अस्तित्व !!! (भाग ६ )  

Submitted by Sujata Siddha on 20 January, 2020 - 01:44

अस्तित्व !!! (भाग ६ )  

बरोब्बर १०. वाजता सुप्रिया आली , शुभ्रा आवरून कुलूप लावून बाहेरच उभी होती , ती आल्याबरोबर त्या दोघी गाडीवरून निघाल्या , रस्ता तसा लांब होता पण दिलेल्या पत्त्यानुसार त्या वेळेत पोहोचल्या , ‘पलाश अँबिंयन्स ‘ एक अत्यंत उच्चभ्रू लोकांची सोसायटी होती , तिच्या प्रचंड मोठ्ठया आवारात व्हिझिटर्स पार्किंग मध्ये गाडी लावून दोघीनी बिल्डिंग शोधून काढली , आणि सिक्युरिटी गार्डच्या फॉर्मालिटीज पूर्ण करून लिफ्ट ने १० व्या मजल्यावर पोहोचल्या. ,एका मजल्यावर फक्त दोन फ्लॅट होते ,आणि दोन्ही फ्लॅट च्या समोरचा भरपूर मोकळा पॅसेज अतिशय कलात्मक रित्या सजवलेला होता , तिकडे कौतुकाने पहात सुप्रिया बेल वाजवणार तितक्यात आतूनच दार उघडण्याचा आवाज आला ते ऐकून दोघी अलर्ट पोझ मध्ये थांबल्या .दार उघडलं , आणि पांढरा शुभ्र नेहरू शर्ट - सुरवार , त्यावर क्रिम कलरची रेशमी शॉल अशा वेषात साधारण ५५ च्या आसपास असलेलं सावळ्या सतेज रंगाचं एक भारदस्त व्यक्तिमत्व समोर उभं होतं . अतिशय रूबाबदार आणि प्रसन्न , “ Welcome Supriya !..तितक्यात त्यांचं शुभ्रा कडे लक्ष गेलं
“Sir , she is my Friend Shubhrata “
“Very Nice ..Come !.. ते म्हणाले आणि थोडा पॉज घेऊन , पाठीमागे असलेल्या शुभ्रता कडे बघत म्हणाले , “Babaji Is Waiting For You !” , शुभ्रता चं कुतूहल चाळवल , कोण हे बाबाजी ? आणि ते माझी का वाट पाहतायत ? त्यांना कसं कळालं सुप्रिया बरोबर मी येणार आहे ते ? आत आल्यावर तर ती बघतच राहिली , प्रशस्त हॉल, त्याला साजेसं अभिरूची संपन्न फर्निचर ,सगळीकडे झुळझुळीत रंगाचे पांढरे शुभ्र पडदे ,बघावं तिकडे divine वाटत होतं , हॉलच्या दरवाजा ला लागूनच असंख्य प्रकारची फुलझाडं लावलेली होती , मऊ गुबगुबतीत गालिचा खाली अंथरलेला होता , हॉलमधली सजावट दृष्ट लागण्यासारखी होती , सवर्त्र श्रीमंती आणि प्रतिष्ठेचा एक रूबाब भरून राहिला होता ,हॉल मधून फिरत विविध देशातून जमवलेले वेगवेगळे आर्टिफॅक्टस बघता बघता शुभ्राची नजर समोर गेली आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखी ती एका जागीच उभी राहिली . समोर पद्मासनात एक भव्य मूर्ती होती ,बसलेल्या अवस्थेतही किमान चार ते पाच फूट उंच असावी , सतेज गोरा चेहेरा , विशाल डोळे , खांद्यापर्यत रुळणारे तांबूस सोनेरी केस , आणि सौम्य केशरी वस्त्र धारण केलेली , साधारण २५ वर्षांची वाटावी , जिवंत भासावी अशी ती मूर्ती, नकळत ती नतमस्तक झाली , “असतो मा सत गमय , तमसो मा ज्योतिर्गमय … “ हा श्लोक तिच्या मन:पटलावर आपोआप उमटत गेला , नमस्कार केल्यावर डोळे मिटून ती शांत बसून राहिली , कितीतरी वेळ अशी बसली माहिती नाही कुणाच्या तरी हलवण्याने ती एकदम भानावर आली , सुप्रिया आणि डॉ . बॅनर्जी तिला उठायला सांगत होते , एव्हाना सुप्रिया डॉ . बॅनर्जी चं आख्ख घर फिरून आली होती ,तिची अखंड बडबड आणि उत्सुक नजर सांगत होती की तिथल्या पवित्र वातावरणापेक्षा तिथल्या रूबाबदार श्रीमंतीचा तिच्यावर खूप प्रभाव पडला होता , त्यानंतर डॉ बॅनर्जीं त्या दोघीना सेशन्स घेतात तिकडच्या हॉल मध्ये घेऊन गेले , काही excersize , काही प्राणायामाचे प्रकार आणि नंतर मेडिटेशन असा साधारण क्रम होता , तिथे आधीच आलेले अनेक साधक होते , मेडिटेशन होऊन session संपेपर्यंत दुपारचा १. वाजला , शुभ्रता आणि सुप्रिया खूप भारावून गेल्या , आधीच्या साधकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की स्वतः: डॉ बॅनर्जी हे उच्चं विद्याविभूषित असून त्यांची पत्नी ही तशीच आहे आणि या दोघांनीही क्रिया योगा च्या सेवेला वाहून घेतलं आहे , दर रविवारी इथे साधना करण्यासाठी सर्व जमतात , नंतर डॉ बॅनर्जीच्या घरी सर्वांना जेवण असतं , ती विस्मयचकित झाली ,किती निस्वार्थ भावानेनं करतायत हे सगळं !..
ते सर्वजण मिळून पुन्हा’पलाश अँबियन्स ‘ मध्ये आले. निघताना त्यांनी तिला एक पुस्तक दिलं ,”ऑटॊबायोग्राफी ऑफ अ योगी “ एका योग्याने लिहिलेलं आत्मचरित्र ?,,आजपर्यँत कलाकार ,राजकारणी , उद्योगपती यांची आत्मचरित्र तिने वाचली होती , पण भौतिक जगाच्या पसाऱ्याकडे पाठ फिरवणाऱ्या संन्याशाने आत्मचरित्र लिहावं ? तिची उत्सुकता खूप चाळवली , कधी एकदा घरी जाऊन पुस्तक वाचतेय असं तिला होऊन गेलं , परतीच्या रस्त्यावर सुप्रियाला खूप काही बोलायचं होतं तसं ती बोलतही होती आणि शुभ्रता ?कितीतरी दिवसांनी आज प्रथमच तिला शांत शांत वाटत होतं , सैरभैर झालेलं मन एका जागी स्थिर झालं होतं , तिच्या डोळ्यांसमोरून ती दिव्य मूर्ती हलायला तयार नव्हती . आज जे आपण अनुभवलं ते काय होतं ? त्याचं लॉजिक तिला लागत नव्हतं , ती मूर्ती कोणाची होती हे तिला माहिती नव्हतं , मनात काहीतरी उमटत होतं , काही खुणा , काही खोल दबलेल्या धूसर आठवणी , आयुंष्यभर परदेशी राहिल्यानंतर , बालपण जिथे काढलं ते घरही विस्मृतीत गेल्यानंतर अचानक जर आपल्याला आपल्या देशात परतावं लागलं आणि आपल्या जुन्या घराच्या खुणा दिसायला लागल्या तर जसं वाटेल तसं काहीसं तिला वाटत होतं पण ते तिला इंटरप्रीट करता येत नव्हतं , घरी जाऊन कधी एकदा डॉ बॅनर्जींनी दिलेलं पुस्तक वाचतो असं तिला झालं होतं, तिला घरी सोडून सुप्रिया गेली तेव्हा दुपारचे चार वाजले होते , पूर्ण दिवस गेला होता तिचा बाहेर , एरवी weekend ला आराम मिळाला नाही की तिची खूप चिडचिड होत असे , पण आज ? आज जरा वेगळी धुंदी आणि excitement होती , गाणं गुणगुणत तिने गॅस वर चहा ठेवला , आलं , वेलदोडे कुटून मनासारखा उकळवलेला , दाट केशरी रंगाचा गरम गरम वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन ती टेबलापाशी आली आणि पर्स मध्ये ठेवलेलं ते जाडजूड पुस्तक बाहेर काढलं , “Autobiography Of a Yogi “ By परमहंस योगानंद , तिला आठवलं page ३३ आणि ३४ आधी वाचायला डॉ बॅनर्जी नी सांगितलेलं , तिने वाचायला सुरूवात केली ,आणि इतका वेळ तिच्या मन:चक्षू समोर ठाण मांडून बसलेली ती मूर्ती कोणाची होती हे तिला कळालं , “क्रियायोगाचे प्रणेते महावतार बाबाजी !!.. “
