सॉरी रे, मन तुला सोडुनी सुखास शोधत असते - तरही मिसरा - प्राजू

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2019 - 04:19

*तरही मिसऱ्यासाठी प्राजूचे आभार*
=====

सॉरी रे, मन तुला सोडुनी सुखास शोधत असते
कुणीच नसते तेव्हा दुःखा तुझीच सोबत असते

काय काय मी करतो हे मी स्वतः कशाला पाहू?
त्यांच्याकडून कळते, ज्या मूर्खांची पाळत असते

मनासारखा एखादाही क्षण नशिबी येईना
तरी बिचारी तिच्या परीने सदैव हासत असते

तुझी देहबोली तर हे नाकारे सारे काही
माझे वेडे हृदय तुझ्या डोळ्यांना वाचत असते

कमी नका मानू कोणी कुठल्याही सेकंदाला
सुरू होत असते काही, तर काही संपत असते

तुझी आठवण नसते तेव्हा मला न आठवतो मी
तुझी आठवण येते तेव्हा जागच जागत असते

किती ठिकाणी सादर केली, तरी लाभले नाही
'बेफिकीर'ची गझल जशा हृदयाला पोचत असते

-'बेफिकीर'!

(०४.१२.२०१९)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय मी करतो हे मी स्वतः कशाला पाहू?
त्यांच्याकडून कळते, ज्या मूर्खांची पाळत असते >> मस्त Lol

ह्या शेराच्या पुढची गजल वाचली, पण डोक्यात शिरली नाही, ह्या शेरात अडकुन राहीली.

Chhan

तुझी देहबोली तर हे नाकारे सारे काही
माझे वेडे हृदय तुझ्या डोळ्यांना वाचत असते>> मस्त.
छान गझल.
सेकंदाला ऐवजी क्षणाला नाही का जमणार?