तो एक तास

Submitted by माऊमैया on 25 December, 2019 - 02:24

एवढ्या गुलाबी थंडीत, झोप पूर्ण झाली नाही, हे कळत असूनही उठावंच लागतं. आणि सगळं भराभर आवरून घ्यावं लागतं. कारण लगेच ' तो एक तास ' सुरु होतो. नेहमीच येतो तसा. पण हल्ली एक महिनाभर, तो मला अगदी नकोसा वाटतो... आणि तिला तर अजिबातच आवडत नसेल 'तो'. असं का वागते ती सध्या, काही कळतंच नाही; आणि काय उपाय करावा, तेही समजत नाहीये.

ती, म्हणजे यावर्षी बालवाडीत जायला लागलेली माझी लाडुली लेक. आणि मी, तिची आई... तिच्यामुळे आईपणाच्या एकेक पायऱ्या चढत शिकणारी...

रोज सकाळी घाई-गडबड करून कसंबसं सगळं उरकून, तिचा डबा- बाटली भरून , रुममध्ये प्रवेश केला, की सुरू होतो.... तो एक तास...
तिला उठवतानाच दोघींनाही माहित असतं, की तिला अजिबातच शाळेत जायची इच्छा नाहीये. पण मागच्या महिन्यात बरेच दिवस सुट्टी झाल्यामुळे, आता तिने रोज शाळेत जावं, अशी माझी इच्छा ( म्हणजे खरंतर हट्टच) असते. मग तिचे बहाणे सुरू होतात, " अजून झोप येतेय, झोपायचंय. " मग शक्यतो तिच्या कलाने घेऊन, तिला न रडवता ( आणि माझा आवाज प्रेमळ ठेवून ), रुमच्या बाहेर आणणं, ही माझी ( म्हणजे माझ्या सहनशक्तीची ) पहिली कसोटी.

बाहेर आलं की, दात घासायची इच्छाच नसते. मग पेस्टच आवडत नाही, ब्रशच आवडत नाही, इथे नाही उभी राहणार, कडेवर उचलून घे; इत्यादी विविध कारणं येतात. ब्रश तोंडात जाण्यासाठी, खूप विनंत्या, दातांच्या टीचरकडे (डेन्टिस्ट) नेण्याची भीती हे प्रकार झाले की, पुढचा कार्यक्रम व्यवस्थित होतो. कारण मुळातच दात घासणं, हे तिच्या आवडीचं काम. आणि नंतर चूळ भरणे, हे सगळ्यात नावडतं काम. मग इथून माझा चढा सूर लागयला सुरुवात होते, कारण घड्याळाचा काटा पण माझं ऐकत नसतो. कसंबसं समजावून, ओरडून जबरदस्तीने, चूळ भरून होते.

इथपर्यंत वेळ हातातून निसटून चाललेली असते. आणि माझ्या सहनशीलतेची मर्यादा संपत येते. तिची आंघोळ हा आमच्या युद्धातला शेवटचा टप्पा. ( हो, युद्धच. कारण प्रेमाने परिस्थिती हाताळण्यासाठी वेळच उरलेला नसतो माझ्याकडे. आणि आमच्या दोघींच्या कर्कश आवाजांमुळे घराचे रणांगण होते. एव्हाना शेजारच्या चार घरांत, ती शाळेत निघालीय, हे समजलेलं असतं. ) तिला माहिती असतं, एकदा आंघोळ झाली की मी तिला शाळेत पाठवणारच. ती पूर्ण असहकार पुकारते. मग मात्र माझ्याकडे पर्यायच नसतो. तिला जबरदस्तीने उचलून बाथरूममध्ये नेते आणि आंघोळ घालते. त्यावेळेस ती प्रचंड रडते, किंचाळते, हात-पाय झटकते, मला मारते. मला अगदी 'पत्थरदिल', निष्ठूर आई व्हावं लागतं तेव्हा.

एवढा गोंधळ झाला की दोघीही दमतो जरा. शेवटची दहा-पंधरा मिनिटं राहिलेली असतात. मग तिला टॉवेल गुंडाळून रुममध्ये नेलं की आमच्या युद्धोत्तर वाटाघाटी सुरू होतात. तिला हवा तो फ्रॉक घालणे ( माझ्या सुदैवाने यंदा तिला गणवेश नाही ), हातात बांगड्या, केसांना क्लिप किंवा एक किंवा दोन पोनी ( छोटी नारळाची झाडं ), हे सगळं ती म्हणेल तस्सं. कधीकधी मोबाईलसुद्धा मिळतो. मग ती न रडता तिची तयारी करु देते. मग तिला पटापट तयार करून चपाती-भाजी भरवून, शाळेच्या गाडीत बसवणे; हा या कार्यक्रमाचा शेवट.

