गूढ अंधारातील जग -३

Submitted by सुबोध खरे on 26 December, 2019 - 08:41

गूढ अंधारातील जग -३

पाणबुडीतील आयुष्य

पाणबुडीत आयुष्य फार खडतर असतं. ते म्हणेज अक्षरशः तुम्ही एखाद्या यंत्राच्या आत मध्ये राहण्यासारखे असते, जेथे हवा पाणी आणि जागा या तिन्ही गोष्टी दुर्मीळ असतात. कारण पाणबुडीचा आकार जितका लहान करता येईल तितका चांगला (तितके तिला लपणे जास्त सोपे होते) आणि आहे त्या जागेत जास्तीत जास्त अस्त्रे, संवेदक(sensor), बॅटरी भरता येतील तितके भरले जाते.
त्यातून या खडतर जागेत काम करताना लोकांच्या हातून काम बिनचूक होणे अत्यावश्यक असते अन्यथा सर्वच्या सर्व लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीमुळे पाणबुडीत काम करणाऱ्या लोकांची एकमेकांशी नाती अतिशय घट्ट होतात आणि ती बहुधा आयुष्यभर टिकून राहतात.
पाणबुडीत दिवस आणि रात्र असा प्रकार नसतोच कारण कुठेच खिडकी नसते. त्यामुळे तेथे घड्याळाकडे पाहूनच दिवस आहे कि रात्र हे ठरवावे लागते.
नौसैनिकांच्या मेंदूमध्ये दिवस रात्र या चक्रात गडबड होऊ नये म्हणून दिवसा पांढरे दिवे लावले जातात आणी रात्री अतिशय कमी प्रकाशाचे असे लाल दिवे लावले जातात.
तेथील दिवस हा १८ तासांचा असतो. म्हणजे सहा तासाच्या तीन पाळ्या असतात. जागा अतिशय कमी असल्याने तीन जणाना मिळून दोन बिछाने असतात. आणि हे सुद्धा जिथे जागा मिळेल तिथे टाकलेले असतात. कित्येक वेळेस सैनिकांना ५५ सेमी व्यासाच्या( पावणे दोन फूट) टॉर्पेडो ट्यूब
(पाणतीर नलिका) मध्ये झोपावे लागते.
प्रत्यक्ष पाणबुडी जेंव्हा डिझेलवर चालत असते तेंव्हा त्याच्या इन्जिन , जनरेटर , पम्प यांचा सर्वांचा भयानक आवाज येत असतो. कारण आतला आवाज बाहेरच्या जहाजाला येऊ नये म्हणून पाणबुडीच्या बाहेरच्या कवचावर आवाजरोधी रबराचा एक जाड थर लावलेला असतो. त्यामुळे हा आतला आवाज पण बाहेर जात नाही.
आपल्याला रिकाम्या वेळात संगीत ऐकायचे ते एखाद्या पिठाच्या चक्की वर बसून कसे ऐकायला येईल तसा पार्श्वभागावर आवाज चालू असतो. आपला झोपायचा बंक पण हादरत असतो.
आपण एकदा पाण्याखाली गेलो कि बाह्य जगाशी कोणताच संपर्क राहत नाही. त्यामुले ताज्या बातम्या जगात काय चाललं आहे याचा सैनिकाचा काहीही संबंध राहत नाही.
( अनुभव म्हणून हे थोडे दिवस ठीक असेल पण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ फुकट गेला अशीच भावना माझ्या मनात कायम येत असे)
पाणबुडी पाण्याखाली असताना त्यात पाणी हे अतिशय मूल्यवान असते. त्यामुळे कपडे धुणे सारख्या कामाना पाणी नसतेच. सैनिक फिकट निळ्या रंगाचे ढगळ असे सुती कपडे घालतात आणि दर तीन दिवसांनी हे कपडे टाकून दिले जातात.(disposable)

