जरा वेगळे वाटते

Submitted by निशिकांत on 11 February, 2020 - 23:29

तुझ्या चाहुलीने मनी तेवते रे
मनाला जरा वेगळे वाटते रे

तुझे मस्त रेंगाळणे भोवताली
जरी ग्रिष्म, श्रावण सुखे पाहते रे

समुद्रास भरती फुका, चंद्र गगनी
दुरावा सदाचाच, हेलावते रे

जुन्या आठवांची खुशी एवढी की
मनाच्या कपारीत ओलावते रे

जसे एकटेपण छ्ळू लागते मज
तुझी प्रेमपत्रे जुनी चाळते रे

उशा पायथ्याला किती संपदा! पण
खरी चैन आलिंगनी लाभते रे

मशाली जळू दे मला काय त्याचे?
तुझ्या प्रेमज्योतीत तेजाळते रे

मनाची उदासी जरा दूर करण्या
तुझा चेहरा एकटक पाहते रे

जगाशी मला काय? देणे न घेणे
तुला केंद्रबिंदू सदा मानते रे

असा काय "निशिकांत" रडतोस वेड्या?
विझू दे मला मी पुन्हा भेटते रे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच आवडली !!
जुन्या आठवांची खुशी... ओलावते रे
जसे एकटेपण .. चाळते रे
मशाली जळू दे .. तेजाळते रे

हे जास्त आवडले.. खर तर सग्गळेच शेर अप्रतिम ! काही खूप रिलेट झाले . मस्तच !!

"समुद्रास भरती फुका, चंद्र गगनी
दुरावा सदाचाच, हेलावते रे"

हा शेर मला कळला नाही, बाकी सगळे शेर छान आहेत.

अजिंक्यराव, सागर आणि समुद्र यांच्यात अनादिकाळापासून प्रेमाचे संबंध आहे असे मानले जाते. म्हणूनच पौर्णिमेला सागराला भरती येते. पण दोघांच्या मिलनाचा योग वास्तवात नसतोच. हे बघून हेलावणे सहाजीक आहे. या शेराची ही पार्श्वभूमी आहे.
अर्थात हा शेर एक कविकल्पना आहे.