मेंरे साजन है उसपार...

Submitted by अतुल ठाकुर on 4 December, 2019 - 09:17

114447-fnabpgkphq-1551677076.jpg

आज एसडी बर्मनचे पुण्यस्मरण करताना त्याने संगीतबद्ध केलेली ग्रेट गाणी आठवत आहेतच. पण त्याने स्वतःच्या आवाजात गायिलेली गाणी विशेष आठवत आहेत. कारण अगदी वेगळाच आवाज आणि जर ही गाणी चित्रपटात पाहिली तर विशिष्ट सिच्युएशन मध्ये वापरला गेलेला तो आवाज म्हणून ही गाणी जास्त लक्षात राहतात. या आवाजात मला लगेच काही भीडत असेल तर त्यातील तीव्रता आणि आर्तपणा. हा आर्तपणा जेव्हा अमरप्रेमध्ये वापरता गेला तेव्हा “डोलीमें बिठाईके कहार” हे अप्रतिम गाणं जन्माला आलं आणि मनमोहन हा आपला पूर्वायुष्यातला नवरा गेल्यावर बांगड्या फोडणार्‍या शर्मिलाचं दु:ख जास्त गडद वाटु लागलं. एसडीची स्वतःच्या आवाजात गायिलेल्या गाण्यांची संख्या फार नसेलच. पण मला त्या गाण्यांबद्दल अतीव आकर्षण आहे. अशाच एका गाण्यबद्दल लिहावेसे वाटते. खुप आवडते गाणे…मेरे साजन है उसपार.

या गाण्यासाठी खास एसडीचा आवाज वापरण्याची कल्पनाच मला ग्रेट वाटते. कारण नुतन, अशोककुमारसारखे कसलेले अभिनेते, विमल रॉयसारखा दिग्दर्शक, बंदिनीसारखी सशक्त कथा. चित्रपटाचा शेवट जवळ आलेला. नदीचा परिसर, खेडवळ वातावरण आणि खेडुत माणसे. अशावेळी अगदी मातीलगतचा आणि मातीची आठवण आणणारा आवाज एसडी शिवाय दुसर्‍या कुणाचा असणार? शेवटी नात्यांमधील तीव्रता चरम सीमेवर आली असताना त्या भावनेला न्याय देणारा आवाज बहुधा निवडला गेला. पण त्याचवेळी नदीची पार्श्वभूमी देखिल लक्षात ठेवून हा आवाज निवडला गेला असावा असे मला वाटते. कारण नदी, होडगी आणि त्यातल्या मासेमारी करणार्‍यांची गाणी या सार्‍या वातावरणाशी मेळ खाणारा हा आवाज आहे.

नदी म्हटलं की बंगाली बाबूंच्या आवाजात ती आर्तता जास्त येत असावी. “ओ रे माझी….. मेरे साज है उस पार” या बंदिनी मधल्या गाण्यात अशीच आर्तता एस्.डी बर्मनच्या आवाजात येते. नुतन द्विधा मनस्थितीत आहे. कुणाला निवडावं? धर्मेंद्र जो आजच्या आयुष्यात आला आहे आणि अशोक कुमार जो पूर्वायुष्यातील प्रियकर आहे. ही चलबिचल इतक्या परिणामकारकरित्या फक्त नुतनच दाखवु जाणे. त्यातुन शैलेंद्रने लिहिलेले गाण्याचे ते सुंदर शब्द…”गुण तो ना था कोई भी अवगुण मेरे भुला देना…मुझे आजकी बिदा का मरके भी रहता इंतजार”…नुतनच्या मनाची घालमेल आणखि वाढवतात. ती जर धर्मेंद्र बरोबर जाईल तर सर्व सुखे समोर वाढुन ठेवलेली असतील. त्याचे तिच्यावर प्रेमही आहे. पूर्वायुष्यातला प्रियकर मात्र आता आजारी आहे. त्याची सोबत केली तर बहुधा कष्ट आणि दु:खाशिवाय पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही.

शेवटी विमल रॉयने मास्टर स्ट्रोक म्हणुन बोटीच्या हॉर्नचा वापर केला आहे. “मेरा खिंचती है आंचल मनमीत तेरी हर पुकार…” ही ओळ येताना बोट निघतानाचा हॉर्न वाजु लागतो. त्या हॉर्नमध्ये अक्षरशः गायीच्या हंबरण्याची व्याकुळता आहे. जणु पुर्वायुष्यातील प्रियकर अगतिक होऊन हाक मारत आहे. येथे सर्व संशय तटातट तुटतात. आणि नुतन धावत सुटते. किनारा आणि बोटींना जोडणारी एक एक फळी काढली जाते. किनार्‍यात आणि बोटीत आता फक्त एक फळी उरली आहे याची पर्वा न करता नुतन धावते आणि अखेर अशोक कुमारच्या बाहुपाशात विसावते…

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच आवडलं लेखन.
हे गाणं मनावर विलक्षण परिणाम करतं प्रत्येक वेळी ऐकल्यावर. एस डींंचा आवाज, त्यातली व्याकुळता अस्वस्थ करते. बंदिनी चित्रपटही भारीच आहे. धर्मेंद्रचं कामपण छानच झालं आहे.
पुण्यात बाजीराव रस्त्यावर जे अक्षरधारा नावाचं पुस्तकांंचं दुकान आहे, त्यांचं अक्षरधारा नावाचं एक मासिक निघतं. त्याच्या दिवाळी अंकात हेमंत गोविंद जोगळेकर यांचा 'पडद्यावरच्या कविता' नावाचा सुंदर लेख आला आहे. त्यात त्यांनीही या गाण्याला मोठा मान दिलाय Happy

अतिशय आवडतं गाणं. बोल, स्वर, चाल, चित्रीकरण सर्वच सुंदर!

बर्मनदांची सगळीच गाणी आवडतात.
मेरे साजन है उस पार -बंदिनी
सुनो मेरे मितवा - सुजाता
सफल होगी तेरी आराधना - आराधना
वहा कौन है तेरा - गाईड
डोलीमे बिठाके कहार - अमरप्रेम
अजून काही राहिले असेल तर जरूर सांगा. वरील सगळीच गाणी प्रिय आहेत Happy

खूपच छान लिहिलंय . वहा कौन है तेरा पण आवडीचं आहे. मुसाफिर..जाएगा कहांss मधला 'हां' तर माझं मन जिंकतो. फार सुंदर.

होय 'वहां कौन है तेरा ..." मस्त गाणे आहे.
.
दम ले ले .... दम ले ले घडीभर ये छैय्यां पाएगा कहां ............. खासच!

मस्त लिहीलंय Happy

रच्याकने मी ह्या लेखाचं शीर्षक मेरे साजन है उपासमार असं वाचलं :फेसपाम:

हे गाणं खूप आवडतं. तशी सचिनदांच्या आवाजातली सगळीच गाणी आवडतात. आराधनामधील ' काहेको रोये सफल होगी तेरी आराधना' हे गाणं फार टचिंग आहे.
त्यांच्या आवाजाला एक रस्टिक टच आहे, असं मला वाटतं.
मी एका कार्यक्रमात ऐकलं होतं की ह्या गाण्यासाठी त्यांना सुरात असलेला पण बेसूर किंवा गाण्याचं शिक्षण नसलेला वाटेल, असा आवाज हवा होता. बाकी कोणाचा आवाज ह्या काहीशा विचित्र अटीत बसत नव्हता. सचिनदांचा आवाज मात्र बरोबर तसाच वाटतो.

"मी एका कार्यक्रमात ऐकलं होतं की ह्या गाण्यासाठी त्यांना सुरात असलेला पण बेसूर किंवा गाण्याचं शिक्षण नसलेला वाटेल, असा आवाज हवा होता. बाकी कोणाचा आवाज ह्या काहीशा विचित्र अटीत बसत नव्हता. सचिनदांचा आवाज मात्र बरोबर तसाच वाटतो." - जावेद अख्तर ने त्याच्या गोल्डन इयर्स मधे सांगितलाय.

छान लेख.
हो, सचिन बर्मन यांचा आवाज वेगळाच होता. आर्तता असायची. पण नुसते गाणे ऐकल्यावर ही आर्तता फारशी भिडली नाही वैयक्तिक.

उदा. आराधना पाहिला असल्याने 'सफल होगी' हे फार फार भिडतं व गाणं फारच सुंदर वाटतं. पण मजा म्हणजे तेच 'बंदिनी' पाहिला नसल्याने 'साजन उस पार' तितकेसे भिडत नाही. नुसतंच 'एक छान गाणं" वाटतं. आता बंदिनी पहावा लागेल.

छान लेख.

मला ते बंदीनीमधे धर्मेंद्र्ला सोडून नुतन अशोककुमारकडे जाते हे काही आवडलं नव्हतं. शाळेत असताना टीव्हीवर बघितलेला. त्यामुळे मेरे साजन है उसपार काही फारसं भावलं नव्हतं. पण तुम्ही छान लिहीलंय.

शेवटी विमल रॉयने मास्टर स्ट्रोक म्हणुन बोटीच्या हॉर्नचा वापर केला आहे. “मेरा खिंचती है आंचल मनमीत तेरी हर पुकार…” ही ओळ येताना बोट निघतानाचा हॉर्न वाजु लागतो. त्या हॉर्नमध्ये अक्षरशः गायीच्या हंबरण्याची व्याकुळता आहे. >>> हे वाचून परत ऐकावसं वाटतंय.

“डोलीमें बिठाईके कहार” >>> हे मात्र आवडतं गाणं, एकदम आर्तता भिडणारी.

वावे, सामो, चीकू, अज्ञातवासी, भाग्यश्री१२३, बुन्नु, हर्पेन, वेडोबा, किल्ली, सीमंतिनी, स्वाती२, अ‍ॅमी प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार Happy

अनया, फेरफटका सुरेख आठवण. धन्यवाद

सुनिधी, अन्जू आभार Happy