गिधाडे कुणी खाल्ली? गिधाडे नामशेष होत आहेत! (फासेपारधी)

Submitted by Dr Raju Kasambe on 29 January, 2020 - 10:35

गिधाडे कुणी खाल्ली? गिधाडे नामशेष होत आहेत!

‘देवा खोटं नाही सांगत. गेल्या दहा वर्षात एकबी गिधाड पाह्यलं नाही. गावाकडे दुष्काळ पडत होता तेव्हा देव आमच्यासाठी आकाशातून गिधाडं पाठवत होता. माहे सगळे लेकरं गिधाडायचं मटण खाऊनशान वाचले. दुसरं कायचं मटण त्यायले आवडतच नव्हतं’.

85 वर्षांचा पारधी भुरा सोनावजी सोळंकी शपथेवर सांगत होता. माझ्याकडच्या पुस्तकातील गिधाडांची चित्रे बघुन त्याचे डोळे पाणावले होते. कंठ रुद्ध झाला होता.

‘आम्ही गिधाडं पोसले होते अन पोसलेल्या गिधाडायला आमी देवच मानत होतो. हळदकुंकू लावून त्यांची पूजा करत होतो. पण पोसलेली गिधाडे आम्ही खाल्ली नाही. त्याहिले आकाशात सोडून दिलं साहेब. खोटं नाही सांगत’.

मी यवतमाळ - अकोला मार्गावरील अडाण नदीच्या काठावर वसलेल्या सांगवी गावातील पारधी वस्तीवर बसलो होतो. सांगवी गावापलीकडे वाशिम जिल्हा सुरू होतो. या गावाला अजूनही ‘शकुंतला एक्सप्रेस’ नावाची तीन डब्याची आगगाडी येते. गाडीने कोळशावरून डिझेलवर मजल मारली पण सांगवी अजूनही कोळशाच्या इंजिनच्या युगात जगत आहे असे मला वाटले. एखाद्या त्रयस्थाला गावातील पारधी वस्तीवरचे सदानकदा भांडत असलेले पुरुष बायकापोरं दिसून पडतात. त्यांचे दारिद्र्य दिसून पडते.

दुर्मिळ होत चाललेल्या गिधाडांची माहिती जमविण्यासाठी मी येथे आलो होतो. भुरा सोळंके सांगत होता. त्याचा मुलगा श्रीकृष्णा सोळंके आणखी माहिती पुरवीत होता. आणि माझ्यासमोर गिधाडांची संख्या कमी का झाली असावी याचे आणखी एक महत्त्वाचे कारण उलगडले गेले. (माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेस काय घडले असेल तो चित्रपटच जणू उलगडू लागला. फ्लॅशबॅक असतो ना तसा)!

वर्ष १९८१. वीस वर्षांपूर्वीचे सांगवी गाव. भल्या पहाटे भुरा सोळंकी आपले फासे पाठीवर टाकून झपझप पावले टाकीत निघाला. कारण उन्हं तापायाच्या आधी त्याला बेड्यावर घरी परतायचे होते. सोबत उमदा कीसन्या म्हणजे श्रीकृष्णा होताच. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यात चिल्ल्यापाल्यांचे हाल होणार याची त्यांना जाण होतीच.