पण या शेवटाकडे येईपर्यंत उशीर झाला आणि खायच्या आधीच गाडी आली, तर तिला उपाशी कशी पाठवणार म्हणून २-३ वेळा, तिच्या पप्पांना सांगितलं तिला शाळेत सोडायला.पप्पा सोडणार म्हटलं की, कळी खुलणार लगेच लाडूची. मग हसत हसत शाळेत जाणार. पण सलग २ दिवस पप्पांनी सोडल्यावर, तिसऱ्या दिवशी शाळेच्या गाडीत बसायला तयारच नाही बाईसाहेब. अक्षरशः ढकलावी लागली तिला गाडीत. २ दिवस तोच हट्ट केला तिने. नंतर नेहमीप्रमाणे जायला लागली.

पण अजूनही रोज सकाळी 'तो एक तास' असतोच. आधी चांगली स्वतःहून शाळेत जाणारी मुलगी अचानक एवढी हट्टी कशी झाली, ते मला कळेना. कारण विचारलं तर म्हणायची, " टीचर ओरडतात." आता स्वभाव मुळातच एवढा नटखट आणि द्वाड आहे की, एकदा कधीतरी ओरडल्या, तरी रोजच ओरडतात असं सांगू शकते ती. मग एकदा एका प्रेमळ संवादातून मी खरं कारण शोधलं आणि ते होतं, "कंटाळा"..... त्याक्षणी खरंच काही उत्तर नव्हतं माझ्याकडे यावर.

रोज सकाळी 'तो एक तास' संपला की, माझं ते स्वतःलाच न पटणारं आक्रमक रुप आठवून मी विचार करत राहते. तिच्यावर एवढं ओरडायला आणि चिडायला मला आवडत नाही खरंतर. ती रडत असताना, माझा हट्ट पूर्ण केलाच पाहिजे, अशी मी तिची जबरदस्तीने तयारी करत असते, तेव्हा खूप वाईट वाटतं. कधी वाटतं, खरंच असं वागायची गरज आहे का? एखाद्या दिवशी तिला शाळेत न पाठवून बघावं का? पण मग वाटतं , तिला तशीच सवय लागली तर? अजून कंटाळा करेल मग. कधी वाटतं, शाळेत नाही पाठवायचं आणि दिवसभर कट्टी करावी तिच्याशी. मग समजेल तिला शाळेत न जाण्याची शिक्षा. पण मला जमेल का दिवसभर अबोला?

माझं लहानपण सुद्धा असंच होतं खरंतर. मलाही शाळेत जायचा खूप कंटाळा होता. मीही लहानपणी खूप मार खाल्लाय, शाळेत जायला नको म्हणून. तेव्हा कारण काय असायचं, ते आठवत नाही. पण कदाचित झोपेतून उठायचा कंटाळा असावा. ( जो अजूनही आहे ). नंतरही अगदी दहावीपर्यंत मला शाळेत जायचा कंटाळाच यायचा. पण जावंच लागेल हे समजत होतं, म्हणून जायचे. माझ्या लाडूचं पण असंच होईल का? इतकी कंटाळवाणी वाटेल तिला शाळा? की तिची शाळा माझ्या शाळेपेक्षा जास्त चांगली असेल? कित्ती ते विचार...

एवढ्या विचारांचं आणि अपराधीपणाचं ओझं घेऊन मी घरी जाते. नजरेसमोर सकाळची रडवेली लाडुली येत असते आणि आता तो रडका लाडू माझ्यावर रागावलेला दिसेल, अशी भीती वाटत राहते घरी पोहचेपर्यंत. पण घरी गेल्यावर माझी हसरी, खट्याळ लाडुली धावत माझ्याजवळ येते; मी उचलून घ्यावं म्हणून. आणि मग आमच्या घट्ट मिठीत 'तो एक तास' कुठेतरी गुडूप होऊन जातो.......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आधी भाजी न खाणारे मुलं मोठे होऊन खायला लागतात का?>>
इतरांचे माहीत नाही पण मी मात्र स्वतः स्वयंपाक करायला लागल्यावर पूर्वी न आवडणार्‍या अनेक भाज्या खायला लागले..

हुशार आहे मुलगी! शाळा कंटाळवाणी असते हे फार लवकर समजलंय तिला Happy

च्रप्स, कठीण आहे तुझं Happy

मृणालिनी, तुझा प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला. होम स्कूलिंग विषयी बरीच वर्षे वाचतेय मी. काही महिन्यांपूर्वी, माझ्या मोठ्या बहिणीनेही हाच सल्ला दिला मला. पण माझ्या सासरी, ही संकल्पना समजावून सांगणे हा मोठा प्रश्न वाटल्याने तो विचार मी तात्पुरता बाजूला ठेवला होता.

पण दोनच दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने हा विषय काढला होता. तेव्हा तुझ्याबद्दल सांगितलं मी त्याला. तुझा हा प्रवास कसा झाला, ते सांगशील का?

