मन वढाय वढाय (भाग १८)

Submitted by nimita on 22 February, 2020 - 22:45

स्नेहाकडून होकार मिळाल्यावर आता दोन्ही घरांत लगीनघाई सुरू झाली.किती मंतरलेले होते ते दिवस ! सगळीकडे नुसता उत्साह आणि आनंद भरून वहात होता. दोन्ही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनी आपली सगळी हौस भागवून घ्यायचं ठरवलं होतं. त्या सगळ्या घाईगर्दीत मधूनच कधीतरी एका निवांत दुपारी स्नेहा तिच्या कपाटातलं सगळं सामान आवरत होती. काय ठेवायचं, काय बरोबर घेऊन जायचं - काहीच सुधरत नव्हतं. तिनी नेहेमीप्रमाणे मदतीसाठी आईकडे धाव घ्यायचं ठरवलं.

स्नेहा जेव्हा आईच्या खोलीजवळ गेली तेव्हा आई बाबा दोघंही त्यांचे जुने फॅमिली अल्बम्स बघत काहीतरी बोलत होते.. स्नेहा खोलीच्या दाराबाहेर उभी होती; पण दोघांचंही लक्षच नव्हतं तिच्याकडे. अल्बम मधला एक फोटो दाखवून बाबा आईला म्हणाले, " हे बघ...हाच फोटो शोधत होतो मी. तिच्या बाहुलीच्या लग्नात अंतरपाट धरून उभा होतो मी...पण माझं लक्ष मात्र स्नेहाकडेच होतं.. आपल्या बाहुलीला हातात धरून अंतरपाटाच्या एका बाजूला उभी होती...बाहुलीपेक्षा जास्त तीच नटली होती. इतकी गोड दिसत होती... पण तोंड मात्र वाकडं ...शेवटी मी विचारलंच तिला काय झालं म्हणून . तर काय म्हणाली माहितीये ? म्हणे- 'लग्नात रडायचं असतं ना म्हणून तशी acting करतीये'.....इतकी गंमत वाटली होती मला तेव्हा..." स्नेहाचे बाबा भरभरून बोलत होते; जुन्या - मनात साठवून ठेवलेल्या आठवणी आज पुन्हा ताज्या होत होत्या ! आज आपल्या बाबांचं हे असं हळवं रूप पहिल्यांदाच बघत होती स्नेहा.ती हळूच चोरपावलांनी खोलीबाहेर गेली आणि भिंतीच्या आडोशाला उभी राहिली...'कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नाही' ही आईची शिकवण तिनी त्या वेळेपुरती गुंडाळून ठेवली. बाबा आईला पुढे सांगत होते- "आणि मग नंतर तिनी किती आग्रह करून जेवायला वाढलं होतं आपल्याला...नुसत्या गुळाचे छोटे छोटे लाडू आणि तिखट मीठ घातलेले कच्चे पोहे ! आठवतंय ना तुला पण ?" बोलताना बाबांचा गळा भरून आल्यासारखा वाटला स्नेहाला ... बाबांचा प्रश्न ऐकून आई म्हणाली," अगदी स्पष्टपणे आठवतंय सगळं. असे अजून कितीतरी प्रसंग आणि आठवणी आहेत ज्या कुठल्याच अल्बम मधे नाही सापडणार... तिच्या शाळेचा पहिला दिवस ! रडून गोंधळ घातला होता वेडाबाईंनी..शेवटी वंदना नी तिला कडेला नेऊन काहीतरी समजावून सांगितलं तेव्हा कुठे तयार झाली मला सोडून जायला!"

