निळा!

Submitted by kulu on 16 February, 2020 - 00:46

खरंतर निळा हा काही माझ्या अत्यंत आवडत्या रंगांपैकी नव्हेच, पण तरीही ह्या निळ्यानेच मला सगळ्यात जास्त दर्शन दिले आहे. माझे अत्यंत प्रसन्न निसर्गदर्शन सगळे या निळ्याशी संबंधित आहे. क्रूझवर डेकवर बसलं कि समोर दर्याचा स्वच्छ ओला निळा क्षितिजापर्यंत ताणलेल्या धुतल्या निळ्या वस्त्रासारखा पसरलेला असतो आणि त्याच्या वर आकाशाचा निळा त्याला भेटायची घाई करत असतो. हे निळे बदलत जातात, हवेत बाष्प असलं कि पांढुरका निळा, पाऊस पडणार असला कि करडा निळा पण मला आवडतो तो पाऊस पडल्यानंतर अभ्रकाचे ऊन पडल्यावर दिसणारा निळा. तो स्फटिकासारखा पवित्र निळा, बाळाच्या निरागस हसण्यासारखा. त्या हसण्याला कारण नसतं म्हणून ते निव्वळ हसणं काळीज सुखावून जातं.... तसा तो कैवल्यात्मक निळा!

बसल्या बसल्या असे किती तरी निळे मनात येत राहतात! मनाचं पण विचित्र आहे, समोर दिसतंय ते बघून समाधानी नाहीच व्हायचं, त्याला गतकाळाच्या आठवणींचा, सुख-दुःखांचा स्पर्श करत राहायचं, कुठलाही नजारा त्यामुळे एकतर आनंद किंवा दुःख या भावनांनी बाधित होतोच! दैवकृपेने माझ्या सगळ्या निळ्या आठवणी सुखाच्या आहेत. लहानपणी डिसेंबर-जानेवारीत थंडी पडली कि एक निळा दिसायचा आकाशात! अंगणातल्या आंब्याच्या झाडाखाली बसलं कि अंगावर उन्हाचा जाळं पडायचं आणि त्या कवडशांतून तो स्वच्छ निळा झिरपायचा. माझे कित्येक शनिवार रविवार असे बसण्यात गेले असतील. शुक्रवारी संध्याकाळीच याचा आनंद असायचा कि आख्खी शनिवार दुपार आणि रविवार सकाळ तो निळा आपल्याला भेटणार! शुक्रवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ हा अत्यंत सुखाचा काळ हे त्यावेळी डोक्यात बसलेलं गणित अजून कायम आहे. दुपारच्या बाराच्या उन्हात त्यावेळी एक घामट त्रासदायक भाव नसायचा. तशा उन्हात आम्ही पाच-सहा जणं शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर फिरंगाईच्या बोळातून सुटून शिवाजी पेठेतनं खाली आलो कि अचानक समोर रंकाळा दिसायचा, तिथं आमच्या सायकलींचा वेग अगदी ठरवल्यासारखा कमी व्हायचा. मुद्दाम तिथं रेंगाळत निळं खुलं आकाश बघत हसत घरी जायचं, दप्तराचं ओझं जाणवायचं नाही कि काही नाही! निळ्यात तरंगल्यासारखं वाटायचं!

मी आठवीत असताना चुलतभावाचं लग्न झालं. प्रथेनुसार कुलदैवताला जायचं म्हणून भैया वहिनी निघाले, पाठी लागून बरोबर मीही गेलोच गाडीतून! धो धो पाऊस ज्योतिबाला जाताना, दुपारी तीन ला पण दाट धुकं! डोंगर चढून वर गेल्यावर एक दहा मिनिटं पाऊस थांबला होता पण आभाळ गच्चंच होतं, यमाईच्या देवळातून वर आल्यावर खाली बघताना खालची गावं आणि वरचा डोंगर यांच्यामध्ये एक भिजलेला निळा भरून राहिला होता! कोडोली, आंबेवाडी, केर्ली अशी सगळी छोटी गावं आपल्या भिजलेल्या कौलांसकट त्या निळ्याच्या पांघरुणात होती, पाणी पिऊन हुरुप आलेल्या शेतांवर तो निळा विसावला होता अलगद ... भिजलेला निळा पण गारठलेला नव्हे... भिजून तृप्त झालेला, संपन्नतेची नांदी देणारा निळा तो! धुवटीचा निळा असं बोरकर म्हणतात त्याला सुनीताबाईंनी पावसाळ्यातला निळा म्हटलंय तो हा असावा!