मी विक्रांत या विमानवाहू नौकेवर वर असताना आमचे कॅप्टन रवींद्रनाथ गणेश हे भारताची पहिली अणू पाणबुडी "चक्र"चे कॅप्टन म्हणून काम करून विक्रांतवर कमांड करायला आले होते. एक दिवस विभागप्रमुखांच्या सभेत ते अधिष्ठासी अधिकाऱ्याला(executive officer) सांगत होते कि माझ्या बाथरूम मध्ये फक्त "अर्धी" बालदी पाणी होते त्यात अंघोळ करणे कठीण गेले त्यावर आमचे कमांडर एअर त्यांना म्हणाले सर आता तुम्ही "पाणबुडीत" नसून एका बलाढ्य अशा विमानवाहू नौकेवर आहात. तुमच्या साठी वेगळे न्हाणी घर असून तेथे कमांडिंग अधिकारी याची खास सोय(privilege) म्हणून तुम्हाला २४ तास गरम आणि गार असे आणि पाहिजे तेवढे पाणी उपलब्ध आहे.
त्यांना चक्र सारख्या "अणू पाणबुडीचे" कमांडिंग अधिकारी म्हणून (privilege)"विशेष सोय" म्हणून एक बालदी पाणी मिळत असे.

सैनिक जेंव्हा गस्तीवर जातात तेंव्हा आपल्या घरून अत्यंत कमीत कमी सामान घेऊन येतात. कारण प्रत्येक माणसाला फार तर एक सुटकेस ठेवता येईल एवढीच जागा दिलेली असते.

सर्वच्या सर्व नौसैनिकांना दर तीन महिन्यांनी याच टॉर्पेडो (पाणतीर) नलिकेतून अंधाऱ्या रात्री पाणबुडीच्या बाहेर पडण्याचा (escape) आणि पोहून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सराव करावा लागतो.
ज्यांनी अंधाऱ्या रात्री समुद्रात पोहण्याचा अनुभव घेतला आहे त्यांना हे किती भयाण आहे त्याचा अनुभव येऊ शकतो.

पाणबुडीच्या लपून राहण्याचे मुख्य कारण ती अजिबात आवाज करत नाही. हा आवाज होऊ नये म्हणून प्रत्येक नट बोल्ट ला रबरी वॉशर लावलेला असतो. डिझेलच्या इंजिन, जनरेटर, पम्प, पाईप या सर्वांच्या हादऱ्यांमुळे हे नट आणि बोल्ट सारखे ढिले होऊ नयेत म्हणून ते सारखे घट्ट करत राहायला लागते.

पाणबुडीची डिझेल इंजिने हि जनरेटर चालवतात. या जनरेटर वर तयार होणाऱ्या विजेनेच पाणबुडीचा पंखा चालतो आणि याच विजेने त्यातील बॅटरी चार्ज होत असते. हि बॅटरी कायम उत्तम स्थितीत ठेवावी लागते त्यातील सल्फ्युरिक आम्ल पाणी याची पातळी कायम ठेवावी लागते. त्यात तयार होणारी सल्फ्युरिक आम्लाची वाफ बाहेर कुठेही जाऊ शकत नसल्याने पाणबुडीतील हवेचा दर्जा खालावू नये म्हणून त्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो.

समुद्रात खोल गेल्यावर पाण्याचे तापमान ४ अंश सेल्सियस असते त्यामुळे पाणबुडीचे तापमान सुद्धा वर आणावे लागते( हवा गरम करावी लागते) आणि किनाऱ्यावर आले कि तापमान २४ ते ३८ अंश से असते ते पण नियन्त्रित करावे लागते( हवा थंड करावी लागते).

पाणबुडीतील स्वयंपाक घर हेही अतिशय लहान असते आणि तेथील सर्व स्वयंपाक हा विजेच्या शेगडीवरच करावा लागतो. त्यामुळे भारतीय पद्धतीचा स्वयंपाक विशेषतः फोडणी सारख्या गोष्टी जरा जपुनच कराव्या लागतात. त्यामुळे तेथे मिळणारे अन्न हे जास्त करून अगोदरच तयार केलेलं असते. तरीही अशा बंद जागेत इतर फारशी कोणतीही सुखसोयी नसल्यामुळे सैनिक जेवणाबाबत जास्त काटेकोर असतात. यामुळे त्यांना नुसतेच चविष्ट नव्हे तर पौष्टिक अन्नहि मिळेल अशी व्यवस्था करावी लागते.

