मोकळ्या जागा आणि सामाजिक सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 10 March, 2020 - 09:41

शहरीकरण, आधुनिकीकरण आणि पैशाच्या हव्यासेपायी मोठा बळी पडलेला विभाग म्हणजे मोकळ्या जागा. शहरंच काय निमशहरं आणि मोठी गावं देखिल त्यांच्याकडच्या मैदानी जागा, बागा, वनांचे पुंजके, ओढे, नद्या, टेकड्या, मोकळा परीसर हे झपाट्यानं गमवत आहेत. अश्या ज्या काही (अजून पर्यंत धुगधुगी राखून असलेल्या) जागा आहेत त्यांच्यावर हावरट बिल्डरांची नजर कधी पडेल, सरकारी बाबूंचे हात कधी ओले होतील आणि गरजेच्या नावाखाली एक विटांची चळत कधी उभी राहील काही सांगता येत नाही. मग ती वस्तीची बिल्डिंग असो, ऑफिसची इमारत असो की मॉल असो. या आधुनिकीकरणाच्या अदृश्य वरवंट्याखाली सगळ्या समाजाच्या हक्काच्या पूर्णपणे मोफत, मोकळा अवकाश देणार्‍या आणि समाजाला एकत्र आणणार्‍या जागा भरडल्या जात आहे हे नक्की.

खरं तर अशा कम्युनिटी स्पेसेसची किती गरज असते समाजाला. या ठिकाणीच माणसं एकत्र येतात, एकमेकांशी संवाद होतात, मनं मोकळी होतात, विचारांची देवाणघेवाण होते, सुखदु:ख वाटली जातात, लहानथोर- स्त्रीपुरुष असे सर्व गट, सर्व समुह एकत्र येऊ शकतात. समाज एकसंध राहण्यास मदत होते. मुलांना खेळायला जागा मिळते, ऊर्जेला सकारात्मक आणि रचनात्मक वाट मिळते.

कम्युनिटी स्पेसेस म्हणजे मॉल नव्हे. तिथेही आपण ठरवून भेटतोच म्हणा. काहीजण तर एसीमध्ये आणि स्वच्छ ठिकाणी फिरण्याचे ठिकाण म्हणून मॉलकडे बघतात हे देखिल माहित आहे. पण मॉलतर सगळ्यांना माहित असतातच. त्यामुळे या धाग्यापुरत्या आपण कम्युनिटी स्पेस म्हणजे मोकळ्या जागा, सार्वजनिक वाचनालयं, मोफत अभ्यासिका असं धरून चालू.

या अश्या जागा राखल्या गेल्या पाहिजेत खरंतर. वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या वाढत्या गरजा पुर्‍या करण्यासाठी जागा लागते हे अगदी कबुल. पण त्यासाठी दुसरे काही पर्याय असतील तर ते आधी शोधावेत. असो. हा विषय फार किचकट आहे. त्यावर अनेकवेळा अनेक मुद्दे मांडले गेले आहेत.

या धाग्यात आपण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतल्या अश्या जागा इथे नोंदवूयात का? म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल.

वाढत्या गर्दीचा अजून एक परिणाम म्हणजे वाढता बकालपणा. घाण, कचरा, पडझड झालेल्या वास्तू तशाच पडून राहणे, नाहीतर मग दुसरं टोक गाठून सौंदर्यदृष्टी न दाखवता केलेली डागडुजी, पुनर्निर्माण आणि रंगरंगोटी ... थोडक्यात aesthetics धाब्यावर बसवलं जातं. किंबहुना भारतीय समाजाला Community aesthetics कशाशी खातात याची अजिबात कल्पना नसते. कारण माझं घर हाच माझा परिसर अशी विचारसरणी असते. आपलं अंगण झाडून स्वच्छ झाल्याशी कारण. दुसर्‍याच्या दाराशी कचरा लोटला म्हणून काय झालं? पण अशा या गलबल्यातही काही आशेची बेटं अचानक लख्खकन चमकून जातात. कोणीतरी सौंदर्यदृष्टी दाखवून ती जागा सजवलेली असते, त्या जागेची काळजीपूर्वक निगा राखलेली असते. तो छोटा का होईना पण कोपरा हसरा दिसतो आणि मग बघणार्‍याला किती आनंद मिळतो यामुळे.

अशा काही जागा, कोपरे माहित आहेत का तुम्हाला असतील तर इथे नक्की नोंद करा. कितीही छोटी जागा, छोटा कोपरा, छोटा इनिशिएटिव्ह असला तरीही त्यांची दखल घेणं गरजेचं आहे. यानिमित्ताने आपलाही परिसराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा विषय केव्हाचा मनात घोळत होताच. पण त्याला मुहुर्त लाभला कारण काल अचानक वर्सोव्याला गेले असताना एक सुंदर बाग दिसली. मस्त मोठ्ठी, हिरवीगार बाग आणि त्याची निगराणी देखिल व्यवस्थित राखलेली होती. लहान मुलांना खेळायला मोठ्ठं जंगलजिम केलं होतं. भरपूर हिरवळ होती. एक परदेशी बायकांचा कंपू योगा शिकत होता. चालणारे होते, नुसत्या गप्पा मारत बसलेली लोकं होती. एकदम मस्त वाटलं मला. फिरताना अचानक एका झाडावरून भारद्वाज पक्षाची साद ऐकू आली आणि लगेच त्या सादेला प्रतिसादही मिळाला दुसर्‍या झाडावरून. दोन मनीमाऊ आणि राखणदाराचा भुंकणारा कुत्राही होता दाराशी.

बागेचं नाव प्रवेशद्वारावर दिसलं नाही. इथल्या राखणदाराला विचारलं तर तो बहुतेक पाच बाग म्हणाला. खरोखरच एकात एक अश्या जोडून तीन बागा दिसल्या मला. कदाचित त्या पूर्वी पाच असतील. घरी येऊन गुगल मध्ये पाहिलं तर त्या बागांची वेगवेगळी तीन नावं दिसली - राज क्लासिक पार्क, बियांका पार्क आणि मुंबई महानगर पालिकेचं उद्यान.

काही फोटो.

5775c73a-ec4b-4314-a5b3-5bfd72f173ce.jpg

.
28c7910d-980f-4ca5-8f54-09b8097d1bcd.jpg

.
1826e99a-7715-41dd-9821-f103ad23f098.jpg

.
a1f440d7-b980-4d53-a74d-e14b37f405ac.jpg

.
b28467cd-46c8-41fc-95cc-dd5bc9c74a1f.jpg

उत्तम लेख. पटला.
जागोजागी बागा, फुलांची बेटे, सुंदर कलाकृती असलेले कलात्मक पुतळे/शिल्पे ( फॉर गॉड्स सेक, महापुरुषांचे नाहीत) हे सर्व अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण करते. A city also needs to breathe.
पण तसे शहराचे नियोजन केले गेले पाहीजे, त्याकरता आर्कीटेक्ट्स ची योजना केली पाहीजे,.
खूपच छान लेख.

बोरिवलीमध्य् अशा बर्याच बागा आहेत. तिथे नेहमी चालणारे लोकं कम्युनिटी गॅदरिंग टाइप गोष्टी करत असतात. मला सगळी नावं पटकन आठवणार नाहीत पण गुगलवर नक्की असणार. उदा. पु.ल.देशपांडे उद्यान आणि त्याच्यासमोर रस्ता ओलांडला की कोपर्यावर आणखी एक बाग आहे.

बंगळुरातही अशा अनेक लहानमोठ्या बागा आहेत. काही तळ्यांच्या भोवती/बाजूला असतात, काही नुसत्याच. काही बागांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे खेळणी नसतात, पण बाकं नक्की असतात आणि कमीतकमी एक तरी घुमटाकार छताचा, सर्व बाजूंनी मोकळा, कट्टे/ बाकं असलेला असा मंडप असतोच असतो.

माझ्या मनात हेच नेहेमी येते...भारतीयान्कडे सौंदर्यदृष्टीचा नक्कीच अभाव आहे. आणि तो समाजाच्या सर्व स्तरान्मधे आहे. सुरवात आपल्यापसूनच करावी लागणार पण मोठ्याप्रमाणावर जनजाग्रुती आवश्यक आहेच. कचरा सुद्धा डोळ्याला खुपला पाहिजे.

छान लेख. अगदी मनातलं.
माटुंग्यालामेहता उड्डाणपुलाखालील जागेत चालायला छान वॉक वे केलाय . ( महेश्वरी सर्कल टू रुईयाचा सिग्नल)
नाहीतर पुलाखालच्या जागा नुसत्या वाया गेलेल्या असतात.
दादर पूर्व स्टेशनसमोर एक (बहुतेक मल्लखांब करणार्‍या मुलांचे) काळ्या रंगातील शिल्प आहे पण ते करायचं म्हणून केल्यासारखं सुशोभिकरण वाटतं. सौंदर्यपूर्ण रचना केलेली नाही. अर्थात हे करावसं वाटलं हेच विशेष. आधी तिथे काय होतं आठवत नाही.