एमएस्सी च्या डिझर्टेशन प्रोजेक्ट्साठी वुड्स होल ला गेलो मार्कोकडे!! आयुष्यातला पहिला परदेश प्रवास, सगळा रात्रीच्या साक्षीने झालेला, भर हिवाळ्यात तिथे पोहोचलो. आख्खं ते गाव स्वप्नातलं, टुमदार बंगले, गच्चं झाडी आणि लेकुरवाळा समुद्र! तिथे पहिला कोरडा निळा बघितला. जॅक नावाचा कुत्रा होता कॅथीकडे. कॅथी म्हणजे मी जिच्या घरी राहायचो ती ७० वर्षांची चिरतरुण बाई, तिचा नवरा डिक सायंटिस्ट! भयानक लाघवी जोडपं, शक्य असतं तर सुटकेस मधून पॅक करून जाईल तिथे न्यावं असं वाटायला लावणारं! तर जॅक त्यांचा कुत्रा, खरंतर अमाण्डा म्हणजे त्यांच्या मुलीचा कुत्रा तो, पण ती बोस्टनला आणि तिथे तिच्या रूममध्ये जागा नव्हती म्हणून इथे आणून ठेवलेला. कॅथीचा बंगला, ज्याला आम्ही द बार्न म्हणायचो, तो तीन मजली, टुमदार, तळ्याकाठी वसलेला! तिथून एक छोटीशी लडिवाळ पायवाट मुरकत मुरकत समुद्रापर्यंत जायची! मी आणि जॅक तिच्यावरून जायचो फिरायला बीचवर. मी १५ डिसेंबरला तिथे पोहोचलो, बर्फ भुरभुरायला सुरुवात झाली होतीच त्यावेळी, तरी आम्ही न चुकता फिरायला जायचो संध्याकाळी ४ ला वगैरे कारण ५ ला अंधारबुडुक. पुढे फेब्रुवारीत ब्लिझर्ड आलं, म्हणजे हिमवादळ. सलग दोन दिवस बर्फ कोसळत होता, एक मिनिटाची पण उसंत घेतली नाही. थांबला तेव्हा सगळी सृष्टी विरक्त झाली होती, पांढऱ्याधोप बर्फाचं लिंपण सगळ्यावर, आमच्या गाड्या २ फूट बर्फाखाली! पण या सगळ्यात ती पायवाट मात्र वाचली कारण डिकने तिच्यावर आधीच जाडं मीठ पसरून ठेवलं होतं! तिथला बर्फ त्यामुळे पटकन वितळला म्हणून मग दुपारी तीनला बाहेर -२० तापमान असताना मी न जॅक बाहेर पडलो, त्याला पण भयानक बोअर झालं होत दोन दिवस घरात बसून, हुंदडत बाहेर पडला. आम्ही पायवाटेवरून जाताना मी सहज वर बघितलं आणि तो दिसला..... निळा.... कोरडा थंड पण मायाळू साधूसारखा! जगाचे सगळे रुसवे फुगवे सोसून विरक्त झालेल्या प्रेमरुम बनलेल्या साधूसारखा! तो सगळीकडे भरून राहिलेला फक्त आकाशातच नव्हे, झाडात साचलेल्या हिमकणांवरून परावर्तित होत होता, तळ्याच्या गोठलेल्या बर्फ़ावरून इकडे तिकडे पसरत होता...तो हसत होता, त्याला आनंद सोडून दुसरं काही माहीतच नसावं किंबहुना! तो निळा आनंदरूपी विरक्तीचा होता, बर्फाने धुवून निघालेल्या नितळ हवेत अजून जवळचा वाटत होता. हाच काय तो हिवटीचा निळा?

