मन वढाय वढाय (भाग १७)

Submitted by nimita on 19 February, 2020 - 20:23

टेलिफोनच्या रिंग मुळे रजत आणि स्नेहाची भावसमाधी भंग पावली. रजतच्या हातातून आपले हात सोडवून घेत स्नेहा फोनच्या दिशेनी पळाली.वंदनामावशी चा फोन होता. तिला रजतशी बोलायचं होतं. स्नेहानी रजतला हाक मारली -"रजत, मावशीला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोलून घ्या तोपर्यंत मी मागचं दार बंद करून येते, मग आपण निघू या."

रजत एकीकडे आपल्या चेहेऱ्यावरचा आनंद लपवत फोनपाशी गेला."हं आई, बोल." पण त्यानी जरी कितीही नॉर्मल आवाजात बोलायचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या आवाजातला आनंद बरोब्बर टिपला होता त्याच्या आईनी. आपलं हसू दाबत तिनी विचारलं,"काय रे, जोडीनी येताय ना दोघं?" 'आईला नेहेमी न सांगताच कसं कळतं सगळं?' रजत ला या गोष्टीचं नेहेमीच आश्चर्य वाटायचं. एक दोन वेळा त्यानी तसं बोलूनही दाखवलं होतं. तेव्हा त्याचे बाबा म्हणाले होते," देवानी प्रत्येक आईच्या डोक्यात तसं डिफॉल्ट सेटिंग करून ठेवलेलं असतं. त्यामुळे आपण त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. हे सगळं आपल्या बुद्धी पलिकडचं आहे." आत्ता रजतला बाबांचं ते वाक्य आठवलं. "हॅलो रजत, अरे मी काय विचारतीये ?" पलीकडून आईनी पुन्हा प्रश्न केला. "हो, हो. आता निघतोय आम्ही दोघं इथून. पोचतो घरी थोड्या वेळात." भानावर येत रजत म्हणाला. तेवढ्यात स्नेहा पण खोलीत आली. ती बाहेर जायला निघाली तेवढ्यात रजतनी तिचा हात धरून तिला थांबवत म्हटलं," स्नेहा, माझ्याशी लग्न करायचा तुझा निर्णय तू मनापासून, पूर्ण विचार करूनच घेतला आहेस ना ? नाईलाज म्हणून किंवा भावनेच्या भरात तर नाही ना ?" रजतच्या हातावर आपला हात ठेवत स्नेहा म्हणाली," अजिबात नाही. मी अगदी सगळ्या दृष्टीनी विचार केलाय यावर. शिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या आजी आणि आईनीच नाही तर तू स्वतः सुद्धा मदत केलीयेस मला या निर्णयापर्यंत पोचायला.त्यामुळे तू मनात कुठलीही शंका आणू नको. माझा होकार पक्का आहे आणि मला माझ्या या निर्णयाबद्दल पूर्ण खात्री आहे. आता निघू या का ? तिकडे सगळे जण आपली वाट बघत असतील."

स्नेहाच्या बोलण्यातला शब्द न् शब्द खरा असल्याचं जाणवत होतं रजतला - तिच्या डोळ्यांत त्याला तो खरेपणा अगदी स्पष्ट वाचता येत होता. त्याच्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका गायब झाल्या. स्नेहाच्या हातावरची पकड घट्ट करत तो हसला आणि म्हणाला," चल, आपल्या घरी जाऊ या."

थोड्याच वेळात दोघं रजतच्या घरी पोचले. रजतच्या मोटरसायकलचा आवाज ऐकून आजी लगबगीनी दारापाशी आली. दोघं घरात शिरणार इतक्यात त्यांना थांबवत तिनी हाक मारली," अगं वंदना, नीला.... आले बरं का दोघं..." पुढच्या क्षणाला दोघांच्या आया हसत हसत बाहेर येताना दिसल्या. येता येता रजतच्या आईनी त्याच्या बाबांना खुणेनी काहीतरी सांगितलं. रजत आणि स्नेहाला काय चाललंय काही कळत नव्हतं. शेवटी रजत म्हणाला," काय करताय तुम्ही ? आम्हांला असं बाहेर का थांबवलंय ?"

"तुम्ही दोघं पहिल्यांदा असा जोडीनी गृहप्रवेश करताय ना....मग तसंच स्वागत नको का करायला तुमचं?" आजी म्हणाली.रजतच्या आईनी त्यांच्या दोघांच्या पावलांवर दूध आणि पाणी घालून दोघांचे पाय धुतले; आजीनी दोघांवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. स्नेहाच्या आईनी दोघांचं औक्षण केलं आणि म्हणाली," आता एकत्र आत या दोघं." जसे दोघं घरात शिरले तसा रजतच्या बाबांनी टेप रेकॉडेर ऑन केला आणि सनईच्या मंगल सुरांनी सगळं घर भरून गेलं. तेवढ्यात स्नेहाचं लक्ष समोर उभ्या असलेल्या तिच्या बाबांकडे गेलं. पुढे येऊन रजत आणि स्नेहाच्या हातात गुलाबाच्या फुलांचे गुच्छ देत ते म्हणाले," तुमचं दोघांचं खूप खूप अभिनंदन !"

