मन वढाय वढाय (भाग १६)

Submitted by nimita on 16 February, 2020 - 21:54

स्नेहाचं बोलणं ऐकून रजतला सुरुवातीला थोडा धक्का बसला. तो इतक्या वर्षांपासून ओळखत होता स्नेहाला...अगदी रोज जरी भेटत नसले तरी महिन्यातून एक दोन वेळा तरी येता जाता भेट व्हायचीच... मोस्टली दोघांच्या आयांच्या मुळे...पण आजपर्यंत कधीच रजतला स्नेहाच्या वागण्या-बोलण्यातून असं काही जाणवलं नव्हतं. तिचं त्या दुसऱ्या मुलाबरोबरचं नातं इतकं पुढे गेलं असल्याची कोणतीच निशाणी त्याला दिसली नव्हती. आणि म्हणूनच आत्ता स्नेहानी दिलेल्या या कबुली मुळे तो जरा गोंधळून गेला होता.

स्नेहाला त्याची ही अशी प्रतिक्रिया अपेक्षितच होती. ती पुढे म्हणाली," तुझ्या मनात आत्ता काय चाललं असेल याची कल्पना आहे मला. तू शांतपणे परत एकदा विचार कर आणि मग सांग काय ते."

स्नेहा उठून स्वैपाकघरात गेली; पण रजतचं लक्षच नव्हतं. तो आपल्याच विचारात गर्क होता. स्नेहानी कॉफी बनवून आणली तेदेखील त्याला कळलं नाही. "कॉफी घे, नाहीतर थंड होईल ती," स्नेहाच्या बोलण्यानी रजत एकदम भानावर आला.

तिच्या हातातून कॉफीचा कप घेत तो म्हणाला," तू स्वतः हे सगळं मला सांगितलंस आणि तेही आपला निर्णय पक्का व्हायच्या आधी... त्याबद्दल थँक्स. खरं तर तू हे माझ्यापासून लपवून सुद्धा ठेवू शकली असतीस.पण तू प्रामाणिकपणे सांगितलंस. हे ऐकल्यावर कदाचित मी माझा निर्णय बदलेन याची तुला पूर्ण कल्पना होती- तरी तू मला सगळं सांगितलंस... म्हणून पुन्हा एकदा खूप मोठ्ठं थँक्स . तुझ्या या वागण्यामुळे माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर अजूनच वाढलाय स्नेहा. मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केलं याचा माझा मलाच अगदी सार्थ अभिमान वाटतोय. आणि मला खात्री आहे की आपल्या लग्नानंतर सुद्धा आपल्यातलं हे नातं असंच पारदर्शक राहील."

रजतचं असं भावुक होऊन हे सगळं बोलणं ऐकून स्नेहाला सुखद धक्का बसला. तिला वाटलं होतं- रजत वैतागेल, कदाचित त्याचं मन दुखावेल. 'आपण हिचा first choice नाही' हे कळल्यावर त्याचा इगो डिवचला जाईल. अजूनही बरंच काही अपेक्षित होतं तिला. पण इथे तर तसं काहीच नाही झालं. उलट रजत तिची भरभरून स्तुती करत होता. त्याला मधेच थांबवत ती म्हणाली," त्या मुलाबद्दल, आमच्यातल्या नात्याबद्दल तू काहीच विचारलं नाहीस. त्याचं नाव, तो काय करतो, आमचं नातं कशामुळे तुटलं.... हे काहीच माहिती नाहीये तुला आणि तरीही तू ...."

"मला नाही गरज वाटत त्याची." स्नेहाचं वाक्य मधेच तोडत रजत म्हणाला."तो तुझा भूतकाळ आहे. आणि तू स्वतः तुझा भूतकाळ मागे सोडून आली आहेस ; त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या दोघांच्या भविष्यावर त्याचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही." स्नेहाच्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून रजत पुढे म्हणाला," मी लहान असल्यापासून तुला बघत आलोय स्नेहा. तुझी एक सवय मला चांगलीच माहीत आहे....तू हातात घेतलेलं एखादं काम जोपर्यंत पूर्ण करत नाहीस तोपर्यंत दुसरं नवीन काम सुरू करत नाहीस. तुला कुठलंही काम अर्धवट सोडायला आवडत नाही. मला आठवतंय - लहानपणी कधी कधी तू आमच्या घरी जेवायला यायचीस ना तेव्हा तुझ्या ताटात पहिल्यांदा वाढलेलं सगळं अन्न संपेपर्यंत तू दुसरं काहीच घ्यायची नाहीस.माझी आई जर कधी आग्रह करायला लागली तर म्हणायचीस- 'आधीचं सगळं संपल्याशिवाय पुढचं कसं घ्यायचं ? तसं केलं तर मग मागचं आणि पुढचं सगळं मिक्स होतं आणि माझं confusion होतं. मला नाही आवडत तसं.'

