिली ती अत्युच्च आहे. किंबहुना संत हे उत्क्रांतीच्या पातळीवर आपल्यापेक्षा अधिक पुढे असतात असा माझा विश्वास आहे.
.
दुसर्‍यावर प्रेम करणे म्हणजे रडत रडत त्याच्या गळ्यात पडणे नाही, भावनाबंबाळ होणे नाही की दुसर्‍याच्या खाजगी गोष्टींत नाक खुपसणे नाही. व्यवस्थित अंतर ठेउनही दुसर्‍याचा एक माणुस म्हणुन आदर करता येतो. माणुस म्हणुन त्यांच्या follies स्वीकारता येतात आणि in spite of their failings, त्यांना कमी लेखणे टाळू शकतो. पण आपण तर रामालाही जज करण्याचे सोडत नाही जिथे त्याचा तर एक सामान्य मनुष्यावतार होता. मनुष्य असणार म्हणजे चूक होणारच. अस्तित्व टिकवण्याची लढाई आपली जितकी निकडीची तितकीच त्याचीही निकडीची आहे, हे जाणले की जजमेंटवरती नियंत्रण येते.

सामो,
विश्लेषण आवडले.

मनुष्य असणार म्हणजे चूक होणारच. >>> अगदी .+११

>>> इतरांच्या बाबतीत कसे पटकन जजमेंट पास करतो.
>>>>
यावरून मला एक वाक्य आठवले:

जे आपल्यात नसते पण दुसऱ्यात असते, ते तत्व म्हणजे भ्रष्टाचार !

With our thoughts we make the world - Buddha

या वाक्याचे २ अर्थ आहेत
१) प्रत्येक आजुबाजुची गोष्ट हा आधि एक विचार असतो. विचाराशिवाय कोणतीही गोष्ट वा काहिही बनु शकत नाही.
२) प्रत्येक दु:क्ख वा सुख हा एक विचारच असतो. जर सुखी व्हायचे असेल तर दु:ख्खी विचार टाळा. जर तुम्हाला राग येत असेल तर फक्त तो विचार चुकीचा समजुन दुर करा.

In the depth of winter i finally learned there was an invincible summer in me.

नाटकासंबंधी माझे एक आवडते वाक्य हे आहे:

चांगले नाटक कोणते, तर रंगमंचावरचे नाटक संपले, की जे प्रेक्षकाच्या मनाच्या रंगमंचावर दुसरे नाटक सुरु करून देते ते.

काही नाटकांनी मला हा अनुभव पुरेपूर दिला आहे. त्यातली काही अशी:
१. लग्न – जयवंत दळवी
२. सूर राहू दे – शं ना नवरे .

तमाशा सिनेमा नाटकातील लोकांच्या लफड्यांबद्दल श्री व्यंकटेश माडगूळकर लिहितात
आपण मिठाई खावी, कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये

वरची नाटकाबद्दलची दोन्ही वाक्ये आवडली.

आता एक विनोदाबद्दलचे लिहितो.
ते वाक्य श्री. वि. कुलकर्णी यांचे आहे.

‘ असं म्हणतात की, जगात अभिजात विनोद अगदी थोडे, हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच असतात. बाकी सगळी विनोदाची बांडगुळे’.

सध्याच्या मिडिआतील ढकलविनोद पाहिल्यावर हे विधान खूप पटते. असले बहुतेक ‘इनोदी’ असतात.

This too shall pass... He hi दिवस जातील.. चांगल्या दिवसात माजायचं नाही आणि वाईट दिवसात खचून जायचं नाही..

Be kind to yourself - life is tough and you’re not perfect.
Be kind to others - their lives are tough too and they’re not perfect either.

छान


हेही दिवस जातील
>>>
छान.

याच धर्तीवर Nitsche यांचे एक वाक्य आहे:
‘एखाद्या खडतर परिस्थितीतून जाताना जर् तुम्ही संपला नाहीत, तर बलवान नक्कीच व्हाल’.

आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्यावर कठीण आव्हाने पेलायची वेळ येते तेव्हा हे वाक्य खूप धीर देते. आपला निर्धार वाढतो.

‘जे जे तुम्ही ऐकता, ते केवळ (कुणाचे तरी) मत असते ; वस्तूस्थिती नसते.”

.. हे वाक्य सध्या अगदी नको इतके खरे वाटत आहे. अमका तद्न्य, तमका विशेषज्ञ, अमकी संस्था, तमकी संघटना ....... बाब्बो.. नको नको झालय.

एक आवडलेले वाक्य -

इन्टरनेटवरची माहिती म्हणजे ५०% सत्य आणि ५०% टाकाऊ कचरा
- उम्बरतो इको (लेखक )
असा अनुभव बऱ्याचदा येतो. दिशाभूल करणारी माहिती तर पोत्याने असते.

Nobody is superior, nobody is inferior but nobody is equal either.
People are simply unique, incomparable.
You are you.
I am I

हे वाक्य ओशोंचे म्हणून वाचनात आले होते.

Pages