बटेर, तितरे फास्यात फसवणे तर भुराच्या हातचा मळ होता. लावळू (रेन क्वेल), घागरबाटी (ग्रे क्वेल) आणि घाशी टुरु (कॉमन बस्टार्ड क्वेल) तर तो एका दिवसात खंडीभर फसवायचा. कारण त्याला नरग्याच्या आवाजाला मादीचा आवाज काढून उत्तर देता येत होते. त्यामुळे नर आकर्षित होऊन सरळ फास्यात फसत असत. पोरंसोरं त्याच्या आवाजाची नक्कल करीत. पण त्यांना ते साधत नसे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून घरी खुंटीला दोरीने बांधून ठेवलेली गिधाडे उपाशी होती. पोरांसोरांना खायला ज्वारी शिजवून केलेल्या कण्या म्हणजे खिचडी आणि तितरा बाटराची एखादी फोड मिळत होती. मुले रोडावत होती. पालावरची भांडणे कमी झाली होती. म्हातारी माणसे हातभट्टीची घेऊन दिवसभर पडून राहत. बायका आजूबाजूच्या खेड्यात सुया, मणी, माळा, पिना इत्यादी बायकांचे साहित्य विकून दोन-चार दमड्या कमवीत.
संध्याकाळ झाली. म्हातारे-कोतारे मधोमध बसून बारक्या पोरांना जंगलाच्या आणि भुताटकीच्या गोष्टी सांगू लागली. हळूहळू चंद्र वर चढत गेला. मुले पेंगायला लागली. पाल शांत होत गेले. अर्धपोटी सर्वजण झोपी गेले.

भल्या पहाटे गावातला वाघ्या मांग भुरा पारध्याला भेटायला आला. गावातले ढोर मेलेय. ज्याचा बैल मेला त्याने जशी वाघ्याला वर्दी दिली तशी वाघ्याने भुराला वर्दी दिली. सगळ्या पालावर उत्साहाचे वातावरण संचारले. आज आपल्याला पोटभर मटन खायला मिळणार. थोड्याच वेळात वाघ्या मांग मेलेल्या बैलाला मालकाच्या गाडीत टाकून टेकडीच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याच्या मागोमाग पारध्यांची पोरंसोरं गोंगाट करीत चालत गेली. वाघ्याचा चाकू टराटरा फिरला. त्याने बैलाचे कातडे सोलून काढले. कातडे बरोबर गुंडाळून एका पोत्यात कोंबले आणि वाघ्या टांगा टाकीत घराकडे निघून गेला. त्याचे कातडी काढण्याचे कसब शेंबडी पोरं पहात राहिली.

कावळे त्या बैलाच्या मांसाचा वाटा उचलण्यासाठी कधीचेच येऊन टपले होते. गोंगाट करीत होते. जसा वाघ्या मागे सरला तसे कावळ्यांनी बैलाचे लचके तोडणे सुरू केले. गावातली मोकाट कुत्री ही जमली. पण पारध्याच्या पोरांनी त्यांना दगड भिरकावून दूरच ठेवले.

भुरा सोळंके, श्रीकृष्णा, सिलीमन, रामदास, आपरेशन ही मंडळी खुंट्याला बांधलेली गिधाडे खांद्यावर घेऊन बैलाजवळ पोहोचली. त्यांनी सोबत फासेसुद्धा आणले होते. बारीक सुतळीने त्यांनी त्या गिधाडांचे पंख बांधून टाकले. आता त्या गिधाडांना बेडकासारख्या केवळ टुणुक टुणुक उड्या मारता येत होत्या. पण उडता मात्र येत नव्हते. मेलेल्या बैलाजवळ येताच त्यांनी पंख बांधलेली पाच गिधाडे सोडून दिली. उपाशी गिधाडे बैलावर तुटून पडली आणि मांसाचे लचके तोडू लागली. भुरा सर्वांना सूचना देऊ लागला. सिलीमन, रामदास, श्रीकृष्णा सर्व जण पटापट कामी लागले.
बैलापासून थोड्या अंतरावर टेकडीच्या बाजूने सर्व फासे त्यांनी अंथरले आणि झुडपांना बांधून टाकले. फासे लावून होताच सर्वजण मागे सरकून झुडूपाच्या आडोशाला लपले. सूर्य हळूहळू वर सरकू लागला. भुरा पारधी आणि त्याचे सवंगडी आकाशात नजर लावून बसले. भुरा मनोमन देवाला साकडे घालत होता,

‘देवा आम्हाला उपाशी ठेवू नगस. खायला काहीतरी पाठव.’

