माणूस स्वार्थी प्राणी आहे.

Submitted by आर्यन वाळुंज on 13 February, 2020 - 11:07

माझ्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात अनेक लोक भेटले. जवळ आले, दूर गेले. काहींशी वेव्हलेंग्थ जुळली. काहींशी अजिबात नाही जुळली. समर्थ वचनाप्रमाणे परिक्षा केली असता बरेच बरेवाईट अनुभव माणसांचे आले.
मागे एक चांगला व्हिडिओ पाहण्यात आला होता बिलिफ सिस्टीम नावाचा. त्यात दाखवलं होतं. एखाद्या विचारधारेला स्विकारलं की माणूस त्या विचारधारेचा गुलाम होतो. ती विचारधारा तो माणूस चुकीचं, समाजविघातक दुष्कृत्य करीत असेल तरी त्याला त्या गोष्टींचा ना पश्चाताप होतो ना काही बोचणी लागते.
समोरचा माणूस वेगळ्या धर्माचा आहे व तो माझ्या धर्माच्या शिकवणी विरूद्ध श्रद्धा बाळगतो, वेगळ्या चालीरीती पाळतो म्हणून तो शिक्षेस पात्र आहे. त्याचं आर्थिक नुकसान केले, त्याचा जीव घेतला तरी मला पुण्यच मिळेल आणि माझा परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल. अशी काही लोकांची विचारधारा असते.
काही लोकांना श्रीमंत लोकांचा द्वेष असतो. साधनसंपन्न लोक आरामाचं जीवन जगतात, त्यांच्याकडे असलेला पैसा माझ्या सारख्या गरिबांना लुबाडूनच कमावलेला आहे. तेव्हा अशा लोकांना लुटलं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांना सुखाने जगू नाही दिले पाहिजे अशीही काहींची विचारधारा असते.
काही लोकांना सरकारी नोकरी प्रयत्न करूनही मिळालेली नसते. कमी पगाराची खाजगी नोकरी करताना सरकारी नोकर कसे कामचुकार आहेत, त्यांना भरपूर पगार,भत्ते, सोईसवलती मिळतात म्हणून बोटं मोडत असतात. जसं काही यांना सरकारी नोकरी मिळाली असती तर जीव तोडून काम केले असते. बरेचदा उच्च पदावर असणारा सरकारी अधिकारी आपला नातेवाईक आहे हे फुशारकीनं सांगत असतात.
काहींनी आपली निष्ठा एखादी व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष यांच्या चरणी वाहिलेली असते. भले ती व्यक्ती, संघटना समाजविघातक, देशविरोधी असेल तरीही हे त्यांनाच बरोबर म्हणणार.
बहुतेक वेळा आई-वडील देखील पार्शिलिटी करताना पाहिले आहे. एका मुलाला मुद्दाम जवळ करतात, कित्येकदा इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला स्वतंत्र होऊ देत नाहीत. वृध्दावस्थेत तो आधार देईल म्हणून जाणीवपूर्वक त्याची जडणघडण करतात.
साधारण दिसणाऱ्या, दरिद्री माणसाला समाज थोडं अंतर ठेवून वागवतो असे माझं निरीक्षण आहे. असा नातेवाईक असेल तर समारंभात त्याला बोलावतात पण कळत-नकळत त्याला वेगळी वागणूक दिली जाते.
माणूस कितीही पुढारलेला असल्याचं दाखवत असला तरी अगोदर स्वार्थाचा विचार करतो.‌ निस्वार्थी माणसं जगात आहेत,पण त्यांचा टक्का फार कमी आहे.
मला तरी वाटते माणूस स्वार्थी आहे. सर्व सामान्य माणसाला स्वार्थ सोडणं एवढं सोपं नाही म्हणून संतांनी आपल्या आचरणातून उदाहरणं घालून देऊन परमार्थ ( प्राणीमात्रांची निस्वार्थ सेवा) करावा असं सांगितलं आहे.

