वाडवळी भाषा आणि लिंग्विस्टीक्स (भाषाविज्ञान)

Submitted by अतुल ठाकुर on 30 June, 2019 - 04:07

images_1.jpg

लिंग्विस्टीक्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि लक्षात आले की मराठीशिवाय आपल्याला जवळची आणि आयुष्यभर अभ्यास करता येईल अशी एक भाषा आहे ती म्हणजे वाडवळी. आधी “घरकी मुर्गी दाल बराबर” या न्यायाने या भाषेचे महत्त्व वाटले नव्हते. जन्मल्यापासून पहिली सात वर्षे ही भाषा ऐकली. ही आमच्या वाडवळी समाजाची भाषा. पुढे काही कोसागणिक होणारे तिच्यातील बदल, तिची वैशिष्ट्ये जाणवू लागली. मात्र तिच्यात अभ्यासाच्या किती जबरदस्त शक्यता आहेत हे मात्र लिंग्विस्टीक्सचा अभ्यास सुरु केल्यावरच जाणवले. साधारणपणे वसईपासून ते बोर्डीपर्यंत बोलली जाणारी ही भाषा. खुद्द वसईत भाषावैविध्य खुप आहे. समाजागणिक भाषा बदलते. वसईत बोलली जाणारी वाडवळी ही केळवा माहिम, माकुणसार, चिंचणी तारापूर आणि बोर्डी यापेक्षा वेगळी आहे.

म्हणजे चिंचणी तारापूर येथे इथे तिथे ला अटे तटे म्हटले जाते तर माहिममध्ये ऐला तैला म्हणतात. असे बारिकसारिक फरक आहेतच शिवाय भौगोलिकदृष्टीने भाषेत ज्याला "बॉरोड" वर्ड्स म्हटले जाते त्यामुळेही बराच फरक पडला आहे. वसईत बोलल्या जात असलेल्या वाडवळीत पोर्तुगीज शब्द बरेच आढळतात. तर चिंचणी तारापूर परिसर गुजरातच्या जवळ असल्याने तेथिल वाडवळीत काही गुजराती शब्दांचा वापर केलेला दिसतो. भाषेच्या फरकाबरोबरच प्रान्तागणिक लग्नविधी आणि अंत्यविधींमध्येही निरनिराळ्या ठिकाणी काही फरक जाणवतो. बाकी जागतिकीकरणामुळे म्हणा किंवा सभ्यतेच्या कल्पनांमुळे म्हणा वाडवळी आता सुशिक्षितांमध्ये फारशी बोलली जात नाही हे जाणवते. घरातल्या घरात वाडवळी बोलणारी मंडळी बाहेर एकदम मराठीवर येतात. आताची पिढी कदाचित इंग्रजी बोलत असेल.

या भाषेचा अभ्यास सुरु करताना काही ज्येष्ठ मंडळींना मी भेटलो. तेव्हा एका जोडप्याबद्दल असे ऐकले की जे दोघेही शिक्षक असून एकमेकांशी वाडवळीत संवाद साधत होते. पण अशी उदाहरणे फार आढळली नाहीत. काही मंडळी शिक्षण आणि कामानिमित्त मुंबईकडे सरकली आणि त्यांचा गावाशी असलेला संबंध जरी टिकला असला तरी भाषेशी असलेला संबंध तुटला. फार पुर्वी म्हणजे शंभरदिडशे वर्षापूर्वी जेव्हा बाटवाबाटवीच्या प्रकारांची भीती होती तेव्हा वसईहून आमचे पूर्वज मुंबईत म्हणजे गिरगावात येऊन राहिले त्यांचा या भाषेशी काहीही संबंध राहिला नाही. खरेखोटे देव जाणे पण असे म्हणतात की विहिरीत पाव टाकून बाटवण्याचे प्रकार घडत. त्यासाठी माणसे जागा जमिनी सोडून मुंबईला निघून आली. आता काळ बदलला. गंमत म्हणजे आता रोज सकाळी पावाशिवाय चालत नाही.

या भाषेचा लिंग्विस्टीक्सच्या दृष्टीने अभ्यास करायचा म्हणजे नुसतं व्याकरणच नाही तर त्यात असलेले विशिष्ट स्वर, व्यंजने, त्यांचे आघात, शब्दांचे प्रत्यय, त्यांचे अर्थ, काल, लिंग, वचन, म्हणजेच मॉर्फोलॉजी, फोनॉलॉजी, सिंटेक्स, भाषेचा समाजशास्त्रानूसार अभ्यास अशा अनेकानेक अंगांनी तिचा विचार करावा लागणार आहे. वाडवळी बोलताना काही ठिकाणी "स" च्या ऐवजी "ह" चा केलेला वापर (सांगा ऐवजी हांगा) तर काहीवेळा "च" ऐवजी "स" चा केलेला वापर असे अनेक बदल लक्षात घ्यावे लागणार आहेत. ते कदाचित भाषाविज्ञानाच्या काही नियमानूसार घडत असतील तर तसे शोधून काढावे लागेल. शिवाय तीस, चाळीस, पन्नास वर्षापूर्वीची वाडवळी आता बोलली जात नसेल. काही शब्द लुप्त झाले असतील. त्याचीही नोंद करावी लागेल. हा अभ्यास करताना भाषेच्या आणि समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाजु विसरता येणार नाहीत.