नंतर आल्प्समध्ये एक निळा दिसला स्वित्झर्लंडला गेल्यावर! तिथे पण भर हिवाळ्यातच गेलो. माझी स्वीझ आई मार्था...तिच्या कृपेने मला तिथे असंख्य निळे बघायला मिळाले! त्यातला होहेर कोस्टनला दिसलेला निळा दृष्ट लागेलसा. एप्रिलचा महिना होता, होहेर कोस्टनच्या माथ्यावरून समोर बघितलं कि पसरलेला आल्प्स दिसत होता, गारठ्याचं थंडीत रूपांतर झालं होतं, उन्हाने आल्प्सच्या शिखरांशी सख्य साधलं होतं, आकाशात ढगांचे पुंजके आता कोरडे होते आणि या सगळ्याला निळी आभा देणारं निळं निळं आभाळ जिथे नजर जाते तिथवर आणि त्याच्याही पलीकडे....सगळं निळं! पण त्या सगळ्याशी स्पर्धा कुणी करावी? तर खालच्या छोट्याशा तळ्याने! डोंगरमाथ्यावर बसलेलं एक छोटंसं खट्याळ तळं. सगळ्या आजूबाजूच्या डोंगरांनी आपल्या कुशीत अलगद झेललेलं, त्यांचं लाडकं ते चिमुकलं तळं. त्या तळ्याचा गडद निळा सगळ्या निळ्यांत उठून दिसत होता, बाजूच्या हिरव्या डोंगरांनी त्या निळ्याला पाचूचा स्पर्श केला होता. येणारे जाणारे ढग सुद्धा त्यात आपल्याला न्याहाळून बघायचे. एखादा हळूच आपला आकार बदलायचा आणि हलकेच आपल्या नव्या रुपाला न्याहाळून खुश होऊन पुढे जायचा! तो एक गडद खेळकर निळा!

पण सगळयात जास्त निळे मी कुठे बघितले तर ऑस्ट्रेलियात. हा जितका कांगारूंचा देश, वाळवंटाचा देश तितकाच अथांग अफाट निळ्याचा देश! किती आणि कुठले कुठले निळे सांगावे. तिथे मी पहिला मन भरून निळा पाहिला जेव्हा मी सर्फिंग शिकायला लायटन बीचवर जायचो फ्रीमँटल ला. सुंदर अप्रतिम वगैरे वगैरे कुठलेच शब्द कामी येत नाहीत त्या बीचचं वर्णन करायला. पर्थ चे बीचेस बनवताना देवानं कमाल केली आहे, सगळ्यात शेवटी बनवले त्यानं ते. सगळं जग बनवून झाल्यानंतर त्याच्या लक्ष्यात आलं कि अजून भरपूर सौन्दर्य आपल्याकडे शिल्लक आहे, त्यानं ते ठासून भरलं, मुक्तहस्ताने उधळलं पर्थचे समुद्रकिनारे बनवताना. लायटन बीचवर समुद्राचा स्निग्ध निळा पसरलेला असायचा, त्यावर पांढऱ्या लाटा किनाऱ्याशी लगट करत असायच्या आणि पर्थच्या आकाशाचा शुद्ध सारंग त्यावेळी दोन्ही मध्यम आमच्यावर वर्षावत असायचा! नुसत्या आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेने गुदगुल्या व्हाव्यात ज्याच्या सान्निध्यात असा तो निळा! नंतर कालामुन्डा हिल्सवर मार्कोच्या घरी बघितलेला एक निळा वेगळा! त्याच्या अंगणातून खाली पर्थ पसरलेलं दिसायचं! आकाशाचा निळा पर्थला कुरवाळायचा, मध्येच उभ्या असलेल्या काचेच्या इमारतींचा टोकेरीपणा घालवून त्याला नाजुकशी गोलाई द्यायचा आणि हे सगळं किअँती चे घुटके घेत आम्ही शांतपणे बाघायचो!

