तुम्ही तुमच्या मुलांची नावे कशी ठेवली?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2020 - 16:21

मायबोली असो वा जगातले कुठलेही संकेतस्थळ साधारण महिन्याभराने तिथे "मुलासाठी / मुलीसाठी नाव सुचवा" असा एखादा धागा निघतोच. विशेष म्हणजे अश्या धाग्यांवर कोणीही टिंगलटवाळी करत नाही. कारण सर्वांना माहीत असते की हा धागाकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना ते माहीत असते कारण तो त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण सर्वांनीच पोरांची नावे ठेवताना फार विचार केला असेल. जसे घर घेणे हे वन टाईम ईन्वेस्टमेंट असते तसे पोरांची नावे हे देखील एक वनटाईम डिसीजन असते. निदान मुलींना लग्नानंतर नाव बदलायचा एक चान्स तरी मिळतो, बिचारया मुलांच्या जातीला तो ही नाही. त्यामुळे उद्या आपल्या पोरांनी असे कसे रे माझे नाव ठेवले बाबा बोलू नये म्हणून आपण छान सुंदर नाव हुडकून काढतो. किमान अर्धा मराठी शब्दकोष पिंजून काढतो. पण पोरांना एक मस्त अर्थपुर्ण नाव देतो. बस्स तेच नाव तुम्ही कसे शोधले याचे अनुभव ईथे शेअर करूया.

थोडक्यात अन पाल्हाळ न लावता मीच सुरुवात करतो.

१) पहिलीच पोरगी झाली. तिच्या जन्माची कहाणी ईथे शेअर केलेली. आज नावाची करतो. तशी काही विशेष नाहीये. पण मुलगीच पाहिजे आहे आणि मुलगीच होणार याची निन्याण्णवे टक्के खात्री असूनही मुलगी होऊनही बारश्याच्या मुहुर्तापर्यंत तिचे नाव काय ठेवावे हे ठरत नव्हते. म्हणजे सुचत होते पण माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते.

अखेर बारश्याच्या दिवशी पाळण्यात ठेवलेल्या पोरीच्या कानात नाव सांगायची वेळ झाली आणि तिच्या कानात नुसतीच फुंकर मारायची वेळ येतेय का असे वाटले. ईतक्यात अचानक माझे वडील म्हणाले परी नाव ठेवा. पोरगी परीसारखीच आहे दिसायला. सगळे हो हो म्हणाले. मी सुद्धा म्हणालो हो, पोरगी परीसारखीच आहे दिसायला. बस्स यालाच माझा होकार समजून घरच्या लोकांनी हेच नाव फायनल केले आणि दोन महिन्याच्या मासूम चेहरयामागे लपलेल्या एका शैतान मुलीचे नाव परी ठेवले गेले Happy

पुढे मात्र परी हे घरचे नाव म्हणून ठिक आहे पण कागदोपत्री नाव दुसरे ठेऊया असा किडा घरच्यांच्या डोक्यात वळवळला होता. पण तोपर्यंत मी तिचे परी हे नाव स्विकारले होते. ज्या नावाने तिला हाक मारायला आवडते ते सोडून उगाच कश्याला गहन अर्थाचे नाव निव्वळ आपले भाषाज्ञान सिद्ध करायला ठेवा असे घरच्यांना सुनावून मी त्यांच्या डोक्यातला किडा ठेचून मारला.

आजच्या तारखेला मी तिला परी, परया, परू किंवा नुसतेच पss अशी हाक मारून तिच्या साध्यासोप्या सुटसुटीत नावाचा निखळ निर्मळ आनंद ऊचलतो Happy

२) दुसरा पोरगा ऋन्मेष ... नाम तो सुना ही होगा Happy

मला या नावाचा अर्थ माहीत नाही. कदाचित या नावाला अर्थ नसेलही. कदाचित असा शब्दच अस्तित्वात नसेल. मला फक्त मायबोलीवर डुआयडी काढायला एखादे कॅची नाव हवे होते. आणि तो शब्द मराठी शब्दकोषातला हवा असा हट्टही नव्हता. त्यामुळे जे सुचले ते ठेवले.

