मन वढाय वढाय (भाग१०)

Submitted by nimita on 29 January, 2020 - 23:34

स्नेहाला असं विचारांत गर्क बघून आजीनी हळूच विचारलं," इतका कसला विचार करतीयेस बाळा?"त्यावर भानावर येत स्नेहा म्हणाली," आजी, तुला असं म्हणायचं आहे का की सलीलचं प्रेम खोटं आहे ?" आजीला वाटलं -स्नेहाला विचारावं की 'हा प्रश्न तू मला विचारतीयेस का स्वतःच्या मनाला?' पण त्यासाठी ही वेळ योग्य नव्हती; म्हणून ती म्हणाली," छे, अजिबात नाही. मी त्याच्या प्रेमावर अजिबात शंका घेत नाहीये. त्याचं प्रेम असेलही तुझ्यावर ... म्हणजे ... आहेच ! पण एखाद्यावर प्रेम करणं जितकं सोपं असतं ना ; तितकंच अवघड असतं ते प्रेम निभावून नेणं ! जेव्हा दोन व्यक्ती अशा प्रेमाच्या बंधनात अडकतात आणि संपूर्ण आयुष्य एकत्र राहायचं ठरवतात ना तेव्हा बऱ्याच वेळा त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या नात्याची परीक्षा घेणारे प्रसंग आडवे येतात. पण अशा वेळी खचून न जाता, एकमेकांवरच्या प्रेमाच्या बळावर ते दोघं अशा संकटांवर मात करत पुढे जातात. त्यांच्या प्रेमावर होणारा प्रत्येक आघात त्यांचं नातं अजूनच बळकट करून जातो. पण सलीलनी काय केलं? पहिल्याच कसोटी मधे शस्त्रं खाली टाकली. जर त्याच्या एकट्याच्या आयुष्याचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती; पण इथे तर तुझं भविष्य देखील पणाला लागलं होतं. असं असताना तुला काहीही न सांगता, न विचारता तो एकतर्फी निर्णय घेऊन मोकळा झाला."

आजीचं बोलणं स्नेहाला पटत होतं.आणि या वेळी तिनी सलीलच्या वागण्याचं समर्थन नाही केलं; उलट ती म्हणाली," हो, मला पण अगदी असंच वाटलं होतं गं ...एरवी अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण माझ्याबरोबर शेयर करणाऱ्या सलीलनी इतका मोठा निर्णय मला न सांगता घेतला. मला काय वाटेल हा विचार सुद्धा नाही आला का गं त्याच्या मनात ?" बोलता बोलता स्नेहाचे डोळे पुन्हा भरून आले.

स्नेहाला होणारा मानसिक त्रास तिच्या आजीला दिसत होता. आपल्या नातीला असं रडवणाऱ्या सलीलचा खरं तर तिला खूप राग आला होता. जर समोर आला असता तर चांगला खडसावून जाब विचारला असता त्याला ! पण आजीनी देखील जग बघितलं होतं... सलील आत्ता तरी स्नेहाला सामोरा येणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. आणि तसंही ही वेळ सलीलला जाब विचारायची नव्हती तर स्नेहाला तिच्या दुःखातून बाहेर काढण्याची होती. स्नेहाचे डोळे पुसत आजी तिला म्हणाली," नको रडू बाळा ! मी तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल अजिबात शंका घेत नाहीये, पण तुमच्या दोघांमधलं जे नातं होतं ते मात्र कमकुवत होतं हे नक्की ... आणि त्यामुळे ते टिकू शकलं नाही. पण या सगळ्यात तुझी काय चूक आहे ? मग तू स्वतःला अशी शिक्षा का बरं करून घेतीयेस? सलीलनी लग्न न करायचा जो निर्णय घेतलाय त्यात तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा सुद्धा जास्त त्याचा पश्चात्ताप हे मुख्य कारण आहे असं मला तरी वाटतंय. पण तू हा असा टोकाचा निर्णय का घेतीयेस? तुला तुझं आयुष्य भरभरून जगायचा हक्क आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखाचा आस्वाद घे बाळा. आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेव...आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. कितीतरी वेळा आपल्याला तडजोड करावी लागते. त्यावेळी खूप त्रास होतो, पण जे होतं ते नेहेमी आपल्या चांगल्यासाठीच होत असतं. या आत्ताच्या घटनांमधून पण नक्कीच काहीतरी चांगलं होईल...कदाचित आत्ता नाही कळणार तुला ते किंवा माझं म्हणणं पटणार नाही- पण भविष्यात जेव्हा तू मागे वळून बघशील ना, तेव्हा तुला कळेलही आणि माझं म्हणणं पटेलही." आजीच्या बोलण्यामुळे स्नेहा काहीशी अंतर्मुख झाली आणि म्हणाली , "तू म्हणतीयेस की जे होतं ते चांगल्यासाठीच...पण माझं प्रेम तर अपूर्ण राहिलंय गं आजी... किती किती स्वप्नं बघितली होती मी सलीलच्या आणि माझ्या एकत्र आयुष्याची ! पण माझी ती सगळी आता कधीच पूर्ण होणार नाहीत."

