समुद्रमंथनातून निपजलेलं असंही एक रत्नं

Submitted by मामी on 5 March, 2020 - 00:50

मागे कधीतरी पिंटरेस्ट चाळत होते. आता ती साईटच अशी आहे की आपण जी वाट पकडतो तिला असंख्य फाटे फुटत जातात आणि आपण एका मोहमयी भुलभुलैयात हरवून जातो - अगदी स्वेच्छेने. तर, अशाच एका वाटेवर भेटली सी ग्लास.

सी-ग्लास ही संकल्पना मला तोवर माहितही नव्हती. नाव वाचल्यावरही नक्की उलगडा झाला नाही. पण समोर फारच अद्भुत चित्रं दिसली. एका हलक्याश्या श्वेत अवगुंठनात लपेटलेले नाजूक हलक्या रंगाचे काचेचे लोलक आणि ते थेट नार्नियातल्या टर्किश डिलाईट सारखेच दिसत होते. माझा लगेच एड पिवेन्सी झाला. हावरटासारखी ती चित्रं मी बघत गेले.

पोट भरल्यावर मग ज्ञानप्राप्ती करून घ्यावी म्हणून गुगल केल्यावर सी-ग्लासची मजेशीर माहिती मिळाली. सी ग्लास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपणच समुद्रात टाकलेल्या काचेच्या वस्तू फुटून त्या समुद्रामुळे घासल्या जाऊन त्यांचा पृष्ठभाग अर्धपारदर्शक बनतो. मग कधीतरी किनार्‍यावरच्या वाळूत येतात आणि शोधल्या तर मिळतात. त्यामुळेच तिला बीच ग्लास असंही म्हटलं जातं. सी ग्लास दिसायला खरोखरच रंगित टर्किश डिलाईट सारख्याच दिसतात आणि यांपासून दागिने आणि इतर काही हस्तकलेच्या गोष्टी केल्या जातात.

म्हणजे बघा - वाळूपासून काच बनते - त्या काचेच्या वस्तू बनतात - त्या वस्तू वापरून झाल्यावर समुद्रापर्यंत जातात - तिथे त्यांचे तुकडे होतात आणि ते तुकडे लाटा (आणि कदाचित काही प्रमाणात वाळत) मुळे सर्व बाजूंनी घासले जातात आणि मग त्यातील काही तुकडे जे अति बारीक होत नाहीत, जे किनार्‍यापर्यंत पोहोचतात ते आपल्याला किनार्‍यावरच्या वाळूत परत मिळतात. नव्या आणि सुंदर रुपात. मानवनिर्मित काचेवर पंचमहाभुतांपैकी एक असं ते आप (पाणी) त्याच्या समुद्राच्या रुपानं संस्कार करतं आणि मग ते केवळ काचेचे तुकडे राहत नाहीत तर ती रंगिबेरंगी रत्नं बनतात. म्हणजे सी ग्लासला खरंच समुद्र मंथनातून निर्माण झालेलं पंधरावं रत्नं मानायला हरकत नाही, हो की नाही?

आता सी ग्लासचे हे रंग येतात कुठून? तर ते त्या मूळ वस्तूंचेच रंग असतात. पांढर्या आणि त्याच्या अनेक शेडच्या सी ग्लास असतातच. त्याचबरोबर गडद अथवा फिकट हिरवा रंगही सी ग्लासमध्ये जास्त करून बघायला मिळतो. त्याखालोखाल अँबर रंगाच्या म्हणजे गडद फिकट मधाच्या रंगाच्या शेड्स सापडतात. बीयर आणि इतर विविध दारूंच्या बाटल्या, कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या, औषधाच्या बाटल्या, काचेचे रंगित चषक, क्रोकरी वगैरे गोष्टी म्हणजे सी ग्लासचे मुख्य स्त्रोत. याशिवाय मग विंडशिल्डस, खिडक्या वगैरे वस्तूही रूप पालटून सी ग्लास बनून येतात.

यात दुर्मिळ रंग म्हणजे नीळा, जांभळा आणि लाल-गुलाबी. या रंगाच्या काचेच्या वस्तू तश्या कमी असतात. पण विक्स वेपोरबची निळी बाटली आठवतेय? निळी सी ग्लास त्या बाटलीची असू शकते. काही रंगांवरून ती सी ग्लास किती जुनी आहे याचा अंदाजही येतो. उदा, ग्रेट डिप्रेशनच्या काळात (१०२९ च्या सुमारास) गुलाबी रंगाची क्रोकरी जास्त करून वापरली जात असे. म्हणजे हे काही विशिष्ट रंग नेमक्या कोणत्या सोर्सकडून आले आहेत हे लक्षात येतं. असाच एक आहे पिवळा रंग. या रंगाची सी ग्लास ही बहुतकरून १९३० मधे प्रचलित असलेल्या व्हॅसेलिनच्या बाटल्यांमुळे मिळते. म्हणूनच हे रंग दुर्मिळ आहेत. लाल रंगाची असेल तर ती मोटारीच्या टेल लाईटवरच्या काचेची बनलेली असू शकते.

