मन वढाय वढाय (भाग १५)

Submitted by nimita on 14 February, 2020 - 10:40

फोनवर ठरल्याप्रमाणे वंदनाच्या घरी जाण्यासाठी सगळ्यांनी तयारी सुरू केली. आई आणि आजी थोडं आधी जाणार होत्या .. स्वैपाकाची जबाबदारी आज त्यांच्यावर होती. स्नेहाचे बाबा आणि रजतच्या बाबांचा आधीच काहीतरी वेगळाच कार्यक्रम ठरला असल्यामुळे ते दोघंही सकाळपासूनच बाहेर होते. घरातून निघताना आई स्नेहाला म्हणाली," मी आणि आजी स्कूटर घेऊन जातोय गं. तुला घ्यायला रजत येईल थोड्या वेळानी. तसंही तुला त्याच्याशी बोलायचं होतं ना.. तुझा तो निरोप पोचवला मी त्याच्या पर्यंत. आता जे काही बोलायचं असेल ते सगळं उरकून मगच या तिकडे."

त्या दोघी गेल्यावर स्नेहानी पण एकीकडे तयार व्हायला सुरुवात केली. रजत थोड्याच वेळात येणार होता. त्या दिवशी गच्चीवर दोघांचं बोलणं झाल्यानंतर आज पहिल्यांदाच दोघं आमोरासमोर येणार होते. रजतनी स्नेहाला कबूल केल्याप्रमाणे तिला विचार करायला हवा तेवढा वेळ दिला होता. आणि जेव्हा तिनी त्याला भेटायची इच्छा बोलून दाखवली तेव्हाच तोही तयार झाला. Now the ball was in Sneha's court. ती त्याच्याशी काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती- सगळं काही माहीत असूनही अगदी आजी सुद्धा वाट बघत होती.

आणि हे सगळं स्नेहा जाणून होती. म्हणूनच की काय पण तिच्या मनावर थोडं दडपण आलं होतं. 'सलील बद्दल जेव्हा रजतला कळेल तेव्हा त्याची रिऍक्शन कशी असेल ? राग येईल का त्याला ? त्याचा इगो दुखावला जाईल का? सगळं ऐकून जर त्यानी त्याचा विचार बदलला तर ?' आत्तापर्यंत शांत असलेल्या स्नेहाच्या मनात आता पुन्हा चलबिचल सुरू व्हायला लागली होती. तेवढ्यात बाहेरचं गेट उघडल्याचा आवाज आला आणि मागोमाग मोटरसायकल चा पण! 'रजत आला' असं म्हणत स्नेहा दार उघडायला गेली.

रजत नी बेल वाजवायच्या आधीच तिनी दार उघडलेलं बघून रजतच्या मनात उगीचच एक आशा पल्लवित झाली-' म्हणजे माझी वाटच बघत होती ही...' रजत मनोमन सुखावला. पण तसं काहीही चेहेऱ्यावर दिसू न देता तो आत येऊन सोफ्यावर बसला. थोडा वेळ दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. खूपच अवघडल्यासारखं झालं होतं दोघांनाही. पण कोणी तरी सुरुवात करणं आवश्यक होतं. शेवटी स्नेहानी ती कोंडी फोडत विचारलं,"चहा घेशील ना?" आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ती स्वैपाकघरात जायला वळली. आपल्या मौनातून अचानक भानावर येत रजत म्हणाला," नाही, नको. तू बस इथेच. चहा चा मूड नाहीये आत्ता." त्याचं बोलणं ऐकून स्नेहा पुन्हा त्याच्या समोर येऊन बसली. खरं म्हणजे हा सस्पेन्स आता रजतला असह्य झाला होता. पण तो स्नेहाला दिलेल्या वचनात बांधला गेला होता त्यामुळे फक्त वाट बघण्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. काही क्षण असेच एका अवघड शांततेत गेले. काही वेळापूर्वी पर्यंत रजतशी काय आणि कसं बोलायचं हे अगदी पक्कं ठरवलं होतं स्नेहानी; पण आता मात्र तिला कसं आणि कुठून सुरू करावं तेच समजत नव्हतं. पण इतर वेळेसारखा या वेळी रजत स्वतः पुढाकार घेऊन हा विषय सुरू करणार नाही हे स्नेहाला माहीत होतं...कारण त्यानी तसं वचन दिलं होतं तिला. शेवटी एकदाची स्नेहानी बोलायला सुरुवात केली. रजतचे पंचप्राण जणू काही त्याच्या कानांत गोळा झाले होते. स्नेहा म्हणाली," तू मला प्रॉमिस केल्याप्रमाणे मला विचार करायला हवा तेवढा वेळ दिलास त्याबद्दल सगळ्यात आधी तुला खूप मोठ्ठं थँक्स. आणि मी माझा निर्णय सांगायला इतका वेळ लावला त्याबद्दल खूप मोठ्ठं सॉरी. इतके दिवस खूप गोंधळ उडाला होता माझ्या मनात.. आणि त्याला तसंच कारणही होतं. पण आता माझा निर्णय झालाय.... मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला....पण..."