तिला मधेच थांबवत आजी म्हणाली," मी नेमकं हेच सांगतीये तुला स्नेहा.. तुझी सगळी स्वप्नं नक्की पूर्ण होतील , पण ती स्वप्नं पूर्ण करणारा मुलगा सलील नाहीये हे नक्की... आणि म्हणूनच त्यानी तुझ्या आयुष्यातून exit घेतलीये. You deserve someone better than Saleel. असा कोणीतरी जो कायम तुझी साथ देईल , संकटांत तुला अशी वाऱ्यावर सोडून नाही देणार, तुझ्यावर नुसतं प्रेमच नाही करणार तर तुझ्या भावनांचा आदर करेल, तुला एका सहचारिणी चा सन्मान देईल.आणि जेव्हा तो मुलगा तुझ्या आयुष्यात येईल ना तेव्हा पदोपदी तुला माझ्या बोलण्याची प्रचिती येईल."

"तू आडून आडून मला रजतशी लग्न करायला सांगतीयेस का आजी ?" स्नेहा विचारून मोकळी झाली.त्यावर आजी हसून म्हणाली," मी तर रजत चं नावही नाही घेतलं आत्तापर्यंत; पण माझं हे बोलणं ऐकून तुझ्या मनात पहिला विचार रजतचा आला - यातच काय ते समजून घे तू ! पण तुला वाटतंय तसं काही नाहीये माझ्या मनात.. तू कोणाशी लग्न करावंसं हे तुझं तुलाच ठरवायचं आहे . माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सलीलच्या आठवणींत सगळं आयुष्य वाया घालवण्याची चूक करू नकोस. He is not worth it. आणि आता जर तुझ्या मनात रजतचं नाव आलंच आहे तर अगदी प्रामाणिकपणे त्याच्या प्रपोजल चा विचार कर. निदान मी म्हणतीये म्हणून तरी कर...तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्यानी अगदी मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर पण कधीही त्याचं जाहीर प्रदर्शन करून तुझ्यावर दबाव नाही आणला; उलट तुला हवा तेवढा वेळ देऊन त्यानी तुझ्या भावनांचा, इच्छांचा आदरच केलाय. खूप सुखात ठेवेल तो तुला. माझ्या डोळ्यांसमोर लहानाचा मोठा झालाय तो. त्याला, त्याच्या घरच्यांना खूप चांगलं ओळखते मी. जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात ना; तेव्हा फक्त ते दोघंच एकत्र नाही येत तर दोन भिन्न परिवार एका नात्यात बांधले जातात- कायमचे! आणि म्हणूनच आपल्या जोडीदारा इतकंच त्याच्या कुटुंबियांशी जुळवून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि रजतच्या घरचे लोक तुझ्यासाठी अजिबात परके नाहीयेत. खूप सुखात आणि आनंदात राहशील तू - त्यांच्यातलीच एक होऊन ! आम्हांला तरी तुमच्या दोघांच्या सुखापेक्षा अजून दुसरं काय हवंय गं ! म्हणून म्हणतीये- रजत च्या प्रपोजल चा विचार कर- अगदी सगळ्या बाजूंनी - और इस वक्त़ दिल के साथ साथ दिमाग से भी सोचो। आणि अजून एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा- प्रेम इतकंही आंधळं नसावं की त्यापुढे आपण आपला आत्मसन्मान हरवून बसू!कारण हरवलेल्या प्रेमाच्या बदल्यात पुन्हा प्रेम मिळू शकतं पण एकदा का आपला आत्मसन्मान गमावला की आपण स्वतःच स्वतःच्या नजरेतून उतरायला लागतो."

आजीचा तीर अगदी बरोब्बर निशाणावर लागला होता. स्नेहानी खरंच आजीच्या बोलण्यातलं सत्य पडताळून बघायला सुरुवात केली होती.. अगदी तिच्याही नकळत !

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast.