मन वढाय वढाय (भाग ५)

Submitted by nimita on 14 January, 2020 - 04:15

पुढचे काही दिवस जणूकाही पंख लावूनच आले होते. बघता बघता सलीलचा IIT मधे जायचा दिवस जवळ येऊन ठेपला.मधल्या दिवसांत दोघांनाही एकमेकांबरोबर फारसा वेळ मिळालाच नव्हता. सलील त्याच्या जाण्याच्या तयारीत बिझी होता आणि स्नेहा तिच्या सिनियर कॉलेजच्या ऍडमिशन मधे गुंतली होती.

औरंगाबादहून निघायच्या एक दिवस आधी सलीलनी स्नेहाला भेटायला बोलावलं- त्यांच्या नेहेमीच्या ठरलेल्या जागी... कॉलेजच्या कॅन्टीनमधे ! . त्याच्या रिझल्टच्या दिवसानंतर पहिल्यांदाच असे दोघंच भेटत होते; नाहीतर प्रत्येक वेळी कोणी ना कोणी असायचेच बरोबर...कधी मित्र मैत्रिणी तर कधी दोघांच्या घरातले ... पण आज मात्र त्यांना दोघांनाही इतर कोणालाच भेटायची इच्छा नव्हती.

स्नेहा जेव्हा कॅन्टीनमधे पोचली तेव्हा सलील ऑलरेडी त्यांच्या नेहेमीच्या जागी तिची वाट बघत बसला होता. तिला बघताक्षणी त्याचा चेहेरा खुलला. एरवी भेटल्यानंतर आपल्या गप्पांनी आणि हसण्या खिदळण्यानी अख्खं कॅन्टीन दणाणून सोडणारे ते दोघंही आज एकदम गप्प गप्प होते. दोघांनाही काय बोलावं ते सुचत नव्हतं. खरं म्हणजे येताना स्नेहा बरंच काही ठरवून आली होती. किती किती आणि काय काय सांगायचं होतं तिला... पण सलीलला समोर बघितलं आणि जणूकाही ती सगळंच विसरून गेली. सलीलची अवस्था पण तशीच होती. सुरुवातीला थोड्या जुजबी चौकशा झाल्यावर सलील तिला म्हणाला," ऐक ना स्नेहा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय.. I hope ,तुला आवडेल ते! " असं म्हणत त्यानी एक गिफ्ट रॅप केलेलं पॅकेट स्नेहाच्या समोर ठेवलं. स्नेहा ते उघडून बघणार इतक्यात तो म्हणाला," नाही, आत्ता नको उघडू प्लीज. घरी गेल्यावर बघ."

"मी पण आणलंय काहीतरी तुझ्यासाठी," पर्समधून एक गिफ्ट काढून त्याला देत स्नेहा म्हणाली-" पण तू आत्ता बघितलंस तरी चालेल." तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत सलीलनी त्याचं गिफ्ट उघडलं देखील...तो एक अल्बम होता. सलीलनी कुतुहलानी त्यातले फोटो बघायला सुरुवात केली. तो जसेजसे फोटो बघत होता तसेतसे त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत होते. आधीच्या कुतुहलाची जागा आता त्याच्या स्नेहाबद्दलच्या प्रेमानी घेतली होती. त्या अल्बम मधे मागच्या दोन वर्षांतले त्यांचे दोघांचे फोटो होते.... हेरिटेज क्लबच्या भटकंतीमधले, कॉलेजच्या फनफेअर मधले, दोघांच्या वाढदिवसाच्या पार्टीज मधले.... हे आणि असेच कितीतरी ...पण फक्त आणि फक्त त्या दोघांचेच! त्यातल्या प्रत्येक फोटोबरोबर दोघांच्या कितीतरी आठवणी जुडल्या होत्या. स्नेहाच्या हातांवर हात ठेवत सलील म्हणाला," आजपर्यंत मला मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे हे!खरंच, थँक्स स्नेहा...मी अगदी जपून ठेवीन हा अल्बम आणि जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येईल ना तेव्हा यातले फोटो बघीन." बोलता बोलता काहीतरी लक्षात आल्यासारखा तो थांबला आणि म्हणाला," तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तू काय करशील?"

त्याच्या हातावरची आपली पकड घट्ट करत स्नेहा म्हणाली," असाच एक अल्बम मी स्वतःसाठी पण तयार केलाय."

त्यानंतर बराच वेळ दोघं बोलत राहिले, त्यांच्या दोघांच्या future plans बद्दल , पुढच्या आयुष्याबद्दल ! शेवटी निघायची वेळ झाली. दोघांनाही जायची अजिबात इच्छा नव्हती, पण दुसरा काही पर्याय नसल्यामुळे जाणं तर भाग होतं. निघताना सलीलनी विचारलं," उद्या मला see off करायला येशील स्टेशनवर..प्लीज ?" त्याचा प्रश्न ऐकून स्नेहाच्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं. कसंबसं स्वतःला सावरत ती म्हणाली," नको ना रे! तुला जाताना बघितलं तर तिथेच रडू येईल मला. उगीच सगळ्यांसमोर आपल्या दोघांची अवस्था अवघड होऊन बसेल." तिचं म्हणणं पटलं सलीलला. त्या नुसत्या विचारानी त्याचा पण चेहेरा उतरला. ते बघताच स्नेहा हसत त्याला म्हणाली," हां, पण तू जेव्हा सुट्टीत परत येशील तेव्हा तुला रिसीव्ह करायला मात्र मी नक्की येणार हं स्टेशनवर !" शेवटी 'न चुकता पत्रं लिहायचं आणि फोन करायचं' प्रॉमिस करून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

आता स्नेहाला कधी एकदा घरी पोचून ते गिफ्ट उघडते असं झालं होतं. घरी गेल्यावर ती अक्षरशः पळतच तिच्या खोलीत गेली आणि खोलीचं दार बंद करून घेतलं. तिनी उतावीळपणे वरचा रॅपिंग पेपर काढला..आतून दोन पॅकेट्स बाहेर पडली... पहिल्या पॅकेटमधे एक खूप सुंदर ब्रेसलेट होतं- निळ्या रंगाचं ...आणि दुसऱ्या पॅकेटमधे एक पत्र होतं... सलीलनी तिला लिहिलेलं पहिलं वहिलं पत्र !!!

स्नेहानी धडधडत्या हृदयानी ते पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. पत्र बरंच मोठं होतं. पत्र वाचत असताना तिच्या चेहेऱ्यावर वेगवेगळे भाव लपंडाव खेळत होते... कधी मस्करीचं हसू तर कधी विरहाचं दुःख; कधी लटका राग तर कधी स्त्रीसुलभ लज्जा!! पण इतक्या मोठ्या पत्रातल्या फक्त शेवटच्या दोनच ओळी ती पुन्हा पुन्हा वाचत राहिली.......आणि त्या ओळी होत्या....

'I love you Sneha and I will miss you.

फक्त तुझाच- सलील.'

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान