कुणी का सांगत असते?

Submitted by निशिकांत on 14 January, 2020 - 23:34

काय वाटते मनी, कुणी का सांगत असते?
म्हणे प्रथांच्या वर्तुळातही लज्जत असते!

कितीक वर्षे जरी लोटली, जखमा ओल्या
पत्र कधी जे लिहिले त्याने, चाळत असते

परदेशातिल मुलांस आई खुशीत दिसते
हास्य पांघरुन अंतरात ती विव्हळत असते

चालत असता वृध्दत्वाच्या वाटेवरती
घालमेल अन् आठवणींची संगत असते

प्लेग्रुपमध्ये प्रवेश कसला? मजूर आई
तरी बिचारे बाळ एकटे खेळत असते

शरीर विक्रय करून वाटे तिला घृणा पण
पोट भराया नटते, गजरा माळत असते

विरहदाह सैनिकास आहे शाप असा की
सीमेवर बर्फाळ असोनी, पोळत असते

सावलीसही नेत्यांच्या ना सज्जन जाती
तिथे गिधाडे अन् कोल्ह्यांची पंगत असते

"निशिकांता"ला मंदिरात पण रुक्ष वाटते
विठू दिसे वारीत, खरी ती रंगत असते

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशप्पथ ! खूपच आवडली

कितीक वर्षे जरी लोटली, जखमा ओल्या
पत्र कधी जे लिहिले त्याने, चाळत असते

परदेशातिल मुलांस ...

प्लेग्रुपमध्ये प्रवेश कसला...

विरहदाह सैनिकास आहे ...

सावलीसही नेत्यांच्या ...

हे विशेष आवडलेत .. मस्तच !!