आपलं असं उत्स्फूर्त आणि आगळं वेगळं स्वागत बघून स्नेहा आणि रजत खूपच भारावून गेले...खास करून स्नेहा ...तिच्या मनात आलं,'माझ्या एका होकारानी हे सगळे किती खुश झाले आहेत. खरं म्हणजे सगळ्यांची हीच इच्छा होती पण तरीही माझं मन जपण्यासाठी कोणी काही बोलत नव्हते.खरंच, किती मनापासून प्रेम करतात हे सगळे आमच्यावर. आजी म्हणाली होती ते पटायला लागलंय आता मला- जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांच्या बरोबरच त्यांचे परिवार देखील प्रेमाच्या नात्यात बांधले जातात. आणि आमच्या दोन्ही परिवारांमधलं ते प्रेमाचं नातं मला आज पुन्हा प्रकर्षानी जाणवतंय.' स्नेहानी चोरट्या नजरेनी रजत कडे बघितलं. त्याच्या चेहेऱ्यावर तर तिला अक्षरशः जग जिंकल्याचा आनंद दिसत होता. तिच्या मनात आलं, 'ज्याअर्थी हे सगळे इतके खुश आहेत त्याअर्थी मी घेतलेला निर्णय हा सगळ्यांच्या दृष्टीनी योग्यच आहे,' स्नेहाची नजर आजीवर जाऊन स्थिरावली. आज आजीच्या अंगात अगदी दहा हत्तींचं बळ आलं होतं. त्या सगळ्या गोंधळात आजी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत म्हणाली," आता चला सगळे जेवायला. बाकी गप्पा नंतर होतील." जेवणाचं नाव ऐकल्यावर अचानक सगळ्यांना भुकेची जाणीव झाली आणि सगळे डायनिंग रूम च्या दिशेनी वळले. तिथे तर काही वेगळाच थाट होता. रांगोळ्या काय, उदबत्त्या काय !!! ते सगळं बघून रजत देखील भावुक झाला आणि म्हणाला," बाहेर इतकं छान स्वागत आणि आता हा जेवणाचा राजेशाही थाट....किती मेहनत घेतलीये तुम्ही सगळ्यांनी. थँक यू सो मच !"

स्नेहाची मनस्थिती पण काही वेगळी नव्हती.थोडं थांबून स्वतःच्या भावना आवरत ती म्हणाली," आत्तापर्यंत आम्ही दोघांनी तुमचं सगळं ऐकलं ना; आता तुम्ही सगळ्यांनी आमचं ऐकायचं. तुम्ही सगळे पंक्तीत जेवायला बसा.. आम्ही दोघं तुम्हांला वाढतो. कशी वाटली आयडिया ? "

तिच्या या जाहीर फर्मानाला सगळ्या मोठ्यांनी तितकाच जाहीर विरोध केला... मग 'तुम्ही आधी- आम्ही नंतर' या विषयावर चर्चा सुरू झाली. चर्चा कसली- गोंधळ च म्हणावा लागेल. शेवटी आजीनी परिस्थिती चा ताबा घेतला. "अरे, असे भांडू नका. सगळे एकत्र जेवू या. नंतर बरीच महत्त्वाची कामं करायची आहेत आपल्याला...." आजीच्या बोलण्याचा संदर्भ लक्षात न आल्यामुळे सगळे गोंधळात पडले. शेवटी आजीनी गौप्यस्फोट केला..." असे काय बघताय माझ्याकडे? आता यांच्या लग्नाची तयारी नको का सुरू करायला ? वंदना, लवकरात लवकर आमच्या स्नेहाला तुझ्या घरी घेउन ये गं बाई ; म्हणजे आम्ही सगळे सुटलो एकदाचे !!" आजीच्या या बोलण्यावर स्नेहा सोडून बाकीचे सगळे हसायला लागले. स्नेहाच्या चेहेऱ्यावरचा लटका राग बघून रजत तिच्या मदतीला धावला. तिची बाजू घेत तो म्हणाला,"एवढा त्रास होत असेल तुम्हाला तिचा तर सांगा- आज पाठवतच नाही तिला तुमच्याबरोबर परत. मला तर हवीच आहे ती इकडे यायला !"

रजतचा हा युक्तिवाद ऐकून पुन्हा एकदा घरभर हास्याची कारंजी उडाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users