त्याच रात्री शुभ्रा ला एक स्वप्न पडलं , वरून कोणीतरी कॅमेरा मारावा तसं तिला खालचं दृश्य दिसत होतं , ती कुठून पाहत होती किंवा कुठे उभी होती हे तिला दिसलं नाही , पण खाली खूप सारे लोक बसले होते ,त्यांच्या समोर ‘महावतार बाबाजींचा ‘ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता ,जुन्या अगदी १८५० च्या काळात माणसं जशी दिसायची तशी ती सारी माणसं दिसत होती , आणि ते बहुतेक सर्व साधक असावेत , त्या लोकांमध्ये बरोबर मध्यभागी एक माणूस बसला होता , तो वर बघत होता , आणि बघता बघता एकदम त्याने वर उभ्या असलेल्या शुभ्रता कडे बघितलं ,ती एकदम दचकली जणू काही आपणच वरून खाली बसलेल्या आपल्याला बघतोय असा विचित्र भास तिला झाला आणि ती जागी झाली . मोबाईल वर अलार्म वाजत होता , पहाटेचे पाच वाजले होते . इतक्यात सकाळ झाली पण ? आत्ता तर झोपलो होतो आपण तिला वाटलं . ईतकी शांत झोप लागली होती आपल्याला ? गेल्या कित्येक रात्री तळमळून काढल्यानंतर मिळालेली हि सुखाची झोप तिला लाखमोलाची वाटली , खूप फ्रेश आणि छान वाटत होतं , तिला आठवलं आपल्याला कालचे excersize , प्राणायाम आणि मेडिटेशन करायचंय, ती उठली आणि सर्व आवरून तिने excersize करायला सुरुवात केली,करताना तिला सारखा फील येत होता की जणू काही हे तिला माहितीच होतं , आधी केलेलंच होतं , फक्त दीर्घ काळासाठी गॅप पडली होती . सर्व आटपायला बरोब्बर 1 तास लागला , सहा वाजता जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा एक अनामिक ऊर्जा आपल्या नसानसातून सगळीकडे फिरतेय अशी जाणीव तिला व्हायला लागली आणि आनंदाच्या उर्मी अंगातून खेळायला लागल्या , तिला गंमत वाटली , someone could be so happy without any reason , is it possible ? ‘ हे काय होतंय ? सुप्रियाला पण असंच होत असेल का? अंघोळ, नाश्ता, मुलांच्या सकाळच्या शिकवण्या , स्वतःचा टिफिन हे सगळं त्या आवेशातच उरकून ती आज नेहेमीपेक्षा दहा मिनिटे लवकर पोहोचली ऑफिसला .तिला सुप्रियाशी बोलायचं होतं म्हणून , पण सुप्रिया आली नव्हती , तिला उशीर झाला होता यायला , त्या दोघींची भेट एकदम लंच च्या वेळेलाच झाली , पण त्याना एकत्र बोलायला वेळच मिळाला नाही . संध्याकाळी मात्र सुप्रिया तिच्या डेस्कजवळ आली , ‘हाय शुभ्रता , अगं काल मी तुला रात्री व्हाट्स अँप करणार होते ,पण तेव्हढा सुद्धा वेळ मिळाला नाही “, शुभ्रता चे कान टवकारले , सुप्रियाचे अनुभव ऐकायला ती अधीर झाली होती.
“ कस्सलं पॉश होतं ना डॉ बॅनर्जींचं घर ?मी तर वेडीच झाले ते वैभव बघून, आपल्या कधी नशिबात आहे कोण जाणे एवढा पैसा..”
