जीए कथा एक आकलन - सांजशकुन- अस्तिस्तोत्र - १

Submitted by अतुल ठाकुर on 13 January, 2020 - 23:34

जीएंच्या सांजशकुन मधील अस्तिस्तोत्र ही पहिली कथा. कथा फक्त चार पानांची. पण संस्कृतात सूत्र वाङ्मय असतं त्या धर्तीची आहे. सूत्रं अगदी छोटी असतात. किंबहूना ती छोटीच असावी असा नियम आहे. अल्पाक्षरत्व हा येथे फार मोठा गुण मानला जातो. मात्र या एकेका सूत्राचा आवाका प्रचंड असतो. त्यावर नाना तर्‍हेच्या टिका लिहिल्या जातात. अनेक विद्वान अनेक तर्‍हेने त्यांचा अथ लावतात. खरं तर "सांजशकुन" मधील सर्व कथाच सूत्राप्रमाणे आहेत. अणी मी विद्वान नसतानादेखील त्यांतील काही कथांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न अयशस्वी होण्याची शक्यता खूपच असल्याने वाचकांनी फारशी अपेक्षा ठेवू नये हे आधीच सांगितलेले बरे.

"अस्तिस्तोत्र' कथेतील फक्त पहिल्या ओळीवर हा लेख आहे. आणि तरीही अनेक गोष्टी सांगण्याचे राहूनच जाणार आहे याबद्दल मला खात्री आहे. या कथेत रुढार्थाने नायक नाही. या कथेला कालाचे परिमाण नाही. या कथेला विशिष्ट प्रदेशाचा तोंडवळाही नाही. अनेकदा वेदांमध्ये अशा तर्‍हेच्या कथा सांगितल्या जातात. कालाचे बंधन नसल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील काही कथा सार्वकालिक असतात. कुठल्याही काळात त्या कथांचा गाभा हा कालबाह्य होत नाही. "अस्तिस्तोत्र" मध्ये जीएंनी असेच केले आहे असे माझे मत आहे. आपल्या तत्त्वज्ञानात पुरुष आणि प्रकृती वर्णन करणार्‍या सांख्यदर्शनाचा या कथेला आधार आहे. समुद्र हा या कथेतील पुरुष आहे आणि त्याव्यतिरिक्त सारे काही प्रकृती. प्रकृती चंचल आहे तर समुद्र स्थिर आहे. जे काही घडते ते प्रकृतीच्या सत्तेमध्ये.

पहिल्या ओळीमध्ये जीएंनी ज्या उपमा वापरल्या आहेत त्या अत्यंत आशयघन अशा आहेत. "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणे" अशी कथेची सुरुवात आहे. उन असे तसे नाही. ते भाजणारे असणार. त्याशिवाय कवटी तावून निघणारच नाही. आणि उल्लेख कवटीचा आहे. जिवंत प्राण्याचा नाही. म्हणजे नुसतेच काहीतरी संपलेले नाही तर काहीतरी संपून बराच कालावधी झाला आहे. जीए या "काहीतरी संपण्याचा" संकेत "सांजशकुन" मधील बहुतेक कथांमध्ये देतात. आभाळाला या तावून निघालेल्या कवटीची उपमा दिली आहे. एरवी दिवसाचे आभाळ म्हणजे स्वच्छ निळे, गडद निळे किंवा पावसाळ्यात काळ्या ढगांनी भरलेले. संध्याकाळी निरनिराळ्या रंगांची किमया करणारे. पण कथेतले आभाळ तसे नाही.

कवटीची उपमा देऊन जीए वाचकाच्या मनातले ते जुने, झळझळणारे रंगीत आभाळ नाहीसेच करून टाकतात. या आभाळाला तोंडवळाच नाही असे मात्र नाही. ते कवटीप्रमाणे आहे. म्हणजेच स्वच्छ आहे, चकचकीत आहे. ते शिंपल्याप्रमाणे आहे म्हटले असते तर त्याला वेगळा अर्थ आला असता. मग त्याला मोत्याचा संदर्भ आला असता. कुठेतरी सौंदर्याचा अर्थ जोडला गेला असता. जीएंना नेमके तेच टाळायचे आहे असे मला वाटते. त्यामुळे कवटीचा उल्लेख आल्याबरोबर वाचकाच्या मनातले संदर्भ पूर्णपणे बदलून जातात. ही किमया जीए नावाच्या जादुगाराचीच. आता हे आता हे आभाळ कितीही स्वच्छ आणि चकचकीत असले तरी ते सुंदर वाटणारच नाही कारण त्याच्यामागे कवटीचा संदर्भ आहे. त्या चकचकीत आभाळावर आता कुणीही कविता करणार नाही. कवटीची उपमा देऊन जीएंनी सुरुवातीलाच वाचकाला एक वाट दाखवली आहे. आणि कथा वाचताना वाचकाचा प्रवास याच वाटेवरून होणार आहे.

ज्यांना या वाटेवरून चालणे शक्य आहे ते शेवटपर्यंत चालतील. काहींना दम लागेल ते थांबतील. काही मध्येच प्रवास सोडून देतील. मात्र जीएंच्या उपमा तुम्हाला वेगळी वाट घेऊ देत नाहीत. आभाळाचा चकचकीतपणा कवटीप्रमाणे आहे म्हटल्यावर अशा आभाळाखाली जे काही घडेल ते अनिवार्य, प्राचीन, अटळ असेच असणार. या आभाळाखाली ज्याला सुरुवात असेल त्याला शेवट असणारच. जे काही रक्तामांसाने लिहिले जाईल त्यावरील रक्त आणि मांस सुकून जाणार. कारण ते नियतीच्या भाजणार्‍या उन्हात तावून निघणार आहे. त्याला शेवट तर आहेच. पण जे काही थोडक्या कालावधीसाठी उरणारे आहे ते कवटीप्रमाणे असणार आहे. रक्तामांसाची आठवण नसणारे. सर्व गोष्टींच्या अटळ शेवटाची आठवण जीए "अस्तिस्तोत्र" कथेच्या पहिल्या ओळीतच करून देत आहेत अशी माझी समजूत आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! फक्त पहिल्या (तेही अर्ध्यामुर्ध्या !) ओळीतच एव्हढा अर्थ भरलेला असेल...तर पूर्ण गोष्ट काय असेल?
जी एंच्या कथा असंच अंतर्मुख करतात, उदास करतात आणि त्याच वेळी जीवनाचा अटळ असलेला शेवटही अधोरेखित करतात.
आपण नकळत पणे मृत्यू या संकल्पनेचा स्वीकार करतो.....!

जी एंच्या कथांची चाहती -