हाऊ टु ट्रेन युवर गेंडा? काझीरंगाच्या आठवणी!!

Submitted by Dr Raju Kasambe on 10 February, 2020 - 12:30

हाऊ टु ट्रेन युवर गेंडा? काझीरंगाच्या आठवणी!!

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला काझीरंगाच्या राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता संशोधन प्रकल्प मिळाला आणि त्या निमित्ताने मला अंदाजे एक महिना (नोव्हेंबर व डिसेंबर २०१५) आसामात राहावे लागेल अशी माहिती मिळाली. त्या दरम्यान मी तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घ्यावयाच्या होत्या. म्हणजे माझे आवडते काम!

एकदा का पावसाळा सुरु झाला की काझीरंगा वन विभाग केवळ वन्यजीव आणि पूर व्यवस्थापन ह्या कामात गुंतून जातो. ज्याठिकाणी उन्हाळ्यात टूरिस्ट भरलेल्या जिप्सी भटकतात त्याचठिकाणी पावसाळ्यात बोटीतून पॅट्रोलिंग केले जाते. जून महिन्यापासून तर जवळपास ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण काझीरंगाचे जंगल, गवताळ पट्टे जलमय झालेले असते. काझीरंगाचे हे जंगल म्हणजे सपाट, सखल भागात असलेली दलदल आणि थोड्या उंच भागात असलेले घनदाट सदाहरित जंगल ह्याची सरमिसळ आहे.

नोव्हेंबर मधील माझी काझीरंगाची भेट अगदी कडाक्याच्या थंडीत घडली. आमचा मुक्काम बोकाखात ह्या छोट्याशा शहरात होता. खुल्या जिप्सीत स्वतःला जमेल तेवढ्या कपड्यात लपेटून आम्ही सायंकाळी मुक्कामाला परतत असू.

माझा सहकारी समीर बजरू हा सस्तन प्राण्यांचा शास्त्रज्ञ आहे. तर डॉ. स्वप्ना प्रभू एक उत्कृष्ट वनस्पतीशास्त्रज्ञ आहे. अनेकदा स्वप्ना, समीर आणि स्थानिक चालक जून दास नेहेमी सोबत सर्वेला जात असे. समीरला दुसरीकडे जायचे असल्यास मी आणि स्वप्ना दुसरा एक चालक सोबत घेत असू. माझ्या डिसेंबर मधील काझीरंगाच्या दुसऱ्या मुक्कामाच्या वेळी मात्र केवळ समीर सोबत होता.
Kaziranga3.jpg

प्रत्येक वेळेस सर्वेला जंगलात जाताना जिप्सीमध्ये एक रायफलधारी जवान (कमांडो) आणि वन विभागाचा रक्षक (गार्ड) घेणे आवश्यक होते.
Kaziranga.jpg
नियमाप्रमाणे आम्ही तो घेत असू. परवानगी असली तरीही कामाशिवाय जिप्सीच्या खाली उतरायचे नाही असा आमचा अलिखित नियम. काझीरंगाच्या जंगलात वन्यजीवांची खूप रेलचेल आहे. मोठ्या वन्यजिवांपैकी हत्ती, एकशिंगी गेंडा, रानडुक्कर, रानम्हैस, वाघ, आणि बिबट या सहा वन्यजीवांपासून आपल्याला सावध राहणे आवश्यक असते. वाघ आणि बिबट सहजपणे दिसत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष कुणी बोलताना दिसत नाही. बाकीचे चार वन्यप्राणी तर येथे सर्वत्र मुबलक दिसतात. मजेदार गोष्ट म्हणजे समीरने लावलेले ‘कॅमेरा ट्रॅप’ आणि पाऊलवाटेवर उमटलेल्या पाऊलखुणा आम्हाला पुराव्यानिशी हे दाखवीत होते की ज्या भागात आम्ही पायी भटकतोय तेथून थोड्या वेळापूर्वीच वनराज वाघाची प्रभातफेरी झालीय.
***
एक दिवस आम्ही सर्वे करून परतत होतो. रस्त्यात एका चौकीजवळ एक हत्तीचे पिल्लू दिसले. जिप्सी जवळ गेली तेव्हा दिसले की हत्तीचे पिल्लू साखळीने बांधून ठेवलेले होते. जिप्सी जवळ गेली तरी ते बाजू देईना. त्याने रस्ता अडवून ठेवला होता. गार्डने फोन करून तिथल्या चौकीदाराला बोलावले तेव्हा कुठे ते रागावलेले हत्तीचे पिल्लू बाजूला झाले आणि त्याने आम्हाला जाऊ दिले.
****
असेच एक दिवस आम्ही सर्वे करीत असताना एक प्रचंड हत्ती दलदलीत पडून असलेला दिसला. पाच दहा मिनिटे थांबून आम्ही निरीक्षण केले. जमेल तशी मी छायाचित्रे घेतली. एखादा म्हातारा हत्ती मरण पावला असावा असे आम्ही एकंदरीत अनुमान काढले. आमचा सर्वे चालू असताना आणखी एक शास्त्रज्ञ तरुणी दूसरे संशोधन करीत होती. तिच्या नजरेतून सुद्धा हे सुटले नव्हते. ‘संध्याकाळी परत येऊन बघते’ असे म्हणून ती आणि आम्ही आपापल्या कामावर निघून गेलो. दुसर्‍या दिवशी त्या परिसरात मला एक धिप्पाड आणि चिखलाने माखलेला हत्ती दिसला. दलदलीतला हत्ती जागेवर पडलेला नव्हता. तर असे अनुमान निघाले की हाच हत्ती काल स्वतःला चिखलात माखून घेऊन छान लोळत झोपला होता. बाकी काही सीरियस नव्हते!
****
अतिसंरक्षित क्षेत्रात फिरत असताना एका विशिष्ट ठिकाणी मला घाणेरीची छान फुलं आलेली झुडुपे दिसली. त्यावर भरपूर फुलपाखरांनी गर्दी केली होती. मी चालकाला आवाज देऊन जिप्सी थांबविली. पटकन उडी मारून फुलपाखरांची छायाचित्रे घेऊ लागलो. चालकाने हळूच जिप्सीचे इंजिन बंद केले. कमांडो आणि समीरसुद्धा खाली उतरले. तेवढ्यात वनरक्षक ओरडला,