“ हं… आपण काल शिकलो ते meditation वैगेरे केलंस तू सकाळी ? “ नाही म्हटलं तरी शुभ्राताचा थोडा भ्रमनिरास झाला .( हि खरंच आली कशाला होती ? हिला पाणी न्यायचं नव्हतं बहुतेक म्हणून रिकामा हंडा घेऊन आली आणि तशीच गेली . शुभ्रता मनातच हसली )
“ छे कसलं मेडिटेशन कसलं काय ? काल सासूबाई जरा रागात होत्या , सुट्टीचा अख्खा दिवस मी घराबाहेर काढला म्हणून ,त्याना ईशा ला सांभाळावं लागलं ना , “
“ओह !.. मग नेक्स्ट संडे चं कसं करणार ग तु ? “ शुभ्राला कोडं पडलं .
“बहुतेक नाही जमणार अगं , एरवीही मी जॉब मुळे नसते ना घरी , मग त्यांना तसंही ईशा मुळे अडकून पडावं लागतं . आणि सुटीचा अख्खा दिवस आता परत इथे घालवल्यावर , मग कसं ? .” सुप्रियाचा चेहेरा बारीक झाला होता .
“बरोबर आहे सुप्रिया तुझ्या सासूबाईंचं , ईशा ला पण तर आईचा सहवास हवा असेल ना गं, किती लहान आहे गं ते पिलू अजून “
“हो ना .तसही हे मेडिटेशन वगैरे आपल्या संसारी लोकांची कामं नाहीत गं , म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटतं खूप , मेडिटेशन करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं की फार वाटतं आपणही हे करावं पण एवढा वेळ आणि पेशन्स आणायचा कुठून बाई , आपल्या डोक्याला हजार विवंचना , मन तर स्थिर हवं त्यासाठी ? एक दिवस जाऊन आलो बास झालं ,तू हि जाऊ नकोस , तू तर तरुण आणि एवढी चिकणी आहेस , अजून तर तुझ्या सांसारिक आयुष्याला सुरुवात सुद्धा झाली नाही , प्रेमात पडायच्या वयात मेडिटेशन कसलं करतेस ? म्हातारपण आहेच की त्यासाठी राखीव हाहाहा ,SS अगं माझ्या सासूबाई तर ओरडल्या काल मला , म्हणे तुला एक नसतं खूळ आहे , त्या पोरीच्या डोक्यात नको भरवूस असलं काही , तिचं सगळं व्हायचं जायचं आहे अजून “ यावर शुभ्रता किंचित हसली , आता सुप्रिया येणार नाही बरोबर , म्हणजे मग आपल्याला एकटीलाच जावं लागणार , विमान नगर तसं काही जवळ नव्हतं , पण ठीक आहे, आपण जाऊयात तिने मनाशी विचार केला , कारण सतत काहीतरी जे अपूर्ण वाटायचं मागच्या रविवार पासून तिला तसं वाटणं बंद झालं होतं , हेच तिच्यासाठी खूप होतं . लग्न ,संसार पुढचं पुढे बघू .
पुढच्या रविवारी तिला एकटीलाच बघून डॉ. बॅनर्जी अगदी अर्थपूर्ण हसले , जणू त्यांना म्हणायचं होतं कि बोलावणं तुलाच होतं , ती निमित्त मात्र होती . मागच्या रविवार प्रमाणेच याही रविवारी सर्व सिकेव्न्स ने झालं, शेवटी मेडिटेशन करताना शुभ्रता ने जेव्हा डोळे मिटले तिच्या बंद डोळ्यासमोर अतिशय सुंदर असा निळ्या रंगाचा प्रकाश दिसायला लागला ,एरवी मिटल्या डोळ्यासमोर काळोख दिसतो ,एवढंच तिला माहिती होतं .