"आता यापुढे पण गरज पडली तर वंदना अशीच समजावून सांगेल ना गं तिला?" बाबांनी आपल्या मनातली हळवी शंका बोलून दाखवली. त्यावर त्यांना धीर देत आई म्हणाली," त्याबाबतीत अगदी निर्धास्त रहा... मला स्वतःबद्दल जेवढी खात्री नाहीये तेवढा वंदनावर विश्वास आहे." आपल्या नवऱ्याचा मूड ठीक करायला म्हणून ती पुढे म्हणाली,"मला तर वेगळीच भीती वाटतीये... लग्नानंतर लवकरच स्नेहा आपल्याला विसरून गेली नाही म्हणजे मिळवली.. या वंदनाचं काही सांगता नाही येत.... स्नेहाचे इतके लाड करेल की बघणाऱ्याला शंका येईल..ती स्नेहाची सासू आहे का आई? आणि मग माझी पोझिशन धोक्यात येईल !! " आईचं बोलणं ऐकून बाबा पण हसायला लागले.

'एखादया अवघड situation ला हसत खेळत कसं सोप्पं करायचं ते आईला बरोब्बर माहिती आहे. ती जवळ असताना कोणी जास्त वेळ टेन्शन मधे राहूच शकत नाही.' स्नेहाच्या मनात आलं. आपण काही ऐकलंच नाही अशा आविर्भावात ती खोलीत शिरली."काय करताय दोघं? अरे वा ! अल्बम्स!! यातले थोडे फोटो मी बरोबर नेले तर चालेल ना?" आपल्या आई बाबांच्या शेजारी जाऊन बसत स्नेहा म्हणाली. त्यानंतर बराच वेळ ते तिघं मिळून गतस्मृतींना उजाळा देत होते.

रात्रीची जेवणं झाल्यावर आई स्नेहाच्या खोलीत आली. स्नेहाच्या जवळ बसत तिनी विचारलं," दुपारी कशासाठी आली होतीस गं खोलीत? काही काम होतं का?" आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत स्नेहा म्हणाली," खूप महत्वाचं असं काही नव्हतं गं..." काही क्षण कोणीच काही बोललं नाही. पण मग स्नेहानी आईचा हात धरत विचारलं," आई, तू हे सगळं कसं मॅनेज करतेस गं? घरातल्या प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडी सांभाळणं, जर कोणी चुकत असेल तर त्याला न दुखावता त्याची चूक दाखवून देणं, वेळप्रसंगी तुझी चूक नसतानासुद्धा तू पडतं घेताना बघितलंय मी .. केवळ आपल्या घरात शांतता राहावी म्हणून ! मला पण जमेल का गं असं तुझ्यासारखं वागायला? रजतच्या आणि त्याच्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन ना मी ?"

स्नेहाच्या डोक्यावरून आपला हात फिरवत तिची आई म्हणाली," मला काय वाटतं सांगू का बाळा ? सासरची माणसं असो किंवा माहेरची... अपेक्षा या प्रत्येकाच्याच असतात. त्यांच्यासारख्याच तुझ्याही अपेक्षा असतीलच ना त्यांच्याकडून ? कुठल्याही दोन माणसांचं नातं म्हटलं की त्यात छोट्या मोठ्या अपेक्षा आल्याच की ! या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्याकडून नेहेमी अगदी मनापासून प्रयत्न करायचा. दर वेळी आपण यशस्वी होणार नाही कदाचित ! पण आपला प्रयत्न जर प्रामाणिक असेल ना तर तो नक्की समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतो. हेच तत्वज्ञान आपल्याला पण लागू पडतं बरं का ! प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेल याची गॅरंटी नसते; पण म्हणून त्यांच्या इंटेंशन्स वर कधीही शंका घेऊ नये."