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख. पण स्वार्थ दोन प्रकारचे असतात चांगले आणि वाईट. पूर्वी एकदा मार्टिन ल्युथर किंग यांची गोष्ट वाचलेली पुसट आठवते. मार्टिन आणि त्यांचे मित्र गाडीतून एके ठिकाणी जात असतात तेव्हा त्यांची चर्चा सुरु असते. मार्टिन किंग म्हणतात प्रत्येक माणूस स्वार्थी असतो, माणसाच्या प्रत्येक कृतीत स्वार्थ असतो. त्यांच्या या वाक्यावर तिथे असलेले काही असहमती दर्शवतात. गाडी थोडी पुढे गेल्यावर त्यांना एक डुकराचे कि कुत्र्याचे पिल्लू चिखलात फसलेले दिसते. मार्टिन किंग गाडी थांबवून त्या पिल्लाला चिखलातून बाहेर काढतात. गाडीत परत आल्यावर एक मित्र विचारतो त्या पिल्लाला बाहेर काढण्यात तुझा काय स्वार्थ होता. तेव्हा मार्टिन किंग म्हणतात जर मी त्याला बाहेर काढले नसते तर माझ्या मनात सतत अपराधीपणाची भावना राहिली असती कि त्या पिल्लाला मदत केली नाही. आणि या गोष्टीचा विचार करून मला पुढची कित्येक रात्र झोप नसती लागली. सतत ते असहाय्य पिल्लू नजरेसमोर आलं असतं. हे सगळं टाळण्यासाठी मी त्या पिल्लाला बाहेर काढलं.

70 वर्षाच्या अनुभवातून इतकं एकांगी , बाळबोध आणि निगेटिव्ह सार .... ? तुम्ही म्हटलं आहे ते एखाद्या नुकतीच जगाची - बऱ्यावाईटाची ओळख होऊ लागलेल्या अननुभवी तरुणाने म्हटलेलं ठीक आहे .... आयुष्याचा एवढा अनुभव घेतलेल्या माणसाने काहीतरी खोल विवेचन सांगितलं असतं तर जास्त आवडलं असतं ....

धन्यवाद बोकलत भाऊ. चांगला स्वार्थ म्हणजेच परमार्थ! दुसऱ्यांना होणारा त्रास भले ते पशुपक्षीही असोत सहन न होणे हेच संतत्वाचं, साधुतेचं लक्षण आहे. मार्टिन ल्युथर किंग सारखीच घटना ज्ञानकोशकार केतकरांच्या आयुष्यात घडली होती. फक्त कुत्र्याचं पिल्लू होते तिकडे. तुम्ही सांगितलेली गोष्ट बहुतेक अब्राहम लिंकन घोडागाडीने जात असताना घडली होती असं वाचल्याचं आठवतं.
राधानिशा जी लेख खरंच गंडला आहे. मला वेगळं काहीतरी सांगायचं होतं पण सांगता आलं नाही.
काळबोका धन्यवाद.

माफ करा , लहान तोंडी मोठा घास घेतला ...वयाने मी फार लहान आहे तुमच्यापेक्षा , प्रत्यक्ष एवढ्या वयाच्या माणसाला असं समोरासमोर सांगण्याचं धाडस केलं नसतं ... सोशल मीडियावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीच लोक येतात त्यामुळे सांगण्याचं धाडस केलं .

मला वाटतं स्वार्थी असा सरळ निष्कर्ष काढणं अचूक होणार नाही . माणसाचं मन ही फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ... स्वतःच्याच मनाचा थांगपत्ता भल्याभल्यांना लागत नाही ... दुसऱ्यांना माणूस सहज दोष देऊन मोकळा होतो पण त्या व्यक्तीच्या जागी क्षणभर स्वतःला कल्पून बघत नाही ... अमुक चांगला , अमुक वाईट, अमुक स्वार्थी , अमुक कृतघ्न अशी सारखी विभागणी करत राहतो आयुष्यात भेटणाऱ्या माणसांची .. ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत , त्यांच्याही वेगळ्या अपेक्षा , मतं , इच्छा असू शकतात हे सोयीस्करपणे विसरतो ... आपल्या चांगला माणूसच्या व्याख्येत जो बसत नाही तो वाईटच असा निष्कर्ष काढून मोकळा होतो ... त्या लोकांना त्यांची आयुष्यं आहेत , त्यांच्यासमोर वेगळ्या समस्या , आव्हानं , कर्तव्यं , बरीवाईट नाती आहेत हे लक्षात घेत नाही , नेहमी स्वतःला केंद्रस्थानी ठेवून विचार करतो ....