पण माऊ मैया मग तिला शाळेतच पाठवू नका. प्रत्येक मुलामधील सृजनशीलता ,कल्पकता समजून न घेणाऱ्या व्यवस्थेत घालून तुमच्या लाडलीला रेस चा घोडा नका बनवू. मीसुध्दा अशीच शिकले. तुम्ही google वर स्यमंतक सचिन देसाई किंवा University of Life असे सर्च करा. मी कधीच शाळेत गेली नाही. किंवा मग दुसरा पर्याय आहे ज्ञानप्रबोधिनी सारखी शाळा. पण लेख मस्त लिहिला आहे. जणू मीच तो एक तास तुमच्यासोबत अनुभवते आहे असं वाटलं. Happy

जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या ही आई वडिलांना प्रश्न पडला. की खरंच शाळेत जाणं गरजेचं आहे का ? शिक्षण काय फक्त शाळेतच मिळतं का ? आणि या प्रश्नांना घेऊन त्यांनी explore केले. माझी आई charted accountant होती. बाबांची सॉफ्टवेअर कंपनी होती. पण ते सगळं wind up करून आम्ही तिघे आमच्या मुळ गावी म्हणजे धामापुरला आलो. आणि तिथून सुरू झाली माझी learning journey.. तुम्ही हा व्हिडिओ पहा. https://youtu.be/fSjRbS6NIag

Happy
छान लिहिलयं माऊमैया.
प्रतिसाद पण छान.
खरतर फेब 20 मधे मी मुलीचे ऐडमिशन (वय अडिच वर्षे) मुलाच्या शाळेत केले होते आणि मी पण तिथेच जॉईन केले होते (हाय स्कुल टिचर). सकाळी 8.30 ची शाळा.
पण मग नंतर टेन्शन येऊ लागले, पहाटेच उठून सगळा स्वंयपाक वगैरे उरकून मुलांचे आवरावे लागणार होते.
स्वंयपाक आणि मुलाचे आवरणे ठिक आहे.
पण मुलगी त्रास देणार, तरी विचार केला होता, थोडा त्रास देईल मग तिलाही सवय होईल.
कोरोनामुळे फायदा, शाळाच नाही Happy
नाहीतर मलाही या दिव्यातून जावं लागले असतं.

भाज्या खायची सवय जितकी लहानपणी लावाल तितके चांगले. मुलगा अजूनही त्रास देतो भाजी खायला.
म्हणून मुलीला सवय लावली तर ती चपाती भात नको आणि नुसत्या भाज्याच चार म्हणते.

छान लिहिले आहे. सगळे वातावरण अगदी डोळ्यांसमोर उभे राहते.
माझा अनुभव सांगते. माझा मुलगा एवढा त्रास नाही द्यायचा, पण त्याला आवडत नाहीय मनापासून हे सगळे, हे जाणवत होते मला.
मग मी त्याच्यासाठी थोडे उशिरा timing असणारी शाळा शोधली. जेणेकरून त्याची झोप पूर्ण होईल. स्वतः चा स्वतः उठलेला असेल आणि मग फ्रेश मनस्थितीत तयार होईल शाळेसाठी.
एखादे वेळी जर उशिरा उठलाच, तर अतिमहत्वाच्या गोष्टी म्हणजे toilet, brushing एवढेच करून, हातपाय धुवून, गप्पा मारत खाऊ घालायचे. आणि त्याच्या आवडत्या कार्टून बद्दल काहीतरी गोष्ट रचून सांगत कपडे वगैरे घालायचे. (उदा. बेन 10ला असे कपडे आवडायचे, डोरा ला पराठा खूप आवडतो, इ. )
अंघोळ मग शाळेतून परतल्यावर. तसेही नर्सरी मधली, पहिली -दुसरीतली मुले खूप कपडे मळवतात, हातपाय खराब करतात. त्यामुळे आरोग्याच्या -स्वच्छतेच्या दृष्टीनेही मला एक डॉ. म्हणून हेच योग्य वाटले. त्यामुळे कायमस्वरूपी तीच पद्धत ठेवली. घरी परतल्यावर छान अंघोळ. शाळेतील कपडे रोज धुवूनच टाकायचे.

मृणालिनी, तुझा व्हिडीओ पाहतेय. पूर्ण नाही पाहिला अजून. पण तुझ्याकडे बघून हे कळतंय की, ज्या हेतूने तुझ्या आई बाबांनी हा निर्णय घेतला, तो हेतू साध्य झाला. निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान शिक्षण घेतलंस तू.

माझी लेक तर सध्या या सुट्टीचा आनंद घेतेय. शाळेकडूनही ऑनलाइन किंवा ऑफलाईन असा कोणताही अभ्यास नाहीये. आम्हीदेखील फार सक्ती नाही करत तिच्यावर. थोडीफार अक्षरे लिहायला शिकलीय. तिचं नाव, पप्पांंचं नाव, मित्र- मैत्रिणींची नावं अशा पद्धतीने अक्षर ओळख चालू आहे. बाकी खेळ आणि चित्रकला. अर्थात तिला जेव्हा वेगवेगळे प्रश्न पडतात, तेव्हा तिला समजेल अशा भाषेत शास्त्रीय माहिती सांगते. त्यामुळे दिवस-रात्र कसे होतात, ऋतू, पाऊस कसा पडतो, सूर्य,पृथ्वी,चंद्र;अशी माहिती आहे तिला.

Mrunali.samad आणि नादिशा, प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.

Pages