समुद्राच्या तावडीत एखादी काचेची वस्तू गेली की लाटांची घुसळण प्रक्रिया किती ताकदीची आहे त्यावरून सी ग्लास बनण्याचा कालावधी ठरतो. साधारण ५ वर्षांमध्ये सी ग्लास बनू शकते पण कधी कधी २०-३० ते चक्क ५० वर्षेही लागू शकतात बरं. तसंच काही समुद्रकिनारे सी ग्लाससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांवर शोधलं तर सी ग्लास सापडण्याची शक्यता जास्त आहे.

काचेबरोबरच अर्थात चिनीमातीच्या चिक्कार वस्तूही समुद्रात पोहोचतात. त्यांच्यावरही हे लाटांचे संस्कार होतात आणि त्यातून निपजते सी-पॉटरी. कडा घासल्या गेलेल्या पण पृष्ठभागावर नक्षीकाम मिरवणारी. अशीच आणखी एक गंमत असते ती म्हणजे बाटल्यांच्या मानेची आणि तोंडाची. यामुळे (विशेषतः तोंडामुळे) मस्त रंगित आरपार वर्तुळाकृती तुकडे तयार होतात. दोर्‍यात ओवून गळ्यात लटकवता येतील असे. बाटल्यांची बुडं जाड असल्यामुळे आणि अनेकदा त्यांवर काही नक्षी असल्याने ती देखिल वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. मद्याच्या नक्षीदार चषकांचे स्टॉपर्सही त्यांच्या नक्षीमुळे वेगळे ठरतात. पिंटरेस्टवर शोधून बघा किती मस्त मस्त सी ग्लास असतात ते.

आता एखाद्या गोष्टीची चलती आहे म्हटल्यावर ती जास्त प्रमाणात निर्माण करण्याची गरज असतेच. सी ग्लास शोधून शोधून किती मिळणार? मग यावर उपाय म्हणून सी ग्लास कृत्रिमरित्या करणारी यंत्र आली. बांधकामासाठी वाळू, सिमेंट, पाणी घालून गोल फिरवणारी यंत्रं असतात तशी पण लहान यंत्रं असतात. यात दगड घालून त्यात काचेचे तुकडे टाकून घुसळतात. कडा गुळगुळीत होऊन सी ग्लास बनते. पण खरे मोती ते खरे मोती आणि कल्चर्ड ते कल्चर्ड. असो.

सी ग्लासवरून आठवलं काही समुद्रकिनारी वाळूवर ओल्या अथवा सुक्या पर्णरहीत झाडांच्या फांद्या दिसतात त्या पाहिल्यात? वठलेल्या पण तरीही सुंदर असतात त्या. कधीकधी मोठी खोडं देखिल असतात. अनेक काटक्या तर असतातच पडलेल्या. यांना ड्रिफ्ट वुड ( driftwood ) म्हणतात. झाडं तुटल्यानं , पडल्यानं ती झाडं, त्याच्या फांद्या समुद्रात तरंगत राहतात आणि हवाउन्हापाण्यात धुऊन निघाल्यानं स्वच्छ होऊन किनार्‍याला लागतात. चांगलं तावून सुलाखून निघाल्यानं अनेकदा हे लाकूड हाडांसारखं पांढरं दिसतं. ड्रिफ्टवुड पासून फर्निचर करतात तसंच हस्तकलेच्या वस्तू, दिवे, वॉलपीसेस वगैरेही करतात.

सी ग्लासची माझ्याबाबतीतली एक गंमत सांगते. इंग्लंडच्या ट्रिपमध्ये एका बीचवर (बहुतेक Conwy, Wales) ला मला एक अर्धवट तुटलेली हिरवी सी ग्लास मिळाली होती. अगदी छोटासा तुकडा होता तो आणि तुटका असल्याने आतली गर्द हिरवी काचही दिसत होती पण तरीही मी हरखून गेले होते. (घरी घेऊनही आले होते मी. आता हरवली कुठेतरी.) आता यात गंमत अशी की त्याआधी तिथल्याच एका दुकानात मला टर्किश डिलाईटही मिळालं होतं आणि ते घेऊन खाल्लं होतं. या दोघांचा नक्की काहीतरी संबंध आहे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंयस मामी.
मी हे सी ग्लास पाहिले आहेत कुठेतरी, पण ते सी ग्लास होते आणि अशा प्रकारे ते बनतात याची मुळीसुद्धा कल्पना नव्हती. रोचक माहिती आहे.

मामी मस्त माहिती !! पण खरे मोती ते खरे मोती आणि कल्चर्ड ते कल्चर्ड>> +१११
बहुतेक ना .. माझ्याकडे पण असल्या सी ग्लासेस आहेत .. ज्यांना दगड समजून मी गोळा केलं होतं खरं तर !
कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर ते नक्की आठवत नाहीये पण बहुतेक स्पेन ला गेलेलो तेव्हा बार्सिलोना च्या किंवा सेविलें वगैरे मधे
आता घरी जाऊन सापडले तर फोटो टाकते विकांताला

छान लेख मामी . किती दिवसांनी लिहीलेस. माझा एक शेल लव्हर्स गृप आहे त्यात लोक नेहमी सी ग्लास चे अभूत पूर्व फोटो टाकत असतात. तसेच सी डॉलर पण छान असतात. हे सी ग्लास चे तुकडे खरेच अनेक शोपीसेस ज्वेलरीत वापरता येतात. वायर गुंडाळून मस्त होतात. काच खरेच टेरिफिक मटेरिअल आहे.