छान धागा छान प्रतिसाद
जेव्हा नवी मुंबईला स्थायिक व्हायचे ठरवले तेव्हा दक्षिण मुंबईहून नवी मुंबईकर होणे मला जड जाईल या विचाराने आधी ईथे भाड्याने राहून बघूया म्हटले. त्यानुसार वाशीला राहायला आलो. आणि ईथली एक गोष्ट आवडली ते म्हणजे दर चार गल्ल्यांनंतर एखादे गार्डन आहे. त्यात डोळ्यांना सुखावणारी हिरवळ आहे, लहान मुलांना खेळायला झोका घ्सरगुण्डी तर मोठ्यांसाठी ओपन जिम आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छता आहे. माझ्या सुदैवाने मी भाड्याने घेतलेले घर वाशीच्या मिनी सी शोअरच्या जवळ होते. आधी असे काही डोक्यात नव्हते. पण आता येथील गार्डन्स दैनंदिन जीवनाचा ईतका अविभाज्य भाग झाले आहेत की मला सिरीअसली ईथे राहायला मजा येऊ लागलीय. दर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशीच नाही तर मूड येईल तेव्हा बागेत फेरफटका मारता आला पाहिजे. गजबजलेल्या शहरात अध्येमध्ये हाकेच्या अंतरावर असे निवांत स्पॉट हवेतच.
फोटो टाकायला परमिशन असेल तर शोधून नक्की टाकेन Happy

बोरिवलीमध्य् अशा बर्याच बागा आहेत. >>> अक्षरशः नाक्यानाक्यावर Happy
Phoenix hospital च्या गल्लीत समोरासमोर दोन बागा आहेत.
गोराई ला , पंगतच्या गल्लीत एक मोठी बाग आहे.

<< अशा काही जागा, कोपरे माहित आहेत का तुम्हाला असतील तर इथे नक्की नोंद करा. >>
मी तर म्हणतो अजिबात करू नका. एकदा का लोकांना कळले की तिथेपण लगेच लोकांची गर्दी जमू लागते आणि मग सोबत येतो बकालपणा आणि गलिच्छपणा. निव्वळ एक उदाहरण देतो. आमीर खानच्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली लेह लडाखमधली शाळा आणि प्यॅनगाँग लेक, लगेच लोकांच्या झुंडीच्या झुंडी जायला लागल्या तिथे.

नव्या मुंबईत अशा जागा खूप आहेत. एकट्या नेरुळात (पूर्व) आता आठवायचे म्हटले तरी मला चटकन 10 बागा आठवल्या. Happy अतिशय प्रशस्त, नीट निगराणी राखलेल्या, 1 कोपरा मुलांच्या खेळण्यासाठी राखलेला. अशा बागा एकमेकांपासून अगदी हाकेच्या अंतरांवर आहेत. त्यात भर म्हणून वंडर्स पार्क. तिथे तर मुलांच्या खेळण्याजागी खाली मऊ वेगळे कार्पेट आहे, मुले पडलीतरी लागू नये म्हणून. स्केटिंग रिंग, चालत खेळायचा बुद्धिबळ पट हे तर आहेच. सोबत टॉय ट्रेन आणि 4 राईड्स पण आहेत. काल उत्सव असावा तरी गर्दी उसळलेली. मुलांनी सुट्टीचा फायदा घेऊन पालकांना खेचले होते पार्कात.

बेलापुरातही खूप बागा आहेत. माझ्या घराच्या जवळ कमळतळे आहे. गेली 2 वर्षे पावसाळ्यानंतर बिल्डर्स पाणी उपसून न्यायचे व तळे कोरडे व्हायचे. सध्या तिथे कमळे एका कोपऱ्यात सरकावून कसलीतरी पानशेती सुरू केलीय कोणीतरी. निदान पाणी तरी वाचेल. इथे पक्षी भरपूर येतात. घराशेजारीच असलेल्या माझ्या लाडक्या पारसिक टेकडीवर न मुची पाण्याची प्रचंड मोठी टाकी आहे, ज्यावर हँगिंग गार्डन आहे. गेली 3 वर्षे नमूने थोडे दुर्लक्षित केले होते पण यंदा बाग चांगली फुलवलीय. सायंकाळी खूप गर्दी असते.