मुलाचा जन्म झाला, नावाची शोधाशोध सुरू झाली. हे नावही आलेले माझ्या डोक्यात. पण ज्या नावाचा अर्थही माहीत नाही ते बायकोला कसे सुचवायचे असा बाळबोध विचार करून मनातच ठेवले.

पण एकदा बायकोच सहज म्हणाली, मला तर ते ऋन्मेष नावही खूप आवडते... खर्रंच, मी सुद्धा ते ऐकून उत्साहीत झालो. आणि जराही वेळ न दडवता तिच्याकडून या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले.

दुसरया दिवशी बायकोने आपल्या बहिणींना हे नाव सांगितले. तसे त्यांनी नाके मुरडत भुवया तिरप्या केल्या. हे कसले नाव? म्हणत स्वत: शोधून आणलेली नावे पुढे दामटली. बायकोच ती, माहेरचा आहेर पहिला स्विकारणार. त्यात तिच्या आईनेही नावाला अर्थ हवाच ! असं ठासून म्हटले. मग तर मी नाक घासूनही ती माझे ऐकणार नव्हती.

पण तरीही मी ठाम राहिलो. प्रकल्प मी तडीस नेणार आणि उद्घाटन सोहळा दुसरयांच्या हस्ते. असे कसे चालणार. अखेर सासुरवाडी नमली आणि ऋन्मेषच नाव फायनल झाले. सध्या रुनू, रुंट्या, रुंटूपुंटू अश्या नावांचा ते लोकं मनसोक्त आनंद घेतात. पण ऋन्मेष नावाला मात्र Runमेष म्हणजे मेंढ्या हाकणारा मेंढपाळ असे चिडवतात.....

आता आपलेही किस्से येऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलीचं नाव मला काहीतरी unique ठेवायचं होतं... पण तिला सुद्धा सगळे जण परी सारखी दिसते म्हणून परी म्हणायचे... मला ते नाव आवडलं.. पण खूप कॉमन वाटलं म्हणून त्याला similar म्हणुन 'परिधी' नाव ठेवले... तेव्हा मला वाटले की हे अगदी unique नाव असेल पण नंतर लक्षात आलं की माझ्या वयाच्या मुलींची नावं सुद्धा परिधी वगैरे आहेत... तेव्हा थोडं वाईट वाटले कारण मुलीचं नाव unique आणि अर्थपूर्ण असावं अशी माझी खूप ईच्छा होती.. शाळेत नाव टाकताना बदलावं असा विचारही केला नाही.. आणि आता परिधी नाव शाळेत बरंच गाजतंय तेव्हा माझ्या मुलीचं नाव 'परिधी'च

वावे Proud
माऊमैय्या धन्यवाद Happy

मोक्षू, माझ्याही मुलीच्या गेल्यावर्षीच्या बेस्ट फ्रेंडचे नाव परीधी होते. दोघी सतत एकत्र गळे घालून. दोघी हुशार आणि मस्तीखोर. त्यामुळे फार कन्फ्यूजनही व्हायचे.

जन्म तारखे नुसार आणि वेळे नुसार जे आद्याक्षरे सांगितली गेली त्या नुसार च नाव ठेवलं.
>>>>>
ग्रेट! फार कमी लोकं असे करतात. काहींची ईच्छा असूनही अक्षर अवघड येते की नाही जमत. माझे स्वत:चे अक्षर "ड" आलेले. माझे पाळण्यातील नाव "डेमाजी" ठेवलेले. नशीब हेच खरे नाव ठेवले नव्हते. अन्यथा त्याचे जुमांजी झाले असते