पाणबुडी जेंव्हा गस्तीवर निघते तेंव्हा ती किती दिवस जाणार आहे आणि कुठे जाणार आहे हे त्या पाणबुडीच्या कॅप्ट्नलाही माहित नसते. त्याला हि आज्ञा बंद लिफाफ्यामध्ये बंदर सोडताना दिली जाते. साधारण शिधा आणि रेशन किती दिवसाचे भरले आहे यावरून सैनिक अंदाज करत असतात. पण आपल्या मागे आपल्या कुटुंबाला काही गरज लागली तर काय करायचे याची सर्व तजवीज सैनिकाला करून ठेवावी लागते. घरचे कोणी आजारी असेल काही महत्त्वाचे काम असेल तर काय करायचे याची काळजी सुद्धा मागे ठेवूनच सैनिकाला निघावे लागते.

बाकी युद्धाचा सराव सारख्या गोष्टी तर होतच राहतात. सैनिकांना तंदुरुस्त राहण्यासाठीपाणबुडीत एक ८ x १० फुटाची छोटेखानी व्यायामशाळा पण असते. लोक तेथे व्यायाम करून आपले वजन नियंत्रणात ठेवतात. शिवाय पाणबुडीत तळण्याची प्रक्रिया जवळ जवळ करताच येत नाही. त्यामुळे तेथील आहारात तेलाचा वापर कमीच असतो शिवाय मिताहार आणि वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनेच आहार तयार केला जातो. त्यात सर्व तर्हेची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील अशा तर्हेची सोयही केली जाते.
ड जीवनसत्त्व हे सूर्य प्रकाशातुन मिळते. साधी पाणबुडी ३०-४५ आणि अणुपाणबुडी ९० दिवसाच्या गस्तीवर जातात तेंव्हा त्यांना असा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे त्यांना दर महिन्याला ६०, ००० IU ची गोळी महिन्याला एक या प्रमाणात दिली जाते. (अशा नौसैनिकांची गरज रोज १००० IU इतकी असते)
पाणबुडीवरील नौसैनिकांच्या आहारात रोजच्या रेशन व्यतिरिक्त अतिरिक्त चीज बटर आणि इतर दुधाचे पदार्थ पण अंतर्भूत असतात.

पाणबुडी हो दंडगोलाच्या आकारात असल्यामुळे अगदी शांत समुद्रातही ती भरपूर गोल डोलत(rolling) असते आणि खवळलेल्या समुद्रात तर ती भयानक हलते. ४५-६०डिग्री इतकी दोन्ही बाजूना. ४५-६०डिग्री इतकी दोन्ही बाजूना म्हणजे ३० डिग्री एका बाजूला.त्यामुळे समुद्र खवळलेला असेल तर बहुसंख्य नौसैनिक पाणबुडी पाण्याखालीच असेल तर बरे असे म्हणतात.

पाणबुडी हि साधारण २०० ते ४०० मीटर इतक्या खोलीपर्यंत डुबकी मारून जाते तेथे तिच्यावर असणारा पाण्याचा दाब हा सदर १० मीटर ला १ atm किंवा १ kg/ sq cm असतो म्हणजेच १०० मीटर खोली वर हा दाब ११ atm किंवा साधारण ११ kg/ sq cm असतो. आपल्या कारच्या टायर मध्ये २. ५ kg/ sq cm इतका दबाव असतो

तेथे ४० जणांना मिळून एक किंवा दोन संडास असतात आणि त्याचा मैला पाण्याखाली असताना बाहेर टाकण्यासाठी दाब देऊन बाहेर टाकणारी पम्पावर चालणारी प्रणाली असते त्यात पहिल्यांदा मैल एका पाईप मध्ये घेऊन वरील झडप बंद करावी लागते बाहेरील झडप उघडावी लागते आणि मगच पम्प चालू करावा लागतो यात काही चूक झाली तर याच संडासात मेल्याचे कारंजे उडते. हा अनुभव जवळ जवळ १००% सैनिकांनी घेतलेला असतो.

प्रत्येक ठिकाणी असे डोळ्यात तेल ठेवून काम करावे लागते.

सैनिकांना शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्या पण खंबीर असावे लागते. कारण महिनोन्महिने कुटुंबापासून दूर अंधाऱ्या जगात ते राहतात जेथे अन्न वस्त्र आणि निवारा सारख्या मूलभूत गरजा सुद्धा नीट पूर्ण होत नाहीत.

