ताई आई

Submitted by Silent Banker on 8 February, 2020 - 00:16

विदाशास्त्रज्ञांच्या मतानुसार ( Data Scientist) आपण सर्वसामान्य माणसे साधारणपणे आपल्या जीवनात १०० ते १५० लोकांना ओळखत असतात। त्यांचाशी आपला परिचय असतो। शिष्टाचाराची घडी मोडून त्यातील १५ ते २० लोकांबरोबर आपण गप्पाटप्पा करतो, रस्त्यात कुठे भेटलो की आवर्जून विचारपूस करतो। "कसे काय , बर चालले आहे ना !" अशा स्वरूपाचा संवाद आपल्या परिचयाचा असतो। या सर्व लोकसंग्रहात घट्ट मैत्री , हितगुज करण्यासाठीचा गोतावळा मात्र ५ ते ७ जीवनयात्रींच्या पुढे फारसा जात नाही।

हा गोतावळा म्हणजे जिथे प्रत्येक जीव खुलतो , रुसतो , हसतो। आपली भयभीति , आपली सुखदुःखे , आशा आकांक्षा या मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी हे "Inner Circle" ( गोट ) माणूस आपल्याभोवती गुंफतो। साहजिकच या गोटात आपल्या नात्यातील , भावकीतील लोक असतात। पण त्यांच्याबरोबरीने आपल्या रक्ताची नसून देखील जन्मजन्मांतरीचे ऋणानुबन्ध असल्यासारखे आपल्यावर प्रेम करणारी सच्चे जीवनसाथी देखील असतात। कसोटीच्या क्षणी आत्मविश्वास , कठिण काळात धीर अणि आनंदाच्या क्षणी कौतुकाची थाप अगदी सहज देऊन मोकळे होतात। वाढदिवसाच्या शुभेच्छा असो किंवा दुखण्या खुपण्याच्या वेळेची विचारपूस असो , ही माणसे अखंड आपल्या सोबत असतात।

आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आजी , आई-बाबा , काका-काकू , बायको या नंतर माझ्या गोटातील (Inner Circle) मधील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे " श्रीमती शुभदा श्रीहरी छत्रे " अर्थातच " ताई आई ".

५ फुट ४ इंचाच्या आतबाहेरची उंची , ताम्बुस गोरा रंग , शिडशिडीत बांधा , अंगावर सुती साडी , व " नुकतीच बापट बाल शाळेतून लहान किंवा मोठ्या गटाला शिकवून( आजच्या काळातील "pre-primary") परतली आहे अशी देहबोली , म्हणजे आमची "ताई आई ". साडीचा पदर उजव्या हाताने खांदयावर सावरण्याची लक़ब , चेहऱ्यावर कुतूहल आणि आपुलकी यांच्या मिश्रणातून होणारे भाव घेऊन " तुम्हाला सांगते पप्पूची आई " असे म्हणत ताई आई ने घरी गप्पांचा अड्डा जमविला की घर बसल्या सांगलीतील सगळ्या बातम्या कळायच्या। गप्पांच्या मध्ये दाद देताना " हात तोंडावर घेऊन मानेला छोटासा झटका देऊन गड़गड़ाटी हसण्याची लक़ब तर विरळाच। स्मितहास्य असले प्रकार तिच्या प्रकृतिला काही मानविले नाहीत।

"ताई आई " ही माझ्या आयुष्याचा भाग कधी बनली हे मला तरी काय आठवत नाही , ती मात्र अगदी मुहूर्त लक्षात असल्यासारखा मला सांगायची की " अरे लहानपणी शाळेला जाताना तू भोकाड पसरलेस की आमचा दादा ( मनु दादा अर्थातच "देवदत्त छत्रे ") किंवा राणी ( ताई म्हणजे अपर्णा छत्रे ) तुला आमच्या घरी घेऊन यायचे , खेळविण्यासाठी म्हणजे तुझे रडणे बंद । " असा हा सगळा रोकटोक मामला। खरच आहे म्हणा ते। " ताई आई " चे घर म्हणजे आम्हा मुलांचा उन्हाळाच्या सुट्टीतील अड्डाच। ते घर म्हणजे आमच्यासाठी "OYO" Rooms सारखेच , जिथे आम्ही खरच "On Your Own" असायचो। सकाळच्या खाण्यापासून दुपारच्या कोको पर्यंत आम्हा बालगोपालांचा मुक्काम "ताई आई " कडे ठरलेला। हे अन्नसंस्कार मला फार महत्त्वाचे वाटतात। " उसळ किंवा भाजी " बरोबर फरसाण खाण्याची सवय मला लावली ती " ताई आई अणि ताई बाबांनीच." पुढे ऑफिसमध्ये लक्षात आले की मारवाड़ी लोग जेवणात "नमकीन" खातात। माझ्यासारख्या चित्पावनाला ही "वैश्यवृत्तिच्या " खाद्यसंस्कृतिची लहानपणीच परिचय करून देणारी मास्टर शेफ म्हणजे ताई आई. दूसरी अणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे " Cocoa". "कोको हे पेय मी परवा परवा पर्यन्त फक्त ताई आईकडेच प्यायलेलो आहे। जागतिक पातळीवर आजकाल "Cocoa Drinking Games" खेळले जातात कारण त्यातुन "Cocoa "चे चांगले आरोग्यदायी गुण सगळांना समजतील जसे की " प्रतिऑक्सिडिकारक( antioxidant) , रक्ताभिसरणपोषक ( Improve Blood Flow, reduce Clot formation) , रक्तदाब नियंत्रक ( Control Blood pressure) इत्यादि " त्यामुळे सध्या मोठ्या मोठ्या "Coffee Houses" मध्ये स्पेशल "Cocoa Flavored Drinks" ठेवली जातात। बर " Cocoa" पिण्यासाठी ती चव जीभेवर बसविणे फार महत्त्वाचे। ते काम ताई आई ने आमच्या लहानपणीच करून घेतलय।

