झुबे

Submitted by बयो... on 23 December, 2019 - 03:57

माझे झुबे…
तुझ्या एका टिचकिने
खुळ्‌कन हसायचे
अंगभर शहारायचे
लक्‌ लक्‌ गिरकी,
ती तर कधी थांबुच नये वाटायची......

आठवतं?
त्या दिवशीही
न चुकता उशिरा आलास
माझ्या अपेक्षित देहबोलीच्या बाजूला,
‘सॉरी’चा आव आणत उभा राहिलास...
‘आता हिला कसं समजावू? चे
सगळे हवेतले हिशोब मला
दुसरीकडे शुन्यात (?)
नजर लावुनही जाणवत होते
ओठातली शांतता डोळ्यांतुन ओघळणार इतक्यात..
तू टिचकी मारलीस…
अन्‌ कानांशी ‘छुळ्ळुक'सा झुब्यांचा आवाज झाला...

क्षणार्धात राग विसरुन दोघेही त्या
‘छुळ्ळुक’ जगात रमलो.
तेव्हा पासुन ते झुबे मी घालण्याचा
तुझा अबोल हट्ट
मी मनापासून आपसुक जपला...
जपलं.. त्या टिचकीतही
तुझं असणं..
तुझ्या हातांचा ओझरता स्पर्श.. आणि
आपलं .. फ़क्त दोघांचं
‘छुळ्ळुक' जग...
आठवण अनावर झाली की
मी वेड्यागत स्वत:च टिचकी मारायचे..
पण तुझा स्पर्श
झुब्यांनाही कळायचा?
मग तेही वाट बघायचे.....

भेटायला का आला नाहीस?
वाट बघून बघून
ओंजळीत बसून
माझ्या सुकल्या डोळ्यांत
एकटक बघत बसतात ते..
तुझ्या अपघाताची बातमी
अजुनही खोटीच वाटते त्यांना.
शेवटी पुरुन टाकलं मीच त्यांना
जमीनीत.. खोल खोल...
पण तो "छुळ्ळुक" नाद
आभाळभर उरलाय..
तो कसा? कुठे पुरायचा?
सांगशील?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्ग Sad

आईशप्पथ ,, न्हाय जमणार इतकं ओघवतं ,, मनाला छेदणारं लिखाण आजवर पाहिलं नव्हतं .. अक्षरशः मी छुळ्ळुक जगात जाऊन आलो .. खरंच इतकं हळवं , भावनाप्रधान फार वाचलेलं आहे .. सलाम .. सुरुवातीपासूनच जग , कवितेत रेखाटने म्हणजे भव्यदिव्य काम .. दंडवत

या कवितेमुळेच मी आजपासून तुमचा फ्यान झालोय आणि मला तुम्हाला कळवायला अत्यानंद होतोय कि मी माझ्या जगातील एकमेव असा आहे , कि ज्याने कुणाला तरी फ्यान मानलंय . प्रोफाइल बघितल्यावर तर धक्काच बसला कि आपण एक स्त्री आहात.. तर तुम्ही एकमेव स्त्री आहात कि ज्यांना पहिल्यांदाच फ्यान मानलंय .. कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण आहे .. हे त्रिवार सत्य आहे कि आज मी पहिल्यांदाच कोणालातरी कविता वाचून फयान मानलंय ..