आठवणीतील 'शाळा' :- 6

Submitted by Cuty on 3 March, 2020 - 06:09

प्राथमिक शाळा संपतासंपताच वेध लागले होते ते माध्यमिक शाळेचे. तेथील मोठी मुले, त्यांचा वेगळा गणवेष घालून ऐटीत सायकलवर शाळेत जाताना पहायचो आम्ही. त्यांच्या गणवेषाचे आणि सायकलचेसुद्धा खूप आकर्षण असायचे आम्हाला. तशीच सायकल, सॅक घेऊन आपण हायस्कूलमध्ये जाणार आहोत असे स्वप्न आम्ही बघायचो. रस्त्याने जाताना कधीतरी हायस्कूलच्या बाहेरून आतील दृश्य पहायचा प्रयत्न पण व्हायचा. जास्त काही दिसले नाही तरी लाकडी बेंच, त्यावर वह्यापुस्तके ठेवून, कोपर टेकवून शिकत असलेली मुले पाहून, लगेच जाऊन त्या बेंचवर बसायचा मोह व्हायचा.
शेवटी एकदाचे आम्ही हायस्कूलला गेलो! पहिल्या दिवशी तर ती मोठी शाळेची ईमारत, मोठे लोखंडी गेट, त्यातून आत गेल्यावर मोठे पटांगण, मग मोठे वर्ग हे पाहूनच हरखून जायला झाले. प्रार्थना झाली आणि आम्ही वर्गात बेंचवर बसलो. आता इथे कोणी एकच शिक्षक नव्हते, तर प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक, वेगळी वही आणि पुस्तक होते. सवयीने कुणी शिक्षकांना 'गुरूजी' म्हणून हाक मारली तर आधी ते शिक्षकच हसायचे. इथे गुरूजींना 'सर' आणि बाईंना 'मॅडम' म्हणायची पद्धत होती. तरी कधी कुणी मॅडमना 'बाई' म्हटले तरी चालायचे. आम्ही सुरूवातीला बाईच म्हणायचो. खरेतर इथले सर्व शिक्षक चांगले होते. छान शिकवायचे आणि बोलायचेसुद्धा तरी त्यांच्याशी बोलताना मोकळेपणा जाणवायचा नाही. आमचे प्राथमिकचे शिक्षक एकदम साधे रहायचे तर, इथल्या शिक्षकांचे राहणीमान अधिक चांगले होते. ते नेहमी चांगल्या, कडक ईस्त्रीच्या पोषाखात असायचे. सर्व बाई नेहमी ईस्त्री केलेल्या, छान झुळझुळीत साड्या नेसून, सेंट लावून, वेगवेगळ्या प्रकारची वेणी घालून आणि त्यात कधीतरी फूल वगैरे घालून येत असत. या सर्वांच्या चपला, घड्याळे, पेन वगैरे वस्तू भारीतल्या असत.
या मोठ्या शाळेत नेहमी कुठले ना कुठले उपक्रम, कार्यक्रम सतत चालत असायचे. दरवेळी आधीच काही दिवस त्याची नोटीस वर्गात येई. अगदी 'उद्या शाळेला सुट्टी आहे' अशी नोटीस येईपर्यंत शिक्षकही ही गोष्ट वर्गात आधी सांगायचे नाहीत. कधी एखाद्या महापुरूषाची जयंती,पुण्यतिथी असली की त्यानिमित्ताने कुणालाही नाव देऊन स्टेजवर भाषण करता येत असे. कधी शालेय, तर कधी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, निबंधस्पर्धा असत. या स्पर्धा मी कधीच सोडत नसे. आणि निबंध असो की वक्तृत्व, माझा पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेला असे. माझे हस्ताक्षरही छान होते. एखादी जयंती,पुण्यतिथी यानिमित्ताने मी नेहमीच स्टेजवर भाषण करीत असे. त्यामुळे झाले असे की, मी जरी ओळखत नसले तरी मला शाळेतील बरेच विद्यार्थी आणि शिक्षक ओळखू लागले. मात्र खेळात मी नेहमीच मागे राहिले. शालेय आणि आंतरशालेय खोखो, कबड्डी वगैरे स्पर्धा नेहमीच आमच्या शाळेत होत. त्यात मी भाग घेतला नाही तरी आवडीने पहायचे. एकूणच आजच्या भाषेत बोलायचे तर ते दिवस अगदी 'हॅपनिंग' होते.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

बेंचवर बसण्याची ओढ असते खरे!

होय. शिवाय आमच्या गावात प्राथमिक आणि हायस्कूल शिक्षकांच्या रहायच्या काॅलन्याही वेगळ्या जागी होत्या. शिक्षकांनी एकत्र एका जागी जमिनी विकत घेऊन काॅलनी करून घरे बांधली होती (आहेत).