अक्षरगाणे

Submitted by कविन on 26 February, 2020 - 22:41

अ अ रे आईचा
ब ब रे बाळाचा
क क रे कोणाचा?
काळ्या काळ्या केसांचा

ख ख रे खाण्याचा
ग ग रे गाण्याचा
घ घ रे कोणाचा ?
तो तर माझ्या घराचा

च च रे चकलीचा
छ छ रे छत्रीचा
ज ज रे कोणाचा?
जेवणातल्या जिलबीचा

झ झ रे झोपेचा
ट ट रे टोपीचा
ठ ठ रे कोणाचा?
ठ तर आहे ठेंग्याचा

ड ड रे डब्याचा
डबा असतो खाऊचा
ढ ढ रे ढगाचा
काळा ढग पावसाचा
ण ण रे कशाचा?
पाणी गाणी शब्दामध्ये
ण तर असतो शेवटचा

त त रे तबल्याचा
थ थ रे थेंबाचा
द तर असतो दादाचा
ध तर धमाल धिंग्याचा
न न रे कोणाचा?
नाचूयातल्या नाचाचा

प प रे परीचा
फ फ रे फुलाचा
ब तर असतो बर्फीचा
भ आवडत्या भजीचा
म म रे कोणाचा?
म लब्बाड माऊचा

य य रे यशाचा
र र रे राजाचा
ल लपाछुपीचा
व तर आहे वहीचा
श सांग कोणाचा?
श माझ्या शाळेचा

पोटफोड्या ष म्हणतो
नाही बरं मी शेताचा
मी तर षटकोनाचा
ळ ळ रे कोणाचा?
माळ, बाळ या शब्दांमध्ये
ळ तर असतो शेवटचा

स स रे सशाचा
ह ह रे हरणाचा
क्ष क्षमा क्षमतेचा
ज्ञ सांग तू कोणाचा?
जे शिकतो त्या ज्ञानाचा

हि तर आहे बाराखडी
चालीत रोज म्हणूया
सोपी सगळी अक्षरे ही
गाण्यामधून शिकूया

-----------------------------------

सहज गप्पांमधे विषय निघाला तेव्हा मैत्रिण म्हणाली तिला लहान मुलांच्या शिबीरात मराठी अक्षर ओळख घ्यायची आहे. त्याकरता खेळ गाणी गोष्टी काही आहेत का? म्हंटले बघूया लिहून जमतय का.

प्रयोग म्हणून लिहिले आणि काही भाचरांना वाचून दाखवण्यासाठी त्यांच्या पालकांकडे दिले. भाचरांना आवडल्यामुळे म्हंटले आजच्या मराठी भाषादिनानिमित्त इथे प्रकाशित करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
मजा आली म्हणताना... >> +१