लोणी भापकरचा यज्ञवराह

Submitted by ऋतुराज. on 2 March, 2020 - 09:35

लोणी भापकरचा यज्ञवराह

नुकताच काही कामानिमित्त लोणी भापकर (मोरगावजवळ) गेलो असता तेथील मध्ययुगीन काळातली प्राचीन मंदिरे व जुने वाडे पाहण्यात आले.

लोणी भापकर हे गाव मोरगावपासून अंदाजे ९ किमी वर आहे. भापकर सरदार घराण्याच्या वंशजांचे मूळ गाव.

गावात एक सोमेश्वराचे मंदिर आहे, याला पिवळा ऑईलपेंट रंग दिलेला आहे. तसेच या मंदिराजवळ अनेक वीरगळ आहेत. गावात भापकरांचा प्रचंड जुना वाडा आहे.

लोणी भापकरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ. काळभैरवनाथाचे सुंदर मंदिर गावात आहे.

Kalbhairavnath Mandir.jpg

मंदिराबाहेर एक दगडी दगडी कोरलेल्या खांबात एक शिवलिंग आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर नगारखाना लागतो. आत डाव्या बाजूला सुंदर बारव आहे. उजव्या बाजूला नगारखान्याच्या बाजूला एक भव्य घंटा आहे. हि घंटा दोन दगडी खांबांच्या मध्ये अडकवलेली आहे. ह्या घंटेवर क्रॉस आहे त्यामुळे ती इंग्रज किंवा पोर्तुगीझाकडून आली असण्याचा संभव आहे. मंदिराच्या आवारात दोन भव्य दिपमाळा आहेत. मूळचे मंदिर काळ्या पाषाणात बनवलेले आहे परंतु कळस मात्र अलीकडच्या काळातील आहे. सगळ्या मंदिराला निळ्याऑईलपेंटने रंगवलेले असल्यामुळे त्याचे मूळचे सौंदर्य नाहीसे झाले आहे . मंदिराचा सभामंडप हेमाडपंथी शैलीचा आहे, त्याच्या खांबावर अनेक नक्षीदार चित्रे कोरली आहेत. मंदिराच्या गाभार्यात काळभैरवाच्या दोन व देवीची एक अश्या तीन मुख्य मूर्ती आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गंडभेरूंडाचे शिल्प कोरले आहे. गंडभेरूंडाने प्रत्येक पायात व शेपटीत एकेक हत्ती पकडला आहे.

Vyal.jpg

यानंतर आम्ही श्री मल्लिकार्जुन मंदिर पाहायला गेलो , हे जरा गावापासून बाहेरच आहे.

Mallikarjun Mandir.jpg

हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या पुढ्यात भव्य चौकोनी पुष्करिणी आहे. दगडी चौथऱ्यावर भग्नावस्थेतील नंदी आहे. मंदिरातील सभामंडपातील खांबावर अनेक सुंदर चित्रे, प्रसंग कोरलेले आहेत. गायक, वादक, नर्तक आदींच्या खूप सुरेख मूर्ती खांबावर कोरलेल्या आहेत. पशु, पक्षी, शिकार यांचे देखावे या खांबावर कोरलेले आहेत.

Khamb 1.jpg
.
Khamb 2.jpg
.
Khamb 3.jpg
.
Khamb 4.jpg

गर्भगृहाच्या बाहेर उजव्या बाजूला शेंदूरचर्चित गणेशाची मूर्ती असून, डाव्या बाजूला देवीची मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहात एक मोठे व दुसरे त्याहून जरा लहान अशी दोन शिवलिंगे आहेत. मंदिराच्या कळसाची बरीच पडझड झाली आहे.

Devi.jpg
.
Ganpati.jpg
.
Shivling_0.jpg

पुष्करिणीत जायला पायऱ्या आहेत. पुष्करिणीतील पाणी वापरात नसल्याने शेवाळ साचून हिरवेगार झाले होते. पुष्करिणीच्या चारही बाजूला अनेक रिकाम्या चौकटी/ दिवळ्या आहेत, त्यात पूर्वी मूर्ती असाव्यात असा अंदाज. पुष्करिणीत उतरल्यावर डाव्या बाजूला एक मंडप आहे. त्यावरही खूप कोरीवकाम केले आहे. त्याच्या छताला देखील खूप सुंदर नक्षीकाम केले आहे.

Pushkarini 1.jpg
.
Pushkarini.jpg

याच मंडपासमोर एक दत्तमंदिर आहे. आत दत्ताची पांढऱ्या संगमरवराची प्रसन्न दशभुज मूर्ती आहे, परंतु ही नजीकच्या काळातील वाटते. मंदिरातच दगडी पादुका आहेत. तसेच पितळी नित्यपुजेतील दत्तमुर्तीदेखील आहेत.

Datta.jpg

श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात इथले सगळ्यात महत्वाचे शिल्प आहे, ते म्हणजे यज्ञवराह. विष्णूने वराहवताराचे कार्य संपुष्टात आल्यानंतर वराह शरीराचा त्याग केला व त्याच शरीरापासून यज्ञाची विविध अंगे/ सामुग्री बनली अशी विष्णूपुराणातली आख्यायिका आहे. मूर्तीभंजकांनी या वराहाचे मस्तक तोडले आहे, तरीही हे शिल्प अतिशय देखणे आहे. वराहाच्या पाठीवर झूल पांघरलेली असून त्यावर छोट्या छोट्या चौकोनांत विष्णूमूर्ती कोरलेल्या आहेत. वराहाच्या चारही पायांवरही विष्णूमूर्ती कोरलेल्या असून पायात शंख, गदा ही आयुधेही कोरलेली आहेत. वराहाच्या शेपटीत पृथ्वीला गुंडाळलेले आहे. वराहाच्या मूर्ती खाली नमस्कार करणार्या, मानवी धड व सर्पाचे शरीर असणारी मूर्ती आहे आहे.

Varah 1.jpg
.
Varah 2.jpg
.
Varah 3.jpg

वेळेअभावी बरेच फोटो काढता आले नाही व परिसर नीट पाहता आला नाही. पुन्हा गेल्यावर तो अभ्यासपूर्वक पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

यज्ञवराह याविषयी किंवा या मंदिराविषयी अधिक माहिती असल्यास नक्की कळवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवरचाच २०१२ मधल्या यज्ञवराहाचा फोटो आणि या पानावरचा २०२० मधला फोटो पहिला. वाईट वाट्लं. गेल्या ८ वर्षात अजून अवस्था खराब झाली आहे. हा दोष जुन्या मूर्तीभंजकांचा का नवीन असा प्रश्न पडतोय? का केवळ अनास्थेमुळे हे झालंय ?

सामो, आसा, कुमार१, हीरा, स्वाती२, अजय...... प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आसा, दुव्यासाठी धन्यवाद ... छान लिहिला आहे लेख
हीरा, माहितीबद्दल धन्यवाद. प्रचेतस चे काही लेख वाचले आहेत पण हा नाही. नक्की वाचेन
अजय, तुमचं म्हणणं पटलं. अनास्था हे कारण असावे. इतकं सुंदर शिल्प, पुष्करणी, मंदिर ... परंतु इथे त्याचा साधा महिती देखील उपलब्ध नाही

एकूण चांगली माहिती फोटोसाहीत दिली आहे. छान!

असे दोन वराह (अभंग) पाहिले आहेत.
१) ग्वालिअर किल्ल्याखाली गुजरी म्युझियम मध्ये.
२) खजुराहोच्या पश्चिमी मंदिरसमुहात.

Srd माहितीबद्दल धन्यवाद
मी खजुराहोचा वराह पहिला आहे. प्रचंड आणि अगदी सुबक शिल्प आहे ते.