अकराव्या बाराव्या शतकात प्रताप बिंब राजाने महिकावती येथे आपली राजधानी वसवली. हेच आताचे केळवे माहिम. हा राजा जेथून प्रवास करून येथपर्यंत आला त्या वाटेवर कदाचित या भाषेच्या खुणा मिळु शकतील. या राजाने आपल्या बरोबर जी क्षत्रिय कुळे आणली होती तेच योद्धे जेथे कायमस्वरुपी राहिले आणि पुढे यांनी नांगर हाती धरून शेती करण्यास सुरुवात केली. वसई ते बोर्डीपर्यंतच्या या निसर्गसौदर्याने नटलेल्या भागात भाजीपाला, शेती हा या लोकांचा मुख्य व्यवसाय होऊन राहिला. "वाडीवाले" म्हणून वाडवळ असाही या शब्दाचा एक उगम सांगितला जातो. या समाजातील एक विद्वान श्री. अशोक सावे यांनी सर्वप्रथम या भाषेचा अभ्यास केला. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची अशी राजवाडेंची "महिकावतीची बखर" प्रसिद्ध आहे ज्यात या समाजाची माहिती मिळते.

अभ्यासासाठी ही भाषा निवडताना माझ्यासाठी काही गोष्टी अनुकूल आहेत हे माझ्या लक्षात आले. ही भाषा मला नीट कळते आणि काही महिने प्रयत्न केल्यास मी पुन्हा बोलु शकेन असा विश्वास वाटतो ही एक जमेची बाजु. ज्या समाजाची ही भाषा आहे त्या वाडवळी समाजाचा मी एक घटक आहे ही दुसरी जमेची बाजु. आणि या भाषेच्या अभ्यासासाठी ज्या भाषेच्या व्याकरणाची (पाणिनी) आवश्यकता आहे त्या संस्कृतशी माझी तोंडओळख आहे, तिजवर माझे प्रेम आहे ही महत्त्वाची अशी तिसरी जमेची बाजु.

आता या जमेच्या बाजु जशा सांगितल्या तसे खाचखळगेही सांगावे लागतील. समाज काय आणि भाषा काय, यांचा अभ्यास करणार्‍याला अपरिहार्यपणे राजकारणाला तोंड द्यावं लागतं. भाषा ही थेट सत्ता आणि सामर्थ्याशी संबंधित अशी गोष्ट आहे. भाषिक सामर्थ्याचा निरनिराळ्या हेतूंसाठी वापर करणारी माणसं जगभर आढळतात. मला काही वेगळा अनुभव येईल असे मानण्याची आवश्यकता नाही. सुदैवाने माझी पार्श्वभूमी समाजशास्त्राची असल्याने या सार्‍याला तोंड देण्यासाठी मी तसा तयार आहे. थोडक्यात काय तर अभ्यासाला सुरुवात करताना बरीचशी उत्सुकता, थोडा सावधपणा आणि खुपखुप आनंद अशी सध्या परिस्थिती आहे.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त .

स्वारस्य असलेला विषय..
शुभेच्छा आहेतच

खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि माझ्या आवडीचा विषय आहे. यावर अजून खूप वाचायला आवडेल.

वावडल अशी भाषा आहे हेच माहीत नव्हतं. पूर्वी ऐकली नसण्याची शक्यता आहे. युट्यूब वर या भाषेतील काही संवाद किंवा इतर काही बोलणं असेल तर प्लिज माझ्यासारख्या लोकांसाठी लिंक टाका.

तुमच्या संशोधन आणि अभ्यासासाठी शुभेच्छा

लेख आवडतो आहे.
वाडी करणाऱ्या आगरींपेक्षा वाडवळ सौम्य वाटतात. वसइतल्या क्रिश्चनांची भाषा यापेक्षा वेगळी आहे का?