जो प्रकार खाण्याचा बाबतीत तोच वागण्याचा बाबतीत। " मुस्सदीपणा"किंवा "हातच राखुन बोलणे " वैगरे शहरी प्रकार तिला कधी मानविले नाहीत। जे काही आहे ते थेट कुणाचा आडपडदा न ठेवता। " म्हणजे मी मला MBA नंतर नोकरी लागली म्हणून सांगायला गेलो" किंवा "दरवर्षी दिवाळीला सांगलीला गेल्यावर तिला भेटलो की गप्पा व्हायच्या"। ताई किंवा दादा मला मग काम काय करतोस किंवा किती तास काम असते, तुझी पोस्ट काय आहे वैगरे साधारण प्रश्न विचारायचे।" "ताई आई नेहमी थेट भिडायची अणि म्हणायची अरे ते जाऊ दे , पैसे वैगरे किती मिळतात अणि मग ते सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर जी कौतुकाची अणि अभिमानची मुद्रा यायची तेव्हा खरच वाटायच की " I am arrived in life." अणि त्यांनतर त्या आनंदात ती मला पूर्ण सांगली दर्शन घर बसल्या घडवून आणायची।

मग ते चौकातील कार्नर वरील तिचे घर आमचा "Gossip Corner" असायचा। " अरे तुला सांगते पप्पू , त्या जोश्यांच्या प्रभुने फराळाचे १०० किलोची आर्डर घेतली" पासून " आपटे यांच्या मुलीचा काणेंच्या मुलाशी लग्न ठरले पण , ती पोरगी वस्ताद निघाली रे... " पर्यन्त सर्व गॉसिप " Cocoa With Tai Aai" च्या सेशन मध्ये पार पडायचे।

आता कामाच्या गडबडीत गेल्या काही वर्षात सांगलीच्या ट्रिप थोड्या कमी झाल्या। तरी आई कडून ताईआई बद्दल माहिती कळत राहायची। "पप्पूला एकदा येऊन जायला सांगा " असा निरोप आईकडून द्यायची। पण प्रत्यक्ष गाठीभेटी झाल्या नाहीत तरी वर्षातून एक दिवस मात्र नक्की फ़ोन व्हायचा तो म्हणजे ३१ मार्च। दर वर्षी न चुकता बरोबर सकाळी ११: ३० वाजता फ़ोन यायचा , " अरे पप्पू , बिजी नाहीस ना रे , कामात असतील तर नंतर करते फ़ोन, असे म्हणतच "Happy Birthday हा , सुखी रहा " म्हणून फ़ोन ठेऊन पण दिलेला असायचा। "

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात , आपण कर्तंव्य म्हणून किती तरी लोकांना "वाढदिवसाच्या शुभेच्छा " देऊन मोकळे होतो। तो बहुतेकदा जुलमाचा रामराम असतो। निर्व्याज भावनेतून , आपल्यावरच्या प्रेमपोटी दिलेल्या वरील शुभेच्छा म्हणूनच अधिक सुखावतात।

आज पण ३१ मार्च आहे अणि आज पण सकाळी ११: ३० वाजतील , पण तो एक फ़ोन मात्र आज नाही येणार ही भावनाच मन व्याकुळ करणारी आहे। ताई आई आज या जगात नाही याची जाणीव करुन देणारी आहे। मला खात्री आहे आज पण तिची तिच गड़बड़ "स्वर्गात पण चालू असेल, तिच्या नेहमीच्या स्वरात तिथल्या अप्सरांना सांगत असेल " अहो अप्सरा बाई आज ना आमच्या पप्पुचा वाढदिवस आहे , फ़ोन करायचे लक्षात ठेवले पाहिजे "

तो कॉल आपल्या पर्यन्त पोहचण्याची " रेंज " अणि " बैंडविड्थ " आपल्या फोनमध्ये नाही ,तेव्हा तो मिस्ड कॉल च ताई आई ची आठवण सदैव माझ्या मनात ठेवेल। ताई आई च्या स्मृतीस शतश: प्रणाम।

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
तुम्ही खुप सारे लेख टाकताय म्हणून वाचुन होत नाहीयेत.
कोको म्हणजे काय? बोर्न्व्हिटा टाइप काही?

Correct

खुप छान व्यक्तीचित्रण..तुमच्या ताई-आई अगदि डोळ्यासमोर आल्या..
वाचन दांडग आहे तुमचं .. इतर लेखनातुन कळतय..

छान व्यक्तीचित्रण केले आहेत !
माझ्या आई वडीलांनी जिला मुलगी मानली होती ती ताई अशीच आहे !
मला वाटतं , प्रत्येकाच्या जीवनात असतेच अशी कोणी ताई - आई !