स्नेहाला आईचं म्हणणं पटत होतं. एरवी कायम 'happy go lucky' असणाऱ्या , प्रत्येक गोष्टीत humour शोधणाऱ्या तिच्या आईचं हे रूप बघून स्नेहा खूपच भारावून गेली होती. लहान असल्यापासून तिनी आपल्या आईला कायम सुखी, समाधानी आणि आनंदी असलेलंच बघितलं होतं. अर्थात, कधी कधी राग अनावर होऊन आईनी धारण केलेला रुद्रावतार सुद्धा अनुभवला होता स्नेहानी. पण असे प्रसंग अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके कमी होते. आणि आईच्या या अशा खेळकर स्वभावामुळेच ती नात्यात आणि ओळखीच्या लोकांत एकदम पॉप्युलर असायची. स्नेहाचे सगळे मित्र मैत्रिणी पण तिच्या आईशी अगदी त्यांची बेस्ट फ्रेंड असल्यासारखे वागायचे. पण आज तिच्या आईचा मूड काही वेगळाच होता. 'लवकरच आपली मुलगी आपल्याला सोडून तिच्या नव्या घरात, नव्या नात्यांत बांधली जाणार आहे' याची अगदी पदोपदी जाणीव होत होती तिला. आणि म्हणूनच की काय आजकाल छोट्या छोट्या गोष्टींमुळे एकदम भावुक व्हायला होत होतं. उगीचच डोळे भरून येत होते. सतत स्नेहाच्या अवतीभवती राहावंसं वाटत होतं- त्या निमित्तानी तिच्या सहवासाचे अजून काही क्षण साठवून ठेवता येत होते.

"आता तू लवकरच नवीन नाती जोडणार आहेस," आई पुढे म्हणाली." रजत आणि त्याच्या घरच्यांना तू अगदी लहान असल्यापासून ओळखतेस हे जरी खरं असलं तरी तुमच्या लग्नानंतर हे नात्यांचं समीकरण बदलणार आहे.. आणि त्यात काही चूक नाहीये.. in fact मी तर म्हणेन की हे समीकरण बदलायलाच हवं. आता रजत हा तुझा फक्त मित्र नसणार- त्याबरोबरच तो तुझा नवरा असणार आहे; तुझ्या आयुष्यातला तुझा जोडीदार ! त्यामुळे आता त्याच्या अपेक्षा पण बदलतील हे तुला माहीत असणं आवश्यक आहे. अर्थात, हीच गोष्ट तुझ्या बाबतीत सुद्धा लागू आहे. तूही आता त्याच्याकडे 'नवरा' या अपेक्षेनी बघायला लागशील. आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायचं किंवा त्यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करायचं दायित्व प्रत्येक नात्यात असतं. नवरा आणि बायको हे एकमेकांना 'कॉम्प्लिमेंटरी' तर असावेच पण त्याहीपेक्षा जास्त ते 'supplimentary' असावे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्नेहा, जेव्हा एका पुरुषाच्या अपेक्षा त्याच्या स्वतःच्या घरात पूर्ण होत नाहीत ना , तेव्हा त्याचं लक्ष घराबाहेर जातं."

आई बराच वेळ बोलत होती आणि स्नेहा मंत्रमुग्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होती. एक एक शब्द मनात साठवून ठेवत होती. खरंच, किती छान वाटत होतं असं आईच्या कुशीत झोपून तिचा आवाज ऐकत राहणं ! एखाद्या 'so called' विचारवंताला लाजवतील असे प्रगल्भ विचार - पण तेही किती साध्या, सोप्या भाषेत उलगडून दाखवले होते आईनी! आईचं बोलणं ऐकता ऐकता स्नेहाला झोप लागून गेली...लहानपणी गोष्टी ऐकताना लागायची- तशीच !

आज कितीतरी दिवसांनंतर स्नेहा आपल्या आईच्या कुशीत झोपली होती... पण तिची आई मात्र स्नेहाच्या शांत, समाधानी चेहऱ्याकडे टक लावून बघत होती....आपल्या मुलीचा चेहेरा डोळ्यांत साठवून ठेवायचा प्रयत्न करत होती....पण डोळ्यांत साठलेल्या पाण्यामुळे सगळंच धूसर दिसायला लागलं होतं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं!!
किती सुंदर मांडलंय हे...आणि आईचे विचार तर किती मस्त आहेत Happy
पुलेशु!!

सुंदर लिहिलंय..
स्नेहाच्या मनाचे अपडाऊन्स खुप छान मांडलेत.. आवडतीये कथा..