मला तर दक्षि ण मुंबईतील पिज्जा बाय द बे. पासून चालत चालत एन सी पी ए ला जायचे तो भाग फार आव्डतो. अगदी कोझी व क्युट वॉक आहे. मध्ये मध्ये त्रिकोणात झाडे फुले लावली आहेत. बेस्ट म्हण जे फुट पाथ व रस्ता ह्या मधले ट्रांझिशन जे आहे ते भराव टाकून स्मूथ केले आहे.
अपंग , वयस्कर गुढघे दुखी वाले लोक ह्यांच्यासाठी फार महत्वाचे. फुट पाथ वरून रस्त्यावर दण कन पाय आपटला जातो तसे करावे लागत नाही.

आणि समोर मरीन ड्राइव्ह. अजून काय हवे.

आता याला सौंदर्यदृष्टी म्हणावी का कसं ते तुम्ही ठरवा.

सिअ‍ॅटल शहराच्या फ्रीमॉंट भागात एका ब्रीजखाली बसवलेला हा ट्रोल.

Scandinavina folklores (आठवा : थ्री बिली गोटस ग्रफ ची कथा) मध्ये या अशा ब्रीज खालच्या ट्रोल्सचे उल्लेख आहेत. त्यावर आधारित हा ट्रोल बनवलाय. ब्रीजखालच्या मोकळ्या जागेचा उपयोग. आणि ट्रोलीण बाईंना त्यातलं सौंदर्यही दिसेल. बाकीचे ट्रोल वर चढून फोटो काढून घेतात.

बोरिवलीमध्य् अशा बर्याच बागा आहेत. तिथे नेहमी चालणारे लोकं कम्युनिटी गॅदरिंग टाइप गोष्टी करत असतात. मला सगळी नावं पटकन आठवणार नाहीत पण गुगलवर नक्की असणार. उदा. पु.ल.देशपांडे उद्यान आणि त्याच्यासमोर रस्ता ओलांडला की कोपर्यावर आणखी एक बाग आहे.

नवीन Submitted by वेका on 10 March, 2020 - 11:32>>>>

बोरिवली वेस्ट ला सावरकर उद्यान वर दाखवलेल्या चित्रासारखेच आहे। चर्नी रोडला (वेस्ट) स्टेशन बाहेर एक गार्डन आहे ते तर मस्तच त्यात असलेली खेळणी लहान मुलांना ऍडव्हेंचर करण्यासाठी छान च।मज्जा आहे तिथे। पण तिथे केवळ लहान मुले आणि स्त्रियांना प्रवेश आहे। आमच्या बिल्डिंग च्या मागे टिळक उद्यान पण छान आहे मॅटर्निटी / प्री वेडिंग शूट करण्यासाठी येतात लोक तिथे।

पंगतच्या गल्लीत एक मोठी बाग आहे.

Submitted by स्वस्ति on 10 March, 2020 - 20:33 >>..
हो ते गार्डन आमच्या मागच्या खिडकीतून दिसते 'लोकमान्य बालगंगाधर टिळक उद्यान' । हे नाव मी यासाठी लिहिले कारण आधी ते चुकीचे लिहिले होते मग मी त्याचे फोटो काढून शिवा शेट्टी आणि bmc च्या fb पेजवर टाकले तेव्हा ते सरळ झाले।

छान लेख!

शिवाजी पार्क (दादर) चौपाटीजवळील संत ज्ञानेश्वर उद्यान सुध्दा छान आहे. पुर्वी तिथे मधून चौपाटीपर्यंत रस्ता जात होता. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन उद्याने होती. एका बाजूच्या उद्यानामध्ये प्रेमी युगुलांचा वावर जास्त असायचा त्यामुळे तिथे सहसा सामान्य नागरिक जात नसत. पण नंतर महानगरपालिकेने त्या दोन्ही उद्यानांचे एकत्रीकरण व सुशोभिकरण केले. आता तिथे मुलांना खेळायला, सामान्य नागरिकांना मोकळेपणे फिरायला भरपुर जागा आहे. त्याच बरोबर समुद्राचे सानिध्य असल्यामुळे सायंकाळी छान वाटते.

अजुन माझ्या पाहण्यात आलेली ठिकाणे म्हणजे पवई तलावाच्या भोवतीने केलेला पदपथ आणि गोरेगाव पुर्वेला गोकुळधाम येथील आरे भास्कर उद्यान.

मस्त माहिती गोळा होतेय.

इतर गावा-शहरांत राहणार्‍यांनीही लिहा कृपया.

मी तर म्हणतो अजिबात करू नका. एकदा का लोकांना कळले की तिथेपण लगेच लोकांची गर्दी जमू लागते आणि मग सोबत येतो बकालपणा आणि गलिच्छपणा. निव्वळ एक उदाहरण देतो. आमीर खानच्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली लेह लडाखमधली शाळा आणि प्यॅनगाँग लेक, लगेच लोकांच्या झुंडीच्या झुंडी जायला लागल्या तिथे. >> उपाशी बोका, चित्रपटात दाखवलेली ठिकाणं प्रसिद्ध होतात याला काही इलाज नाही. पण आपल्या शहरातील सार्वजनिक जागा सगळ्यांना माहित झाल्या तर चांगलंच आहे की. आहेतच त्या सर्वांच्या मनोरंजनासाठी. आता तिथे जाऊन कचरा होणार नाही हे बघणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची, सर्व नागरिकांची. यासाठी आवश्यक ते सामाजिक भान हवं, नसेल तर जमेल तिथे लोकांना सांगावं सरळ.

वांद्र्याला 'इक्वल स्ट्रीट' नावाचा उपक्रम राबवला जातो. दर रविवारी सकाळी काही तास कार्टर रोडची एक बाजू वाहनांसाठी बंद ठेवतात आणि इथे लोकांनी जमून आपल्याला हवे ते उपक्रम करायची संधी असते. कोणी स्केटिंग करतात, कोणी चित्रं काढतात, गाणी म्हणतात, लहान मुलं सायकली चालवतात ..... मस्त वातावरण! सध्या सुरू आहे का बघायला हवं. साधारण शुक्रवारी मोठी जाहिरात असते की येत्या रविवारी इक्वल स्ट्रीट भरवला जाईल अशी.

दादरलाच शिवाजी पार्कजवळच्या गॅस गल्लीत माणिक वर्मा उद्यान आहे. चटकन लक्षात येत नाही पण मस्त आहे (निदान काही वर्षांपूर्वी होतं. लेक लहान होती तेव्हा मी घेऊन जायचे तिला.) हिरवी झाडं आणि थोडे झोपाळे, घसरगुंडी वगैरे आहे. आता लेटेस्ट परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी भेट द्यायला हवी.

रायगड, तो ट्रोल मस्त आहे. Lol

ब्रिजखालच्या जागा हा एक महत्त्वाचा घटक आहे. याबद्दल रश्मीला लिहायला सांगितले आहे. ती लिहीलंच लवकर.

ठाण्याला इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि सर्व्हिस रोड यामध्ये एक लांबलचक हिरवा पट्टा आहे. इथे लोकं जॉगिंग करताना दिसतात.

साधना, पारसिकची टेकडी आणि ते कमळतळं बघायला यायला हवं. शक्य असेल तर गुगल लिंक दे ना या दोन्ही ठिकाणांची.

पारसिकच्या टेकडीवर शीळफाट्याला जाणारा खिंडीतला रस्ता आहे तिथून पायर्‍या चढून एका मंदिरात जाता येतं. पावसाळ्यात हा भाग विशेष सुंदर दिसतो.

विषय अगदी पटला. बंगलोरला 'द अगली इंडिअन' नावाच्या एक संस्थेने लोकपुढाकारातून खूप स्वागतार्ह असे aesthetic बनवायला सुरुवात केली आहे, ते पण घाणेरड्या जागा सुधारून. सध्या त्यांचा आवाका जरी छोट्या पातळीवर असला, तरी अनेक वर्षे टिकणारे (डिझाईन च असे आहे की लोक सहसा घाण करत नाहीत पुन्हा, हे कसे साधले हे वाचण्यासारखे आहे) सस्टनेबल मॉडेल तयार केले आहे. त्यांचा प्रभाव एवढा वाढला की सध्या बंगलोर महापालिकेला त्यांना सोबत घेणे भाग पडले आहे. अनेक इतर शहरात देखील त्याचे रिपीटीशन लोकांनी करून पाहिले आहे. त्यांचे फेबु पान नक्की बघा.

हरचंद पालव, याच संस्थेविषयी रश्मीला लिहायला सांगितले आहे. तिचा या संस्थेशी जवळून संबंध आहे. फार उत्तम काम करत आहेत ते.

वरळीच्या पोदार हॉस्पिटलच्या मागच्या बाजूची गल्ली 'अभ्यास गल्ली' म्हणून ओळखली जाते. रात्री इथे दोन्ही बाजूच्या पदपथांवर रस्त्याच्या दिव्यांखाली अनेक जण आपापली पुस्तकं घेऊन अभ्यास करतात. खूप आनंदी आणि आशावादी दृश्य असतं हे.

इच्छा शक्ती असली की असाध्य ते साध्य करणं शक्य होतं ह्याचा उत्तम नमुना म्हणजे फोर्ट मधल्या हर्निमन सर्कल ची बाग.

काही वर्षांपूर्वी टाटांनी ह्याचे व्यवस्थापन हातात घेतले आणि फोर्ट मधल्या आधीच कमी असलेल्या बागा म्हणजे गर्दुल्ले, भिकारी ह्यांना आंदण दिलेली जागा हे समीकरणच बदलून गेलं.

भर वस्तीत असून ही ही बाग फार छान रीतीने मेंटेन केली आहे. ह्या गोलाकार बागेच्या मघोमध एक जल पुष्करीणी, आणि त्याला मध्य धरून चार दिशेला जाणाऱ्या चार स्वच्छ वाटा अस त्याच स्वरूप आहे. मध्ये मध्ये बसायला बाक ठेवली आहेत. काही भागात चांगली हिरवळ राखली आहे . एक छोटा कोपरा मुलांसाठी राखीव आहे जिथे झोपाळे वैगेरे आहेत.

अनेक प्रकारची झाड ही इथे मेंटेन केली आहेत त्यामुळे दुपारी ही ह्या बागेत सावली असते. फोर्ट मध्ये कामाला येणाऱ्या पण हक्काचे विश्रांती स्थान नसणाऱ्या लोकांसाठी हा विसावा आहे. डबे खाणं, रिकामा वेळ घालवणं , विश्रांती घेणं ह्या साठी ह्या बागेचा खूप जणांना उपयोग होतो. इथे विद्यार्थ्यांसाठी काही भाग अभ्यासिका म्हणून राखुन ठेवला आहे. इतकच नाही तर कधी कधी ऑफिसचे गृप इथे आपापले डबे घेऊन येतात आणि वनभोजनाचा आनन्द लुटतात.

सगळी मॅनेजमेंट टाटा गृप ची असून ही टाटा यांनी आपलं नाव देण्याचं टाळलं आहे. हर्निमन ह्या मूळ इंग्रजी पत्रकारचं नाव च बागेला दिलं गेलं आहे.

इच्छा शक्ती असली की असाध्य ते साध्य करणं शक्य होतं ह्याचा उत्तम नमुना म्हणजे फोर्ट मधल्या हर्निमन सर्कल ची बाग.>>> हॉर्निमन सर्कलला महिन्यातून दोनदा तरी जाणे होते. त्यामुळे ती बाग अतंत्य उत्कृष्टरीत्या राखलेली आहे हे माहित आहे. पण टाटा ग्रुपच्या माध्यमातून तिथे व्यवस्थापन पाहिले जाते हे माहित नव्हते.

नेरूल.पश्चिमेला Jewel of navi mumbai शेजारी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध वृक्ष लागवड केली आहे (सीवूड mall जवल). 7-8 महिन्यांपूर्वी बराचसा भाग under construction.होता. पुनः गेले की तेव्हाची स्थिती पाहिन.

मामी, छान लेख! या निमित्ताने माहिती गोळा होते आहेच. जोडीला असे काही आपल्याही गावात असावे असे वाटून नवे काम सुरु झाले तर उत्तमच!
रायगड, ट्रोल फार क्युट आहे!

या निमित्ताने माहिती गोळा होते आहेच. जोडीला असे काही आपल्याही गावात असावे असे वाटून नवे काम सुरु झाले तर उत्तमच! >> खरंय स्वाती. सर्व गावात बागा, मैदानं, सार्वजनिक वाचनालयं असायलाच हवीत.

इच्छा शक्ती असली की असाध्य ते साध्य करणं शक्य होतं ह्याचा उत्तम नमुना म्हणजे फोर्ट मधल्या हर्निमन सर्कल ची बाग. >>> हो हो मनीमोहर. माहिती खूप छान दिली आहेस. सुरेख आहे ती बाग. तिथे कधी कधी काही प्रोग्रॅम्सही होतात.

Pages