रोमिओ

Submitted by सा. on 25 December, 2019 - 10:12

"गली में मारे फेरे
पास आनेको मेरे
कभी परखता नैन मेरे वो
कभी परखता तौर..."
तिसर्‍या मजल्यावरच्या बाल्कनीचा दरवाजा किलकिला झाला आणि आतून गाण्याचे सूर बाहेर आले. त्याबरोबर समोर जलाराम किराणा स्टोअरबाहेर बसलेल्या त्याने मान वर केली. वाण्याच्या दुकानाबाहेर बसून चकाट्या पिटणे हाच त्याचा दिवसभराचा टाईमपास होता. आणि जलारामच्या पोराची त्याच्याशी दोस्ती असल्याने त्याला कोणी हटकत पण नसे.
काही वेळाने ती बाल्कनीत आली. तो सावध झाला आणि उठून उभा राहिला. तिने खाली पाहिले आणि तिची नजर त्याच्याकडे गेली. तो तिच्याकडे टक लावून पहात होता. तिने नजर फिरवली आणि ती रहदारीकडे पहात उभी राहिली. पण त्याची नजर तिच्यावरच रोखली आहे हे तिला माहित होते. काही वेळाने तिने पुन्हा त्याच्याकडे चोरून नजर टाकली. पण तो अनिमिष नेत्रांनी तिच्याकडेच पहात होता. तिने बेपर्वाईने वळल्यासारखे दाखवले आणि ती परत आत गेली. पण जाताजाता तिने खांद्यावरून एक कटाक्ष मागे टाकल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नाही. ती आत गेली तसा त्याने एक उसासा टाकला.
ती गल्लीतून येता-जाताना तो नेहमी पहात असे, पण तिच्या जवळ जायची त्याची कधी हिंमत झाली नाही. याला कारण तिची ती अतिविशाल मम्मी. जेव्हा बघावे तेव्हा मम्मी बॉडीगार्डसारखी तिच्याबरोबर असे. एकदा त्या दोघी रानडे केमिस्टच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मम्मी काहीबाही घेत होती. त्यावेळी त्याने धीर करून तिच्याजवळ जायचा प्रयत्न केला होता. तेवढ्यात मम्मीची नजर वळली. तिने मारक्या म्हशीसारखे त्याच्याकडे रोखून पाहिले आणि तिला हिसडा देऊन आपल्याजवळ ओढले. त्याबरोबर तो तिथल्यातिथे थिजला होता.
मात्र त्याच्या मनात दिवसरात्र तिचाच विचार असे. आपल्यासारख्या सडकछाप टपोरीची त्या बडे घरकी बेटीशी काय बरोबरी, हा विचारही त्याच्या मनाला शिवत नसे.
अचानक तो चपापून उभा राहिला. समोरचे दृष्य पाहून त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती आज खाली उतरली होती.... एकटीच.... आणि त्याच्याकडेच पहात होती.
त्याची नजर जाताच ती पटकन वळली आणि चालू लागली. तो गडबडीने उठला आणि तिच्यामागून निघाला. आज ये मौका नही छोडेंगे.
ती घाईघाईने पार गल्लीच्या टोकापर्यंत गेली, पण तिथे पोचल्याबरोबर रेंगाळली. तो मागे होताच. त्याने घाईने तिला गाठले. ती थांबली.
त्याने धैर्य गोळा केले आणि तो तिच्या अगदी शेजारी खेटून उभा राहिला. तिचा श्वासोःछ्वास वाढला. त्याने तिच्या नजरेला नजर भिडवली. तिचे डोळे लकाकले. त्याने आजूबाजूला पाहिले. टळटळीत दुपारचा सन्नाटा होता. आजूबाजूला कोणी नव्हते.
त्याने धीर एकवटला आणि बिन्दिक्कतपणे तिच्या तोंडाला आपले तोंड भिडवले.
"अय्या!... हे काय!... आय ॲम अ लेडी यू नो!..." तिने नजरेनेच त्याला दटावले आणि ती हळूच दिपक टेलरच्या दुकानामागच्या आडोशाच्या जागेकडे सटकली. त्याने आजूबाजूला एक कानोसा घेतला आणि शेपटी हलवत तिच्यामागे धाव ठोकली....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा मस्तच..
साले ईन लोगो की जिंदगीही कमाल होती है.. हेवा वाटतो बरेचदा !

लालबाग परळ आठवला. तिथे दुकानदाराचा मुलगाच तिला फसवतो. या कथेत मला वाटलं ती त्याला पिशव्या वगैरे उचलायला लावेल.