मानाची म्हणून समजली जाणारी नोकरी प्रत्यक्ष काय असते याची सामान्य माणसाला साधी जाणीव ही नसावि याची खंतही काही वेळेस आढळून येते. हे सर्व मागे टाकून हि माणसे काय मानसिकतेने तेथे नोकरी करत असतात याचे मला राहून राहून फार आश्चर्य आणि कौतुक वाटते.

लष्करातील( भूदल वायुदल आणि नौदल) कमांडो आणि पाणबुडीतील सैनिक हे अतिशय समर्पित(dedicated) भावाने काम करत असतात. पाणबुडीतील नौसैनिक हे सुरुवातीला काही तरी रोमांचक करायचे म्हणून भरती होतात परंतु त्यांच्या प्रशिक्षणानंतर अतिशय खडतर आयुष्य असले तरी फारसे कोणी सोडून जात नाही( वैद्यकीय कारणामुळे बाहेर काढावे लागलेले सोडून). अगोदर त्यांना यासाठी मिळणारा भत्ता फक्त १२०० रुपये होता. या तुटपुंझ्या पैशासाठी कधीच कोणी पाणबुडी जॉईन करत नव्हते.

हा भत्ता ६ व्या वेतन आयोगा ने तो हुद्द्याप्रमाणे ५००० ते १०,०००/- केला आणि आता ७ व्या वेतन आयोगात तो १०००० ते २०,०००/- केला आहे असे ऐकतो. हे निदान काही तरी सन्मान्य(RESPECTABLE) आहे

पण अशा "भत्त्यासाठी" आयुष्यभर अंधारात काढणे हे फारच जास्त आहे.

अशा नाही चिरा नाही पणती म्हणून जगणाऱ्या माणसांना माझ्या तर्फे एक दंडवत.

प्रत्यक्ष पाणबुडीत काम कसे चालते हे पाहण्यासाठी आपण रॉकी आणि मयूर यांच्या हायवे ऑन माय प्लेट या कार्यक्रमाचे हे दोन व्हिडीओ जरूर पहा.
https://www.youtube.com/watch?v=aCSa0xglJNc
https://www.youtube.com/watch?v=MEO9l5jq_iM
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप खडतर आयुष्य आहे.
कधीच परत न मिळणाऱ्या आयुष्यातील काही वर्ष अंधार कोठडीत काढणे हा मोठा त्याग आहे .
तुम्ही जे वर्णन केले आहे ते वाचून अंगावर काटा येत आहे.
प्रत्यक्ष जे ते जीवन अनुभवत असतील त्यांची अवस्था काय होत असेल.
आता अनेक शोध लागले आहेत .
पाणबुडी ही मनुष्य विरहित करणे फारसे अवघड नाही.
AI चा वापर जास्तीत जास्त करणे आणि मनुष्य बळ कमीत कमी (शक्यतो नाहीच) वापरणे हे मानवता च्या नजरेने सुद्धा गरजेचं आहे.

4 था भाग हा
पाणबुडी चे किती प्रकार आहेत.
प्रकारा नुसार वर्गीकरण.
रशिया ,फ्रान्स,आणि जर्मनी ह्या व्यतिरिक्त भारताला पाणबुडी कोणत्या देशाने दिली आहे.
भारतीय बनावटीची पाणबुडी सेवेत आहे का.
किती भाड्या नी आहेत आणि किती खरेदी केलेल्या ही माहिती ध्या

सुंदर माहिती. वाचताना एकदम त्या जगात घेउन जात आहे ही लेखमाला!

काही प्रश्न: (उत्तरे जमतील तशी सवडीने द्या)
- या अंधारातून नेहमीच्या उजेडाची सवय करायला जड जात असेल, त्याकरता काही प्रोसीजर असते का? अर्ध्या रात्री पोहून किनार्‍यावर जाण्याचा उल्लेख वाचला. त्यापेक्षा आणखी काही वेगळी मदत केली जाते का?
- पाणबुडीतील सैनिकांकरता डॉक्टर त्या स्टाफ मधे असतात का?
- पाणबुडी किनार्‍यावर असणे आणि खोल समुद्रात गस्तीवर असणे याच दोन 'स्टेट' असतात का?
- जेव्हा पेरिस्कोप मधून पाहायचे असते तेव्हा कितीही खोल पाण्यात असेल तरी तेथून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत वरती येउ शकणारा पाइप अशा पाणबुडीत असतो का?