पर्थात जॅकरांडाची झाडे भरपूर, काही मुद्दाम लावलेली, बरीचशी आपोआप आलेली. एरव्ही ती आजिबात लक्ष्यात येत नाहीत. बाकीच्या हिरव्या शांततेत भर घालत ती उभी असतात. पण एकदा का बहरावर आलीत कि दुसरं कुठलं झाड आपल्या नजरेत ठरत नाही. जांभळ्यागर्द फुलांनी सगळं आसमंत सजवून टाकतात. पर्थचे व्हिक्टोरिया पार्क सारखे भाग तर जांभळी पैठणी नेसलेल्या सुवासिनी सारखे शकुनवंत होतात. आपल्याकडे जसा गुलमोहोर फुलताना आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या रिक्त जागेला सुद्धा लालिमा फासतो तसं जॅकरांडा वर्षातून एकदा पर्थचा तो आसमंत जांभळ्यात माखून टाकतो! एरवी जांभळा आणि निळा हे मानवी जगात काही फार चांगलं कॉम्बिनेशन नाही. पण निसर्ग स्वतःच कलाकार असेल तर आपल्या आवडी निवडी, किंबहुना आवडीनिवडी या नावाखाली दृष्टीला लावलेल्या सगळ्या सवयीचं गळून पडतात! वर पर्थाचं बोट लावलं तर बोट निळं होईल इतकं संहत निळं आकाश, त्यात अधेमधे येणारे चुकले माकले शुभ्र ढग आणि खाली जॅकरांडाची जांभळी माया! निसर्गाची अशी रंगपंचमी बघताना मनाचं फुलपाखरू होतं! हजारो जन्म त्या रंगांच्या एखाद्या फटकाऱ्यावर बहाल करावेत! पर्थलाच बासेल्टन जेट्टीने एक निळा दाखवला होता! आयुष्यातल्या अत्यंत सुखाच्या दिवसांपैकी तो एक! मी अज्या, बुद्धी, जोसी अशी आमची गॅंग आणि बुद्धीची फॅमिली आम्ही पर्थ च्या खाली मार्गारेट रिव्हर ला गेलो होतो. रात्री बासेल्टनला थांबलो, बीचवर एअर बीएनबी ने बंगला घेतला होता. रात्रभर समुद्राची गोड गाज कानी. सकाळी जाग आल्या आल्या बीचवर गेलो, समोर बघतो तो काय निळाच निळा! कसं वर्णन करू? कसं सांगू? त्या निळ्याला कशाचीच उपमा नाही, निळ्यानेच निळ्याची आरती करावी असा तो निळ्याहूनही निळा! हिरवट निळं पाणी, त्यात तो क्रीम कलर चा बीच आणि आकाशाचा तो निळा यात मध्येच ती बॅसॅल्टनची शुभ्र जेट्टी पहुडली होती! कित्येक जन्मांच्या पुण्यराशी जमल्यानंतर दिसणारा तो निळा या जन्मी सहज दिसला!

हे सगळं सगळं आता आठवतंय! समोर निळा आपल्या छटा बदलतोय. सरळ पश्चिमेला जाणाऱ्या आमच्या बोटीच्या नाकासमोर सूर्य मावळायला आलाय. इंदिराबाई म्हणतात तसं पश्चिम क्षितिजावर सूर्याचा सुवर्णकलश कलंडलाय, पण, नुसताच नाही! आपण कलशातून पाणी ओतताना हाताची ओंजळ करतो तसं ढगांनी एक ओंजळ धरलीय त्या सुवर्णकलशासमोर! त्या ढगांच्या पुंजक्यातून शेकडो प्रकाशधारा समुद्रावर सांडल्यात! समुद्र पुरियाधनाश्री झालाय आणि या सगळ्यात भरून राहिलेला तो निळा आपली अनेक रूपं दाखवतोय! सूर्याच्या खालच्या निळ्यावर केव्हाच लाली चढलीय, त्याच्यासमोर एक हिरण्यगर्भी निळा, त्याच्याही पुढं सोनं मिसळून न मिसळल्यासारखं, आमच्या बोटीच्या आजूबाजूला तो नजारा बघून लाजणारा एक हलका निळा आणि बोटीच्या मागे युगायुगांचा हाच नजारा बघून संन्यस्थ झालेला गडद निळा....अनुभवाने पोक्त झालेला! कधीतरी असं होतं कि एखाद्या गोष्टीच सौन्दर्य आपण एव्हढं जगतो कि त्याच्यापुढे एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे स्वतःच ते सौन्दर्य होणे, मी न राहणे! किशोरीताई म्हणायच्या "यमन जेव्हा मी असा गाईन कि मीच ती स्वरलहर होईन तिथे किशोरीचे देहरूपी अस्तित्वच संपेल, तो सर्वोच्च प्रतीचा यमन!" तसं झालंय या निळ्याचं! हा निळा मी इतका जगलोय कि आता मलाही त्या निळ्याचा भाग व्हावं वाटतंय, "तो" निळा न राहता "मी" निळा झालो कि मग ती सर्वोत्तम निळाई! निळा पाहिला पासून निळा जाहलो पर्यंतचा सुंदर प्रवास असेल तो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाचा कॅनव्हासच मुळात निळा आहे.त्याच्या भरपुर छटा अजुन अनुभवायच्या बाकी आहेत मला हे तुमच्या लेखामुळे प्रकर्षान जाणवायला लागलंय.. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत! Happy

आहाहा..
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.
....एवढंच!