मुलं अतिशय गोड आहेत. त्यामुळे नावंही तशी गोडच हवीत.
मला परी नाव लाडाने बोलतो तसं वाटतं. नावच परी हे काही वर्षापर्यंत माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं.
ऋन्मेष नाव छान आहे.
माझ्या मुलीचं नाव माझ्या भावाने ठेवलं. त्याने दोन नावं ठरवली होती. गायत्री आणि कावेरी.
माझ्या नवर्‍याचं आणि सासरी मला जे आवडेल ते ठेव असं होतं. तरी मोठ्या जाऊबाई हौशी असल्याने त्यांनी सलोनी, सावरी झालच तर कशिश, सुजल Lol ही नावं सुचवली होती.
ती एकता कपूर फेम नावं न आवडल्याने कावेरी ठेवलं. मुलाच्या वेळी आम्ही दोघं स वाले आणि मुलगी क वाली. तर मुलाचं पण क वरुन ठेवुया बहीणीला मॅच. स वरुन ठेवुन कावेरी एकटीच ऑड मॅन नको असा विचार करुन कबीर, क्रिश, केदार, कैवल्य, कपिल असे ऑप्शन बघुन कौस्तुभ ठेवलं. Happy तेव्हा क्रिश सिनेमा आलेला आणि दिदोदुनियादारीत कैवल्य Happy

मोक्षू, माझ्याही मुलीच्या गेल्यावर्षीच्या बेस्ट फ्रेंडचे नाव परीधी होते. दोघी सतत एकत्र गळे घालून. दोघी हुशार आणि मस्तीखोर. त्यामुळे फार कन्फ्यूजनही व्हायचे.>>>गेल्या वर्षीच्या म्हणजे? या वर्षी नाही का? शाळा चेंज केली का?

ऋन्मेष नाव छान आहे.
मी प्रेग्नन्सी मध्ये विष्णुसहस्त्रनाम ऐकायचे आणि त्यामध्ये रुचिरंगद असा शब्द आहे त्यावरून मुलगा झाला तर रुचिर नाव ठेवायचे ठरविले मुलगी झाली तर शमिका ठेवणार होतो.
मुलगा झाला सो रुचिर नाव ठेवले.
बरेच जण विचारतात माझं नाव ऋ वरून आहे म्हणून मुलांचेही त्याचा अक्षरावरून ठेवले आहे का तर तसे काही नाहीय.
तो एक योगायोग आहे एवढेच.

माझे पाळण्यातील नाव "डेमाजी" ठेवलेले. >>> हे नाव ठेवताना तुझ्या पायावर पांघरूण असावे. नाहीतर "डांबरट" ठेवले असते.

माझ्या मुलीच्या जन्माआधी मी बऱ्याच नावांची लिस्ट काढून ठेवली होती. मुलांची फार नावं नव्हती डोक्यात. पण मुलींची खूप आवडती नावं लिस्टमध्ये होती. मृण्मयी आणि ग्रीष्मा विशेष आवडती. मुलीचा जन्म ग्रीष्म ऋतूत होईल, म्हणून ग्रीष्मा जास्त आवडत होतं.
कृष्णाचा कर्मयोग भावतो, त्यामुळे गरोदरपणात भगवद्गीता वाचत होते. त्यामुळे बाळ मुलगा असो वा मुलगी, लहानपणी कृष्णासारखं नटखट असावं, असं खूप वाटायचं. मुलगा झाला तर कृष्णाचं नाव ठेवायचं होतं. मुलीसाठी 'कृष्णा' हे नाव यायचं डोक्यात. पण थोडंसं मुलासारखं वाटणारं हे नाव ठेवायची भीती वाटत होती. ( तेव्हाच होसूमीयाघ मधल्या जान्हवीला प्रदीर्घ कालावधीनंतर कन्यारत्न होऊन , त्यांनी तिचं नाव कृष्णा ठेवलं होतं. Bw )

लेकीचा जन्म झाल्यावर तिसऱ्या दिवशी नाव काय ठेवूया, अशी चर्चा सुरू झाली. सासूबाई पटकन म्हणाल्या, 'तुम्ही काहीही नाव ठेवा, मी राधाच हाक मारेन.' कृष्णाशी जोडलेलं ते नाव लगेच आवडलं. म्हटलं, 'राधाच ठेवू नाव.' थोड्या वेळाने सासरे तिचं जन्मटिपण घेऊन आले, तर त्यात राशीनुसार रा आणि ता ही अक्षरे आली होती. मग तर राधा नाव पक्कंच झालं.