‘साब, हाथी!’

पुढल्या एका क्षणात आम्ही सर्वजण जिप्सित उड्या मारून बसलो होतो. कसे ते आठवत नही. सांगायचे असे की हत्तींचा कळप अगदीच जवळ पण गर्द झाडीत चरत होता. जिप्सीच्या आवाजामुळे आणि फुलपाखरांच्या नादात आम्हाला हत्तींच्या आवाजाचे अजिबात भान राहिले नव्हते.

हाऊ टु ट्रेन युवर गेंडा?
Indian_Rhinoceros_Rhinoceros_unicornis_by_Dr._Raju_Kasambe_IMG_0511_(10).JPG
समीरला आज अगदी काझीरंगाच्या आतल्या भागात ‘कॅमेरा ट्रॅप’ लावायचे होते. मी, समीर, जून (चालक), वनरक्षक व बंदुकधारी जवान असे पाच जण सोबत होतो. प्रवाश्यांच्या गाड्या फिरायला राखून ठेवलेला ‘टूरिस्ट झोन’ संपला तेव्हा तेथील रक्षकाने आमच्या कागदपात्रांची पुन्हा एकदा शहानिशा करून घेतली. ह्याच्या पलीकडे ‘कोर झोन’मधील (अतिसंरक्षित क्षेत्रातील) वन्यप्राण्यांना टूरिस्ट जिप्सींची जास्त सवय नसते. ते बुजरे असतात तसेच वेळप्रसंगी आक्रमक होतात.

खूप वेळपर्यंत नोंदी घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. मध्ये एका सपाट गवताळ परदेशात दोन रान हेल्यांची जुंपलेली होती. पण आमची जिप्सी जवळ येताना दिसल्यावर त्यापैकि एकाने भांडण सोडून आमच्या जिप्सीवर लक्ष केन्द्रित केले व फुरफुरायला सुरुवात केली. जिप्सीवर चालून आल्याचे नाटक पण केले. अर्थात आम्ही त्याच्याकडे न जाता दुसरीकडे जिप्सी वळवल्यामुळे त्याने आक्रमक पवित्रा सोडून दिला.

Indian_Water_Buffalo_Bubalus_arnee_by_Dr_Raju_Kasambe.jpeg

काझीरंगाच्या जंगलातील टेहळणी चौक्या (चेक पोस्ट) ह्या जमिनीवर सीमेंटचे खांब बांधून त्यावर बांधलेले घर अशा स्वरूपाच्या असतात. पावसाळ्यात सगळं जलमय झाल्यावर पहिल्या मजल्यावरील वन कर्मचारी सरळ बोटीत बसू शकतात! अधिक पाणी वाढल्यास घराच्या स्लॅबवर चढून रेस्क्यू टिमला वायरलेस संदेश पाठविला जातो.

तर दुपारी आमची जिप्सी अशा एका चौकीवर पोहोचली. जिप्सीतून उतरणार तर जवळच एक धिप्पाड गेंडा फुरफुरत होता. जिप्सीमधील कमांडोने त्याला हातातली रायफल दाखविली आणि

‘जाओ उधर. चले जाओ!’

असे काहीसे आसामी भाषेत ओरडू लागला. त्याने रायफल छातीशी धरून जिप्सीतून खाली उडी मारली. लगोलग समीरने उडी मारली. आता मी आणि वन रक्षकच जिप्सित उरलो होतो. तो मला उतरायला सांगत होता. पण माझी हिम्मत होत नव्हती. चौकीवर (पहिल्या माळ्यावर) असलेले सगळे गार्ड पण मला

‘डरो मत. ओ हमारा इधरका गेंदा है. कुछ नही करेगा. उसका टेरिटरी है’.