मलाही अपूर्वाई मधला "निळाई" आठवला.... निळा रंग निर्गुणाचा. माझ्याकडे निळ्यासावळ्या खट्याळ कान्होबाचं एक चित्र आहे... त्याची आठवण झाली.
लेख सुंदर!
असे खूप खूप निळे अनुभवायला मिळोत!

खूप सुंदर लिहिलंय.
असे नानागुणी निळे... Happy

निळाई 'जावे त्यांच्या देशा' मधला, प्रज्ञा Happy

लिंक रोचक आहे जिज्ञासा! आणि 'खरा' नसतो म्हणजे तरी काय? पिगमेंटने निळा दिसू दे नाही तर प्रकाशाच्या करामतीने, निळा तो निळाच Happy

वा , सुंदर .. निळ्याच्या अंतरंगाचा ठाव घेतला आहे तुम्ही.
ग्रेसांची सुंदर कविता आठवली . इथे टाकावीशी वाटली.

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

मी ही स्वरबद्ध केली आहे आणि गात असतो माझ्या कार्यक्रमात.

मस्त लिहिलंय रे. ही कविता आठवली बघ -

"एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा
दूर डोंगरातला एक जरा, त्याच्याहून निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा, एक मखमली निळा
इंद्र निळा, त्याला एक गोड, राजबिंडा निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
असे नानागुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे
ज्यांच्यामुळे नित्य नवे घडे, तुझे माझे डोळे
जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
अशा कालिंदीच्या काठी, एक इंदिवर निळा
आपणही होऊ निळ्या, करू त्याच्याशी रंग संग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे, रंग खेळतो श्रीरंग.."- बोरकर.

एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा - मला पण ती बोरकरांची कविता आठवली. पुलं आणि सुनीताबाईंच्या आवाजात ऐकलेली.

निळाई 'जावे त्यांच्या देशा' मधला, प्रज्ञा>>> अर्र्र!!!
आता एडिटपण करता येईना. असो. आता लक्षात राहील. थँक्स वावे! Happy

धन्यवाद Happy

पशुपत, तुमच्यामुळे खूप सुंदर कविता कळली !

एक आनंदयात्रा कवितेची या पुलं आणि सुनीताबाईंंनी केलेल्या बोरकरांच्या कवितांंच्या वाचनाच्या कार्यक्रमात 'एक हिवटीचा निळा...' ही कविता आल्यानंतर सुनीताबाईंंनी ही वरची ग्रेस यांची 'असे रंग आणि ढगांच्या किनारी' हीदेखील कविता म्हटली आहे. शिवाय पुलंनी ज्ञानेश्वरांची 'निळीये रजनी..' ही विराणी गायली आहे. आता हिवटीचा निळा किंवा असे रंग आणि ढगांच्या किनारी या कविता वाचल्या की आपोआपच त्या सुनीता देशपांड्यांच्याच आवाजात ऐकू येतात Happy Happy

सुंदर अप्रतिम वगैरे वगैरे कुठलेच शब्द कामी येत नाहीत >>> हे तुझ्या लेखासाठी पण लागू होतं. क्या बात है, चित्रदर्शी वर्णन निळा.

तुझ्या लिखाणाची जादू खूप दिवसांनी अनुभवली. लिहित राहा आणि आम्हाला आनंद देत रहा. God bless u.

पशुपत, लंपन धन्यवाद छान कविता शेअर केल्याबद्दल.

निळा म्हटल्यावर मला पटकन, 'नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा' गाणं आठवतं. आता कुलू तुझा हा लेख आठवेल.

<निळा म्हटल्यावर मला पटकन, 'नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा' गाणं आठवतं.>
अहाहाहा....
सुधीर मोघे + र्हुदयनाथ जी + लता दी ....

Kulu
अप्रतिम वर्णन केलय. खूपच देखणा लेख.
काप्री बेटावरील ब्लू ग्रोटोची .... निळाई ...अत्यंत सुंदर , आयुष्यात एकदातरी ती पाहण्याची इच्छा आहे.
पुलं, सुनीताबाई , बोरकर .....यावरून आणखी एक कविता आठवली.
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले......

Pages