पाच दिवसांचा आठवडा!

Submitted by झुलेलाल on 13 February, 2020 - 00:15

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे. एखाद्या कार्यालयात एखादे काम घेऊन गेले आणि त्याच दिवशी संबंधित अधिकारी वेळेत जागेवर भेटून कामही झाले असा अनुभव आल्यास, त्यानिमित्त सत्यनारायण वगैरे घालून भाविकांस प्रसाद वाटावा असा आनंद त्यास होत असला तरी तशी संधी मात्र क्वचितच कोणाच्या वाट्यास येत असते.
गेल्याच आठवड्यात एका माहितीसाठी मंत्रालयाशी संबंधित असलेल्या एका खात्याच्या उपसचिवास मी फोन केला. ते अधिकारी कार्यालयात आले आहेत, पण जागेवर नाहीत असे उत्तर मला मिळाले. त्यानंतर त्याच दिवशी, कामाची वेळ संपेपर्यंत दर अर्धा तासांनी मी फोन करत गेलो आणि तेच उत्तर मला मिळत गेले. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार घडल्यावर स्वत: जाऊन भेटावे असे ठरवून मी तेथे गेलो, तेव्हाही हे अधिकारी जागेवर नव्हतेच. ‘कार्यालयात आले आहेत, पण कुठे आहेत माहीत नाही’ असे ‘इमानदार’ उत्तर या महाशयांच्या केबिनबाहेर बसणाऱ्या कर्मचाऱ्याने थंडपणे दिले. दुसऱ्या दिवशीही त्या अधिकाऱ्याचा मुखचंद्र पाहणे आमच्या नशिबी नव्हतेच!
सरकारी कार्यालयांत अनेकदा कामाच्या वेळात कर्मचारी जागेवर नसणे हा प्रकार आढळतो. सकाळी बोटाने पंच केल्यावर संबंधित कर्मचारी कामावर हजर झाला असे मानले जाते व संध्याकाळीही कामाची वेळ संपताना त्याने पुन्हा बोटाने आऊटपंच केल्यावर त्याचा कामाचा दिवस ‘भरला’ असे समजले जाते. कामासाठी खेटे घालणाऱ्यांच्या पदरी काय पडते हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे!
आता तर, पाच दिवस ‘भरावयाचे’ असल्याने मंत्रालयातील कामासाठी गावाकडून मुंबईत येणाऱ्यांना पुरेसा, म्हणजे पाच दिवस व सुट्टीचे दोन दिवस संपल्यानंतर दोनचार दिवसांची सवड काढून यावे लागण्याची शक्यता आहे.
कामकाजाचे तास वाढविण्यापेक्षा, कामाचा वेग वाढविणे हा या समस्येवरचा मूळ उपाय आहे.
म्हणून, पाच दिवसांचा आठवडा करणारच असाल, तर सुट्ट्यांचे दोन दिवस रोटेशन पद्धतीने, म्हणजे, काहींना सोम-मंगळ, काहींना बुध-गुरू, काहींना शुक्र-शनि व काहींना रवि-सोम अशा रीतीने सुट्ट्या द्याव्यात. म्हणजे, सर्वांस दोन दिवसांच्या सुट्टीचे फायदे उपभोगता येतील, व शनिवार-रविवारीही कामकाज सुरू ठेवता येईल!
याचा फायदा जनतेसही होईल. ज्यांना आपापल्या कामकाजाच्या दिवसांत सरकारी कार्यालयांतील कामकाजाकरिता वेळ काढता येत नाही, अशी सर्वसामान्य माणसे शनिवार-रविवारी या कामांचा पाठपुरावा करू शकतील!
(कसे वाटते ‘स्वप्नरंजन’?)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सरकारी कर्मचार्‍यांना पाच कशाला दोनच दिवस काम द्यावे. किंवा तेपण नको. वर्क फ्रॉम होम द्यावे. सध्या आहेतच ते पगारही चालू ठेवावे.

पण- लोकांना पर्याय द्यावा की एखादं काम सरकारी कर्मचार्‍याकडून करुन घ्यायचं की नाही. खाजगीकरणाचा ऑप्शन द्यावा.
पासपोर्ट ऑफिसमध्ये टीसीएसला कंत्राट दिल्यावर एकदम फरक पडला, अर्ध्या तासात काम उरकून दोन दिवसात हातात पासपोर्ट मिळू लागला- असे रिव्ह्यूज आहेत.
तसंच जो डिजिटायझेशन पुश आहे त्यानुसार ऑनलाईन पोर्टलद्वारे जास्तीत जास्त कामं होतील हे बघावं. खाजगी बँकांचं इन्फ्रास्ट्र्क्चर आहे. त्यांच्याकडे स्टाफ असतो, तो लागेल तसा रँप अप करता येतो. ते रिर्सोसेस वापरता येईल.
यामुळे सरकारी कर्मचार्‍यांवर काही अन्याय होऊ नये यासाठी त्यांच्या नोकर्‍या, भरती वगैरे सुरुच ठेवावं.

आपण किती क्षुद्र आहोत हे अनुभवायचे असेल
तर
एक तर हिमालयात जावे
अन्यथा
सरकारी कार्यालयात