मन वढाय वढाय (भाग १४)

Submitted by nimita on 11 February, 2020 - 05:57

रात्री स्नेहा तिच्या खोलीत गेल्यानंतर तिच्या आईनी आजीची खोली गाठली. आजीला आपल्या सुनेच्या नजरेत हजार प्रश्न दिसत होते. एका आईच्या मनातली चलबिचल आणि त्यामुळे तिची झालेली हवालदिल अवस्था दुसऱ्या आईला अगदी न सांगताही कळत होती. आपल्या सुनेच्या पाठीवर हात ठेवत आजी म्हणाली," नको काळजी करू. गाडी रुळावर आहे आणि लवकरच आपलं इच्छित स्टेशन गाठेल असं दिसतंय."

"अहो आई, पण तिच्या मनात काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये.. आणि काही विचारावं तर रजतनी सक्त ताकीद देऊन ठेवली आहे. त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान आहे- ती निदान तुमच्यापाशी तरी मोकळी होतीये. त्यामुळे ती चुकीचा विचार करणार नाही याची खात्री आहेच आम्हांला सगळ्यांना... पण जोपर्यंत काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सगळ्यांचा जीव नुसता टांगणीला !" इतक्या दिवसांची घालमेल आज अशा रितीनी बाहेर पडत होती. आपल्या सुनेचे हात हातात घेत आजी म्हणाली," मला समजतंय गं सगळं...पण मी स्नेहा ला प्रॉमिस केलंय की आमच्या दोघीतलं बोलणं मी कोणाला नाही सांगणार; त्यामुळे माझाही नाईलाज आहे. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या शिकवणीवर आणि आपल्या घराच्या संस्कारांवर विश्वास ठेव. ती योग्य तोच निर्णय घेईल. लवकरच सगळं काही ठीक होईल."

आजीचं हे बोलणं ऐकून नीलाचा जीव भांड्यात पडला. इतक्या दिवसांच्या अनिश्चिततेमुळे तिच्या मनावर खूप मोठं दडपण होतं. आजीच्या बोलण्यानी आणि त्याहीपेक्षा तिच्या त्या मायेच्या स्पर्शानी नीलाला एकदम हलकं, मोकळं वाटायला लागलं. आज बऱ्याच दिवसांनंतर तिला शांत झोप लागणार होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी आजीच्या अपेक्षेप्रमाणे स्नेहा तिच्या खोलीत आली. "आजी, मी आज रजतला भेटायला जाणार आहे. त्याला सगळं खरं खरं सांगायचं ठरवलंय मी. त्यानंतर तो जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल." मुद्दामच आजीच्या खोली बाहेर घुटमळणाऱ्या नीलानी स्नेहाचं बोलणं ओझरतं ऐकलं. पण त्यातून 'स्नेहा आज रजतला भेटणार आहे,' हे तिच्या लक्षात आलं आणि तिनी सुटकेचा श्वास सोडला. स्नेहा खोलीतून बाहेर यायच्या आत ती लगबगीनी स्वैपाकघरात गेली. पुढच्या काही मिनिटांतच स्नेहा पण तिथे आली. एकीकडे चहाचं आधण ठेवत तिनी विचारलं,"काय करतीयेस आई? Wow, शेवयाची खीर? आज काय विशेष?" स्नेहाकडे बघायचं टाळत तिची आई म्हणाली," असंच , आज वाटलं काहीतरी गोड करावं. तुला आवडते म्हणून खीर करतीये. तुझा काही वेगळा प्रोग्रॅम तर नाही ठरवलास ना आज ? जरी असेल तरी दुपारी जेवायला असशील ना घरी?"

नीलानी उगीच खडा टाकून बघितला. स्नेहा म्हणाली," जायचं तर आहे बाहेर, पण अजून वेळ ठरली नाहीये. "आपल्या आईचा पुढचा प्रश्न आधीच ओळखून ती पुढे म्हणाली," आज मी रजतला भेटायला जाणार आहे. मला त्याच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे - आणि तेही लग्नासंबंधात कोणताही निर्णय घेण्याआधी ! आत्ता त्यालाच फोन करणार आहे ..कधी भेटायचं ते विचारायला."

स्नेहाच्या डोळ्यांत बघत तिची आई म्हणाली," मला खात्री आहे - तू जे करतीयेस ते पूर्ण विचार करूनच करत असणार. पण तरीही फक्त एकच सांगावंसं वाटतंय बेटा... जर कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी!"

आईचं बोलणं ऐकून स्नेहाला खूप अपराधी वाटायला लागलं. आईच्या कुशीत शिरत ती म्हणाली," सॉरी आई, गेल्या काही दिवसांपासून मी खूप त्रास दिला ना तुम्हांला सगळ्यांना... खूप चुकीचं वागले मी. पण अगं, माझं मलाच काही कळत नव्हतं. इतका मोठा निर्णय घ्यायचा होता. खूप दडपण आलं होतं. पण आजीशी बोलले, तू वेळोवेळी सांगत असतेस ते उपदेश आठवले आणि त्यामुळेच आज मी या निर्णयावर आलेय. थँक्स आई... for always being there ." स्नेहाचं बोलणं ऐकून तिची आई पण खूप भावुक झाली. 'आता आपली मुलगी मोठी झालीये, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याइतकी समजूतदार झालीये' ही भावनाच किती सुखावह होती. काही क्षण असेच गेले; शेवटी आईच्या कुशीतून आपली सुटका करून घेत स्नेहा तिला चिडवत म्हणाली," अब छोडो भी। बच्चे की जान लोगे क्या?"

