आनंदछंद ऐसा - कुमार १

Submitted by कुमार१ on 24 February, 2020 - 01:04

माझे छंद हे भाषा आणि लेखन यासंबंधी आहेत. त्यापैकी एक म्हणजे दैनिकांतील पत्रलेखन. मी या छंदात कसा पडलो, त्यातून कसा आनंद मिळाला आणि त्यातून अनुभवात कशी भर पडली याचा आढावा घेतो.
….

माझ्या या छंदाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी. ते माझे पदवीचे अखेरचे वर्ष. अभ्यासाच्या पुस्तकांच्या गराड्यात बसून प्रचंड वाचन, मनन, पाठांतर आणि मग चर्चा असा तो व्यस्त दिनक्रम असे. पण या सगळ्यातून थोडी तरी फुरसत काढून काहीतरी अभ्यासबाह्य करावे असे मनातून वाटे. आपल्या आजूबाजूस असंख्य घटना घडत असतात त्यातील काही मनाला भिडतात. त्यावर आपण कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. तशा आपण मित्रांबरोबर चर्चा करतोच. पण त्या विस्कळीत स्वरूपाच्या असतात. पुन्हा त्या ठराविक वर्तुळात सीमित राहतात. जर मला काही विचार मुद्देसूद मांडायचे असतील आणि ते समाजात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावे असे वाटले तर ते लिहून काढणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली.

त्याकाळी पत्रलेखकाला आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. त्यामुळे मलाही हे सर्व खुणावत होते. अशाच एका उर्मीतून मी पहिलेवहिले पत्र लिहीले. ते क्रिकेटवर होते. आता लिहून तर झाले पण छापून येण्याची काय शाश्वती? आपल्या शहरातील सर्वाधिक खपाच्या पेपरात तर ते छापून येणारच नाही असे मनोमन वाटू लागले. मग एक युक्ती केली. त्या पत्राच्या तीन हस्तलिखित प्रती सुवाच्य अक्षरात लिहिल्या आणि त्या तीन वृत्तपत्रांना पाठवल्या.

आता ते पत्र प्रसिद्ध होणार की नाही याची जाम उत्सुकता लागलेली. रोज सकाळी पेपर आल्यावर त्यावर झडप घालून ‘ते’ पान उघडायचे आणि त्यावर अधाशासारखी नजर फिरवायची. ८-१० दिवस गेले आणि एके दिवशी तो सुखद धक्का बसला ! पत्र छापले गेले होते. यथावकाश ते पत्र अन्य दोन पेपरांतही प्रसिद्ध झाले.

मग मला या प्रकाराची गोडी लागली. विविध विषयांवर दैनिकांतून पत्रलेखन हा माझा छंद झाला.
………..
आता नमुन्यादाखल माझे एक पूर्वप्रसिद्ध पत्रे इथे सादर करतो.
………

२००२ मध्ये ‘लोकसत्ता’ तील माझ्या या पत्रावर दोन प्रतिसाद आले होते. त्यातील एकात माझ्या मुद्द्यास विरोध केला होता. तर त्यावर आलेल्या अन्य एका वाचक-प्रतिसादात पुन्हा माझा मुद्दा उचलून धरला होता. ही खरी संवादाची मजा असते. ती ३ पत्रे आता सादर करतो. माझे पत्र पूर्ण आहे. पण अन्य २ वाचकांची नावे न घेता त्यांच्या पत्रांचा गोषवारा देतो.
…..

पत्र क्र. १ (माझे) :
विद्यार्थी भाडेकरू नकोच !

गेल्या काही वर्षांत महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले बांधून झाली आहेत. एखादे संकुल बांधून झाले की त्यातील बऱ्याच सदनिका या स्वतःला राहण्याची गरज नसणाऱ्याकडून ‘गुंतवणूक’ म्हणून घेतल्या जातात. मग त्या विद्यार्थ्यांना भाड्याने दिल्या जातात. असे विद्यार्थी हे बहुतांश सधन वर्गातील, परराज्यातील आणि विनाअनुदान महाविद्यालयांमध्ये भरमसाठ शुल्क भरून शिकणारे(?) असतात.

