माझा स्वभाव आहे

Submitted by निशिकांत on 6 December, 2019 - 00:02

स्वछंद मस्त जगणे माझा स्वभाव आहे
दु:खात शांत निजणे माझा स्वभाव आहे

गरिबीत पाहिल्या मी हस-या अनेक जखमा
त्या कोंदणी सजवणे माझा स्वभाव आहे

वस्तीत आज माझ्या रडणे निषिध्द आहे
हसणे कधी हसवणे माझा स्वभाव आहे

मजला नकोत कुबड्या अथवा शिड्या कुणाच्या
लागून ठेच, चढणे माझा स्वभाव आहे

बाजार आज भरले ईमान शील विकण्या
सौदे कधी न करणे माझा स्वभाव आहे

वाटेत लाख काटे, मज काळजी कशाला?
येता प्रसंग उडणे माझा स्वभाव आहे

उध्दार मम कराया देवास हाक कैसी ?
करणे प्रयत्न झटणे माझा स्वभाव आहे

पाठीत वार केले, मजला न राग त्यांचा
वाईट ते विसरणे माझा स्वभाव आहे

उपदेश मी न केला, सांगीतली न गीता
हातात शस्त्र धरणे माझा स्वभाव आहे

माझ्या कलेवराला मम अंगणी पुरावे
खांद्यास भार नसणे माझा स्वभाव आहे

"निशिकांत" तू कशाला केलीस आत्महत्त्या ?
पिकण्या अधीच गळणे माझा स्वभाव आहे

निशिकन्त देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users