घड्याळात १० वाजलेले दिसत आहेत पण ते सकाळचे की रात्रीचे कळत नाही हे फार डेंजर फीलिंग आहे.

सबमरिन खुप खोलवर जाते तेव्हा तेथील महाकाय जलचर जसे व्हेल शार्क्स मोठे २ टनी स्क्विड ऑक्टोपस वगैरेंच्या प्रतिक्षिप्त क्रिया काय असतात ? जसे पक्ष्यांच्या थव्यामुळे विमान अपघाताच्या बातम्या घड़तात तसे ह्या जलचरांमुळे पाणबुडीला काही अपघात होण्याच्या शक्यता असतात का ? झालेत का ?

कालव्हेरी या पाणबुडीचीही वजन १८७० टन आहे. तर अरिहंतचे ६००० टन आणि रशियाकडून घेतलेली "चक्र"चे वजन १२००० टन आहे.

त्यामुळे २ टनांच्या जलचरामुळे पाणबुडीला काहीही फरक पडत नाही. मुळात पाणबुडी चालू असेल तर त्याचा आवाजामुळे जलचर जवळ फिरकतही नाहीत.

जेव्हा पेरिस्कोप मधून पाहायचे असते तेव्हा कितीही खोल पाण्यात असेल तरी तेथून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत वरती येउ शकणारा पाइप अशा पाणबुडीत असतो का?

पाणबुडीच्या पेरिस्कोपची उंची ६० फुटापर्यंत असू शकते. साधारण पणे पाणबुडीच्या बॅटऱ्या अपरात्रीच चार्ज केल्या जातात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभागाखाली ५० फुटावर असलेली पाणबुडी रात्री २ वाजता विमाने किंवा उपग्रह याना दिसणे कर्म कठीण आहे. तेसुद्धा ती पाणबुडी तिथे आहे हे नक्की माहिती असेल तर.
https://www.maayboli.com/node/72810

हा पाईप साधारण ५०- ६० फूट इतकाच असतो त्यामुळे पेरिस्कोपने पाहण्यासाठी किंवा केंद्राकडे संदेश पाठवण्यासाठी पाण्याखाली ५०-६० फूट एवढ्या खोलीवर यावे लागते.

अर्थात आता संदेशवहनासाठी भारताने अति निम्न क्षमतेच्या ध्वनिलहरींनी(ELF EXTREMELY LOW FREQUENCY) संदेश वाहन चालू केल्यामुळे आपल्या पाणबुड्याना (विशेषतः अणुपाणबुड्याना) पृष्ठभागावर येण्याची आवश्यकता बरीच कमी झाली आहे.
हा तपशील नंतरच्या भागात येईलच The US, Russia and India are the only nations known to have constructed ELF communication facilities. The Indian Navy has an operational ELF communication facility at the INS Kattabomman naval base to communicate with its Arihant class and Akula class submarines. https://en.wikipedia.org/wiki/Project_Sanguine

आत्ता सुट्टीत आम्ही कारवार वरून जात होतो तेव्हा तिथल्या नेव्हल बेस entry ला 2 ते तीन किलोमीटर लांब रांग होती सामान्य लोकांची. तिथे काही tourist attraction आहे का? Google वर काहीच माहिती सापडली नाही. विशाखापट्टणम ला फक्त पाणबुडी बघायची म्हणून काही वर्षांपूर्वी गेलो होतो. वेळ नव्हता म्हणून आणि 3 किमी रांगेत उन्हात उभं राहणं शक्य नव्हते म्हणून कोणाला विचारले नाही काय आहे.

अर्ध्या रात्री पोहून किनार्‍यावर जाण्याचा उल्लेख वाचला. त्यापेक्षा आणखी काही वेगळी मदत केली जाते का?

पाणबुडी नादुरुस्त झाली किंवा त्यात काही अपघात झाला तर त्यातून बाहेर पडून आपला जीव वाचवण्यासाठी करण्याचा सराव आहे हा.