मग माहेरी गेल्यावर ,लेकीला बऱ्याचदा राधाच हाक मारायचो आम्ही. नंतर खरोखर नाव पक्कं करायचं झालं, तेव्हा नवरा राधा नाव नको म्हणाला. बऱ्याचशा मित्र-मैत्रिणींनाही राधा नाव old fashioned वाटत होतं. मग पुन्हा एकदा नामशोध चालू झाला. आता र आणि त वरून नावं शोधायची असल्याने माझी आधीची लिस्ट बाद झाली. मला राधाच जास्त आवडलं होतं, तर नवऱ्याच्या डोक्यात रेवा होतं. मला रेवा आवडतच नव्हतं. मग तिसरंच नाव शोधलं, 'ऋत्वी'. बारशाच्या आदल्या दिवशीपर्यंत हेच नाव ठरलं होतं, जे दोघांच्याही फार आवडीचं नव्हतं.
शेवटी आम्ही पुनर्विचार केला आणि आई शेवटी राधाच बोलणार आहेत; राधा नावच ठेवू, असं ठरलं. (म्हणजे थोडा एकतर्फीच निर्णय झाला. Proud ) आणि अशा प्रकारे बारशाला आम्ही आमच्या मुलीचं नाव 'राधा' ठेवलं.

Submitted by माऊमैया on 7 February, 2020 - 12:14

हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा टाईप झालं. Lol

आणि आम्ही 'रेवा' नाही ठेवलं म्हणून नवऱ्याच्या मित्राने नंतर त्यांच्या मुलीचं नाव रेवा ठेवलं; कारण त्याला ते नाव आवडलेल तेव्हा.

कहर म्हणजे, जेव्हा राधाला तिच्या नावामागची कहाणी कळली, तेव्हा ती म्हणाली, " मला राधा नाव नको, मला रेवा नाव पाहिजे." Uhoh

माउमैया मस्त Happy

राधा नाव ओल्ड फॅशनच असलं तरी लहान मुलींना फार गोड वाटतं
राधिका नावाच्या काही गोड मुली पाहिल्या आहेत मी ( नंतर राधिका मसाले वाली पाहिली त्यामुळे आता ते नाव फारस आवडत नाही. Happy )
रेवा माझ्या भाचीच नाव आहे . तिच्या बाबाला फार आवडलेलं . आम्हालाही खूप आवडत .

नाव ठेवायचा आत्याचा मान मला एक्दा मिळालेला . माझ्या भाचीसाठी भरमसाठ नाव शोधलेली , त्यातली - अंशु आणि कुहु मी फायनल केलेली . वहीनीला म्हटलं यातलच एक ठेव .
माझ्या कॉलेजमध्ये एक अंशु नावाची दिल्लीची मुलगी होती . तिला पाहिल्यापासून ते नाव फार आवडलेलं .
वहीनीनेही बारश्याच्या आदल्या दिवशी कुहु नको अंशुच ठेउ असा निर्णय बदलेला .

आम्हाला 'old is gold' उक्तिप्रमाणे क्लासिक नाव हवे होते. नवर्याचे साऊथ इण्डियन फॅशनने क्रिष्णा पहिले नाव आहे, म्हणून मुलाचे अर्जुन ठेवले.
तसे हे नाव फार कॉमन झालेय इकडे..

आम्ही अति कॉम्पिटिशन व सर्वांचाच हट्ट असल्याने चिठ्ठ्या टाकल्या होत्या. त्यात नवर्‍याने आलमस, मी वृंदा , नणंदेने काहीतरी व साबांनी रिया नाव - अशा चिठ्ठ्या होत्या.
पैकी साबांच्या निवडीची चिठ्ठी आली.

आलमस Uhoh

अल्मास/ अलमास असा उच्चार आहे. प्रेशस स्टोन/ रत्न असा अर्थ sangitalamazya मुस्लिम kaligne.त्याच्या बायकोचे की मुलीचे नाव होते ते.

Pages