गाठोडे

Submitted by पुरंदरे शशांक on 7 October, 2017 - 11:31

गाठोडे

गेलो गाठोडे घेऊन
अंतकाळी मीच माझे
विचारले अंतकाने
काय अाहे तुझ्यासवे

सोडी मीही लगबगी
गाठोडे जे माझे म्हणे
जपलेले सारे काही
दाखवावे या अाशेने

दुःख निराशा मत्सर
दंभ लोभ मोह सारे
अाश्चर्याने ओरडलो
नाही गाठोडे हे खरे

म्हणे हसून अंतक
खोट नाही यात काही
जन्मवरी जपलेले
तेच अाले तुझ्याठायी

नको ओरडू भयाने
व्यर्थ अाक्रोशू तू अाता
तुझा तूच करी घात
तुझे हित तुझ्या हाता....
.....................................
(अंतक = मृत्यूदेवता)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणे हसून अंतक
खोट नाही यात काही
जन्मवरी जपलेले
तेच अाले तुझ्याठायी

सुरेख !!!

नको ओरडू भयाने
व्यर्थ अाक्रोशू तू अाता
तुझा तूच करी घात
तुझे हित तुझ्या हाता.... >>> .सहिये

किती सुरेख!!
________
नामस्मरण हाच राजमार्ग आहे. खूप शांती लाभली मला तरी.
_________
बाकी आपले षड्रिपू हे आपली उत्क्रांती व्हावी, वंश सातत्य रहावे या दृष्टीकोनातून नैसर्गिक रीत्याच, निर्माण झालेले असावेत. आपला स्वार्थ आपण नाही पाहीला तर नामशेष होउ. पण यातील एक मेख अशी की - आपल्या गुणसूत्रात हे षड्रिपू आहेत तेव्हा त्यांच्या जोपासनेकरता विशेष प्रयत्न करु नये कारण ते आपोआपच / मूळातच प्रबळ आहेत. याउलट संतुलनात्मक दृष्टीने, अध्यात्मिक/सात्विक गुण यांचा प्रभाव कमी आहे म्हणुन त्यांच्या जोपासनेकरता प्रयत्नशील रहायला हवे.