या विद्यार्थ्यांच्या बेताल वर्तनाचा आजूबाजूच्या कुटुंबांना खूप त्रास होतो. रात्री बेरात्री मोठ्याने गप्पा मारणे, बाइक्सवरून वारंवार रपेट करणे, मित्रमैत्रीणींना जमवून ‘ओल्या पार्ट्या’ साजऱ्या करणे असे अनेक उद्योग हे विद्यार्थी करतात.

संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सहकारी संस्था स्थापन व्हायला बराच कालावधी लागतो. या काळात सदनिका विद्यार्थ्यांना भाड्याने देणाऱ्या लोकांवर कोणताच अंकुश नसतो. वास्तविक विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह हेच योग्य ठिकाण आहे. परंतु, तेथील शिस्तीचा बडगा नको म्हणून बरेच विद्यार्थी सदनिकांमध्ये घुसतात.

तेव्हा सदनिका भाड्याने देताना त्या कुटुंबालाच देण्याचे नैतिक बंधन मालकांनी स्वतःवर घालावे. प्रत्येक सहकारी गृहसंस्थेने सदनिका विद्यार्थ्यांना भाड्याने न देण्याचा ठराव मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी. सदनिकांमध्ये भाड्याने राहून शिस्तीत वागणारे विद्यार्थी हे खूप कमी प्रमाणात आढळतात.

( ‘लोकसत्ता’, दि. २५/३/२००२, साभार !)
*****

पत्र क्र. २ (श्री. अबक) :
विद्यार्थी भाडेकरू का नकोत ?

वरील पत्र वाचले. काही विद्यार्थी बेताल वागत असतील पण त्यासाठी सर्वांनाच वेठीला धरू नये. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे नसतात. ........ सदनिका विद्यार्थ्यांना भाड्याने न देण्याचा ठराव सुचवण्यापेक्षा बेशिस्त विद्यार्थ्यांना ताबडतोब सदनिका खाली करण्याचा ठराव करण्याबाबत कुमार यांनी सुचवले असते तर बरे झाले असते. (१/४/२००२).
************

पत्र क्र. ३ (श्रीमती गमभ) :
विद्यार्थी भाडेकरूंचा त्रासच !

वरील दोन्ही पत्रे वाचली. श्री. अबक यांची प्रतिक्रिया पटण्यासारखी नाही. आमच्या सोसायटीतील विद्यार्थ्यांचा आम्ही अतोनात त्रास व धिंगाणा सहन केला आहे. ... घरमालकाकडे खूप तक्रारी केल्यावर त्यांनी मोठ्या नाराजीनेच विद्यार्थ्यांना घर सोडायला लावले.....

महानगरांत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांची सोय वसतिगृह, dormitaries, नातलग आणि श्रीमंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत हॉटेल्समध्ये होऊ शकते. विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या गैरवर्तन होण्याचा धोका लक्षात घेऊन, त्याना भाडेकरू म्हणून ठेवणे नकोच हे कुमार यांचे मत नक्कीच समर्थनीय आहे. ( ६/४/२००२).
*****

एखादा मुद्दा किंवा विचार मोजक्या शब्दांत मांडणे ही एक कला असते. माझ्या या छंदातून मला ती विकसित करता आली. एखादे पत्र छापले जाण्याचा आनंद, तर एखादे न छापले जाण्याचे दुःख, पत्र प्रकाशनाची आतुरता आणि लेखनविषयाची निवड या सर्व पैलूंचा अनुभव मिळत गेला. त्यातूनच पुढे स्वतंत्र लेखन करण्याची बैठक तयार झाली.
…………………………….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान छंद आहे हा . समाजाला फायदेशीर असा.

वर्तमानपत्रात आलेल्या पत्रलेखनाची दखल कोर्टाने घेऊन sue moto कारवाई केल्याची देखील उदाहरणे आहेत .

