चीपकु खारुटी !

Submitted by Dr Raju Kasambe on 23 February, 2020 - 00:26

चीपकु खारुटी !

एका बागेतील एका मोठ्या वृक्षावर एका खारीच्या (Squirrel) जोड्याने घरटे केले. खूप सारा पालापाचोळा, सुतळ्या, कापडाचे तुकडे, धागे, पॉलिथिनचे तुकडे वापरून त्या दोघांनी मोठ्या मेहनतीने ते घरटे बनविले होते. दुरून ते कचऱ्याचे वाटोळे बेचके वाटावे असे दिसत असे. काही दिवसांनी त्या जोडप्याचा संसार फुलला आणि त्यांना दोन पिल्लं झाली. सुरुवातीला अगदी मांसाचे गोळे असलेली पिल्लं आपल्या आईचे दुध पीत आणि तिच्या पोटाखाली झोपून राहत. हळूहळू त्यांच्या अंगावर लव फुटली. नंतर छान राखाडी केस फुटले. आता ते बऱ्यापैकी आपल्या आई-बाबांसारखे दिसू लागले. हळूहळू ते घरट्यातून डोकावायला लागले. मग घरट्याच्या बाहेर येऊन उन्हात बसू लागले. आई-बाबा खाली बागेत लोकांनी टाकलेला खाऊ घेऊन येत आणि ह्या दोन भावंडांना भरवत. सुरूवातीला आई बाबा त्यांना तोंडात उचलून घेऊन जात.

नंतर मात्र ते आपल्या मजबूत नखांच्या पकडीच्या जोरावर झाडाच्या फांद्यांवर खेळायला लागले. अशा वेळेस लांब झुपकेदार शेपटी तोल सांभाळायला कामी येई. एकदा दोघांनीही एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारून जायचे ठरविले. मोठ्या खारुटीने अलगद उडी मारली. लगेच छोट्या खारुटीने सुद्धा झेप घेतली. पण तिची झेप चुकली, धपकन आवाज करून ती झाडाखालच्या डबक्यात पडली.

त्या खारुटीच्या सुदैवाने बागेतील मजुराने तिचे प्राण वाचविले. या घटनेनंतर तिची हिम्मत खचली आणि ती आईच्या पाठीवर चिपकून पाठकुळी बसू लागली. तिला आता झाडावर चढायची सुद्धा भीती वाटायला लागली. प्रयत्न केला की ती कधी झुडपांमध्ये तर कधी कचरा पेटीत आपटायची. तिची झाडावर चढायची भीती एवढी वाढली की वर चढायचा नुसता विचार जरी केला तरी तिचे पाय लटपटू लागत. शेवटी तिने निर्णय घेतला की ती कधीही झाडावर चढणार नाही आणि केवळ जमिनीवरच राहील.

पण एका खारी साठी केवळ जमिनीवर आयुष्य जगणे सोपे नसते. त्यातही ती तर एका वर्दळीच्या बागेत जन्मली होती. लहान मुलं, मोकाट कुत्री, गावठी मांजर तिचा पाठलाग करीत. मोकाट कुत्री आणि गावठी मांजर तर तिला मटकावायला सदा तयार असत. कुत्र्यांपासून आणि लहान मुलांपासून बचाव करण्यासाठी ती मग तुरुतुरु धावून एखाद्या गर्द झुडपात दडून बसे. पण तरी सुद्धा तिला मांजरांची भीती सतावत असे.

तिच्या आयुष्यात तिला आणखी एक आधार मिळाला होता. तो म्हणजे एक चिमणी. तिला चिमणीच्या रूपाने एक प्रेमळ मैत्रीण मिळाली नसती तर तिला जगणे मुश्कील झाले असते. ह्या चिमणीचे घरटे बागेतल्या एका कार्यालयाच्या भिंतीतील छिद्रात होते. ती दररोज अन्नाच्या शोधात ह्याच खारीच्या झाडाखाली येत असे. बागेत फिरायला आलेल्या मनुष्यांनी सांडलेले किंवा टाकलेले खरकटे, शेंगदाणे, आलू चिप्स, पॉपकॉर्न इत्यादी खाऊ ते दोघे खात. मस्त उन्हात खाऊ खात खात मग त्यांच्या गप्पा रंगत. ते दोघे सोबत खेळत. मस्ती करीत.