आई पण काही कमी नव्हती... एकीकडे आपले डोळे पुसत फुल्ल फिल्मी स्टाईल मधे ती पण म्हणाली," जा सिमरन जा..जी ले अपनी ज़िंदगी।"

आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा दोघींच्या खळाळत्या हास्यानी सगळं घर भरून गेलं.

स्नेहा हसत हसत बाहेरच्या खोलीतल्या फोनच्या दिशेनी गेली - रजतशी बोलून भेटीची वेळ ठरवायची होती.

स्नेहाची आजी आणि आई दोघींचं सगळं लक्ष आता स्नेहाच्या बोलण्याकडे लागलं होतं. पुढच्या काही मिनिटांतच स्नेहानी येऊन सांगितलं," वंदनामावशी आहे फोनवर. ती म्हणतीये की 'सगळे जण जेवायलाच या आमच्याकडे'. आज रविवार असल्यामुळे सगळेच घरी असणार ना. काय करायचं आई ?" स्नेहानी प्रश्नार्थक मुद्रेनी तिच्या आईकडे बघितलं." तिला म्हणावं, तुम्हीच सगळे या इकडे. आज मी खीर- पुरीचा घाट घातलाय म्हणावं," स्नेहाला परत पाठवत नीला म्हणाली. पण आपल्या दिशेनी आलेला टोला परतवत स्नेहा म्हणाली," मी नाही सांगत काही, तूच बोल तिच्याशी प्रत्यक्ष. कारण तुमचं दोघींचं 'तू तू-मैं मैं ' चालू राहील आणि मधल्या मधे मी मात्र निरोप्या होईन .. नेहेमीसारखी! मी जातीये खोलीत. काय ठरतंय ते सांग मला. पण आज कुठल्याही परिस्थितीत मला रजतशी बोलायचं आहे, हे नक्की!"

स्नेहाचं म्हणणं काही अगदीच चुकीचं नव्हतं. नेहेमीप्रमाणे तिची आई आणि मावशी दोघींच्यात 'तुझ्या घरी नको;'माझ्या घरी भेटू ' - या न संपणाऱ्या विषयावर बराच वेळ चर्चा झाली आणि शेवटी या चुरशीच्या सामन्यात वंदनामावशी विजेती ठरली. स्नेहाला नेहेमीच त्या दोघींच्या नात्याची गंमत वाटायची. छोट्या छोट्या कारणांवरून दोघींची अशी प्रेमळ 'तू तू- मैं मैं' व्हायची... पण निकाल कोणाच्याही बाजूनी लागला तरी दोघीही तेवढ्याच खुश व्हायच्या. आत्ताही जेव्हा आई हसत हसत म्हणाली," वंदना कडे जायचंय बरं का आपल्याला." तेव्हा तिला चिडवत आजी म्हणाली," म्हणजे यावेळी पण तुझी माघार का?" त्यावर डोळे मिचकावत आई म्हणाली," नुसती माघार नाही हं... यशस्वी माघार !! तिच्या घरी जेवायचं असलं तरी सगळा स्वैपाक मी करणार आहे. आणि हो- आजची स्पेशल खीर पण आहे मेन्यू मधे !"

स्वैपाकघरात जाणाऱ्या आपल्या सुनेकडे आजी अगदी कौतुकानी बघत होती.'इतके दिवस स्नेहाच्या काळजीत अगदी कोमेजून गेली होती बिचारी...आज हिला पुन्हा पहिल्यासारखं उत्साही बघून किती बरं वाटतंय ! घृष्णेश्वरा, असंच हसतं खेळतं ठेव रे बाबा सगळ्यांना!!' आजीनी मनोमन प्रार्थना करत म्हटलं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा छान लिहिता आहात. पण कथानक रेंगाळत आहे असे मला वाटते. रजतशी नायिकेचे लग्न झालेले आहे हे पहिल्या भागापासून च माहिती आहे. त्यामुळे ते कसं होणार ही उत्कंठा जास्त ताणण्यात मजा नाही. असं आपलं मला वाटतं. पु.भा.प्र.

एस, मी अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही कथा म्हणजे एका स्त्रीच्या भावविश्वाचं वर्णन आहे. एक स्त्री -जिने एका माणसावर जीवापाड प्रेम केलं- त्याचा नकार पचवून दुसऱ्या माणसाला होकार देण्यापर्यंतचा तिचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. मी या सगळ्या घटना एक दोन भागात गुंडाळू शकले असते. पण या कथेमागचा उद्देश तो नाहीये. कथेच्या नायिकेचं भावविश्व कसं आणि का बदलतं हे वाचकांना पटवून देणं हा उद्देश आहे.
तुमच्या या प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद Happy

प्रत्येक प्रसंगाबरोबर पात्रं, त्यांच्यातली नाती खुलंत चालली आहेत. कुठेनकुठे relate झाल्यासारखं वाटायला लागलंय. आधी स्नेहाचा निर्णय चुकीचा वाटत होता. आता विरोध मावळत चालला आहे Happy