चांगला छंद आहे. समाजोपयोगी. शिवाय वैद्यक क्षेत्रातील माहिती देणारे लेख लिहीत असता तोही चांगला उपक्रम आहे डॉक्टर. :स्मित :

छान.
पण विद्यार्थ्यांना घर भाड्याने न देण्याबद्दल तुमच्याशी असहमत आहे बरं का Proud

> वर्तमानपत्रात आलेल्या पत्रलेखनाची दखल कोर्टाने घेऊन sue moto कारवाई केल्याची देखील उदाहरणे आहेत . > जाई याबद्दल वेगळा लेख लिही जमलं तर.

तुमचं लिखाण खरंच सामाजिक जाणिवांचे असते. असे लिखाण विरळ होतेय. जे असते ते ब-याचदा गळेकाढू असते. एखाद्या विषयाचा तर्कसंगत हळूवार विचार कसा असतो हे तुमच्याकडून शिकायला मिळाले... धन्यवाद

आवडले लिखाण.
ह्या छंदाची सद्य परिस्थिती काय आहे? अजूनही अशी वाचकांच्या पत्र व्यवहाराची सदरे चालू आहेत का?

पण विद्यार्थ्यांना घर भाड्याने न देण्याबद्दल तुमच्याशी असहमत आहे बरं का
अ‍ॅमी, ह्यावर एक पत्र तर लिहिलंच पाहिजे.

वरील सर्वांना धन्यवाद.

१. जेव्हा पत्रलेखक एखाद्या विषयावर काही मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्याशी काही वाचक असहमत होणारच, हे त्याने गृहीत धरलेले असते. सर्व मतांचे स्वागत आहे.

२. अलिकडे छापील पेपरांत पत्रांचे सदर बरेच आक्रसले आहे. अनेक इ माध्यमांचा विस्तार पाहता हे अपेक्षित होते.

३. इ- पेपर निघण्याआधीच्या काळात मात्र ते सदर म्हणजे सुंदर वैचारिक घुसळण असायची. सर्व मराठी पेपरांत म टा चे या सदराचे शीर्षक सुंदर होते : ' बहुतांची अंतरे'.
सध्या ही ते कदाचित टिकून असेल; छापील अंक मी पाहिलेला नाही.

धन्यवाद.

वाचकपत्र सदरासंबंधीच्या १९९५ पूर्वीच्या काही आठवणी रोचक आहेत:

१. दै. केसरीमध्ये या सदरातील दरमहा १ पत्र हे बक्षीसपात्र ठरवले जाई. मग त्या पत्रलेखकाचा फोटो, परिचय इ. प्रसिद्ध होई.

२. तसेच रोज एखाद्या पत्राला साजेसे चित्र काढण्याचा केसरीचा शिरस्ता होता. चित्र समर्पक असे.

३. दै. सकाळ (पुणे) मध्ये रोज १० तरी पत्रे प्रकाशित होत आणि त्यातले मुख्य पत्र हे ठळक मथळ्यात असे. त्या पत्राच्या लेखकाला अंकाची एक प्रत भेट पाठवली जाई !

४. तर काही काळ असे मुख्य पत्र हे अंकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होई.

धन्यवाद.

वाचकांच्या पत्रातून एका शहराचा कसा कायापालट झाला यावर एक लेख वाचला होता.

ते शहर आहे मँचेस्टर. सुमारे १७० वर्षांपूर्वी ते अतिशय गलिच्छ होते. लोक रस्त्यावरच मलमूत्र विसर्जन करीत. मग काही लोकांनी हे चित्र बदलण्याचा विडा उचलला. त्याची सुरुवात दैनिकांतील वाचकपत्रांनी झाली. त्यातून सतत स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.

त्यातून हळूहळू बदल होत ते शहर स्वच्छ झाले. आज ते जगातील खूप सुंदर शहरांपैकी एक आहे.

वरील सर्वांना धन्यवाद.

मभादि निमित्त माझे एक २००२ मधले मटातील एक पत्र इथे डकवतो.

patra (2).jpg

डॉक, पत्राशी सहमत.

>> दुसऱ्या भाषेतील शब्द हे पिठात मीठ इतक्याच प्रमाणात असावेत – लो.टिळक >>>
सुंदर ! आवडले.