रजतनी दिलेलं हे उदाहरण ऐकून स्नेहाला एकदम हसूच आलं. त्याला चिडवत ती म्हणाली," काहीही काय बोलतोयस तू? कुठलं कनेक्शन कुठे जोडतोयस? जेवणाचं ताट आणि माझा भूतकाळ ??काहीही ...."

तिच्या या अशा चेष्टेमुळे रजत थोडा खट्टू झाला. पण आपलंच घोडं पुढे दामटत तो म्हणाला," तुला नसेल दिसत काही कनेक्शन.... पण एकदा माझ्या नजरेतून बघ- म्हणजे कळेल मला काय म्हणायचं आहे ते. मला एवढंच म्हणायचं होतं की तुला कुठल्याच बाबतीत 'भिजत घोंगडे' ठेवायला आवडत नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की ज्या अर्थी तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस त्या अर्थी तू तुझं आधीचं नातं तुझ्या मनातून आणि तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकलयंस. त्याशिवाय तू हे नवं नातं जोडलंच नसतंस. आणि म्हणूनच मला त्या मुलाबद्दल काहीही माहीत करून घ्यायचं नाहीये.. माझ्यासाठी त्याचं अस्तित्व शून्य आहे."

रजतचे इतके स्पष्ट विचार आणि मुद्देसूद बोलणं ऐकून स्नेहा खूपच प्रभावित झाली. काही क्षणांपूर्वी त्याची चेष्टा केल्याबद्दल तिची तिलाच लाज वाटत होती. ती त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याचे हात हातात घेत म्हणाली,"ए, सॉरी रे ! मी मगाशी तुला असं चिडवायला नको होतं. तुझ्या म्हणण्याचा खरा अर्थ समजून न घेता उगीचच तुझी चेष्टा केली मी. पण तुझं बोलणं ऐकून मला एका गोष्टीची जाणीव झालीये- तू मला जितकं ओळखतोस ना तितकं मी स्वतः पण नाही ओळखत मला ! माझ्यावर इतका विश्वास ठेवल्या बद्दल खरंच खूप खूप थँक्स !!" बोलता बोलता स्नेहाचे डोळे भरून आले. इतके दिवस तिच्या मनात एक अजीब अशी टोचणी होती. पण आज रजतपाशी आपलं मन मोकळं केल्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं... पण त्याहीपेक्षा रजतच्या स्वभावातला समजूतदारपणा आणि त्याच्या विचारांमधली सुस्पष्टता बघून ती अगदी भारावून गेली होती. इतकी वर्षं ती रजतला फक्त 'एक जवळचा मित्र' म्हणूनच बघत होती. पण आज त्याच्या बोलण्यातून,त्याच्या प्रत्येक शब्दामधून तिला त्याच्या मनात डोकावून पाहता आलं होतं. तिचा 'जवळचा' मित्र कधी तिचा 'जिवाभावाचा' मित्र झाला हे तिचं तिलाही कळलं नाही. तिला पुन्हा एकदा आईचं ते वाक्य आठवलं...' आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करावं.'

बराच वेळ दोघंही तसेच स्तब्ध, शांत बसून होते. एकमेकांच्या हातांत हात देऊन ! आपापल्या विचारांत गर्क... आता आपल्या भावना व्यक्त करायला त्यांना शब्दांचा आधार घ्यायची गरज नव्हती. दोघांनीही अगदी खुल्या मनानी त्यांच्या या नवीन नात्याचा स्वीकार केला होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एवढंच म्हणायचं होतं की तुला कुठल्याच बाबतीत 'भिजत घोंगडे' ठेवायला आवडत नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की ज्या अर्थी तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस त्या अर्थी तू तुझं आधीचं नातं तुझ्या मनातून आणि तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकलयंस. त्याशिवाय तू हे नवं नातं जोडलंच नसतंस..........यावरुन हेच दिसून येते की सलील परत आला तरी काही फरक पडणार नाही.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत