दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर (उत्तरार्ध)

Submitted by Dr Raju Kasambe on 7 February, 2020 - 08:51

दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर. (उत्तरार्ध)

दि.१० जून २००६:
दुर्मिळ जेर्डन्स कोर्सरच्या शोधात. या दिवशी सकाळी आम्हाला ब्लॅक आयबिस, कॉमन वूडश्राइक, पाम स्विफ्ट, यलो-लेग बटनक्वेल आणि पिवळ्या चोचीचा सातभाई दिसला. ह्या सातभाईंची शिळ खूप मंजुळ आणि कर्णमधुर असते.

सिरोंचाला विश्रामगृहावर परत येऊन पोटपूजा करून आम्ही कारमध्ये पेट्रोल भरायला गेलो. सिरोंचा इथल्या एकुलत्या एक पेट्रोल पंपावर आज पेट्रोल उपलब्ध नव्हते. असाह्यपणे आम्ही डॉक्टर पिंपळापुरे यांची कार सिरोंच्याला सोडून वनविभागाच्या जीपमध्ये स्वार झालो (आम्हाला शासनाचे वाहन वापरायचे नव्हते). दुपारी आम्ही आसरल्लीकडे कूच केले. अधूनमधून थांबून आजूबाजूच्या जंगलाची निरीक्षणे घेत आम्ही प्रवास करीत होतो. अंदाजे पंधरा किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्हाला ख्रिस्ती लोकांचे स्मशान दिसले. त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे चांगले झुडपी जंगल होते. उजव्या हाताला प्राणहिता नदीचे रुंद पात्र आणि पाणी दिसत होते. रस्ता आणि नदीच्या पात्रामधील परिसरात संपूर्ण गाजर गवताचे साम्राज्य पसरलेले दिसले. आसरल्ली विश्रामगृहावर पोहोचलो. तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गहोकार यांची भेट घेतली. सायंकाळी आसरल्लीवरून निघून उलट प्रवास करून आम्ही अंकिसा गावाजवळच्या झुडुपी जंगलाचा भाग बघायला पोहोचलो. या सायंकाळी आम्हाला खूप लांब असा ‘ट्रांसेक्ट’ करायला मिळाला.

एके ठिकाणी वन विभागाची जीप आम्हाला सोडून गेली होती व पुढील वळणावर आम्हाला न्यायला येणार होती. दूरवरच्या खेड्यातून लाऊडस्पीकरवरून गाणी ऐकू येत होती.

जंगलात सर्चलाईट फेकला की तिकडून नक्षलवादी आमच्यावर (आम्हाला सीआरपीएफ समजून) गोळ्या झाडतील अशी भीती मनात दाटून यायची. तसेच नक्षलवादी समजून सीआरपीएफवाले आमच्यावर गोळ्या झाडतील अशी सुद्धा शक्यता होतीच. आम्हाला लघवी लागली तेव्हा आमच्या मनात एवढी धास्ती बसली होती की मला तर ग्रुप सोडून जायची पण हिम्मत राहिली नव्हती.

पण ‘नक्षल’ तसेच ‘पोलिस’ दोन्ही शब्द स्थानीकांसमोर उच्चारायचे नव्हते. म्हणून त्याबद्दल कोणीही ब्र सुद्धा काढला नाही. पुन्हा एकदा जेर्डन्स कोर्सर दिसल्याचा मला भास झाला. बरीच धावपळ केल्यानंतर तो साधा पोंड हेरॉन असल्याचे लक्षात येऊन माझे हसे झाले.
रात्री दहाच्या सुमारास आम्ही आसरल्लीच्या विश्रामगृहावर पोहोचलो.

दि. ११ जून २००६ ला पहाटे पाच वाजता आम्ही आसरल्लीचे विश्रामगृह सोडून दुर्गम अशा कोपेला गावाकडे प्रस्थान केले. दोनेक किलोमीटर पर्यंत झुडूपी जंगलामध्ये आम्ही कॉल वाजून बघितला. त्यानंतर जंगलाचा प्रकार बदलून सागवान बहुल जंगल लागले. आणखी पुढे गेल्यानंतर घनदाट असे जंगल लागले. पुढे बोदला नाला पार करून सोमनपल्ली हे खेडे लागले. येथे ग्रामस्थांची बोलून पुढे निघालो. रस्ता कच्चा व घनदाट जंगलातून जात होता. थोड्या थोड्या अंतरावर थांबत आम्ही जंगलाच्या नोंदी घेत होतो. सोमनपल्ली ते कोपेला दरम्यान आम्हाला हरियल, खंड्या, व्हाईट बेलिड ड्रोंगो, सर्पगरुड, नवरंग, सुवर्ण कांचन (गोल्डन ओरिओल), निळ्या शेपटीचा राघू (ब्लू टेल्ड बी-इटर) आदी पक्षी दिसले. उंच झाडांवर राज्य प्राणी शेकरूची अनेक घरटी दिसली. तीन पट्टे असणारी खार (थ्री स्ट्राइप्ड स्क्विरेल) येथे मला बघायला मिळाली.

या परिसरात मला मुंग्यांचे पुरुषभर उंचीचे वारुळ बघायला मिळाले. याला स्थानिक लोक पुट्टा म्हणतात; मेळघाटात (हिंदीत) त्याला डुंबर म्हणतात. कोपेला हे गाव महाराष्ट्र, आंध्र प्रदेश (आता तेलंगणा) व छत्तीसगडच्या सीमारेषा मिळतात तेथे वसलेले आहे. बहुतेक स्थानिक लोक तेलुगु भाषा बोलताना दिसले. गावातील सर्व पुरुष केवळ लुंगी बनियान अशा पोशाखावर वावरत होते. समोर थोडी गर्दी होती आणि जोरजोरात ढोल ताशे वाजत होते.

वन विभागाच्या गाडीतून उतरलो. सुरुवातीला कोणीही आमच्याशी बोलायला आले नाही. मग मीच पुढाकार घेऊन

‘ये पिट्ट्या देखा क्या?’

अशी सुरुवात केली. थोड्या वेळात माझ्या भोवती ग्रामस्थांचा घोळका जमला. पक्ष्यांबद्दल खूप माहिती मिळाली. आमच्या सोबत असलेले नारायण बोरे वय ६० वर्षे, तिरुपती धन्नोरे व सुधाकर कावेरी यांची आम्हाला मदत मिळाली.

कोपेला वरून निघून परत सिरोंचा गाठले.

(येथील विश्राम गृहात गिधाडांचा विषय निघाला म्हणून श्री शेख ह्यांनी पाच वर्षांपूर्वी (२०००-२००१) घडलेला एक प्रसंग सांगितला. त्यावर्षी सिरोंचा नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ४०-५० कुत्री विष घालून मारली होती. ही कलेवरं शेजारून वाहणार्‍या प्राणहिता नदीजवळ फेकून देण्यात आली. ह्या कुत्र्यांचे विषाक्त मांस खाऊन अंदाजे १५० गिधाडे मेली.

असाच प्रसंग आसरल्लीच्या वनधिकार्‍याने सुद्धा सांगितला होता. १९९९-२००० साली आसरल्ली गावात विष लावलेले धान्य खाऊन गुरांचा मृत्यू झाला होता. ह्या मृत गुरांचे मांस खाऊन अंदाजे १०० गिधाडे दगावली होती.

त्यांनी सांगितलेली आणखी एक घटना. एका ग्रामस्थाने (मलबारी कवड्या?) धनेश मारून खाल्ला होता. त्याचे शिंग त्या शिकार्‍याकडे अजूनही ठेवले असल्याचे सांगितले. दुर्दैवाने आम्हाला ते बघता आले नाही. तीन राज्यांच्या सीमा मिळतात तेथे असलेला धनेश मलबारी कवड्या (Malabar Pied Hornbill) की प्राच्य कवड्या (Oriental Pied Hornbill) ह्या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते).

वनविभागाचे श्री शेख व इतर सर्वांना धन्यवाद देऊन परतीला निघालो. पुन्हा एकदा कोनेसरीचे शेकरू मन भरून बघून घेतले. मला एका खड्ड्यात कोळ्याच्या पीलावळीचे दर्शन झाले (आता वाटते की ते सोशल स्पायडरचे कुटुंब असावे). नाल्यातील एका छोट्या खोलगट ओलसर कपारीत जवळपास शंभरेक फुलपाखरे झोपलेली होती. त्यात कॉमन इंडियन क्रो, ब्लू टायगर, प्लेन टायगर, कॉमन रोझ ही फुलपाखरे होती. जड अंतकरणाने कोनेसरीचा निरोप घेतला.

गडचिरोली जिल्ह्यातून बाहेर पडल्यानंतर रात्री उशिरा कुठेतरी धाब्यावर जेवण घेतले. मध्यरात्रीनंतर नागपूरला पोहोचलो. दुर्मिळ जेर्डन्स कोर्सर आपल्याला शोधायचा आहे आणि तो सिरोंच्यालाच मिळेल असा विचार करीत मी निद्राधीन झालो.

स्थानिक तेलुगू भाषेतील पक्ष्यांची नावे:
१. सर्व लावा (Quail): कुरेड पिट्ट्या
२. कॉमन बस्टर्ड क्वेल: पुरेड पिट्ट्या
३. तित्तिर (Francolin): कौंजी पिट्ट्या
४. बगळे: कोंगा
५. ग्रे हेरोन: पोलिस कोंगा
६. गावठी कोंबडी: कोडी
७. मोर: नेमेली
८. लाल रानकोंबडा: कारकोडी पुंजू
९. लाल रानकोंबडी: कारकोडी
१०. राखी रानकोंबडा: चेदलकोडी पुंजू
११. राखी रानकोंबडी: चेदलकोडी
१२. जेर्डन्स कोर्सर: कामजुलू/ गबिलम/ आंखदोबेरा
१३. टिटवी: कंडलेडी पिट्ट्या
१४. माळटिटवी: चिन्ना सीतवा
१५. धाविक (Indian Courser): कालू तेल्लगा, ऊंटइ, पेंदा सीतवा (?)
१६. इंडियन थीक-नी (Indian Thick-knee): पुरड’ पिट्ट्या
१७. कॉमन हुपू: अदला पिट्ट्या
१८. नीळकंठ (Indian Roller): पाल पिट्ट्या
१९. धनेश (Hornbill): सूंपनाथी
२०. घुबड (आउल): गुडलागूफा, पेदा पिट्ट्या
२१. पिंगळा (Spotted Owlet): गुडलागूफा
२२. गव्हाणी घुबड (Barn Owl): पाईडी कंठा, फाईडी कंठे
२३. रातवा (Nightjar): नेलताप्पिडी
२४. पोपट (Rose-ringed Parakeet): रामचिल्का
२५. करण पोपट (Alexandrine Parakeet): खाकीरोबा
२६. टूई पोपट (Plum-headed Parakeet): चिल्का
२७. गरुड: कुक्कसम
२८. घार: गड्डा
२९. गिधाड: पंतरेगडी
३०. पाणकोंबडी: पुलकोडी
३१. वेडा राघू (Green Bee-eater): रेला पिट्ट्या
३२. हरियल (Green Pigeon): पोलगू
३३. कबुतर (Rock Pigeon): पायरम
३४. होला (Dove): गुवा
३५. सुगरण: जाकोर पिट्ट्या
३६. कोतवाल: नल्ल पिट्ट्या
३७. बुलबुल: पीकलेंका
३८. कावळा: काकी
३९. कोकिळा: कोयलम
४०. भारद्वाज: सामुर काकी
४१. मैना (साळुंकी): गोरेंका
४२. सातभाई: पुट्टा सीतवा
४३. पाकोळी: मंगल कट्टी
४४. चिमणी: उर्विस्ता.

(ता.क.: नंतर आम्ही अनेकदा विचारणा केली असता आम्हाला वन विभागातील अधिकार्‍यांनी ह्या परिसरात पुन्हा जाऊ नका म्हणून सल्ला दिला. आमच्या ह्या दौर्‍याच्या आठच दिवस आधी नक्षलवाद्यांनी आख्खी बस भूसुरुंगस्फोट घडवून उडवून दिली होती. त्यात एका लग्नाचे वर्‍हाड होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथे पडलेला मोठा खड्डा आमच्या मार्गातच होता.

जेर्डन्स कोर्सरला याची देही आणि आपल्या महाराष्ट्रातच शोधायचे स्वप्नं अजून तरी अधुरे आहे. आमच्या ह्या मुलूखगीरीत ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी आमची काळजी घेतली आणि आम्हाला जीवंत परत येऊ दिले त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद).

डॉ. राजू कसंबे,
मुंबई.

पूर्वप्रसिद्धी: दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणी. दिनांक: १२ जुलै २००९.

महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगढच्या सीमारेषा जेथे मिळतात तेथे वसलेल्या कोपेला गावाचे गुगल लोकेशन येथे बघा: https://www.google.com/maps/place/Kopela,+Maharashtra+442504/@18.7725322,80.2327304,19160m/data=!3m1!1e3!4m5!3m4!1s0x3a325c78d29a9bab:0x44d06c13d7e759e4!8m2!3d18.8375771!4d80.2258587

Group content visibility: 
Use group defaults

थरारक सफर. नक्षल भागात जाऊन आलो असल्याने वास्तववादी चित्रण भिडले अगदी.

निव्वळ निष्काळजीपणे इतकी गिधाडे गेली Sad

सुरेख लेख!

न्यूटन सिनेमा आठवला.

खरंच थरारक.
या मोहिमेत तुम्हाला जे इतर पक्षी फुलपाखरे वगैरे दिसले त्यांची छायाचित्रे असती तर अजून बहार आली असती.

ध्यासवेडे लोक.
छान लेख. आवडला.

या मोहिमेत तुम्हाला जे इतर पक्षी फुलपाखरे वगैरे दिसले त्यांची छायाचित्रे असती तर अजून बहार आली असती.>>>>>>>>>>> +१

थरारक! आणि केवढी चिकाटी!
२०१८ सालच्या मुशाफिरी दिवाळी अंकात श्री. द. महाजन यांचा ' शोधमोहीम, काळ्या मानेच्या क्रौंचाची' हा लेख आला होता. त्याची आठवण झाली.

छान लेख. आवडला.

या मोहिमेत तुम्हाला जे इतर पक्षी फुलपाखरे वगैरे दिसले त्यांची छायाचित्रे असती तर अजून बहार आली असती>>>>>>>>११११११