सूर्य डोक्यावर येऊ लागला असे एक शेंबडं पोर आकाशाकडे बोट दाखवून ओरडलं,

‘रात्तल’!

आणि सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. भुराची प्रार्थना सफल होत होती. रात्तल म्हणजे राजगिधाड (किंग व्हल्चर). मृत जनावरांचा शोध सर्वप्रथम रात्तललाच लागतो. इतर गिधाडे रात्तलवर लक्ष ठेवून असतात. रात्तल कुठे घिरट्या घालीत उतरतोय म्हणजेच खाद्य असणारच हे त्यांना समजते. आणि ती गिधाडेही खाली तरंगत खाली उतरायला लागतात.

ठिपक्या सारखे दिसणारे रात्तल बघता बघता खाली येऊन घिरट्या घालू लागले आणि वर आकाशात शेकडो ठिपके घिरट्या घालताना दिसू लागले. सर्वप्रथम रात्तल जमिनीवर उतरले. थोड्याच वेळात पन्नास-साठ गिधाडे बैलाजवळ उतरली आणि मांसासाठी भांडाभांडी करू लागली. लांब माना बैलाच्या पोटात घालून आतले मऊ मांस लिचू लागली. मोठी चोच पटापट खाण्याच्या कामी येऊ लागली.
चोची रक्ताने भिजून गेल्या. आधीच कुरूप असलेली गिधाडे आता क्रूर आणि रक्तपिपासू भासू लागली.

भुरा पोरांना बोटाने गिधाडे दाखवीत होता. सर्वात छोटे आणि पांढऱ्या रंगाचे ते लिंडा जातीचे (इजिप्शियन व्हल्चर). काळी मान, काळे पंख आणि पांढरी पाठ ते ‘गरद’ (व्हाईट रम्प्ड व्हल्चर); पांढरट मान तपकिरी पंख आणि मानेभोवती पिसे आहेत ते आहे पांढरे किंवा ‘धोलियो’ आणि सर्वात आधी उतरले ते लाल मानेचे आहे ना, ते आहे रात्तल, गिधाडांचा राजा (किंग व्हल्चर)!

गिधाडांचे पोट भरत आले असेल तेवढ्यात भुरा आणि सिलीमन हातात पांढरे गमचे उंचावून बैलाकडे जाऊ लागले. मांस खाऊन शरीर वजनी झालेली गिधाडे टुनुक टुनुक उड्या मारीत पलीकडे पळू लागली. पलीकडे जमीनवर लावून ठेवलेल्या फास्यात ती अडकू लागली. अडकलेली गिधाडे धडपडू लागली. भुरा आणि सिलीमन पुन्हा मागे सरले. थोड्या वेळाने त्यांनी गमच्या दाखवून गिधाडांना दचकवले. गिधाडे पळायला लागली की फास्यात अडकत. असे चार-पाच वेळा करून झाल्यावर प्रत्येक फास्यात एक गिधाड अडकून पडलेले होते. भुराने आवाज देताच सर्व पोरंसोरं फास्यात पडलेल्या गिधाडांना पटापट उचलू लागली. एकूण बावीस गिधाडे अडकली होती, त्यात घरचीच पाळलेली पाच होती.

‘लिंडा’ चे मटन कमी पडणार होते तर रात्तल, गरड आणि धोलियो चे प्रत्येकी साडेतीन ते चार किलो मटन पडणार होते. पालावर सर्वजण आजची शिकार घेऊन पोहोचताच बायका म्हातारे आनंदित झाले. परमेश्वराने भुराची प्रार्थना ऐकली होती. पालावरची मुले पुढची आठ दिवस तरी उपाशी राहणार नव्हती! फक्त ज्वारीची तेवढी सोय करायची होती.

सुन्न मनाने मी भुरा आणि श्रीकृष्णाचा निरोप घेतला. बसमध्ये बसल्यावर मी विचारमग्न झालो. अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम या केवळ चार जिल्ह्यातील एकूण शंभर एक पालावरील हजारो पारध्यांनी दहा वर्षात किती गिधाडे मारून खाल्ली असतील? आणि भरीस भर म्हणजे गिधाडांची एक जोडी दर वर्षी केवळ एकच अंडे घालते. म्हणजे प्रजननाचा दरही अल्प असतो. 1992 नंतर गिधाडे झपाट्याने कमी झाली आणि आज मृत जनावरांना खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवणारी गिधाडे दुर्मिळच नव्हे तर नष्टप्राय होऊन बसले आहेत!

(टिप: सर्व नावे, स्थळे काल्पनिक आहेत).

डॉ. राजू कसंबे, मुंबई

पूर्वप्रसिद्धी: दैनिक लोकमत, मंथन पुरवणी. दि.१७ मार्च २००२.

Group content visibility: 
Use group defaults

२००२ चा लेख...
आता गिधाडांची स्थिती काय आहे मग...
खरेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत?

नक्की कोणाबद्दल वाईट वाटवून घ्यायचे हे कळेनासे होते. पाणी पिऊन झोपणार्या मुलांबद्दल की नष्ट होणाऱ्या गिधाडांबद्दल.

माडगूळकरांचा एक लेख आठवला. शिकारीची विनंती करणारा पारधी व दिवसभर फिरूनही एकही शिकार न मिळालेले माडगूळकर...

मस्त लेख.
दोन महिन्यांपुर्वीच एक शेतकरी सांगत होता की गिधाडे चवीने मारुन खाल्ली काही लोकांनी. म्हणजे त्यांना बकऱ्याचे मटन दिले तरी ते तोंड फिरवत व गिधाडे मारुन खात.
गिधाडांची काय अवस्था आहे आता महाराष्ट्रात?

की कोणाबद्दल वाईट वाटवून घ्यायचे हे कळेनासे होते. पाणी पिऊन झोपणार्या मुलांबद्दल की नष्ट होणाऱ्या गिधाडांबद्दल.>>>>>>>> अगदी अगदी! त्या दारिद्र्याचे वर्णन वाचल्यावर नेहमी येतो तो विचार मनात आला बापरे त्यामानाने आपण किती सुखी!

गिधाडे नष्ट होण्याचे हे कारण माहित नव्हते. आपल्या जखमी आजारी गुरांच्या वेदना कमी करण्यासाठी शेतकरी डायक्लोफेनक हे औषध वापरतात. ही जनावरे मृत झाल्यास त्यांचे अवशेष गिधाडे खातात व जनावरांच्या मांसातील डायक्लोफेनाकमूळे गिधाडाची किडनी खराब होऊन गिधाडे मरतात. गिधाडे कमी होण्याचे हे ही एक कारण आहे असे सांगितले जाते.
दुर्मिळ होत जाणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी नाशिक जवळ अंजनेरी येथे खास गिधाडांचे रेस्टॉरंट आहे.

सुंदर लिहिलंय... काय झालं असेल त्याची कथा ही एकदम अस्सल उतरली आहे. एकदम चित्रदर्शी. सर्वात महत्त्वाचं एक बाजू/ भूमिका घेऊन न लिहिल्याने मन विचारात पडलं, आणि आणखी आवडलं. Happy
साधना सारखंच वाटलं. पण अर्थात शेवटी वाईट माणसांबद्द्लच वाटलं. अन्नसाखळीत माणूस सर्वोच्च आहे. तो जगण्यासाठी जी धडपड करतो त्याला काही वेगळी फुटपट्टी असुच शकत नाही. आजवर कित्येक प्रजाती नामशेष झाल्या. नामशेष होऊ नये यासाठीची काही प्रमाणात धडपड समजते, पण टोकाला जाऊन पूर्ण क्लोन करुन नामशेष प्राणी नव्याने निर्माण करणे हे सुद्धा निसर्गात ढवळाढवळच वाटते.
यांना/ यांच्या मुलांना शिक्षण मिळून जगण्याचे मेन स्ट्रिम मार्ग उपलब्ध झाले असते, आणि ज्यांना पिढिजात पद्धतीने जगायचं असेल तर शिकारीवर नियंत्रण (बंदी नाही, पण रेग्युलेटेड नियंत्रण) आणता आलं असतं तर!... असा विचार मनात आला.