धन्यवाद लोकहो.

हो अमा , सी डॉलर्स असतात. ते एक प्रकारचे चपटे समुद्री प्राणी आहेत.

पाणी आणि उन्हामुळे बदल घडून सुंदर कलाकृती घडून येणारं अजून एक उदाहरण म्हणजे जाळीदार पिंपळपान.

अजून काही उदाहरणं आठवतायत कोणाला?

वा, एकदम वेगळाच विषय आहे. हे बघायला हवं. आमच्याकडे समुद्रावर मला असे काही नक्षी असलेले दगड लहानपणी मिळायचे. काही नैसर्गिक होते, पण काही अगदी मानवनिर्मित वाटायचे, कदाचित ते सी पॉटरी असावेत.

बाकी ड्रीफ्ट वुड वाचून 'यथा काष्ठम् च काष्ठम् च' किंवा माडगूळकरांचं 'दोन ओंडक्याची होते सागरात भेट' हे आठवलं. Happy

सी ग्लास पाहिले असतील कुठेतरी पण त्यांना सी ग्लास म्हणतात हे आजच कळले. छान माहिती. कुणाकडे असेल तर सी ग्लासचा फोटोही जरूर टाका.

पाणी आणि उन्हामुळे बदल घडून सुंदर कलाकृती घडून येणारं अजून एक उदाहरण म्हणजे जाळीदार पिंपळपान.>> पूर्वी असे पिंपळ पान साफ करून त्या जाळीत रंग भरून डार्क बॅक ग्राउंडवर बाळकॄ ष्णाची मनोहर आकृती काढत व रंगवत. नुसती जाळीदार पिंपळ पाने सुद्धा रंगात बुडवून किंवा
सोनेरी / चंदेरी/ कॉपर/ पर्ल शेडच्या मेटॅलिक रंगात बुडवायची, जास्तीचा रंग हलकेच झटकायचा व हँडमेड पेपर अस्तओ त्या घडीत ते रंगवलेले पान ठेवायचे. वरून दडपण ठेवायचे.काही वेळाने काढले की छान डिझाइन मिळते. ह्याची ग्रीटिंग कार्ड छान दिसतात.

हे मस्त आहे. खूपच सुंदर. नष्ट झालेली वस्तू परत पुनर्जन्म घेऊन येते.
कुठेही गेलं तरी दगड, शिंपले, गारगोट्या, अगदीच काही नाही तर काटक्या ए. उचलून आणायची सवय आहे.
मुलानेपण वारसा घेतला आहे.
अजून सी ग्लास नाही मिळाली पण लक्ष ठेवायला अजून एक गोष्ट कळाली.

असं काही असतंय का? मग समुद्राकडे फिरकायला हवं नाहीतर इन्स्टाग्रामकडे.
शाळीग्राम असेच मिळायचे गंडकी नदीत नेपाळमधून वाहात आलेले गये'ला.

अतिशय मस्त माहीती.
___________
या भारत भेटीत मला दादर समुद्र किनार्‍यावर २ अमेथिस्ट क्रिस्टल्स मिळाले. I have no idea how they were lying there without anyone noticing.

छान लिहीलयं!
मामी, पिंपळपानासारखीच सुरेख जाळी सोनचाफ्याच्या पानांनाही पडते. एकेकाळी बागेतल्या अशा जाळीदार पानांवर मी रंगकाम करत असे.

छान. बरं झालं ओळख करून दिली. मला अगोदर वाटायचं की हे नैसर्गिक खडेच आहेत. किती सुंदर दिसतात वेगवेगळ्या आकाराचे, रंगछटांचे तुकडे.

>>>सामो, कुणीतरी ते तिथे ठेऊन गेलं असेल किंवा पर्स मधून पडले असतील Wink>>>> Happy तसेच वाटते आहे मला. बाकी कारण कचरा होता.

छान लेख आणि माहिती. फोटो टाका की ओ ताई, अंतर्जालाच्या क्रुपेने का होईना!

पण मूळात हे आपण केलेलं प्रदुषणच नव्हे का? ह्या आपण समुद्रात टाकलेल्या काचांमुळे जलचरांना धोक उद्भवत असणार.

पण मूळात हे आपण केलेलं प्रदुषणच नव्हे का? ह्या आपण समुद्रात टाकलेल्या काचांमुळे जलचरांना धोक उद्भवत असणार. >> नक्कीच प्रदुषण आहे. आपण केलेला कचरा कितीतरी प्रमाणात समुद्रात जातो. सी ग्लासच्या बाबतीत इतकंच म्हणता येइल की आपल्याकडून मिळालेल्या कचर्‍यातून काहीतरी कलात्मक असं समुद्राकडून परत मिळतं. ही ग्लास बनत असताना काही जलचरांना त्रास होत असेल नक्कीच.

Pages