१) >> वाडवळी बोलताना काही ठिकाणी "स" च्या ऐवजी "ह" चा केलेला वापर>>
- वसइतले भट फुलवाले मुंबईत दुकानदारांसाठी हार आणतात ते असं बोलतात. 'सारु' (= चांगले) ऐवजी 'हारु'. त्यांच्याकडून आले असेल.
२) "अंत्यविधींमध्येही फरक" -
विरारच्या एका नातेवाइकाच्या यात्रेवेळी एका बोरिवलीच्या माणसाकडे लाह्याने भरले ताट हातात दिले, चला मागे म्हणाले. त्याने एकदोन मुठी लाह्या घराजवळ टाकल्या . पुढे रस्त्यात पसरलेल्या वाईट दिसतात म्हणून नाही टाकल्या. स्मशानाच्या गेटपाशी भटजी भडकला. हे कशाला आणलं इथवर? ताटातल्या लाह्या गटारात ओतल्या त्याने. तो म्हणालात्रमलाक्षकाय माहीत लाह्या उधळत जायचं? ही पद्धत सर्वच पाळतात.

वाह किती सुंदर लेख. तुमच्या अभ्यासाचा विषय पण इंटरेस्टिंग आहे. शुभेच्छा तुम्हाला.

ही भाषा पूर्वी परिचयाची होती. काही येत नाही पण कानावर पडायची. लग्न झाल्यावर दहा वर्ष नालासोपारा इथे राहिल्याने कानावर पडायची. विशेषत: लोकल ट्रेनमध्ये जास्त.

फार पूर्वी ट्रेनने प्रवास करताना ऐक्ली होती. यात आणखी एक म्हणजे 'आळॉ, गेळॉ' अशी ऑ कारान्त पद्धतीने देखील वाडवळी भाषा बोलली जाते

सर्वप्रथम उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांची हात जोडून क्षमा मागतो.

pracharak2002, हर्पेन , अन्जू , स्वाती२, असामी , ॲमी प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.

युट्यूब वर या भाषेतील काही संवाद किंवा इतर काही बोलणं असेल तर प्लिज माझ्यासारख्या लोकांसाठी लिंक टाका.
मीरा तशा काही लिंक्स मिळाल्यास नक्की टाकेन.

वाडवळी ही उपभाषा अर्थात डायलेक्ट आहे का?
केशव तुलसी, डायलेक्ट किंवा उपभाषा कशाला म्हणावे याबाबत भाषाविज्ञानामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. यापैकी एक म्हणजे सर्वच भाषा आहेत, डायलेक्ट असे काही वेगळ्याने न मानणारादेखिल वर्ग आहे. वाडवळीबद्दल आणखि अभ्यास झाल्यावरच मी याबाबत काही बोलु शकेन.

फार पूर्वी ट्रेनने प्रवास करताना ऐक्ली होती. यात आणखी एक म्हणजे 'आळॉ, गेळॉ' अशी ऑ कारान्त पद्धतीने देखील वाडवळी भाषा बोलली जाते
चिवट, ही वाडवळी नसण्याची शक्यता आहे. कारण मी ऐकलेल्या वाडवळीच्या विविध प्रकारांमध्ये असे दिसले नाही. मात्र वसईत कादोडी नावाची बोली बोलली जाते. ती ही असण्याची शक्यता मला वाटते.

एक दोन संवाद ,उतारे ?
srd, वेळ मिळाला की देतोच.

Submitted by चिवट on 4 July, 2019 - 10:27 >>>>> आभारी आहे. भाषा ऐकायला मिळाली. गोड आहे. बऱ्यापैकी समजते आहे. कोकणी भाषेच्या जवळ वाटते.

कादोडी >> त्यांना कादॉ म्हणतात का??
नक्की माहित नाही.

आभारी आहे. भाषा ऐकायला मिळाली. गोड आहे. बऱ्यापैकी समजते आहे. कोकणी भाषेच्या जवळ वाटते.
धन्यवाद मीरा. खरं म्हणजे भाषेचा गोडवा बरेचदा ती कशा तर्‍हेने बोलली जाते यावर असतो असे मला वाटते. वाडवळी जी तुम्ही विडियोत पाहिली ऐकली ती कदाचित एका भागातील असेल. निरनिराळ्या भागात वेगवेगळे हेल वापरून ही भाषा बोलली जाते.

मोहना, शुभेच्छांसाठी खुप खुप आभार.

निरनिराळ्या भागात वेगवेगळे हेल वापरून ही भाषा बोलली जाते. >>> वसईत हेल काढून ऐकली आहे, ट्रेनमध्ये तरी.

आता हीच नक्की ऐकली ना मी की सामवेदी ऐकली, त्यांची पण एक वेगळीचं बोलीभाषा आहे. कारण वरच्या व्हिडीओतली भाषा मला ओळखीची वाटली नाही.

अलिबागच्या आसपासचा सोमवंशी क्षत्रिय समाज बहुतेक ही भाषा बोलत नसावा. ना सो त एक शेजारी होते म्हणून माहिती.

अलिबागच्या आसपासचा सोमवंशी क्षत्रिय समाज बहुतेक ही भाषा बोलत नसावा. ना सो त एक शेजारी होते म्हणून माहिती.
अन्जू आपलं निरिक्षण अगदी बरोबर आहे. काहींनी तेथे जाऊन माग काढण्याचा प्रयत्न केला असता असे कळले की अनेक वर्षांपूर्वीच त्यांच्यात ही बोली लुप्त झाली झाली आहे. कुणीच बोलत नाहीत.

कादोडी भाषा विरार वसई पट्ट्यात कुपारी समाजाची बोलीभाषा आहे. क्रिस्चन समाज अजूनही ही भाषा बोलतो.

अलिबाग कडे वेगळी भाषा बोलली जाते मराठी कडे झुकते पण हेल आणि शब्द थोडे वेगळे असतात पण आता जास्त कोणी बोलत नाही. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी झाल्यामुळे असे झालेय. अलिबाग माझ सासर आहे आणि विरार माहेर म्हणून या दोन्ही भाषा माहिती आहेत

कादोडी भाषा विरार वसई पट्ट्यात कुपारी समाजाची बोलीभाषा आहे. क्रिस्चन समाज अजूनही ही भाषा बोलतो.>>>>>>

यूट्यूबवरील सुनील डिमेलो यांनी टाकलेले व्हिडियो पाहिले.एका व्हिडियोच्यावेळी त्यांना विचारले की वाडवळ समाज आणि कुपारी समाज यांच्यात काय फरक आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाडवळ बोली, सोमवंशी क्षत्रिय समाज बोलतो आणि कुपारी समाज्,(हा पूर्वीचा सामवेदी ब्राह्मण समाज) कादोडी बोली बोलतो.

अनिश्का तुला येते का हि बोलीभाषा किंवा गावात, नातेवाईकात बोलतात का. आमच्या शेजारी चौलचे होते सोमवंशी क्षत्रिय चौकळशी समाजाचे, त्यांच्याकडे प्रमाण मराठीच बोलायचे.

आठवत नाही नेमके कोठे मायबोलीवर की व्रुत्तपत्रात पण या भाषेवरील अश्याच आशयाचा लेख वाचल्याचे आठवते आहे..त्यातिल लेखक गावात जाउन अधिक माहीती गोळा करण्याच्या प्रयत्नात होता...ते तुम्हीच का?

अंजू आमची असही खास बोलीभाषा नाही कही शब्द हेल वगेरे असतात वेगळे पण खुप नाही...
म्हणजे अगदी माझ्या आजी च्या पीढितील लोक ही नॉर्मल मराठी च बोलतात. जस मी म्हटले हेल काढून बोलणे काही गोष्टित हे तर आहे पण भाषा अपण बोलतो त्या पेक्षा विशेष वेगळी नाहीये. माझ गाव मांडवा आहे त्याच्या बाजुचे कोप्रोली

यूट्यूबवरील सुनील डिमेलो यांनी टाकलेले व्हिडियो पाहिले.एका व्हिडियोच्यावेळी त्यांना विचारले की वाडवळ समाज आणि कुपारी समाज यांच्यात काय फरक आहे ))))) --- सुनील माझा वर्गमित्र आहे.. तो कुपारी आहे. मी आहे सोमवंशी पण आमच्या जातीत सुद्धा मुंबई उरण अलिबाग नुसार थोडा फरक आहे बोली भाषेत. पण आम्ही प्रमाण मराठीच बोलतो फक्त काही शब्द वेगळे जसे विळी ला मोरली, टाकीला साठ वगैरे....

सर्वांचे मनःपूर्वक आभार. वाडवळीवर लवकरच काम सुरु करण्याची इच्छा आहे. आजवर झालेले काम हे शब्दकोशाच्या संदर्भात आहे. त्यातही चिंचणीच्या श्री. अशोक सावे यांचे यावरील काम बरेच प्रसिद्ध आहे. भाषाविज्ञानाच्या संदर्भातील काम म्हणजे या भाषेच्या व्याकरणावर, त्यातील स्वर व्यंजनावर आणि इतर महत्वाच्या पैलूंवर सविस्तर संशोधन करण्याची माझी इच्छा आहे.
साधारणपणे साठीच्या आसपासच्या मंडळींकडून माहिती गोळा करावी असे वाटते कारण त्याहून तरूण माणासे जे वाडवळी बोलतात ते मराठीच्या जास्त जवळचे आहे. काही ठिकाणी ९० वर्षाची वृद्ध मंडळी आहेत त्यांना गाठावे असेही एक डोक्यात आहे. काम प्रचंड आहे. पाहु या आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सुरु होईल अशी आशा आहे.

Pages