कमेंट काय द्यावी तेच सुचत नाहीये.. दोन्हीपैकी कुणा एकाचीच बाजु न घेतल्यामुळे लेख आणखीनच भावला..

लिखाण भीषण वास्तव मांडणारे आहे. चित्र डोळ्यासमोर उभे राहते. काही प्रसंग तर वाचवले नाहीत. शब्दांवरून उड्या मारत मारत पुढे गेलो. सत्य हे कल्पनेपेक्षा किती कटू असते हे जाणवले.

पण फासे पारधी व अन्य कोणी खाल्ल्यामुळे गिधाडे कमी झाली हि थियरी यापूर्वी कधीच वाचली नाही वा पटली सुद्धा नाही. त्यातूनही जर हे त्यांचे पूर्वपरंपरागत खाणे असेल तर १९९० नंतरच गिधाडांच्या संख्येत अचानक घट का व्हावी? पण हो, ज्या काळात हा लेख प्रसिध्द झाला (२००२) त्याकाळात गिधाडे कमी होण्याची समस्या खूप चर्चेत होती ते आठवले. माध्यमांतून खूप काही लिहून येत होते.

>> डायक्लोफेनाकमूळे गिधाडाची किडनी खराब होऊन गिधाडे मरतात. गिधाडे कमी होण्याचे हे ही एक कारण आहे असे सांगितले जाते.
Submitted by आग्या१९९० on 29 January, 2020 - 22:32

याच्याशी सहमत आहे. २००३ साली केलेल्या संशोधनात गिधाडे कमी होण्यामागचे हे कारण उजेडात आले. विकिपिडीया व अन्य साईट्सवर सुद्धा याला दुजोरा मिळतो. म्हणूनच नंतर या औषधांवर बंदी आली. आज भारत, पाकिस्तान, नेपाळ मध्ये यावर बंदी आहे.

गिधाड
vulture-696x447.jpg

गिधाडाचे पंख
2_04_51_54_gidhad-2_1_H@@IGHT_460_W@@IDTH_800.jpg

किंग व्हल्चर

download.jpg


34781134646_4c8283c129_b.jpg

इजिप्शियन व्हल्चर

Egyptian_vulture.jpg

व्हाईट रम्प्ड व्हल्चर
white-rumped-vulture-ee09d3ed-086e-496d-9592-58b7f72e6ea-resize-750.jpeg
फोटो आंतरजालावरुन साभार __/\__

हा व्हिडीओ बरेच वर्षापूर्वी पाहीलेला....

मी नाशिकला झाडावर बसलेले गिधाड पाहीलेले....बापरे, काय मोठ्ठे होते.... अवजड शरीरामुळे गिधाडाला पटकन उडता येत नाही.

कात्रजच्या बागेत पुर्वी मोठे गिधाड होते. त्याचेही नाव जटायू होते. त्याने पंख पसरले तर किमान ९-१० फुट सहज व्हायचे. म्हातारे झाले होते म्हणून तेथे ठेवले होते.

