अंतःकरणाचा अंत (वृद्धाश्रमातील आईच्या मनातील बोल .........)

Submitted by Neha_19 on 5 December, 2019 - 22:42

उन्हाळे पावसाळे सरले आता
काळरात्र फक्त उरली
दूर तुझ्यापासून जाता जाता
नजर नजरेलाही नाही भिडली ....

माझ्या आयुष्यात आला तेव्हा
माझाही पुनर्जन्म झाला
तुझा घट्ट धरलेला हात सोडताना
माझा श्वास कोंडला गेला ......

रडायचा जेव्हा तू रात्री
घ्यायचे मी तुला माझ्या कुशीत
अंतःकरण जड झालंय रे
सावरतेय स्वतःला डोळे पुशीत ......

जेव्हा तू पहिले पाऊल टाकले
आनंदाश्रूनी माझे डोळे पाणावले
माझे पाऊल घराबाहेर पाडताना
तू का नाही रे मला अडवले???

का रे असा वागतो आहेस
एकदा तरी मागे वळून बघ
ही आई खूप वाट बघेल रे तुझी
एकदा तरी माझ्या मनात डोकावून बघ ......

माझ्या स्वप्नातल्या उत्तरार्धातही
असे स्वप्न मी पाहिले नव्हते
तुझ्या आठवणीने तळमळावे लागेल
असे प्रश्नही कधी उद्भवले नव्हते ......

पुरे झालं रे आता आयुष्य
नाही उरलं काही भविष्य
अंधार कोठडी झालीय जीवनाची
वेळ आलीय निरोप घेण्याची ........

कितीही मोठं झालं माझं बाळ
तरी चिमुकलाच रे तू माझ्यासाठी
अजून मोठा हो चिरंजीवी भव
माझे आशीर्वाद आहेत तुझ्यापाशी .......

- नेहा हातेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users