शेवटी कोण इथे कायमचं राहायला आलं आहे ... पण 5 - 10 वर्षांपूर्वी आपल्याशी काहीतरी वाईट वागलेल्या माणसावरचा राग लोक मनात धरून ठेवतात ... हे म्हणजे ट्रेनमध्ये भेटलेला माणूस जरासं वेडंवाकडं वागला म्हणून प्रवास संपवून घरी आल्यावरपण महिनोंमहिने त्याचा राग मनात ठेवण्यासारखं आहे .

माझी माणसं - प्रिय जवळची माणसं या कॅटॅगरीत फार कमी लोक असतात , त्यांच्यात फारसे दोष दिसत नाहीत , जे दिसतील त्यांना पोटात घातलं जातं .. ती व्यक्ती असेल तशी स्वीकारली जाते ... बाकी अलम दुनियेत काही ना काही दोष दिसतातच .. कारण ते परके वाटत असतात ... प्रिय व्यक्तीची आगळीक सहज माफ केली जाते पण परक्या माणसाच्या लहान चुकीनेही काहींना खूप राग येतो ...

बहुसंख्य माणसांची सरळ स्वार्थी आणि निःस्वार्थी अशी विभागणी करणं कठीण आहे . एखादा माणूस भावाच्या मदतीला धावून जाणार नाही पण मित्राच्या जाईल तेही अगदी निरपेक्षपणे , एखादा दुकानात 2 रूपयासाठी घासाघीस करेल पण वाटेत भिकाऱ्याला 5 - 10 रूपये देईल .. स्वतःच्या मुलांचे हट्ट पुरवले जातात ते उद्या मोठा झाल्यावर मला बघेल या हेतुतून नाही , instinct , मातृत्व आणि पितृत्त्वाची भूक .. म्हणून वेळेस आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांच्या गरजा - इच्छा पूर्ण केल्या जातात .. अर्थात स्वतःची मातृ पितृत्वाची क्षुधा शांत करण्यासाठी मुलं जन्माला घालणे हाही एक मोठा स्वार्थच म्हणता येईल .

आईवडिलांना सांभाळलं जातं ते नाही सांभाळलं तर जग काय म्हणेल म्हणून नाही तर प्रेमापोटीच ... गेल्या 100 वर्षात परिस्थिती बदलली आहे पण इतकी शतकं कुटुंबव्यवस्था टिकून राहिली ती प्रेम असल्याशिवाय नाही .... केवळ स्वार्थ / जुलमाचा रामराम असता तर इतकी वर्षं ती टिकणं अशक्य होतं... स्वार्थ असलाच तर तो भावनिक गरजांची पूर्तता होणे , सुरक्षितता , नातेवाईक अडीअडचणीत धावून येतील याची खात्री या गोष्टींचा असेल .

स्वार्थ असलाच तर तो भावनिक गरजांची पूर्तता होणे , सुरक्षितता , नातेवाईक अडीअडचणीत धावून येतील याची खात्री या गोष्टींचा असेल .
नवीन Submitted by radhanisha on 13 February, 2020 - 23:42
>> मला खरं तर हेच अधोरेखित करायचं होतं की, आपण नेहमी ' माणूस हा समाजशील प्राणी आहे व तो एकटा राहू शकत नाही.' हे वाक्य वाचत असतो, ऐकतो. तर समाजशील असणं म्हणजेच त्याच्या गरजा इतरांकडून पुर्ण होतात. म्हणजेच यात एकाचा नाही तर सर्वांचा स्वार्थ साधला जातो या स्वार्थाला सहजीवन असे नाव दिले आहे.
समाजात वृध्दाश्रमांची वाढती संख्या माणसाचा संकुचित, स्वार्थी स्वभावच दर्शवते.