अतिशय सुंदर लिहिलंय.
रायगड जिल्ह्यात महाड येथील श्री. प्रेमसागर मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे गिधाडांच्या संवर्धनासाठी यशस्वी मोहीम राबवली आहे. त्यासंबंधी माहिती देणारा हा व्हिडिओ.
https://youtu.be/diUHS5MHLlQ

गेल्या वर्षी आम्हाला दिसलेली ही गिधाडे. बहुतेक ताम्हिणी घाटात. नक्की लक्षात नाही.
IMG-20190816-WA0030.jpg

विनिता, झकास फोटोज दिलेत.. Happy

व्हिडीओतला जटायु निसर्गाला आपल्या कवेत घेतोय कि काय अस वाटल..
सुंदर लिंकसाठी धन्यवाद बोकलत! Happy

पण फासे पारधी व अन्य कोणी खाल्ल्यामुळे गिधाडे कमी झाली हि थियरी यापूर्वी कधीच वाचली नाही वा पटली सुद्धा नाही./>>>>

ही थियरी पटण्याजोगी नाही कारण पारधी व अन्य लोक शेकडो वर्षे गिधाडे खाताहेत. त्यांची जी हलाखी वर आलेली आहे तीही शेकडो वर्षे अशीच आहे. भटक्या जमाती कुठेही स्थायिक होत नसल्यामुळे उदरभरण करण्यासाठी जमीन नसते, जंगल स्किल सोडून बाकी कसलेही स्किल हाती नसते. त्यामुळे जंगलातले प्राणी व गावात चोऱ्या हीच दोन माध्यमे शिल्लक राहतात पोट भरण्यासाठी. चोऱ्यांमुळे पारधी जमात प्रचंड बदनाम झालेली आहे व त्यापायी त्यांनी खूप त्रास भोगला आहे. त्यांच्या मुलांना शिक्षण वगैरे देऊन पुनर्वसन करणे वगैरे छोट्या प्रमाणात झालेले आहे पण ह्या गोष्टींना त्यांचाच विरोध असतो. सरकारी पातळीवर एखादा चांगला प्रांताधिकारी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून काम करतोही पण त्याचा कार्यकाळ लिमिटेड असतो, त्याच्यानंतर आलेल्याने लक्ष घातले नाही तर ते प्रकरण तिथेच थंडावते.

गिधाडे कमी झाली ती वर दिलेल्या इतर कारणांमुळे, त्यांचे वावराचे क्षेत्र माणसाने काबीज केले, खाणे कमी झाले, खाण्यावर निर्बंध आले, वगैरे...

जीवो जीवस्य जीवनम...

Illisions या Richard Bach च्या पुस्तकात एक प्रसंग आहे. पुसट आठवतो , असा काहीसा आहे.
काहीही खयला न मिळालेले दोघे अरण्यात एक्मेकाला भेटतात. त्यातला एक नरभक्षक आहे. तो म्हणतो , मी तुला खाल्ले तर तू मरणार , आणि नाही खाल्ले तर मी मरणार !

डॉ. राजू, ही बाजू माहीत नव्हती. धन्यवाद.

<<मी तुला खाल्ले तर तू मरणार , आणि नाही खाल्ले तर मी मरणार !>> पशुपत, अगदी.

मुंबईमधे मलबार हिलवर बरीच गिधाडे आढळायची.आकाशात घिरट्या घालणारी गिधाडे बरीच पाहिली आहेत.कालांतराने कमी कमी होत गेली.विषारी मांसाच्या सेवनामुळे त्यांची संख्या रोडावली असे वाचनात आले होते.

मुंबईत मलबार हिल ला लागूनच पारश्यांचे शांतिमनोरे आहेत. मृत झरतुष्ट्रीयांचे शव अनेक विधींनंतर अंतिम विल्हेवाटीसाठी या विहिरीत सोडले जाई. त्याचे मांस खाण्यासाठी त्या परिसरात गिधाडे येत. गिधाडांची संख्या अनैसर्गिकरीत्या कमी झाली हे एक आणि झरतुष्ट्रीयांची लोकसंख्याही खूपच कमी झाल्यामुळे विहिरीत पडणाऱ्या मृतदेहांची संख्या म्हणजे पर्यायाने गिधाडांचे खाद्यही कमी झाले या दोन कारणांमुळे अलीकडे तिथे गिधाडे दिसत नाहीत.

Pages