असा धीर देत होते. पण गेंड्याने आमच्याकडे चार पावलं पुढे टाकली. तेव्हा माझी फा.... म्हणजे फारच घाबरगुंडी उडाली होती म्हणजे टरकलीच होती म्हणा ना.
तेव्हा माझ्या लक्ष्यात आले की गेंड्याच्या चेहेर्‍यावर संपूर्ण कातडे असल्यामुळे त्याचे हावभाव आपल्याला अजिबात वाचता येत नाहीत.

जिप्सितला वन रक्षक म्हणाला,

‘डरो मत. इसको अभी भगाता है’.

त्याने खिशातून बेचकी आणि छोटे खडे काढले. आता हा बेचकीने काय करणार? (म्हणून मी जीव मुठीत धरून थरथरत उभा होता, हो असेच घडले असेल कदाचित!). तर गड्याने बेचकीत खडा टाकून जोरात गेंड्यावर नेम धरून मारला. गेंडा फुरफुरत आमच्याकडे आणखी चार पावलं धावला. तोपर्यंत दूसरा खडा त्याच्या नाकाडावर आदळला होता. आता मात्र गेंडा तिरक्या चालीने आमच्यापसुन दूर पळायला लागला! युरेका!! हत्तीसारख्या धिप्पाड गेंड्याला बेचकीने घाबरवता येऊ शकतं हा मोठा शोध मला लागला होता. अरे, हे आधी माहीत असतं तर मुंबईवरुन निघतानाच एक बेचकी घेऊन नसतो का आलो. तर सांगायचे काय की, माझ्याजवळ बेचकी नसल्यामुळे मी गेंड्याला घाबरत होतो.

images.jpg

तरी सुद्धा मी कॅमेरा ट्रॅप लावायला समीरसोबत जाऊ शकलो नही. समीर आणि शस्त्रधारी कमांडो दूर निघून गेले होते (म्हणजे किमान शंभर तरी फूट एवढ्या प्रचंड दूर ते निघून गेले होते!). मी चौकीच्या पायर्‍या चढून काळ्या चहाचे भुरके घेत ‘टेरिटरी’चा मालक असलेल्या गेंडयाकडे आणि त्याच्या साम्राज्याकडे (आजूबाजूला त्याचे खूप सारे गेंडाबंधु शांतपणे चरत होते) बघत सुरक्षितपणे बाल्कनीत बसून राहिलो. नजर पोचेल तिथपर्यंत चारही दिशांना पसरलेला काझीरंगाचा गवताळ प्रदेश. मध्येच दलदली. दूर टेकड्यांवर हिरवी आणि ब्रोकोली सारखी सजलेली घनदाट सदाहरित जंगलं. समीरनी त्या दिवशी काय ‘मीस’ केलं ते मी त्याला एकदा सांगणारच आहे!!

डॉ. राजू कसंबे
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

गेंडयाकडे आणि त्याच्या साम्राज्याकडे (आजूबाजूला त्याचे खूप सारे गेंडाबंधु शांतपणे चरत होते) बघत सुरक्षितपणे बाल्कनीत बसून राहिलो.

पंधरा डब्यांची ट्रेन केली!

लेख खूपच आवडला हे सांगायचे राहून गेलं. खरंच खूप रोमांचक वर्णन आहे. मी सुद्धा भितीने असाच गळपाटलो असतो.

काय मस्त वर्णन आहे. तुम्ही फारच खुलवून लिहिता. शैली अतिशय सुरेख आहे. आणि अनुभव तर एक से एक . अजून फोटो असतील तर जरूर द्या.

झकास..

खूप आवडला लेख
तुमच्या जवळील अनुभवांचा खजिना पाहायला आवडेल

मस्त लेख. आवडला. गेंडा फोटोत छान दिसतो पण प्रत्यक्षात इतका महाकाय प्राणी शेजारी असेल तर घाबरगुंडी उडणे नैसर्गिक आहे Happy

वा वा एकदम मस्त ... तुमचे लेख खरोखर वाचनीय असतात. लकी आहात कि निसर्ग इतक्या जवळून पाहायला मिळतोय तुम्हाला

@ डॉ. राजू कसंबे

गेले काही आठवडे माबोवर तुमचे एकापेक्षा एक सरस लेख वाचायला मिळत आहेत. वेगळ्या जगाचे अनुभव.
ह्या लेखाचे शीर्षक तर फारच आवडले.

BTW 'बेचकी' म्हणजे काय ? Y आकाराची असते ती गुलेल ?

छान लिहिलंय सर,

धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल Happy

अनिंद्य
खूप आभार. हळूहळू लेख टाकत राहीन. बरेच लिहिलेले आहेत. आणि लिहितोय.

Pages