स्नेहाचा होकार ऐकल्यावर रजत इतका खुश झाला की त्याला तिच्या वाक्यातला तो शेवटचा 'पण...' ऐकूच नाही आला. गेल्या काही दिवसांपासून तो ज्या तणावाखाली होता तो आज एका क्षणात नाहीसा झाला होता. अचानक त्याला सगळं जग सुंदर वाटायला लागलं. तो पुढे काही म्हणणार इतक्यात स्नेहा नी आपलं वाक्य पूर्ण केलं.."पण, त्याआधी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.. confession च म्हण ना ! तू प्लीज आधी माझं सगळं म्हणणं नीट ऐकून घे आणि त्यानंतर मग तू जे काही ठरवशील ते मला मान्य असेल."

स्नेहा एका दमात बोलून मोकळी झाली.पण तिच्या होकाराबरोबरचा हा clause ऐकून रजत मात्र गोंधळला. 'हिच्या काही अटी वगैरे असतील का? पण मग ती 'confession आहे' असं का म्हणाली? काय सांगायचं असेल?' रजत विचारात पडला. आपलं टेन्शन लपवायचा निष्फळ प्रयत्न करत त्यानी विचारलं," काय सांगणार आहेस नक्की? खूप गंभीर आहे का काही?" त्याला अशा अवस्थेत बघून स्नेहाला खूप अपराधी वाटायला लागलं. 'आपण उगीचच त्याच्या मनाशी, त्याच्या भावनांशी खेळतोय की काय' असं वाटून ती एकदम म्हणाली," सॉरी रजत, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना ! पण तुझ्या बरोबर पुढचं आयुष्य सुरू करण्याआधी मला माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल तुला सगळं सांगायचं आहे. आपल्या या नात्यात मला कुठलाही आडपडदा नकोय. या नवीन नात्याचा श्रीगणेश करण्यासाठी पाटीवरचं आधीचं सगळं पुसून टाकणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी तुला आज बोलावलं आहे." स्नेहाचं हे वक्तव्य ऐकून रजतची काळजी अजूनच वाढली. तो थोडासा वैतागून म्हणाला," प्लीज, जे काही आहे ते सांग ना लवकर.."

स्नेहा आपले शब्द जुळवत म्हणाली," रजत, तुझ्या आधी माझ्या आयुष्यात एक दुसरा मुलगा होता. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं....म्हणजे आमच्या मधे जे काही होतं त्याला प्रेम म्हणतात असं मला वाटत होतं.पण गेल्या काही महिन्यांत अशा काही घटना घडल्या की ज्यांमुळे आता तो मुलगा माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला आहे. हे सगळं तुला माहिती असणं माझ्या दृष्टीनी खूप महत्वाचं आहे.. आपल्या या नात्याची सुरुवात खरी असावी असं मला वाटतं आणि म्हणूनच तुझ्यापासून मला काहीही लपवून ठेवायचं नाहीये. आज मी तुला सगळं सांगणार आहे- अगदी 'अथ' पासून 'इति' पर्यंत ! त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू करू शकतोस. तुझ्या proposal चा फेरविचार करू शकतोस.कदाचित हे कळल्यावर तू तुझा निर्णय बदलशील.... पण तरीही मी तुला सगळं सांगणार आहे. कारण तुझ्याशी खोटं बोलून तुझं प्रेम स्वीकारण्यापेक्षा तुला खरं सांगून तुझा रोष पत्करणं मला मान्य आहे. निदान आरशात बघताना;स्वतःच्या नजरेला नजर देताना पस्तावणार तर नाही मी !"

मधे काही क्षण थांबून तिनी पुन्हा बोलायला सुरवात केली," अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट ... माझ्या मनात सध्या तरी तुझ्याबद्दल आदरयुक्त मैत्रीची भावना आहे. पण तू माझा अगदी जवळचा, जिवाभावाचा मित्र आहेस हेही तितकंच खरं आहे. आणि माझ्या मते नवरा बायकोच्या नात्याचा पाया हा जर मैत्रीचा असेल तर त्यांचं नातं जास्त मजबूत होतं. कारण प्रेमाच्या नात्यात रुसवे फुगवे , समज- गैरसमज होऊ शकतात पण त्याच नात्यात जर मैत्री सुद्धा असेल ना तर हे सगळे प्रॉब्लेम्स चुटकीसरशी नाहीसे होतात.जर आपलं दोघांचं लग्न झालं तर आपल्यातल्या नात्याला न्याय द्यायचा मी पूर्ण प्रयत्न करीन- अगदी प्रामाणिकपणे !!"

मनातलं सगळं असं भराभरा बोलून टाकल्यामुळे स्नेहाला आता खूप हलकं वाटत होतं, पण तरीही अजून बरंच काही सांगायचं होतं तिला; तिनी समोरचा रजत साठी आणून ठेवलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि चोरट्या नजरेनी रजत कडे बघितलं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users