हे काहीतरी नवीन होतं,तिला गंमत वाटली , कितीतरी वेळ भान हरपून बंद डोळ्याने ते बघत राहिली, . एखादं महगड़ गॅझेट आपण विकत घेतो , ते वर्षानुवर्षे वापरत असतो मग एखाद्या दिवशी कोणी एक एक्स्पर्ट येतो , आणि आपण वर्षानुवर्षे वरवर वापरणाऱ्या त्याच गॅझेट मध्ये कितीतरी नवीन faetures आहेत जे अतिशय चमत्कारी आणि अद्भुत आहेत हे दाखवतो तेव्हा जसे आपण अवाक होतो तशी शुभ्रता अवाक होऊन येई प्रत्येक वेळी , आपलंच शरीर आपल्याला किती अनभिद्न्य आहे , तिला वाटून जाई . ‘तुझे आहे तुजपाशी , परी तू जागा चुकलासी “ परमेश्वराने आपल्याला एवढा खजिना दिलाय पेटारा भरून पण आपण फक्त पेटाऱ्यावरचं डिझाईन पाहण्यातच आयुष्य घालवतो आणि आतला खजिना तसाच राहतो , बंद पेटारा शेवटी तसाच अनंतात विलीन होतो , तिला वाटे , काळ आपल्यावर केव्हा घाला घालील माहिती नाही , पण आहे तोपर्यँत मला मिळालेला प्रत्येक क्षण मी ह्या खजिन्याची चावी शोधण्यात घालवायला हवा बाकी गोष्टी म्हणजे नोकरी , पैसे या तर काळाच्या ओघात मिळतीलच त्यासाठी आपणby default मेहेनत करतोच, असेच काही रविवार गेले , प्रत्येक रविवारी’ पलाश’ ला जाण्याची उत्सुकता कायम राहिली , हळू हळू शुभ्रताच्या चेहेऱ्यावरचे कोमेजलेपण जाऊन तिथे एक नैसर्गिक तजेला आला आणि तिचं सौंदर्य आणखीन खुलायला लागलं . अशीच एका रविवारी ती गेली असताना डॉ बॅनर्जींनी session मध्ये सांगितलं की येत्या गुरूवारी ‘गुरूपौर्णिमा ‘आहे , ग्रह स्थिती नुसार इतका सुंदर ग्रहयोग जवळजवळ तीस वर्षांनी आला आहे , त्या दिवशी सकाळी सात वाजता दीक्षा संपन्न होईल . आणि त्यांनी यादी वाचून दाखवली त्यात ‘ शुभ्रता आर्य” हे नाव ऐकून ती चकीत झाली.
“दीक्षा म्हणजे काय? “ मेडिटेशन झाल्यानंतर पलाश मध्ये जेवत असताना शुभ्रता ने शेजारी बसलेल्या हर्षा ला विचारल .
हर्षा जेवताना दोन सेकंद थांबली ,” शुभ्रता तु जेव्हा जन्मली असशील तेव्हा तुला आई -वडील , भाऊ असेल तर भाऊ, आजी आजोबा अशी सगळी फॅमिली तुझ्या अवतीभवती असेल , तसंच दीक्षा म्हणजे मनुष्याचा पुनर्जन्म आणि या जन्मातली आपली फॅमिली म्हणजे आपले सद्गुरू !.. बोलता बोलता तिने हात जोडले .आपल्याला जिने जन्म दिला ती आई आपल्या बरोबर या जन्मापूरतीच असते ,पण ही सद्गुरू माऊली तिने एकदा जर आपला हात धरला तर ती पुढच्या अनेक जन्मातही आपल्याला सोडत नाही,आपण जोपर्यँत आपल्या मुक्कामी पोहोचत नाही, तोपर्यँत ती सदैव आपल्याबरोबर असते , तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तुला पेटाऱ्यातल्या खजिन्याची चावी कशी मिळवायची हे सांगणारा क्षण म्हणजे दीक्षा, दीक्षा झाली म्हणजे अध्यात्माच्या शाळेत रीतसर तुझी ऍडमिशन झाली , तुझा चावी शोधायचा प्रवास सुरू झाला आणि जोपर्यँत तुला ती चावी मिळून त्यातला खजिना हस्तगत करता येत नाही तोपर्यँत सुदगुरू तुझ्याचसोबत राहतात , लक्षात ठेव ,हा एक लांब पल्ल्याचा प्रवास आहे आणि प्रवास म्हटलं कि कधी तो खडतर असणार , कधी चांगला असणार , पण या सगळ्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शक म्हणून सदगुरू लाभतात , ते ही विनामूल्य , गुणी आणि पात्र शिष्य एवढीच त्यांची गुरुदक्षिणा , इथे स्वतः:चा लाभ काही नसतो , हे नि:स्वार्थी प्रेम असतं आणि असलं निर्भेळ प्रेम फक्त सद्गुरू किंवा परमेश्वर करू शकतो .
“ये तन विषकी बेलरी !गुरू अमृतकी खान ! शीश दिये भी गुरू मिले ! तो भी सस्ता जान !!