पाणबुडीच्या पुढच्या भागात असलेल्या पाणतीर (torpedo) मारण्याच्या नळकांड्यातून सरपटत बाहेर पडून प्रचंड दबाव असलेल्या खोल पाण्यातून पृष्ठभागावर येण्याची सवय व्हावी म्हणून हा सराव मधून मधून केला जातो.

आपण वर दिलेल्या दुव्यातील व्हिडीओ पाहिलात तर हे लक्षात येईल.

नौदलात येणाऱ्या प्रत्येक सैनिकास "पोहण्याची चाचणी" पास व्हावेच लागते. अन्यथा त्याला पहिली बढतीच दिली जात नाही. हि चाचणी म्हणजे संपूर्ण गणवेशात बुटासकट १०० मीटर पोहून पार करायचे असतात.

आपण जेंव्हा जहाजातून पाण्यात पडतो तेंव्हा काही अर्ध्या चड्डीत नसतो.

फुलशर्ट फुल पॅन्ट आणि बुटासकट पोहायला गेलात तर शर्टात आणि पॅन्ट मध्ये पाणी शिरून ते फुगतात आणि १०० मीटर पोहणे पण कठीण होते.

लष्करी आयुष्यात साध्या साध्या गोष्टींबाबत सुद्धा पार टोकाचा विचार करावा लागतो

रंजक पण अतिशय महत्वाची माहिती खरे सर.
तुमच्यामुळे नाविक दल आणि खास करून पाणबुडीतील सैनिकांच्या खडतर आयुष्याची ओळख होते आहे.

जसे अवकाशात जास्त काळ राहणार्‍या अवकाशवीरांच्या हाडांच्या घनतेत ग्रॅविटी अभावी जसा फरक दिसून येतो तसे पाणबुडीत प्रेशर नियंत्रित केले असले तरी लाँग टर्म काही तब्येतीच्या तक्रारी पाणबुडीतील सैनिकांच्या मागे लागतात का? निवृत्तीनंतर सरकार ह्या सैनिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवते का?

लाँग टर्म काही तब्येतीच्या तक्रारी पाणबुडीतील सैनिकांच्या मागे लागतात का?
तब्येतीच्या शारीरिक तक्रारी फारशा नसतात. कारण बहुसंख्य सैनिक तरुण आणि निरोगी असतात आणि जसे जसे वय वाढत जाते तसे त्यांना प्रत्यक्ष पाणबुडीत गस्त घालण्याऐवजी किनाऱ्यावरील कामे जास्त दिली जातात. परंतु त्याच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी जास्त असतात त्या पुढच्या भागात येतीलच.

निवृत्तीनंतर सरकार ह्या सैनिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवते का?

सर्व नौसैनिकांना स्वतः साठी आणि बायकोसाठी आयुष्यभर आणि अवलंबून असे पर्यंत (२५ वयापर्यंत)मुलांना सर्व वैद्यकीय सेवा लष्करी रुग्णालयात फुकट उपलब्ध आहेत. लष्करी रुग्णालयात किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट पासून बायपास आणि कर्करोगाचे आधुनिक उपचार या सुविधा उपलब्ध आहेत.

डिझेलवर चालत असते तेंव्हा त्याच्या इन्जिन , जनरेटर , पम्प यांचा सर्वांचा भयानक आवाज येत असतो. कारण आतला आवाज बाहेरच्या जहाजाला येऊ नये म्हणून पाणबुडीच्या बाहेरच्या कवचावर आवाजरोधी रबराचा एक जाड थर लावलेला असतो. त्यामुळे हा आतला आवाज पण बाहेर जात नाही.
आपल्याला रिकाम्या वेळात संगीत ऐकायचे ते एखाद्या पिठाच्या चक्की वर बसून कसे ऐकायला येईल तसा पार्श्वभागावर आवाज चालू असतो.
हे पटायला थोडे कठीण जाते आहे.
इंजिन आणि सैनिकांचे झोपायचे ठिकाण हे वेगळे असणार .
सैनिक जिथे झोपत असतील ती भाग साऊंड proof करायला आताच्या आधुनिक काळात काय तांत्रिक अडचण आहे.
सविस्तर सांगावे .
उस्तुकाता आहे.