तसंही मराठी वृत्तपत्रांचे मराठी हा चिंतेचा विषय झालेलाच आहे.

छान पत्र...
मला तर हल्ली माबो देखील बुचकळ्यात टाकते. हिन्दी कविता, गझल प्रकाशित व्हायला लागल्यात .

छान आहे तुमचा छंद! शाळेत असताना अशी वाचकांनी लिहिलेली पत्रे आवर्जून वाचत असे. थोडक्यात मुद्देसूद लेखन असे स्वरुप मला आवडायचे. काही वेळा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू नव्यानेच उलगडत असे, तर काही वेळा असा विचार करणारे आपण एकटेच नाही हे बघून छान वाटे.

वरील सर्वांना धन्यवाद.

स्वतः पत्रे लिहिण्याबरोबरच मला एक उपछंद देखील आहे. अन्य वाचकांची मला आवडलेली पत्रे देखील मी संग्रहित करतो.

त्यातील हे एक पहा. आपल्या दोन माजी राष्ट्रपतींच्या संदर्भातले आहे. ९/२/२००४च्या लोकसत्तामधले. मुंबईच्या एका वाचकाचे.

कलाम (2).jpg

कलाम यांनी त्यांचा शब्द कालांतराने पाळलेला आपण सगळेच जाणतो. त्यांना पुन्हा एकवार सलाम !

विद्यार्थ्यांना घर भाड्याने देण्यावर सोसायटी बंधन आणू शकत नाही. ते सरळ बेकायदेशीर आहे.
Every member of the society has the right to give his flat on leave and license basis and the society cannot restrict bachelors or spinsters. The requirement of obtaining the prior permission from the society to give the flat on leave and license basis, has been removed from the new model bye-laws. Members only need to inform the society about the flat being given on rent, by submitting a copy of the duly registered leave and license agreement and a copy of the tenants’ information submitted to the nearest police station,”
एवढेच नव्हे तर भाडेकरूंच्या कारला परवानगी नाकारणे हे देखील बेकायदेशीर आहे

पत्र एककल्ली व टोकाचे वाटले. अर्थात आपल्याला आलेले अनुभव मला आलेले नाहीत त्यामुळे, मला कल्पना नाही.
छंद खूपच आवडला.

छान छंद.

म. टा. चं शीर्षक अजुनही बहुतांची अंतरे असंच आहे. ई मेलची ई अंतरे.

वरील सर्वांचे आभार !

लेखातील पत्रातील विषय वादग्रस्त आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मते असणार हे उघड आहे. अशा सर्व मतांबद्दल आदर आहे. खुद्द लोकसत्ताने देखील अशी दोन्ही बाजूंची पत्रे छापली आहेत.
जो जे भोगतो तेच तो तीव्रतेने लिहितो. असे असंख्य सामाजिक विषय आहेत, ज्यांना दोन बाजू आहेत.
.....
आता कायदा आणि वास्तव याबद्दलचे निरीक्षण. मी संबंधित सहकारी कायदा वाचलेला नाही. तरी पण असे वाटते की ‘अमुक तमुक कुणाला भाड्याने देऊ नये’, अशी तरतूद नसावी.
पण.....
आमच्या भागातील २२ गृहसंस्थांनी हा ‘संस्थेचा नियम’ म्हणून संबंधित मुद्दा सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला आहे. गेली २० वर्षे तो विनातक्रार अमलात आणला गेला आहे. निदान माझ्या संस्थेत तरी कोणी सभासद त्याविरुद्ध न्यायालयात गेलेला नाही.

यावर अभ्यासू सहकारी कायदातज्ञांचे मत वाचायला आवडेल.
स्वंतंत्र बंगला आणि सहकारी संस्थेविना असलेली सदनिका-संकुले यांना मुक्तता असते आणि ते विद्यार्थी ठेवतात, हे आपण जाणतो.
.....
विनंती: निदान मभादिचे धाग्यावर तरी इंग्रजी परिच्छेद डकवणे टाळावे. पूर्ण प्रतिसाद (दुवा वगळता) देवनागरीत लिहावेत.

धन्यवाद !

Pages