जगलो थोडे

Submitted by निशिकांत on 11 September, 2019 - 00:36

आयुष्याचे ओझे वाहुन झुकलो थोडे
जीवन जगता शतदा मेलो जगलो थोडे

देवाचा मी दासच होतो, भांडण नव्हते
हार तरी का? प्रश्न करूनी थकलो थोडे

घडणे जे जे तेच घडे तर का न म्हणावे?
सत्कर्माची ऐसी तैसी, चिडलो थोडे

पक्षी सारे सोडुन गेले नवख्या जगती
वठलेला तो वृक्ष बघूनी रडलो थोडे

श्रीमंतांचे झगमग जीवन मृगजळ मजला
तिमिरासंगे दोस्ती करण्या विझलो थोडे

बिनबाह्यांचा सदरा शिवला का? मज पुसती
अस्तिनच्या सापाशी दोस्ती, चकलो थोडे

आनंदाची ओळख नसता दु:ख कशाचे?
विश्वावरती थुंकुन मी पण हसलो थोडे

थाट कशाचा? चिंधी नव्हती लाज लपवण्या
तिरडीवर नववस्त्र मिळाले सजलो थोडे

रखरख सारे, ओल न दिसली "निशिकांता"ला
रिमझिम गजला बरसत आल्या भिजलो थोडे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!!!
.
थाट कशाचा? चिंधी नव्हती लाज लपवण्या
तिरडीवर नववस्त्र मिळाले सजलो थोडे
.
पक्षी सारे सोडुन गेले नवख्या जगती
वठलेला तो वृक्ष बघूनी रडलो थोडे

सर्वच कडवी आवडली खरे तर.

छान आवडली

जगलो आहे

मनसोक्त डुंबावेसे वाटले पण
काठावरतीच जगलो आहे

आख्खी भाकर तर सोडाच
चतकोर वाट्यातच जगलो आहे

नुसतेच पाहणे, वास कसला घेतो
गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे

गुरू त्यांचे प्रबळ होते
राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे

सुख एवढेच निखारे नव्हते
गरम फुफाट्यात जगलो आहे

राजेंद्र देवी