चिमणीची दृष्टी खारुटी पेक्षा फार तीक्ष्ण होती. कुठल्याही धोक्याची तिला प्रथम चाहूल लागत असे. लगेच ती कर्कश आवाजात चिवचिवाट करून सर्वांना धोक्याची सूचना देत असे. खारुटीला तिची भाषा कळत असल्यामुळे ती क्षणार्धात झुडुपात गडप होऊन जाई. खारुटी मग तिला सापडलेली खाऊची नवीन जागा दाखवीत असे. चिमणीने दिलेल्या धोक्याच्या इशार्‍यांमुळे खारीचा जीव अनेकदा वाचला होता. आपण आपल्या मैत्रिणीसाठी विशेष काही करू शकलो नाही त्याबद्दल खारुटीला नेहमी खंत वाटत असे. झाडावर चढण्याच्या भीतीपोटी तिला चिमणीचा खूप आधार वाटत असे.

एक दिवस खारुटी झाडाखाली खाद्य शोधीत होती. बराच वेळ झाला तरी चिमणी आली नाही. जोराचा वारा असल्यामुळे पक्षांचे आवाज सुद्धा जास्त येत नव्हते. खारुटीला चुकल्यासारखे वाटायला लागले. अचानक वारा मंदावला आणि खारुटीला चिमणीचा आवाज ऐकू आला.

“वाचवा, वाचवा”.

खारुटीला चिमणीचा आवाज कुठून येतोय ते कळायला बराच वेळ लागला. कारण चिमणीचा आवाज झाडाच्या शेंड्यावरून येत होता. खारुटीने जमिनीवर खूप आरडाओरड केली. तिला वाटले आपले आई-बाबा धावून येतील आणि चिमणीची मदत करतील. पण कदाचित ते खाद्याच्या शोधात बरेच दूर गेले होते. खारुटी जमिनीवर अस्वस्थपणे धावत होती. आता चिमणीच्या आर्त हाका क्षीण व्हायला लागल्या.

‘माझ्या मैत्रिणीचे प्राण संकटात आहेत. मी काहीतरी करायला हवे. पण काय? ती तर तिथे शेंड्यावर आणि मी अशी येथे. झाडावर चढायलाच हवे नाहीतर माझी मैत्रीण... नाही...’

खारुटीने झाडाच्या बुंध्यावर पकड घट्ट करीत वर चढायला सुरुवात केली. अर्धेअधिक चढून गेल्यावर तिने सहज खाली नजर टाकली.

‘अरे देवा!’

संपूर्ण जमीन गरगर फिरत होती. खारुटीने पुन्हा खाली न बघता वर चढायला सुरुवात केली. लवकरच ती चिमणीजवळ पोहोचली. बघते तर काय चिमणी एका पतंगाच्या मांजात आणि फांदयामध्ये चांगलीच गुरफटलेली होती.

चिमणी हळूच पुटपुटली
‘मला वाचवा’.

खारुटीने आपल्या तीक्ष्ण दातांनी तो बारीक मांजा सहज कुरतडून तुकडे करून टाकला. चिमणी स्वतःला सावरून अलगद उडून एका फांदीवर जाऊन बसली. ती पुटपुटली,

‘खारुताई, आज माझा जीव तुझ्या मुळे वाचला बघ’.

पण, खारुटीचे त्याकडे लक्ष कुठे होते? ती खाली जमिनीकडे बघत होती. विशेष म्हणजे आता खालची जमीन फिरत नव्हती की तिला गरगरत नव्हते. ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आनंदाने अलगद उड्या मारू लागली. आनंदाने ओरडू लागली. तिचे आई-वडील जेव्हा तिला शोधत येतील तेव्हा ती त्यांना झाडाखालच्या झुडपांमध्ये सापडणार नव्हती. ती त्यांना झाडांच्या शेंड्यांवरून उंच आवाज देऊन चकित करणार होती. कारण आता ती आईच्या पाठीवर बसून फिरणारी चिपकु खारुटी राहिली नव्हती.

डॉ. राजू कसंबे,
मुंबई.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults