पुस्तक परिचय - काचेपलीकडचे जग

Submitted by प्राचीन on 2 March, 2020 - 22:10

पुस्तक परिचय - काचेपलीकडचे जग
लेखक - विद्याधर म्हैसकर
विजया वितरण, कराड. २०१६.
-----
नुकतेच माझे लग्न झाले होते त्या वेळची गोष्ट. सासूबाईंनी थोडा बाजारहाट करण्यासाठी पाठवले होते आणि म्हणाल्या होत्या, "हळद तिखटाची बरणी ओगल्यांचीच आण."
पुढे रीतसर स्वयंपाकगृहप्रवेश करतेवेळी कमलाबाई ओगले मदतीस आल्या होत्या. एवढाच काय तो ओगल्यांशी आलेला संबंध. परवा ह्या स्मृती पुन्हा ठळक झाल्या. निमित्त होते पुस्तक 'काचेपलीकडचे जग'. ओगल्यांशी जरा ऐसपैस ओळख करून घ्यायला हवीच होती आणि पुस्तकानं तशी करूनही दिली. प्रभाकरपंत ओगलेंपासून हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं काचेपलीकडील जग आपल्यासाठी खुले होते. हेच ते 'चिकित्सा प्रभाकर' चे लेखक. चाळीस वर्षे मेहनत व अभ्यास करून सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे लेखक. मात्र आपल्या काचेपलीकडील जगाचा निर्माता नव्हे.
तर या प्रभाकरपंतांना आठ मुलगे व एक मुलगी. त्यांच्या पत्नीस रस्त्यावरून जात असताना बायका नमस्कार करीत. 'अष्टपुत्रा' सुवासिनी म्हणून. ह्या आठही भावांमध्ये अतिशय घट्ट जिव्हाळा आणि एकुलती एक बहिणाबाई अगदी लाडकी. शिक्षणाचा ध्यास, वागण्यात शिस्त, आपसातील माया व निर्मत्सरी वागणं आणि विशेष म्हणजे काळाच्या पुढे विचार करणे ही या कुटुंबाची वैशिष्ट्ये. पुस्तकाचा लेखक म्हणजे प्रभाकरपंतांचा मुलीकडून नातू.
मुंबई - पुण्याच्या मुली ह्या घरात सुना म्हणून येतात आणि अगदी समरस होताना दिसतात. त्याकरिता मुलींचा मनमिळावू स्वभाव तर होताच पण घरच्या सर्वच माणसांचा मोकळा स्वभावही जोड देणारा होता. एक उदाहरण म्हणजे गुरुनाथ ओगले लग्नासाठी मुलगी बघायला पुण्यात मुलीकडे जातात आणि मुलीची तत्कालीन पद्धतीने परीक्षा घेत नाहीत. त्यांना त्या वाड्याची बांधणी, झुंबर यांत अधिक रस वाटतो. तिचं कुशल भरतकाम त्यांना आवडतं आणि त्यांना मुलीला प्रश्न विचारायला सुचवलं जातं, तेव्हा ते सहजपणे सांगतात, "मी बाजारात गाय खरेदी करायला आलेलो नाही." एकमेकांच्या संमतीशिवाय विवाह करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करताना मुलीकडूनही प्रश्नांची अपेक्षा करतात. अर्थात त्या काळात हे फार क्रांतिकारक विचार होते यात शंका नाही. एवढेच नव्हे तर शिक्षण व सुसंस्कृतपणा यांचा खरा परिणाम ह्या कुटुंबातील लोकांच्या विचारांची झेप बघून लक्षात येतो. इंजिनियरिंग मध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आलेले हे गुरुनाथ सतत देशाकरिता काहीतरी करण्याचा विचार व तदनुषंगिक वाचन करतात. काचकारखान्याचा संकल्प त्यातूनच उद्भवतो.
नंतरच्या घडामोडी अगदी रोचक पद्धतीने समोर येतात. जागा देण्यात आधी किर्लोस्कर, नंतर औंधचे महाराज यांचे योगदान, जनसामान्यांना आवाहन करून माणूस जोडत जाणं, प्रत्येक भावाने कारखान्यास पूरक शिक्षण घेत ह्या व्यापास हातभार लावणं, सुरुवातीला झालेले कष्ट, तडजोड, इ. अगदी सलग प्रवाहासारखे पण थोड्या वेगळ्या वृत्तांत शैलीत लिहिले आहे.
देशातील कच्चा माल वापरून पक्का माल तयार करण्यासाठी तरुणांनी साहस, आधुनिक विद्या यांचा उपयोग करणे हीदेखील एक देशसेवा आहे व त्यामुळे देशाची प्रगती होईल, ह्या लोकमान्यांच्या विचारांची कास धरत ओगले बंधूंनी आपल्या कार्याचा विस्तार परदेशापर्यंत केला. घरातील स्त्रीवर्गाला तर सक्षम बनवलंच परंतु पिठाची गिरणी काढून चालवण्याची ऊर्जा एका खेडवळ कामगार स्त्रीमध्येही उत्पन्न केली हे विशेष..
रोज न चुकता सूर्यनमस्कार घालणारा औंधचा राजा, उतारवयात कारखान्याचे भोवताली हिरवळ फुलवण्यासाठी झटणारे प्रभाकरपंत , काचरस फुंकून काच बनवण्यात तरबेज वहिनी व तिला बघून अचंबित झालेला निजामाचा जनानखाना.. अशा कितीतरी गमतीदार गोष्टी व माणसं वाचायला मिळतात.
हिंदुस्थान परकीय सत्तेखाली असताना निर्माण केलेला हा बिलोरी उद्योग वाचनीय आहे. इति अलम् |

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
विद्याधर म्हैसकर माझ्या आजोबांचे (आणि आमच्या कुटुंबाचे) खूप जुने स्नेही. अनेक वर्षं कर्‍हाडला शेजारी राहायचे. त्यांच्या बोलण्यात ओगलेवाडी आणि ओगले काच कारखान्याचा अनेकदा उल्लेख यायचा. (ते बहुदा तिथेच नोकरी करायचे. मला नक्की आठवत नाही.)
घरच्या चुलत-आत्ते भावंडांना याची लिंक पाठवते.

ऋतुराज ,हर्पेन ,ललिता - प्रीति, कुमार १,विनिता झक्कास आणि वावे सर्वांचे आभार.
कमलाबाई ओगले ह्या मंडळींच्या नात्यातील आहेत का हे माहीत नाही.

किती मोजक्या शब्दात या कुटुंबियांची आणि त्यांच्या कामाची नेमकी "ओळख" करून दिलीत. व्वा !