डिझेलवर चालत असते तेंव्हा त्याच्या इन्जिन , जनरेटर , पम्प यांचा सर्वांचा भयानक आवाज येत असतो. कारण आतला आवाज बाहेरच्या जहाजाला येऊ नये म्हणून पाणबुडीच्या बाहेरच्या कवचावर आवाजरोधी रबराचा एक जाड थर लावलेला असतो. त्यामुळे हा आतला आवाज पण बाहेर जात नाही.
आपल्याला रिकाम्या वेळात संगीत ऐकायचे ते एखाद्या पिठाच्या चक्की वर बसून कसे ऐकायला येईल तसा पार्श्वभागावर आवाज चालू असतो.
हे पटायला थोडे कठीण जाते आहे.
इंजिन आणि सैनिकांचे झोपायचे ठिकाण हे वेगळे असणार .
सैनिक जिथे झोपत असतील तो भाग साऊंड proof करायला आताच्या आधुनिक काळात काय तांत्रिक अडचण आहे.
सविस्तर सांगावे .
उस्तुकाता आहे.

बघतो
अजुन बघितला नाही म्हणून क्षमस्व

"पाणबुडी किनार्‍यावर असणे आणि खोल समुद्रात गस्तीवर असणे याच दोन 'स्टेट' असतात का?"

पाणबुडीत सूर्य उदय किंवा अस्त नसतोच तर २४ तासाचा दिवस असायचे कारणच नाही म्हणून तेथे १८ तासाचा दिवस असतो
याचे कारण अभ्यास केल्यावर असे आढळले कि माणूस अशा वातावरणात जास्तीत जास्त सहा तासापर्यंत आपला उत्साह ठेवू शकतो यानंतर त्याची कार्यक्षमता झपाट्याने खाली जाते. म्हणून तेथे सहा तासाचीच शिफ्ट असते. पाणबुडीत माणसे जितकी कमी तितकी श्रेयस्कर असते त्यामुळे कमीत कमी माणसांकडून जास्तीत जास्त क्षमतेने काम करून घेणे आवश्यक ठरते
यामुळे पाणबुडी जेंव्हा गस्तीवर जाते तेंव्हा 18 तासाचा दिवस आणि किनाऱ्यावर असते तेंव्हा 24 तासाचा दिवस पाळला जातो.
यावर जास्त विस्ताराने पुढे येईलच.

समुद्र तळाशी (हा पण शब्द चुकीचा आहे)
म्हणून पाणबुडी चा ठाव ठिकाणा लागत नाही हा गैर समज दूर करा.
काही गोष्टी कोणताच देश कधीच उघड करत नाही.
ज्या दिवशी पाणबुडी बनली त्याच दिवशी ती कशी नष्ट करायची ह्या वर विचार सुरू झाला.
ज्या दिवशी अनु bomb banle aani त्याचा विनाश जगाने बघितला त्याच दिवशी अनु बॉमबस्फोटां होण्या अगोदर त्याला कसा नष्ट करायचा ह्याचा विचार चालू झाला ..
कल्पना चावला आकाशात गेली पण परत पृथ्वी वर नाही आली.
हा योगायोग नाही अशी पण शंका आहे.
तेव्हा पाणबुडी शोधून नष्ट करणे अवघड आहे
असा समज नक्की नसावा.
वेळ आली की प्रतक्षिक बघायला मिळेल.

"पाणबुडी चा ठाव ठिकाणा लागत नाही हा गैर समज दूर करा."
आपला पाणबुडी विरोधी युद्धाचा (antisubmarine warfare) अनुभव बराच असावा मग आपणच याबद्दल माहिती देऊन आमच्यासारख्याना उपकृत करावे ही विनंती

मी पहिल्या भागातच माझ्या तुटपुंज्या आणि सीमित ज्ञानाबद्दल लिहिले असून सुरुवातीलाच माफी मागितली आहे ती अशी:--
"एखादे वेळेस माहिती विसंगत किंवा चुकीची असण्याची शक्यता आहे त्यात कुणी दुरुस्ती सांगितली तर मी प्रथमच माफी मागतो आहे आणि या चुका सुधारण्याचा माझा प्रयत्न राहील हे हि नमूद करू इच्छितो."

आपण ही माहिती दिल्यास मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन_/\_

Pages