तू भाग्यवान आहेस शुभ्रता केवळ पाच रविवारच्या तयारीवर तुला दीक्षा मिळतेय, आम्ही बघ इथे दोन-तीन वर्षांपासून येतोय आमचा अजून योग आला नाही .याचा अर्थ आम्ही अजून पात्र नाही आहोत . ”
हर्षा जे बोलली ते सगळंच तिला कळलं असं नाही पण ती नव्या अनुभवाला उत्सुक होती, बुधवारी तिने ऑफिसला गुरुवारच्या रजेचा चा अर्ज दिला ,(तसही आवर्जून रजा घ्यावी असे प्रसंग तिच्या बाबतीत घडले नव्हतेच, )व्हाट्स अप ग्रुप वर मेसेज करून सकाळच्या शिकवणीला एक दिवसाची सुट्टी जाहीर करून टाकली , गुरूपौर्णिमेनिमित्त डॉ बॅनर्जींच्या तर्फे त्यांच्या स्कुल मध्ये ( डॉ बॅनर्जी एका इंटरनॅशनल स्कुल चे संचालक होते ) संध्याकाळी देखील प्रोग्राम होता तिला दोन्ही गोष्टी अटेंड करायच्या होत्या, आदल्या दिवशी संध्याकाळी घरी येता येता ती बाजारात गेली, ज्यांची दीक्षा होणार आहे त्या प्रत्येकाला सात रंगाची सात फळं आणायला सांगितली होती. खूप फिरल्यावर तिला मनासारखी ताजी रसरशीत फळं मिळाली, आपल्या मनानेच तिने गुरूजींसाठी एक मोठा नारळ आणि मिठाईचा बॉक्स घेतला ,डॉ बॅनर्जींसाठी एक छानसं प्रेझेंट घेतलं, बाबाजींच्या मूर्तीपुढे ठेवायला सुवासिक गुलाब फुलांचा एक गुच्छ घेतला आणि मग ती घरी आली, कपडे बदलून झाल्यावर , थोडंसं खाऊन घेतलं मग सर्व गोष्टी व्यवस्थित एका बॅग मध्ये ठेवल्या ,लाल गुलाबाच्या कळ्या पहाटे छान उमलतील या हिशोबाने तिने आणल्या होत्या त्या पाण्यात ठेवल्या आणि पहाटे चा अलार्म लावून ती गादीवर पडली .खूप फिरल्यामुळे ती खूप दमली होती ,पापण्याही जड झाल्या होत्या ,पण गुरुजींबद्दलच कुतूहल तिची झोप चाळवत होतं , डॉ बॅनर्जी सेशन्स मध्ये ज्या गुरुजींचा उल्लेख वारंवार करत असत , ज्या गुरूजींना बाबाजीनी प्रत्यक्ष भेटून क्रिया योग् शिकवला होता ते तिला उद्या भेटणार होते, बाबाजी !..असं म्हणतात की जे 2500 वर्षांचे आहेत . प्रत्यक्ष कसे दिसत असतील ? योग बलाने त्यांनी आपला देह २५ वर्षाइतकाच ठेवला आहे , किती अद्भूत.. ,१०० व्या वर्षातच माणूस जराजर्जर दिसतो मग जेव्हा २५०० व्या वर्षीही जेव्हा एखादा मनुष्य २५ वर्षा इतका तरुण दिसत असेल तर हे कुठलं ज्ञान आहे ?, ते आपल्यालाही आत्मसात करता येऊ शकत असेल का ? आणि मग हत्या , खून या गोष्टी बदलणं शक्य असेल का ? कारण आपला मृत्यू जर आपल्या हातात असेल तर तो कसा होऊ द्यायचा हेही आपल्या हातात असेल ना ? हे खूप कठीण असेल पण अशक्य नक्कीच नाही , my goodness !..काळाच्या कितीतरी पुढे गेलेलं आपलं हे भारतीय योगशास्त्र किती जबरदस्त असेल ? काय वाटलं असेल गुरूजींना त्याना भेटल्यावर ? गुरुजींच्या तोंडून सगळं ऐकायला ती अधीर झाली होती , कधी एकदा रात्र संपून दिवस उजाडतो असं तिला झालं होतं .

Group content visibility: 
Public - accessible to all site users